नाम्या वारीला जायची तयारी करीत होता. तो अन् त्याची बायको दोघेही यंदा जोडीने वारीला जाणार होते. नाम्याची ही तिसरी वारी होती. अन् त्याच्या बायकोची म्हणजेच लक्ष्मीची ही पहिलीच वारी. नाम्या अन् लक्ष्मीचं यंदाच लग्न झालं होत.
नाम्या च खरं नाव नामदेव. सखू अन् गणपत चा एकुलता एक मुलगा. त्याला सर्वजण प्रेमाने नाम्याच म्हणत. त्याच खर नाव नामदेव आहे हे तर आता कुणाला आठवत देखील नसेल. नाम्याच्या घरी तो, त्याची आई , बाबा अन् बायको एवढं चौकोनी कुटुंब. त्याच्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा होता. त्यावर त्याच्या कुटुंबाची गुजराण व्हायची. कधी कधी नाम्या दुसऱ्यांच्या शेतात मजुरीलाही जात असे. मिळेल ते काम नाम्या आनंदाने करी. नाम्या अत्यंत समाधानी वृत्तीचा होता. मिळेल त्यामध्ये सुखात राहायचा. नाम्याचे वडील हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त. अत्यंत साधी राहणी आणि मुखी पांडुरंगाचे नाम. संसारासोबत परमार्थ सुद्धा प्रामाणिकपणे साधत. त्यांनी आयुष्यात कधीही कुणाचेही मन दुखावले नाही. दरवर्षी आषाढी वारी ला पंढरपूर ला जात असत. आषाढी एकादशी जवळ यायला लागली की त्यांना एकच हुरहूर लागायची. पंढरीला जाण्याची. वारीची परंपरा ही त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली होती. एकदा नाम्यासुद्धा त्यांच्यासोबत पंढरीच्या वारीला सोबत गेला. आणि पांडुरंगाच्या भक्तीत रंगला. संतमंडळींच्या संगतीत पंढरीची वारी करून आल्यावर जणू त्याच्या जन्माचे सार्थक झाले. आता नाम्याने ठरविले. दरवर्षी वारीला जायचं आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. नाम्याच्या आईला मात्र नाम्याच्या वडिलांचं दरवर्षी वारीला जाणं आवडायचं नाही. घरची कामे सोडून दरवर्षी वारीला जातात म्हणून ती चिडायची. नाम्याची बायको लक्ष्मी मात्र याउलट मलापण वारी करायची म्हणून नाम्याच्या मागे लागलेली.
नाम्याचे वडील आजारी होते. म्हणून यंदा नाम्या अन् लक्ष्मी दोघेच जाणार होते. पण आपली वारीची परंपरा आपला मुलगा नाम्याची आई सखू मात्र बडबडत होती.
” तुझे बाबा दरवर्षी वारी करतात हे काय कमी होतं की आता तुम्ही दोघं बी जाणार आहात… त्या विठ्ठलाने काय केलं आपल्यासाठी…समद आयुष्य मी दारिद्र्यात घालवलं…पण तुमचा तो विठ्ठल काही आला नाई मदतीला…”
” अग आई, अस बोलू नये…देवाने आपल्याला खूप काही दिलय…आपण सुखा समाधानाने दोन घास खातोय ते काय कमी हाय का ?” नाम्या म्हणाला. अन् नाम्या परत आपल्या कामात गुंतला. सखू मात्र अजूनही बडबडत होती. नाम्या आणि लक्ष्मी त्याच्या आईवडिलांच्या अन् देवाच्या पाया पडले आणि वारीला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले.
सखू मात्र धुसफूसत होती. नाम्याचे वडील नेहमीप्रमाणे ऐकुन दुर्लक्ष करत होते. घरात एका जागी बसून विठ्ठलाचे नामस्मरण करीत होते. नवऱ्याने तिच्याकडे दुर्लक्ष केल्यावर तिला आणखी राग येत असे. रागारागातच सखूने घरची कामे उरकायला घेतली. सखुने पाण्याची कळशी घेतली आणि ती पाणी भरायला बाहेर जाणार गेली. पाण्याची कळशी भरून आणताना सखू दारातच अडखळून पडली. तिचा पाय मुरगळला होता. डोक्याला सुद्धा मार लागला होता. पाण्याची कळशी फुटून तिथे नुसता चिखल झाला होता. सखुचा पाय खूप दुखत होता. तिला उठवल्या जात नव्हते. इतक्यात दारात नाम्या अन् त्याची बायको येऊन उभे राहिले. आईला खाली पडलेलं पाहून नाम्या अन् लक्ष्मी दोघेही पुढे सरसावले आणि सखुला आधार देत घरात घेऊन गेले. सखूला कुठे लागले ते पाहू लागले. इतक्यात सखुला आठवले की ते दोघे वारीसाठी निघाले होते मग परत कसे आले..?
” तुम्ही दोघं परत कशी काय आलात ?” सखू ने विचारले.
” अग आई, आमची सामानाची एक थैली घरीच राहिली व्हती. तीच घ्यायला म्हणून परत आलतो.” नाम्या म्हणाला.
” असं होय .”
” पण आता तुला लागलंय…दोन चार दिवस तुला बी आराम करायला पायजे…अन् बाबांना पण बर नाही…मग आम्ही कसे जाणार..?”
” अरे पण वारी चुकेल त्याच काय..?” नाम्या चे बाबा त्याच्या दिशेने येत म्हणाले.
” पण तुम्हाला इथ सोडून पण नाही जाऊ शकत….मी पांडुरंगाला इथूनच हात जोडीन…आणि पांडुरंगाला पण समद कळतंय की.”
” राम कृष्ण हरी.” नाम्याचे बाबा तिथून जात बोलले. पण यंदा आपली वारी चुकेल याची हुरहूर त्यांना वाटत होती.
नाम्या अन् लक्ष्मी घरीच थांबले. नाम्या ने त्याच्या आईवडिलांची खूप सेवा केली. लक्ष्मी सुद्धा अगदी हसतमुखाने सासू सासऱ्यांची सेवा करायची. लवकरच सखूचा पाय अगदी ठणठणीत झाला. नाम्या च्या वडिलांची तब्येत सुद्धा बरी झाली. पण नाम्या च्या वडिलांना मात्र वारी चुकल्याच दुःख होते. इतक्या वर्षी इमाने इतबारे केलेली पांडुरंगाची वारी त्याला आठवली. नाम्या मात्र अगदी प्रसन्न दिसायचा. सतत आईवडिलांच्या सेवेत मग्न असायचा.एके दिवशी सकाळी सखू उठली. आज लक्ष्मी उठलेली दिसत नव्हती. सखू ने लक्ष्मीला आवाज दिला. मात्र लक्ष्मीने तिच्या हाकेला ओ दिला नाही. तिने नाम्याला सुद्धा हाक मारली पण नाम्या सुद्धा कुठेच दिसत नव्हता. सखू नाम्याच्या खोलीत जाऊन बघते तर तिथे देखील ते दोघे नव्हते.
सकाळी सकाळी कुठे बरे गेले असतील दोघेही. सखू विचारात पडली. बराच वेळ उलटून गेला तरीही दोघेपण आलीच नाहीत. आता मात्र सखू काळजीत पडली. नाम्याच्या वडिलांना तिने त्या दोघांचा शोध घ्यायला पाठवायचे ठरविले.
इतक्यात नाम्या अन् लक्ष्मी दोघेही घराच्या दारात येऊन उभे राहिले. दोघांच्या हातात कपड्यांच्या पिशव्या आणि इतरही बरच सामान होतं. त्यांच्या हातात सामान बघून सखू ला नवल वाटले. " सकाळपासून कुठं गेले होते दोघं बी...मी कवापासून वाट बघतेय तुमची." सखू पुढे येत म्हणाली. " सकाळपासून..? अग आई... असं काय करतेस...आम्ही तर बऱ्याच दिवसापासून वारीला गेलो होतो. " " माझी काय चेष्टा करतोस काय...आज सकाळी सकाळी मी आवाज दिला तर दोघंही घरी नव्हते तुम्ही...मला न सांगता कुठे गेले होते...?"
” अग आई…आम्ही दोघेही वारीला गेलो होतो…तू स्वप्न पाहिलं असशील…”
” काय…?” सखू आश्चर्याने नाम्या कडे बघत म्हणाली.
इतक्यात नाम्याचे बाबा तिथे पोहचले. सखूला आश्चर्यचकित झालेलं पाहून आणि नाम्या च्या हातचे सामान बघून त्यांनी तुझा तोच प्रश्न विचारला.
“काय रे नाम्या…सकाळपासून कुठे होतास…?….तुझ्या आईला किती काळजी लागून राहिली होती.”
” पण बाबा आम्ही दोघेही वारीसाठी गेलो होतो पंढरीला.”नाम्या आता गोंधळला होता. काय होत आहे हे त्याला कळत नव्हते. आईबाबा असं का विचारताय ह्याचा काही अंदाज त्याला लागत नव्हता. लक्ष्मी सुद्धा नाम्या च्या मागे गपगुमान उभी होती. ती सुद्धा तितकीच गोंधळलेली होती.
” तुम्ही दोघं बी कालपर्यंत घरीच होतात… आज सकाळी दिसलेच नाहीत… आणि आता म्हणताय की वारीला गेलो होतो…” नाम्याचे वडील म्हणाले.
आता मात्र सर्वांच्या लक्षात सर्व प्रकार आलेला. नाम्या अन् लक्ष्मीच्या अनुपस्थितीत साक्षात विठ्ठल रखुमाई नाम्या अन् लक्ष्मीच्या रुपात त्याच्या आईवडिलांची सेवा करीत होते. नाम्याचे वडील तर सरळ देवघरात गेले आणि विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहून नतमस्तक झाले.
” देवा…साक्षात तू माझ्या घरी होतास…पण मी तुला ओळखू शकलो नाही…माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी तू प्रत्यक्षात अवतरलास…साक्षात देवाकडून मी सेवा करवून घेतली…मला माफ कर देवा… मला माफ कर…” सखू, नाम्या आणि लक्ष्मीसुद्धा तिथे आले. ते सुद्धा देवाच्या पाया पडले. सखुला तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता. ज्या पांडुरंगाला आपण आजवर मानलं नाही..नवऱ्याला सुद्धा तिने अनेक दूषणं लावली होती. तोच पांडुरंग तिच्या संकटकाळात तिच्या मदतीसाठी धावून आला होता. अगदी पोटच्या मुलाप्रमाणे तिची सेवा केली होती.
आणि तेव्हापासून सखू दरवर्षी न चुकता आषाढी वारीला जायला लागली. नाम्या त्याच्या सर्व कुटुंबासह आषाढी वारी करू लागला. पुढे नाम्याला मुलं झाली. आणि त्यांनीसुद्धा वारीची परंपरा कायम ठेवली. नाम्याचे कुटुंब आजही पांडुरंगाच्या भक्तीत लीन आहे. पांडुरंगाचे वारकरी म्हणून आजही मोठ्या अभिमानाने आषाढीला जातात. चांगल्या मार्गाने संसार करून परमार्थ कसा साधावा याचा अगदी साधा सरळ मार्ग वारकरी संप्रदायाने जगाला दाखविला.
आरती खरबडकर.