दुकानाला चांगले दिवस आले होते. हळूहळू सुजाताच्या डिलिव्हरीची तारीख सुद्धा जवळ आली होती. सुजाताचे सासू सासरे आता खूपच उत्साहात होते आणि एके दिवशी अचानक सुजाताच्या पोटात दुखायला लागले. दिलेल्या तारखेच्या दहा दिवस आधीच सुजाता ने एका सुदृढ मुलीला जन्म दिला.
सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळाला पाहून सुजाता आजवरच्या सगळ्या वेदना, सगळे दुःख विसरली. मातृत्वाने तिच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी दिली होती. बाळाच्या आजी आजोबांना तर खूपच आनंद झाला होता. अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते.
रेवा सुद्धा तिच्या नवऱ्याला सोबत घेऊन बाळाला पाहायला आली. बाळाचे खूप लाड केले. सुजाताला मुलगी झाल्याचा रेवाला मनोमन आनंद झाला होता. तिला वाटले की बरे झाले सुजाताला मुलगा नाही झाला ते. नाहीतर बाबांनी वंशाचा दिवा म्हणून सगळे काही त्याच्यावर लुटवले असते.
मुलगी काय परक्याचे धन शेवटी. लग्न करून दुसऱ्या घरात निघून जाईल. आई बाबा सगळं काही आपल्या मुलांनाच देतील ह्या विचाराने तिला सुखावले होते. सुजाताच्या सासऱ्यांनी मुलीचे थाटामाटात बारसे केले. सासूबाईंनी बाळाचे नाव सावी ठेवले. सावी अगदी तिच्या बाबांच्या रवीच्या सारखी दिसायची. तिला पाहून तिचे सासू सासरे रवीचे बालपण पुन्हा जगत होते.
पाच वर्षानंतर
जिल्ह्याच्या ठिकाणी आज महिला दिनाच्या निमित्ताने मोठा सत्कार समारंभ आयोजित केला होता. एका मोठ्या उद्योजिकेच्या हस्ते हा सत्कार होणार होता. जिल्ह्याचे आमदार आणि खासदार दोघेही कार्यक्रमाला येणार होते. या
जिल्ह्यातील विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान होणार होता.
खासदार आणि आमदार दोघेही एकत्रच समारंभाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या मागूनच ज्या उद्योजिकेच्या हस्ते हा सत्कार होणार होता त्यांची गाडी दाखल झाली. ड्रायव्हर ने गाडी थांबवली आणि उतरून लगेच गाडीचा मागचा दरवाजा उघडला. एका महिला ड्रायव्हर ला बघून आधीच तिथले सगळेच आश्चर्य चकित झाले होते.
त्या ड्रायव्हर ने गाडीचा दरवाजा उघडला आणि आतून आकाशी रंगाची साडी घातलेली एक सव्वीस सत्तावीस वर्षांची महिला बाहेर उतरली. लिनन ची साडी टापटीप नेसून, हलक्याशा मेक अप मध्ये, आणि अर्धवट बांधलेल्या केसांमध्ये तिचे व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक दिसत होते. ती आत्मविश्वासाने चालत स्टेजवर गेली. तो स्टेजवर जाताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
समारंभासाठी आलेले प्रकाशराव त्या महिलेला पाहून एकदमच आश्चर्यचकित झाले. त्यांना तसे पाहून सोबत बसलेल्या उषाताईंनी त्यांना विचारले.
” अहो…काय झालेय…तुम्ही त्यांना इतके आश्चर्याने का पाहताय…?”
” अगं ही सुजाता आहे…” प्रकाशराव म्हणाले.
” सुजाता…?” उषाताईंनी प्रश्न केला.
” हो…रवीची बायको सुजाता…नंदिनी शी लग्न तुटल्यावर हिच्याशी झाले होते रवी चे लग्न…मी पाहिलं होतं हिला…शालू ताई घेऊन गेली होती मला रवीच्या घरी.. ” प्रकाश रावांनी सांगितले.
” काय..? तुम्हाला खात्री आहे की ही तीच आहे…?” उषाताई सुद्धा एकदमच आश्चर्य चकित होऊन म्हणाल्या. प्रकाशराव काही बोलतील इतक्यात मागून एका गाडीतून सुजाता चे सासू सासरे सावीला घेऊन उतरले. आणि त्यांच्यासाठी श्रोत्यांमध्ये विशेष ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये जाऊन बसले. उषाताई आणि प्रकाशराव त्यांना एकटक पाहतच बसले.
त्यानंतर स्टेजवर सूत्रसंचालन करणाऱ्यांनी घोषणा केली.
” आपल्या मेहनती मुळे आणि दूरदृष्टी असणाऱ्या दृष्टिकोनामुळे खूपच कमी वयात औद्योगिक जगतात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सुजाता देशमुख आता स्टेजवर आल्या आहेत…सुजाता ह्यांनी खूपच कमी वयात नारी मार्ट ची स्थापना केली…
आणि अवघ्या पाच वर्षात नारी मार्ट च्या पंचेचाळीस शाखा त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उघडल्या आहेत…नारी मार्ट मध्ये सगळा कारभार महिलाच बघतात…अगदी माल आणण्यापासून तो पोहचवण्यापर्यंत आणि पॅकेजिंग पासून बिलिंग पर्यंत सगळी कामे महिला करतात…
त्यांना राज्य सरकारने उद्योग रत्न पुरस्काराने गौरवले आहे…आणि आपल्या साठी अभिमानाची गोष्ट म्हणजे सुजाता देशमुख ह्या मूळच्या आपल्याच जिल्ह्याच्या रहिवासी आहेत…”
त्यानंतर पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. सुजाताचा सत्कार करण्यात आला. सुजाता ने सुद्धा आत्मविश्वासाने स्टेजवर छान भाषण दिले. आईला आजवरचा प्रवास उलगडून सांगितला. त्यानंतर सूत्रसंचालन करणारे पुढे म्हणाले.
” दुसऱ्याच प्रयत्नात भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा पास करणाऱ्या जिल्ह्याच्या कन्या नंदिनी नकुल पाटील ह्या स्टेजवर आल्या आहेत… मी सुजाता मॅडम ना विनंती करते की त्यांनी नंदिनी पाटील ह्यांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं…”
सुजाताने नंदिनीचा सत्कार केला. सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. सगळेच अभिमानाने नंदिनीला पाहत होते. सुजाता आणि नंदिनी दोघींनीही हसून एकमेकींना अभिवादन केले. पण त्या दोघींना आपल्या पूर्वायुष्यातील संबंध अजूनही माहीत नव्हता.
नंदिनीचे आई बाबा आणि सुजाताचे सासू सासरे मात्र ह्या विचित्र दैवयोगाला आश्चर्याने आणि कुतूहलाने पाहत होते. सूत्रसंचालकांनी नंदिनीला तिला दोन शब्द बोलण्याची विनंती केली. तशी ती स्टेजवर आली आणि म्हणाली.
” तुम्ही सर्वांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार…मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे…माझ्या आई वडिलांनी नेहमीच माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिले…माझ्या शिक्षणासाठी स्वतःच्या ऐपती बाहेरचा खर्च केला….माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा मला खूप साथ दिली…अगदी स्वतःच्या मुलीला सुद्धा एवढी साथ देत नसेल कुणी…मला समजून घेऊन, मला साथ देऊन त्यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला…
पण सगळ्यात जास्त आभारी आहे ती माझ्या नवऱ्याची…त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कधीच माझी साथ सोडली नाही…सतत माझ्या शिक्षणाला, माझ्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले…
माझा अभ्यास व्हावा म्हणून रोज सकाळी घरातील शक्य तितकी कामे करून ऑफिसला जायचे आणि परत आल्यावर सुद्धा बरीच कामे करायचे…अगदी स्वयंपाक सुध्दा…पहिल्या अपयशानंतर मी खूप खचले होते.. अगदी सगळं काही सोडून परत जायची तयारी केली होती…
तेव्हा त्यांनी माझे मनोबल वाढवले…माझ्या प्रत्येक प्रयत्नात त्यांचा विश्वास माझ्या सोबत होता…अशीच साथ जर प्रत्येक मुलीला, प्रत्येक सुनेला आणि प्रत्येक पत्नीला मिळाली तर मुली आयुष्यात काहीही करू शकतील…आपले स्वप्न पूर्ण करू शकतील….
ज्या प्रमाणे यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणेच एका यशस्वी स्त्री मागेही पुरुषाची खंबीर साथ असू शकते…म्हणून मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या…त्यांना प्रोत्साहन द्या…”
एवढे बोलून नंदिनीने आपले भाषण संपवले. नकुल डोळ्यात अभिमान घेऊन नंदिनीला पाहत होता. सरला आत्या आणि सुनीलरावांच्या डोळ्यात सुद्धा आपल्या सूनेबद्दल अभिमान दाटून आला होता. प्रकाशराव आणि उषाताई तर आज धन्य झाले होते. मग सगळ्यांनीच थोडेफार मनोगत व्यक्त केले आणि सत्कार समारंभ थाटात पार पडला.
तिथे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नंदिनीशी बोलायचे म्हणून थांबले होते. त्यांना नंदिनी कडून अभ्यासाबद्दल आणि स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन घ्यायचे होते. सुजाता मात्र कार्यक्रम आटोपल्यावर तिच्या सासू सासर्यांकडे जायला निघाली. तिची मुलगी सावी तिला पाहून लगेच तिला बिलगली.
सुजाताचे सासू सासरे मात्र अजूनही नंदिनी कडेच पाहत होते. हे पाहून सुजाता त्यांना काही विचारणार इतक्यात प्रकाशराव सुजाता कडे पाहत म्हणाले.
” सुजाता…तुला मोठं झालेलं बघून खूप आनंद झाला बघ…मला ओळखलंस का… ?”
” नाही काका…म्हणजे पाहिल्यासारखं तर वाटतंय पण कुठे पाहिलं ते लक्षात येत नाहीये माझ्या…” सुजाता म्हणाली.
” मी शालू ताई सोबत आलो होतो ना तुझ्या घरी…बरीच वर्षे झाली त्याला…” प्रकाशराव म्हणाले.
सुजाता प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहतच होती. इतक्यात सुजाता चे सासरे म्हणाले.
” सुजाता… हे प्रकाशराव आहेत…नंदिनीचे वडील…”
” नंदिनी म्हणजे तीच ना… जिचा आता मी सत्कार केला…खूप मोठं कर्तृत्व आहे काका तुमच्या मुलीचं…” सुजाता हसून त्यांना म्हणाला.
” हो…कर्तृत्ववान तर ती आहेच…पण तू सुद्धा खूप हिमतीने तुझं विश्व उभारलेस…रवीनंतर तू आधार झालीस ह्यांचा…” प्रकाशराव तिला म्हणाले.
” तुम्हाला हे सगळे कसे माहीत…तुम्ही ह्यांना कसे ओळखत होतात…” सुजाता ने प्रश्न केला.
आपल्या बाबांना सुजाताशी बोलताना पाहून नंदिनी सुद्धा कुतूहलाने तिथे आली आणि म्हणाली.
” बाबा…तुम्ही इथे…?” मग तिचे लक्ष रवीच्या आई बाबांकडे गेले. त्यांना तिथे पाहून ती आश्चर्यचकित झाली. नेमकं काय सुरू आहे ते सुजाताला कळतच नव्हते. नंदिनी ने पुढे येऊन त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली.
” तुम्ही…? इथे…? म्हणजे तुम्ही इथे कसे काय…?” नंदिनीने विचारले.
” तू ओळखतेस आई बाबांना…?” सुजाता ने आश्चर्याने विचारले.
” हे तुमचे आई बाबा आहेत…?” नंदिनी ने पुन्हा आश्चर्याने विचारले.
” हो…असेच समज…अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करतात हे माझ्यावर…” सुजाता म्हणाली.
” मुलीप्रमाणे प्रेम करतात म्हणजे…” नंदिनी ने प्रश्न केला.
” म्हणजे हे माझे सासू सासरे आहेत…” सुजाता म्हणाली.
” काय…?” नंदिनी आश्चर्याने म्हणाली.
” होय नंदिनी…ही आमची सून आहे सुजाता…आमच्या रवीची बायको…”
आता मात्र नंदिनी एकदमच थक्क झाली. एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो हे तिला कळतच नव्हते. सुजाता ला सुद्धा आई बाबा काय बोलत आहेत ते कळत नव्हते. तिचा प्रश्नार्थक चेहरा बघून तिचे सासरे तिला म्हणाले.
” सुजाता… ही नंदिनी आहे…तीच नंदिनी जिच्याशी रवी चे लग्न ठरले होते…जे ऐन लग्नाच्या दिवशी मोडले आणि मग तुझ्याशी त्याचे लग्न झाले…”
आता मात्र आश्चर्य चकित व्हायची वेळ सुजाताची होती. कारण ती आज ज्या जागी होती ते फक्त अन् फक्त नंदिनी मुळेच. ती नंदिनी च्या वाट्याला येणारे आयुष्य जगली होती. नंदिनीला समोरासमोर पाहून सुजाता एकदमच थक्क झाली.
क्रमशः
नंदिनी आणि सुजाताची भेट होण्यामागे काय दैवलेख असेल…? सुजाता एवढी मोठी व्यावसायिक होण्यामागे तिचा काय संघर्ष असेल…? पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.