मंदाताईंनी आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या कुटुंबात करुन होते. सुवर्णा दिसायला चांगली आणि शिकलेली मुलगी होती. तिचा नवरा संकेत मुंबईत एका चांगल्या नोकरीत कार्यरत होता. त्याचा मुंबईत स्वतःचा टूबीएचके चा फ्लॅट होता. सुवर्णाचे सासू सासरे गावी राहायचे. त्यांचा चांगला राजा राणीचा संसार सुरू होता सुवर्णा आणि संकेतचा. आपल्या मुलीला आनंदात पाहून मंदाताई खूप खुश होत्या. आणि आता तर सुवर्णाने मंदाताईंना त्या लवकरच आजी होणार ही गोड बातमी दिली होती. त्यामुळे त्या पार हरखून गेल्या होत्या.
मंदाताई आणि त्यांचे यजमान माणिकराव विदर्भातल्या एका लहानशा गावात राहायचे. माणिकराव सधन शेतकरी होते तर मंदाताई गृहिणी होत्या. त्यांना दोन मुले होती. सागर आणि सुवर्णा. सुवर्णा अभ्यासात हुशार असल्याने मंदाताईंची खूप लाडकी होती. एका हुशार मुलीची आई म्हणून मंदाताईंचे सगळ्या नातेवाईकांत कौतुक होत होते.
सागर अभ्यासात साधारण होता. त्याने जेमतेम बारावी केली आणि वडिलांना शेतीच्या कामात मदत करू लागला होता. सुवर्णा मात्र पदवीधर झाली. मग घरच्यांनी जेव्हा तिच्या लग्नाचे मनावर घेतले तेव्हा संकेतचे स्थळ स्वतःहून चालून आले. मग घरच्यांनी थाटामाटात सुवर्णाच्या लग्नाचा बार उडवून दिला.
त्यानंतर सागरच्या लग्नाचे मंदाताईंनी मनावर घेतले. त्यांना चांगल्या तालेवार घरातील मुलगी सून म्हणून हवी होती. त्यासाठी त्यांनी शोधमोहीम सुद्धा सुरू केली होती. पण सागर एकदा एका मित्राच्या लग्नात गेला आणि त्याने तिथे राधाला पाहिले. राधा त्याला पहिल्याच नजरेत आवडली. पण राधाच्या समोर जाऊन तिच्याशी बोलण्याची सागरची हिम्मत झाली नाही.
पण एकदा मंदाताई आणि माणिकराव यांनी सागरला दोन मुलींचे लग्नासाठी फोटो दाखवले तेव्हा सागरने त्यांना राधाबद्दल सांगितले. मंदाताईंना हे फारसे पटले नाही पण माणिकरावांनी मात्र मध्यस्थांकडून राधाच्या घरची माहिती मिळवली आणि राधाच्या घरची मंडळी चांगली आहेत हे कळल्यावर सागरसाठी राधाला रीतसर मागणी घातली.
मंदाताईंना मात्र राधा सून म्हणून फारशी पसंत नव्हती. कारण राधाची घरची परिस्थिती बेताची होती. पण सागरला मुलगी पसंत आहे अन् माणिकराव सुद्धा ह्या स्थळासाठी अनुकुल आहे म्हटल्यावर त्या लग्नासाठी फारसा विरोध करू शकल्या नाही.
राधा आणि सागरचे लग्न झाले आणि राधा मंदाताईंची सून म्हणून घरात आली. पण मंदाताई तिच्याशी फारच कोरडेपणाने वागायच्या. राधा मात्र कधीच उलटून बोलली नाही. सतत आई आई करून ती मंदाताईंच्या मागेपुढे करायची. पण लग्नाला वर्ष झालं अन् तरीही घरचा पाळणा हलला नाही ह्याच निमित्त करून मंदाताई आता उघडपणे राधाला सूनावू लागल्या होत्या.
या उलट सुवर्णाचे मात्र त्यांना फारच कौतुक होते. तिच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण होत आले होते अन् अशातच ही गोड बातमी. मंदाताईंना तर सुवर्णाला कुठे ठेवू अन् कुठे नको असे झाले होते. सुवर्णाला पाचवा महिना लागल्यावर तिने मंदाताईंना स्वतःजवळ मुंबईला बोलावून घेतले. मंदाताई सुद्धा आनंदाने तिथे जायला तयार झाल्या.
तिथे गेल्यावर मुलीने आणि जावयाने आनंदाने त्यांचे स्वागत केले. मंदाताईंनी सुद्धा लवकरच घराची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. राधा घरी आल्यापासून त्यांची कामांची सवय जवळपास सुटलीच होती. त्या आधी घरी काम करताना बाजूलाच राहणाऱ्या शेवंताची थोडीफार मदत घ्यायच्या अन् त्याबदल्यात तिला काही ना काही मोबदला देत राहायच्या.
त्यामुळे जास्त कामांची सवय त्यांना राहिली नव्हती. पण इथे मात्र आनंदाच्या भरात त्यांनी घरची सगळीच जबाबदारी स्वतःवर घेतली होती. सुवर्णाच्या डिलिव्हरीची तारीख जसजशी जवळ येत होती तसतशा मंदाताई तिला आणखीनच जपायच्या. डिलिव्हरी साठी तिला माहेरी न्यायची त्यांची खूप इच्छा होती पण इकडे दवाखाना जवळ पडतो, तिला इथलीच ट्रीटमेंट सुरू आहे असे म्हणत संकेतने नकार दिला.
मंदाताईंना सुद्धा हे पटले. त्यामुळे तिथे मुंबईतच सुवर्णाची ट्रीटमेंट सुरू राहीली. लवकरच सुवर्णाने एका गोड मुलाला जन्म दिला अन् सुवर्णा ताई नातवाला पाहून हरखून गेल्या. बाळाला पाहायला सुवर्णाचे बाबा, सासू सासरे, सागर अन् राधा सगळेच आले होते. काही दिवस मुंबईला राहून बाळाचे कौतुक करून सगळे आपापल्या घरी निघून आले.
सुवर्णाच्या सासू सासऱ्यांना मुंबईत मुळीच करमायचे नाही. त्यामुळे ते तिथे राहत नसत. म्हणून मग आणखी काही दिवस तिथेच राहण्याचा निर्णय मंदा ताईंनी आनंदाने घेतला. मुलगी आणि जावई सुद्धा अगदी हट्टाने त्यांना राहायचा आग्रह करत होते. म्हणून मग मंदाताई मुंबईतच थांबल्या. खरं तर बाळाला सोडून जायला त्यांचंही मन मानत नव्हतं.
मंदाताई बाळाचं सगळंच करायच्या. बाळ आता सहा महिन्यांचे झाले होते. बाळ वरचे अन्न खायला लागले अन् हळूहळू सुवर्णाने बाळाची सगळी जबाबदारी मंदाताई वर टाकली. ती आतावरचेवर संकेत सोबत बाहेर जायला लागली होती. अधून मधून मैत्रिणींच्या घरी भेटीला जायची, तर कधी किटी पार्टीला जायची. कधी नुसतीच भटकायला म्हणून मॉल मध्ये जायची.
लेक सुवर्णा आणि जावई संकेत दोघेही गोड बोलून मंदाताईंकडून काम करून घेत होते. घरी सून आल्यापासून कामाला हात न लावलेल्या मंदाताई मुलीच्या घरी काम करताना पार थकून जायच्या. त्यातच बाळ रांगायला लागल्यावर त्याच्या मागे धावताना तर त्यांची खूपच तारांबळ उडायची. पण सुवर्णा स्वतःहून त्यांची अवस्था काही समजून घेत नव्हती.
सुवर्णाने लहानपणी पासून आईला घरातील कामे करताना पाहिले होते. तिला वाटत होते की आईला सवय आहे कामांची. मंदाताईंना मात्र आता वाटायला लागले होते की बाळाची जबाबदारी सुवर्णाने घ्यावी अन् आपण आपल्या गावी निघून जावे. पण सुवर्णाला हे स्पष्टपणे सांगायची त्यांची हिम्मत होत नव्हती. त्यांनी एक दोन वेळा आडून आडून सुवर्णाच्या तसे सुचवले सुद्धा होते. पण सुवर्णा काहीतरी कारण सांगून आईचा गावी जाण्याचा विषय टाळायची.
असेच दिवस जात होते. एकदा काम करताना बाळाच्या मालिश साठी वाटीत काढलेल्या तेलाला सुवर्णाच्या लहानग्या मुलाचा हात लागला आणि तेल फरशीवर सांडले आणि अनवधानाने मंदाताई त्यावरून पाय घसरुन खाली पडल्या. त्यांचा जोरात आवाज ऐकून सुवर्णा आणि संकेत दोघेही धावत आले. त्यांना पडलेले पाहून सुवर्णा त्यांना आधार देऊन उचलत म्हणाली.
” अशी कशी ग आई तू वेंधळी…जरा पाहून चालायचं ना…पडलीस ना आता…काही जास्त लागलं तर उगाच दवाखान्यात जावं लागेल…तेही आज सुट्टीच्या दिवशी…”
मुलीच्या तोंडून हे ऐकून मंदाताईंना विश्र्वासच बसत नव्हता की ही आपल्या आईला दुखापत झालेली आहे ह्यापेक्षा आज सुट्टीचा दिवस वाया जाईल ह्याचे दुःख सुवर्णाला जास्त झाले आहे. सुवर्णाच्या स्वभावाचा हा एक वेगळाच पैलू मंदाताईंच्या समोर येत होता.
मंदाताईंच्या कमरेला बराच मार लागला होता. त्या दिवशी मंदाताई पूर्णवेळ त्यांच्या खोलीत झोपून होत्या आणि म्हणूनच त्या दिवशीची सगळी कामे सुवर्णाला करावी लागली. त्यामुळे तिची खूप चिडचिड होत होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा मंदाताईंची कंबर खूप दुखत होती. त्यामुळे संकेत त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. तेव्हा कळले की त्यांच्या कमरेत गॅप आल्याने त्यांना निदान पुढचे दोन महिने तरी बेड रेस्ट वर राहावे लागेल. तेव्हा सुवर्णा आईला म्हणाली.
” आई.. तुझ्या फोन वरून सागर दादाला फोन कर आणि त्याला सांग की तुला घ्यायला ये म्हणून…बाळाला सांभाळून तुझी काळजी घ्यायला मला नाही ग जमणार…”
सुवर्णाच्या तोंडून हे ऐकून मंदाताईंना आश्चर्य सुद्धा वाटले आणि वाईट सुद्धा. कारण आपली मुलगी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल असा त्यांचा ठाम विश्वास होता. पण सुवर्णाने तर पहिल्याच संकटात हात टेकले होते. शिवाय मंदाताईंनी त्यांच्या सुनेला राधाला मोठ्या तोऱ्याने अनेकदा सुनावले होते की माझी मुलगी असताना मला तुझी काही गरज पडणार नाही म्हणून.
आता तिला कोणत्या तोंडाने सामोरे जायचं हा प्रश्र्नसुद्धा त्यांना पडला होता. पण आता सागरला फोन करण्यावाचून काही इलाज नव्हता आणि खरं म्हणजे घरी जायच्या नुसत्या विचारानेही त्यांना बरे वाटत होते. मंदाताईंनी सागरला फोन केला आणि सागर लगेच दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन मंदाताईंना न्यायला आला देखील.
भारी मनाने मंदाताईंनी सुवर्णाचा निरोप घेतला आणि सागर सोबत गावी जायला निघाल्या. घरी पोहचताच राधा ने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना काय हवे नको ते विचारले. मंदाताई मात्र तिच्याशी बोलताना जरा अवघडलेल्या होत्या. पण लवकरच त्यांचे अवघडलेपण दूर होऊ लागले.
राधाने खूप मनापासून त्यांची सेवा त्यांना पुरेपूर आराम मिळेल ह्याची काळजी घेतली. त्यांची पथ्ये सांभाळली. वेळेवर त्यांच्या कमरेला शेकून देणे, त्यांना बाथरूमला जाताना आधार देणे, अंघोळीसाठी मदत करणे, त्यांना हवं नको ते बघणे, आणि रिकाम्या वेळी त्यांच्याशी गप्पा मारायला येणे ही कामे राधाने अगदी मनापासून केली.
सुवर्णा सुद्धा अध्येमध्ये फोन करून आईच्या तब्येतीची विचारपूस करायची. कधीकधी आईला वेंधळी म्हणून त्रागा सुद्धा करायची. कारण तिला वाटायचे की आई जर त्या दिवशी पडली नसती तर आज आई तिच्याजवळ असती अन् तिच्यावर घरकामाची अन् बाळाची जबाबदारी आली नसती. मंदाताई सगळं काही ऐकून सुद्धा गप्प बसून राहायच्या.
सुरुवातीला राधाशी गप्पा मारताना सुद्धा मंदाताई फक्त कामापुरते बोलायच्या पण हळूहळू सासुसूनेच्या नात्यात आपुलकी निर्माण होत होती. आता मात्र मंदाताईंना स्वतःच्या चुका चांगल्याच कळल्या होत्या. राधा सारख्या गोड मुलीला त्यांनी सून म्हणून मनापासून स्वीकारले नाही ह्याचे त्यांना वाईट वाटत होते. आणि राधाला आई न होण्याच्या कारणावरून त्यांनी आजवर जे सुनावले त्याचा त्यांना खूप पश्चात्ताप होत होता.
हळूहळू मंदाताईच्या कमरेचा त्रास बरा झाला आणि मंदाताई पूर्वीसारख्या चालायला फिरायला लागल्या. अशातच एके दिवशी राधा ने त्यांना गोड बातमी दिली की ती आई होणार आहे. मंदाताईं खूप खुश झाल्या. घरात आनंदी आनंद झाला होता. अशातच एके दिवशी मंदाताईंना सुवर्णाचा फोन आला. ती मंदाताई ना म्हणाली.
” आता बरं वाटतंय ना तुला आई…?” सुवर्णा ने विचारले.
” हो ग…आता बरं आहे…तू काळजी करू नकोस… काल तर बाहेर एक चक्कर सुद्धा मारून आले बघ मी…” मंदाताई म्हणाल्या.
” अरे वा…छानच…मग दादाला सांग ना पुढच्या आठवड्यात तुला माझ्याकडे सोडून द्यायला…” सुवर्णा म्हणाली.
” तुझ्याकडे… पण आता एवढ्या घाईघाईने कशाला…?” मंदा ताईंनी आश्चर्याने विचारले.
” कशाला म्हणजे काय आई…? अगं माझ्या एकटीच्याने बाळाला सांभाळणे नाही होत…घरची कामे करताना सुद्धा जीव मेटाकुटीला येतो…एका मावशींना कामासाठी बोलावते मागच्या दोन महिन्यांपासून…पण त्यांचं काम काही मला आवडत नाहीय बघ…आणि पैसे तर एवढे घेतात की काही विचारू नकोस…संकेत सुद्धा म्हणत होते की आई आली तर सगळं व्यवस्थित सांभाळेल म्हणून…” सुवर्णा म्हणाली.
” तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का सुवर्णा…? तुला कामाला बाई परवडत नाही किंवा बाईचं काम आवडत नाही म्हणून तू मला तिथे बोलावते आहेस…” मंदाताईंनी आश्चर्याने विचारले.
” तसं नाही आई…पण तुला माहिती आहे ना की राधा वहिनी सुद्धा आई होणार आहे…मग आता ह्याच बहाण्याने ती आराम करेन आणि सगळी कामे तुझ्या अंगावर पडतील…त्यापेक्षा तू इकडेच ये माझ्याजवळ…तेवढीच मला सुद्धा तुझी मदत होईल…वहिनी बघेल तिचं तिचं… तसही तिला कामांची सवयच आहे…” सुवर्णा ने मनातले बोलून दाखवले.
” मला विश्वास बसत नाही आहे की तू माझीच मुलगी आहे म्हणून…तू अशी काही बोलू शकतेस…तुलासुद्धा माहिती आहे की गरोदरपणात बाईला मदतीची गरज भासतेच…तुलासुद्धा गरज पडलीच होती की…आणि एक आई म्हणून तुझं बाळंतपण निभावणं माझं कर्तव्य होतं…
तू जोवर बाळाची जबाबदारी नीट घ्यायला शिकत नाही तोवर तुझी साथ द्यायला म्हणून मी तिथे थांबले होते…आणि तेव्हा सुद्धा तू काय वागलीस माझ्यासोबत ते तुलाही माहिती आहे…जेव्हा डॉक्टरांनी मला बेड रेस्ट घ्यायला सांगितली तेव्हा तू मला घरी जायला सांगितलेस आणि आता तुला वाटतंय की तुझी आई काम करू शकते तेव्हा परत बोलवत आहेस…
आणि तुला या वयात जर ही सगळी कामे जमत नाही आहेत तर विचार कर की मी किती थकून जात असेल या सर्वात…पण मुलीवर आणि नातवंडांवर असलेल्या प्रेमामुळे मी काहीही तक्रार न करता सगळं काही करत होते…पण तू मात्र सगळ्या जबाबदारी झटकून बाहेर फिरायचीस…
मूल झाल्यानंतर एका आईची जबाबदारी खूप वाढते…राधा गरोदर नसती तरीसुद्धा मी आता तिथे यायला नकारच दिला असता कारण आता तुला तुझ्या संसाराची आणि बाळाची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागेल… त्याशिवाय तुला मातृत्वाच्या जबाबदारीची जाणिव होणार नाही…आणि एक आजी म्हणून जशी माझी जबाबदारी तुझ्या बाळाप्रती आहे तशी राधा आणि सागरच्या बाळाप्रती सुद्धा आहे…त्यामुळे मला वाटतं की तू आता तुझ्या संसारात नीट लक्ष द्यायला हवे…एकदा सवय झाली की सगळं नीट होईल…” मंदाताई म्हणाल्या.
यावर सुवर्णा ने काहीही न बोलता खजील होऊन फोन ठेवून दिला. आईच्या कानउघडणीने तिला तिच्या चुकांची जाणिव झाली होती आणि स्वतःच्या संसाराची जबाबदारी नीट पार पाडायला ती सुद्धा सज्ज होणार होती.
समाप्त.