सुधा आणि सुरेशच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. सुरेशची परिस्थिती जेमतेमच होती. घरी थोडी शेती होती. सुरेश दिवसभर राबायचा आणि आपल्या परिवाराला चांगल्यातल चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. सुरेशच्या घरी त्याचे आईवडील, बायको सुधा आणि तो असे चारच जण होते. सुरेशचे आईवडील सुद्धा त्याला जमेल तसे त्याच्या संसारात मदत करत होते.
पण सुद्धा मात्र या संसारात खुश नव्हती. तिची सुरुवातीपासूनच शान शौकीत राहायची इच्छा होती. पण आधी माहेरची गरिबी आणि नंतर नवरा सुद्धा फार श्रीमंत नाही भेटला म्हणून तिची सतत चिडचिड व्हायची. सुरेश सोबत तर ती नेहमीच या विषयावरून भांडायची. एव्हाना सुरेशला तिच्या या भांडणाची सवय सुद्धा झाली होती.
तिच्या मैत्रिणी चांगल्या श्रीमंत घरी नांदत होत्या. ही त्यांना पाहून मनातल्या मनात आपल्या नशिबाला दोष द्यायची. सासू सोबत सुद्धा सतत भांडायची. सुरेश मात्र मेहनत करून सुधाच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. पण एखादी गोष्ट मिळाली तरीही तिला आणखी चांगली गोष्ट हवी असायची. एखाद्या बाईकडे एखादी साडी पाहिली की हिला तशीच साडी हवी असायची.
पण सुरेश सुद्धा तिच्या मागण्या पूर्ण करून थकत होता. तो मेहनत करत होता पण आहे ती परिस्थिती बदलायला जरा तरी वेळ लागणारच होता. पण सुधा कडे मात्र त्यासाठी संयम नव्हताच. तिला प्रत्येक गोष्टीची घाई असायची. आणि त्यावरूनच मग दोघांतील वाद वाढतच गेले. सुधा काही केल्या ऐकायची नाही. अतिशय हट्टी स्वभावामुळे आणि भांडखोरपणामुळे तिचे सुरेशशी पटेनाशे झाले.
एके दिवशी तिने सुरेशजवळ एका महागड्या साडी साठी हट्ट केला. पण सुरेश ने तिला काही दिवस थांबायला सांगितले. त्यावर ती नाराज झाली. पण दोन तीन दिवसानंतर जेव्हा त्याची बहीण काही कामानिमित्ताने माहेरी आली तेव्हा ती परत जाताना त्याने तिला खाऊ म्हणून काही पैसे दिले. आणि त्यावरूनच सुधाने त्याच्याशी खूप भांडण केले. माझ्या साडीसाठी तुमच्याजवळ पैसे नाहीत आणि बहिणीला द्यायला पैसे आहेत म्हणून. यावरून दोघांमध्ये खूप वाद झाले.
शेवटी ती त्याला सोडून माहेरी निघून गेली. सुरेशने बराच प्रयत्न केला तिला समजावून घरी परत आणण्याचा. पण तिने त्याचे काहीच ऐकले नाही. तिच्या माहेरच्यांनी पण खूप समजावले. पण सुधाला पुन्हा त्या घरी जायचं नव्हतच. मग तिच्या घरच्यांचे सुद्धा तिच्यापुढे काही चालले नाही. आणि सुरेश आणि तिचा घटस्फोट झाला.
सुधाला एकदम हुश्श वाटलं. तिला वाटलं आता आपण मोकळं झालो. पण तिच्या घरच्यांना मात्र आता तिच्या दुसऱ्या लग्नाची काळजी वाटू लागली. म्हणून त्यांनी तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पण सुधाने त्यांना निक्षून सांगितले की मुलगा कसाही असला तरी चालेल. पण चांगला श्रीमंत हवा. आता आपली परिस्थिती इतकी गरीब असताना सुधा साठी श्रीमंत नवरा कसा शोधायचा हा त्यांच्यापुढे प्रश्न पडला.
पण तिच्या नशीबाने तिला लवकरच एक श्रीमंत स्थळ चालून आले. मुलाचं सुधीरच सुद्धा हे दुसरं लग्न होतं. त्याची पहिली बायको वारली होती. सुधीर साधारण चाळीस वर्षांचा होता. पण सुधाला त्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नव्हता. तिला फक्त श्रीमंत मुलाचं स्थळ पाहिजे होतं. मग तिच्या घरच्यांनी सुद्धा जास्त आढेवेढे न घेता तिचं सुधीर शी लग्न लावून दिलं.
लग्न करून सुधा सुधीरच्या घरी आली. आणि त्याच्या घरचं वैभव पाहून मनात खूप आनंदली. सगळं काही तिच्या मनाप्रमाणे झालं होतं. सुधा एकदमच हरखून गेली होती. पण लवकरच ती स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येणार होती.
सुधीरला अनेक वाईट सवयी होत्या. दारू आणि सिगारेट तर रोजचेच होते. संध्याकाळी त्याचं ऑफिस सुटलं की एखाद्या बार मध्ये जाऊन बसायचा. आणि रात्री खूप उशिरा घरी यायचा. सुधा ने त्याला एकदा याबाबत जाब विचारला. तेव्हा त्याने तिला एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला.
” बायको आहेस…बायको सारखी वागत जा…डोक्यावर बसायचा प्रयत्न नको करूस…नाहीतर तुझी लायकी दाखवून द्यायला मला वेळ लागणार नाही…”
एवढे बोलून सुधीर ने तिला एक घाणेरडी शिवी दिली आणि रूमचे दर जोरात आपटून बाहेर निघून गेला. सुधा त्याला पाहतच राहिली. सुरेशने कधीच तिच्यावर आवाज चढवला नव्हता. हात उचलणे तर दूरच राहिले होते. सुधा कधीच त्याच्याशी चांगली बोलत नसे पण त्याने मात्र त्याची मर्यादा कधीच सोडली नव्हती.
त्यानंतर सुधाने कधीच सुधीरला त्याच्या घरी उशिरा येण्यावरून किंवा दारू पिऊन येण्या वरून जाब विचारला नाही. तिची तशी हिंमतच झाली नाही. तो जसा तिच्याशी बोलायचा त्यावरूनच तिला कळायचं की बायकांच्या बाबतीत तो किती असंवेदनशील आहे ते.
बरेचदा दारूच्या नशेत तो त्याच्या पहिल्या बायकोचा उल्लेख करायचा तेव्हा तिला फक्त शिव्याच द्यायचा. आपल्या चार महिन्यांपूर्वीच आजारपणामुळे मरण पावलेल्या बायकोबद्दल जर त्याच्या मनात जराही सहानुभूती नव्हती तर सुधा बद्दल ती निर्माण होणे जरा कठीणच होते.
सुधाच्या घरचा सगळा कारभार तिच्या सासुबाई च पहायच्या. बाकीच्या बाबतीत कितीही उधळपट्टी करत असल्या तरी सुधाला काहीही देण्यापूर्वी त्या शंभर वेळा हिशोब मागायच्या. तिला फक्त खाण्यापिण्याची उजागरी होती. बाकी कशालाही पैसे हवे असतील तर सासूबाईंना मागावे लगायचे. आणि सासुबाई फक्त एकदम मूलभूत गरजांसाठीच पैसे द्यायच्या. पार्लर मध्ये जाणे वगैरे तर त्यांना फालतू गोष्टी वाटायच्या.
आणि सुधा यातलं काहीच सुधीरला सुद्धा सांगू शकत नव्हती. कारण दोघांमध्ये कधी सुसंवाद नव्हताच. त्याला काहीही हवं असलं की तो फक्त हुकूम सोडायचा. आणि सुधाला निमूटपणे तो जे आणि जसे म्हणेल तेच करावे लागायचे. कारण बोलायला मुभा नव्हती. आणि सासू आणि नवऱ्या मध्ये सुधा पार एकटी पडली होती.
शिवाय सासूने घरातील सगळ्या कामांची जबाबदारी सुधावर टाकून दिली होती. घरी फक्त भांडे घासायला बाई यायची. बाकी कामांसाठी आधी नोकर होते पण सुधा घरात आल्यापासून सासूबाईंनी नोकरांना सुट्टी दिली होती. सासुबाई दिवसभर रूम मधून सुधाला ऑर्डर सोडायच्या. आणि सुधा मुकाट्याने त्या पूर्ण करायची.
सासूबाईंच्या मते सुधा गरीब घरातून आलेली आहे म्हणून ती काहीही सहन करेन. कारण गरिबांना तर कामांची सवय असतेच. शिवाय त्यांना वाटायचं की गरीब लोक कामांमुळे कधीच थकत नाहीत. त्यामुळे कधी दुधाच्या घरचे आले की त्या त्यांच्याशी नीट बोलत सुद्धा नसत.
एकदा असेच सुधाच्या गावातील लोक काही कामानिमित्ताने शहरात आले होते. जाताना सुधा इथेच राहते म्हणून भेट घ्यायला जावे म्हणून ते तिच्या घरी आले. त्यांना आलेलं पाहून सुधाला आनंद झाला. पण तिच्या सासूबाईंनी मात्र नाक मुरडले. सुधा ने त्यांना खाली बसायला सांगितले पण सासूबाईंनी मात्र त्यांच्यासाठी वेगळी चटई आणून त्यांना खाली बसायला सांगितले. काय तर सोफा घाण होईल म्हणून.
गावातील लोकांना तर वाईट वाटलेच. पण त्यापेक्षा जास्त वाईट सुधाला वाटले. तिला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले. तरीही ती सासूबाईंना काहीही बोलू शकली नाही. आपल्याला दुरून जे आयुष्य अगदी स्वर्गासारख वाटत होतं. त्याचं सत्य काही वेगळंच आहे ह्याची जाणीव सुधा ला व्हायला लागली होती.
एके दिवशी सुधा काही कामानिमित्ताने तिच्या नवऱ्यासोबत बाहेर जात होती. जाताना तिला अचानक सुरेश दिसला. त्याच्यासोबत कोणीतरी स्त्री होती. बहुधा त्याची दुसरी बायको असावी. दोघेही पाणीपुरी खायला आलेले होते. तिला व्यवस्थित खाता यावं म्हणून त्याने तिच्या जवळ असलेली जड पिशवी स्वतःच्या हातात पकडली होती.
आणि त्याच्या बायकोने सुद्धा त्याच्या हातात पिशवी असल्याने त्याला पाणीपुरी खाता येणार नाही म्हणून स्वतःच्या प्लेट मधील पाणीपुरी प्रेमाने त्याला भरवली. त्या दोघांच्या डोळ्यातील समाधान इतक्या दुरूनही सुधाला जाणवत होते. आणि फक्त पैशांची श्रीमंती मिळवण्याच्या नादात आपण प्रेमाची संपत्ती गमावून बसलोय ह्या जाणिवेने तिच्या काळजात चर्र झालं.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.
खुपच छान आणि विचार करायला लावणारी कथा