दोघीही एकदमच गप्प झाल्या. नेमकं काय बोलावं हे दोघींनाही कळत नव्हते. मग नंदिनी ने स्वतःच हात पुढे केला आणि म्हणाली.
” हाय…”
” हॅलो… नाइस टू मीट यू…” सुजाता सुद्धा हात पुढे करत म्हणाली.
घरच्यांना सुद्धा काय बोलावे आणि काय नको ते कळत नव्हते. मग एकमेकांशी जुजबी बोलणी करून ते तिथून जायला निघाले. पण सुजाता आणि नंदिनी मात्र तिथेच उभ्या होत्या. मग सुजाता सुद्धा तिथून जायला निघाली तेव्हा नंदिनी तिला म्हणाली.
” सुजाता…मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे…”
” बोल ना…मलाही आवडेल तुझ्याशी बोलायला…” सुजाता म्हणाली.
मग दोघीजणी तिथल्याच एका बेंचवर जाऊन बसल्या.
” एक विचारू का…?” नंदिनी म्हणाली.
” विचार ना…” सुजाता म्हणाली.
” तुला माझा राग येत असेल ना…?” नंदिनी ने विचारले
” का…? तुला असं का वाटतंय…?” सुजाताने प्रश्न केला
” माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं ना…” नंदिनी म्हणाली.
” तुझ्यामुळे म्हणजे…?” सुजाताने पुन्हा प्रश्न केला.
” म्हणजे मी त्या दिवशी लग्नाला नकार दिला म्हणूनच तुझं लग्न झालं ना…” नंदिनी म्हणाली.
” असं नाहीये…हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो…कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलेले असेल म्हणून त्या दिवशी तुझे लग्न न होता माझे लग्न झाले…” सुजाता म्हणाली.
” हे फक्त मनाच्या समाधानासाठी बोलायला बरे आहे…पण प्रॅक्टिकली बघितले तर हेच खरं आहे की माझ्या वाटचे भोग तुझ्या वाट्याला आलेत…माझ्या घरच्यांनी फार काही चौकशी न करता माझं लग्न ठरवले आणि मला सत्य कळल्यावर ऐन वेळेला मी नकार दिला…आम्ही आधीच चौकशी करून त्या स्थळाला नकार दिला असता तर कदाचित तुला त्या दिवशी लग्न करावे लागले नसते…” नंदिनी म्हणाली.
” असे नाहीये नंदिनी… तूच विचार कर… तुझं आणि ह्याचं लग्न ठरलं नसतं किंवा तुम्ही लग्नाच्या बऱ्याच आधी नकार कळवला असता तरीही काही झालं नसतं…समजा तुझ्या ऐवजी आधी माझ्यासाठी ह्यांचे स्थळ आले असते तरीही माझ्या आई वडिलांनी काहीही चौकशी न करता फक्त श्रीमंत आहे म्हणून लग्न लावले असते…
कारण आम्ही पाच बहिणी आहोत अन् मी सगळ्यात मोठी आहे…त्यामुळे माझ्या बाबांनी फार काही चौकशी केलीच नसती…आणि ह्यांच्या ऐवजी कुण्या दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झाले असते तरी तो संसार चांगलाच झाला असता ह्याची सुद्धा खात्री नव्हती…त्यामुळे जे झालंय त्यामध्ये तू स्वतःला अजिबात कारणीभूत नकोस मानू…” सुजाताने स्पष्टीकरण दिले.
” आणखी एक विचारू का…?” नंदिनी म्हणाली.
” विचार ना.. ” सुजाता म्हणाली.
” तू कशी काय राहिलीस त्या वातावरणात…कशी हाताळलीस सगळी परिस्थिती…आणि एवढं सगळं घडून गेल्यावरही पुन्हा स्वतःला कसे सावरलेस…?” नंदिनी ने विचारले.
” सगळं काही सोप्पं अजिबात नव्हतं…पदोपदी अडचणी येत गेल्या…पण आई बाबा म्हणजेच माझे सासू सासरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते म्हणून हे सगळे काही शक्य झाले…रवी गेले तेव्हा सावी माझ्या पोटात होती…मातृत्वाची चाहूल एका स्त्रीला खूप कणखर बनवते…मी सुद्धा काही वेगळं केलं नाही… सावी साठी, आई बाबांसाठी मला काहीतरी करणे भागच होते…मी फक्त प्रामाणिक प्रयत्न केले…आणि त्या प्रयत्नांना यश आले एवढेच…” सुजाता म्हणाली.
” तू खरंच ग्रेट आहेस…तुझ्या जागी मी असते ना तर खचून गेले असते…सगळं काही सोडून माहेरी परत आले असते अन् अश्रू ढाळत बसले असते…पण तू शून्यातून विश्व उभारलेस…चालता बोलता प्रेरणास्रोत आहेस तू…आय एम रिअली वेरी प्राउड ऑफ यू…” नंदिनी तिला मिठी मारत म्हणाली.
” थँक यू सो मच डियर…” सुजाता हसून म्हणाली.
आणि दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. अगदी निर्मळ मनाने. नंदिनीच्या मनात इतकी वर्षे जो गील्ट होता तो आता निघून गेला होता. सुजाताच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने ती भारावून गेली होती. सुजाताला सुद्धा नंदिनीला भेटून आनंद झाला होता.
सुजाता गाडीजवळ गेली. तिच्या सासुबाई तिला म्हणाल्या.
” सुजाता…चल निघूयात आता…तुझ्या माहेरची मंडळी वाट पाहत असेल ना…”
” हो आई…” सुजाता काहीशी विचार करत म्हणाली.
सगळेच सुजाताच्या माहेरी जायला निघाले. तिथून पाऊण तासांच्या अंतरावर सुजाताचे माहेर होते. सुजाता माहेरी पोहचली. तिच्या आई बाबांनी खूपच उत्साहाने तिचे स्वागत केले. तिच्या बहिणी तिला पाहून खूप खुश झाल्या.
सुजाताच्या माहेरच्या घराचा आता कायापालट झाला होता. सुजाताने तिच्या माहेरी सुद्धा आर्थिक मदत केली होती. तिच्या लहान बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा तिनेच उचलली होती. तिच्यापेक्षा लहान असणारी तिची बहिण सुद्धा तिच्या नारीमार्ट मध्ये चांगल्या पदावर काम करत होती. इतर बहिणींचे शिक्षण सुरू होते.
रवी गेल्यावर जेव्हा सुजाताला माहेरी न्यायचा विषय निघाला होता तेव्हा तिच्या आई बाबांनी हतबलता दाखवून नकार दिला होता पण तेच आता सारखे म्हणायचे की सासरच्यांना सोडून माहेरी कायमची परत ये. त्यांच्या पेक्षा आम्ही तुझे सख्खे आहोत हे कायम पटवून देत राहायची.
पण हे सगळं फक्त आणि फक्त आपण यशस्वी झालोत म्हणून बदललंय हे तिला कळत होतं. त्या मानाने तिला तिच्या सासरच्या मंडळींच खूप कौतुक वाटायचं. कारण काहीही कारण असलं तरी त्यांनी तिला आसरा तर दिलाच होता पण आई वडिलांचं प्रेम सुद्धा दिलं होतं.
अगदी ती काहीच नव्हती तेव्हाही आणि आताही. तिच्या मुलीला तर ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे. सावी सुजाता पेक्षा तिच्या आजी आजोबांकडेच राहायची. पडत्या काळात त्यांनी तिला खूप साथ दिली होती. आणि तिलाही सगळ्यात जास्त त्यांचाच आधार वाटायचा. नंदिनी स्वतःशीच विचार करत होती. इतक्यात तिची आई तिला एकटं पाहून म्हणाली.
” मी काय म्हणते सुजाता…तू कायमची इथेच का येत नाहीस…? आपण सगळे एकत्र राहूयात… सावीला सुद्धा आजी आजोबांचे प्रेम मिळेल…”
” आम्ही तिथेच ठीक आहोत आई…आमचं सगळं ठीक चाललंय…” सुजाता विषय टाळत म्हणाली.
” काय ठीक चाललंय…तुझा नवरा असता तर वेगळी गोष्ट असती…पण आता कोणासाठी राहायचं तिथे…आणि कामाचं म्हणशील तर तुझे बाबा पण आहेत ना इथे तुझ्या मदती साठी…तुझे बाबा तर तुझ्या सासऱ्यांपेक्षा जास्त विश्वसनीय आहेत तुझ्यासाठी…” आई म्हणाली.
” आई एक विचारू…?” सुजाता म्हणाली.
” विचार ना…” आई म्हणाली.
” आज जर मी यशस्वी नसते…तीच घाबरट, दयनीय, नवऱ्याचा आधार नसलेली सुजाता असते तरी सुद्धा तुम्ही मला आणि सावीला कायमचे घरी ठेवून घेतले असते का…?” सुजाता ने सरळ विचारले.
सुजाता ची आई काही बोलणार इतक्यात त्यांना रवी गेल्यावर घडलेला प्रसंग आठवला. ज्यात सुजाता मला घरी परत घेऊन जा म्हणून आर्जव करत होती पण तिला आपण सोबत घेऊन यायला तयार नव्हतो. तुम्ही ठेवाल तसे राहील, काही तक्रार करणार नाही अशी ग्वाही देऊन तिला सासरी ठेवून घ्या यासाठी केलेल्या विनंत्या आठवल्या आणि त्या स्वतःशीच खजील झाल्या.
पुढे त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. सुजाता एक दिवस माहेरी थांबून मग तिच्या मुलीसोबत आणि सासू सासर्यांसोबत पुन्हा इंदूरला जायला निघाली. सुजाताच्या आईला आज तिला निरोप देताना दाटून येत होते. सुजाता च्या मनात अजूनही ती गोष्ट आहे हे जाणवल्याने त्यांना वाईट वाटत होते.
सुजाता वर आपण अन्याय केला हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांना आतून कुठेतरी अपराधीपणाची भावना दाटून येत होती. तरीही ते सगळे चेहऱ्यावर न दिसू देता त्यांनी सुजाताला निरोप दिला.
गाडीत बसल्यावर सुजाता च्या सासरेबुवांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला तर समोरून रेवा बोलत होती. रेवा तिच्या बाबांना म्हणाली.
” बाबा..प्लिज माझी मदत करा…ह्यांना व्यवसायात खूप नुकसान झाले आहे…त्यांनी ज्या बिल्डरच्या प्रोजेक्ट मध्ये पैसे लावले होते त्याने फसवले ह्यांना…त्या गुंतवणुकीसाठी जवळपास सगळी मालमत्ता विकायला काढली होती ह्यांनी…सुदैवाने घर आणि दोन तीन प्लॉट तेवढे ठेवले होते…पण ह्यातून सावरायला आम्हाला आता पैशांची गरज आहे बाबा…तुम्ही सुजाताला सांगा ना…तुम्ही म्हटलं तर ती कधीच नकार देणार नाही…” रेवा म्हणाली.
सुजाताला ऐकू जाणार नाही एवढ्या आवाजात तिचे बाबा तिला म्हणाले.
” सॉरी…मी नाही सांगू शकत तिला…आणि तू जे आमच्या सोबत केलेस त्याचंच फळ मिळालंय तुला…बापाच्या म्हातारपणी त्याला फसवलस तू…खूप चुकीचं वागलीस तू आयुष्यात…आणि सुजाता च्या कष्टाचा पैसा मी अजिबात तुम्हाला द्यायला सांगणार नाही…” तिचे बाबा म्हणाले आणि त्यांनी फोन कट केला.
सुजाता त्यांच्याकडे पाहत म्हणाली.
” काय झालं बाबा…? कुणाचा फोन होता…?”
” काही नाही… राँग नंबर होता…” सासरे म्हणाले.
” रेवा ताईंचा फोन होता ना…” सुजाता म्हणाली.
” तुला कसे कळले…?” सासरे बुवांनी आश्चर्याने विचारले.
” तुम्ही जरी आरामात बोलले असले तरी मी रेवाताईंचा आवाज आला मला…” सुजाता म्हणाली.
“…………..” सासरे.
” मला वाटतं तुम्ही त्यांना मदत करायला हवी…” सुजाता म्हणाली.
” तिने इतकं वाईट केल्यानंतरही तुला असं वाटतं…” सासरे म्हणाले.
” हो बाबा…त्यांनी जे केलं त्याचं फळ त्यांना मिळालंय…आणि आपण इतरांना मदत करतोच की…इतरांसोबत टाय-अप करतोच…तशीच संधी रेवाताईंना देऊ…पण सोबतच अट ठेवू की सगळं काही रेवाताईंनी सांभाळावं म्हणून…म्हणजे आपल्या नारीमार्ट ची पॉलिसी पण राहील महिलांसोबतच काम करण्याची…त्या योग्य काम करू शकल्या तर त्यांना आणखी जबाबदारी देऊ…नाहीतर त्यांच्याशी करार संपवून टाकू…”सुजाता म्हणाली.
” तुझं मन खरंच खूप मोठं आहे सुजाता…मी बाप असूनही माझ्या मनात तिला मदत करण्याची इच्छा झाली नाही…अन् तुझ्यासोबत ती इतकी वाईट वागून ही तू तिला मदत करायला तयार आहेस…”
” आयुष्यात एक संधी तर प्रत्येकाला मिळायला हवी ना बाबा…” सुजाता म्हणाली.
” हम्म…बरोबर बोलत आहेस तू…” तिचे सासरे म्हणाले.
तिच्या सासुबाई मात्र डोळ्यात पाणी आणून सुजाता कडे पाहत होत्या. त्यांनी देवाला हात जोडले आणि मनोमन सुजाता ला त्यांच्या आयुष्यात आणल्या बद्दल देवाचे आभार मानले.
समाप्त.
माझ्या निर्णय या कथेला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. सुरुवातीला रोज एक भाग टाकायचे पण नंतर काही कारणास्तव भाग टाकायला उशीर व्हायला लागला. पण तरीही तुम्ही सांभाळून घेतले त्याबद्दल खूप आभार.
नंदिनी पासून सुरू झालेली ही कथा सुजाताच्या आयुष्यात कधी डोकावू लागली ते लिहिताना माझं मलाही कळलं नाही. प्रत्येक कथा आपला शेवट घेऊनच जन्माला येते हे मलाही नव्याने कळले. कारण मला कथा फक्त दोन भागात लिहायची होती पण मी ही त्या कथेत गुंतले आणि आपल्या कथेने एवढा मोठा प्रवास पार पाडला. सुजाता हे पात्र फक्त एका भागापुरते होते पण ते पात्र कथेची सगळ्यात जमेची बाजू बनले.
तुम्हाला कथेतील कुठले पात्र सगळ्यात जास्त आवडले ते नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला लिहायला कायम प्रोत्साहन देतात. पुन्हा भेटूया एक नवीन मराठी कथा घेऊन. धन्यवाद
©®आरती निलेश खरबडकार.