अरुणाचा नवरा बाहेरून आला आणि त्याच्या हातातली पिशवी त्याने किचन मध्ये असलेल्या अरुणाला नेऊन दिली. अरुणाने ती लगेच आडोश्याला ठेवून दिली. किचनमध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकाची मदत करणाऱ्या नीमाताईंच्या नजरेतून हे काही सुटले नाही. थोड्या वेळाने नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना अरुणा ती पिशवी सोबत घेऊन गेली. आणि थोड्याच वेळात तिच्या दोन्ही मुलांना तिने तिच्या खोलीतून आवाज दिला.
” सार्थक, सानवी…जरा इकडे या…”
तसे दोघेही आत गेले. लहानगा अर्णव सुद्धा दोघांच्या मागे मागे आत जायला लागला. त्याला पाहून अरुणा म्हणाली.
” अर्णव…तू थोडावेळ बाहेरच थांब…”
तसा पडलेल्या चेहऱ्याने अर्णव खोलीतून बाहेर आला. आणि आजीला शोधत स्वयंपाकघरात गेला. आजीने हसत हसत त्याला विचारले.
” काय मग लाडोबा…खेळून झाले का…? भूक लागली असणार ना तुला…? थांब मी साखर, तूप, पोळी देते…”
” ते नाई…मला ते छालथक दादा खात आहे ते पाइजे…” अर्णव म्हणाला.
आता मात्र निमा ताईंना खूप वाईट वाटलं. नवऱ्याने आणलेला खाऊ अर्णवला द्यायला लागू नये म्हणून ती खोलीत जाऊन मुलांना खाऊ घालते हे तर एव्हाना त्यांना कळले होतेच. त्याचे त्यांना खूप वाईट सुद्धा वाटायचे. आपली सख्खी मुलगी स्वतःच्या सख्ख्या भावाच्या मुलासोबत अशी वागते ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
आणि शिवाय तीन वर्षांचा अर्णव खाऊन खाऊन किती खाणार आहे. पण त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. कारण त्यांना आणि सार्थकला आता अरुणाच्या घरी राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. अरुणा जसं ठेवेल तसचं राहावं लागणार होतं. आणि आईविना वाढणाऱ्या अर्णवचा विचार त्याच्या सख्ख्या बापाने सुद्धा केला नव्हता तर मग आत्याकडून तरी काय अपेक्षा ठेवणार होत्या.
आताशा हे रोजच घडत होतं. काहीही चांगलं चुंगल घरात आणलं की अरुणा ते अर्णव पासून आणि अर्थातच निमाताईंपासून लपवून ठेवायची. तशी पाहता अरुणाची परिस्थिती काही वाईट नव्हती. नवऱ्याची चांगली नोकरी होती. स्वतःच घर होतं. अरुणा ताई सुद्धा भाडेकरूंकडून मिळणारी बरीचशी रक्कम अरुणाला द्यायची. त्यांचा आणि अर्णवचा खर्च म्हणून. त्यामानाने दोघांना खर्च खूप कमी लागायचा.
सुरूवातीला अरुणा अर्णवचे खूप लाड करायची. पण आता बरेच दिवसांपासून इथेच राहतोय म्हटल्यावर तिला वैताग यायचा लागला होता. तसे पाहता सार्थकचा सुद्धा काही त्रास नव्हता. स्वतःच्या वयाच्या मुलापेक्षा बराच समंजस होता तो. पण नशिबाने त्याला असं दुसऱ्याच्या घरी आश्रित म्हणून राहावं लागत होतं ह्याच नीमाताईंना वाईट वाटत होतं.
सुरूवातीला आपल्या मुलीचं घर आहे म्हणून हक्काने राहणाऱ्या निमाताई आता स्वतःच सांभाळून वावरायच्या. घरकामात होईल तो मदत करायच्या. मुलांवर लक्ष ठेवायच्या. त्यांना अंघोळ घालून देण्यापासून ते शाळेसाठी स्कूल बस पर्यंत सुद्धा नेऊन द्यायच्या. अरुणा वर असलेला भार आता बराच कमी झाला होता. त्यांना कळत होतं की अरुणाला आता बहुधा आपली अडचण होतेय. म्हणून त्या जरा जास्तच सांभाळून राहायच्या.
एके दिवशी सकाळीच त्या झोपेतून उठल्या तेव्हा त्यांना जाणवले की अर्णवला चांगलाच ताप आलाय. म्हणून त्यांनी लगेच जाऊन अरुणाच्या रूमचे दार ठोठावले. जरा त्राग्यानेच अरुणा रूमच्या बाहेर आली आणि आईला म्हणाली.
” काय झालं आई…? अगं आज रविवार…सुट्टीचा दिवस…इतक्या सकाळी कशाला उठवलेस…?”
” अगं…अर्णवला ताप आलाय…तुझ्याकडे औषध आहे का…?” निमाताई म्हणाल्या.
” हो…” असे म्हणून अरुणाने आतमधून तापीचे औषध आणून आईला दिले.
निमाताईंनी अर्णवला बळेबळेच चहा बिस्कीट खाऊ घातले आणि तापीचे औषध दिले. थोड्या वेळाने अर्णव झोपी गेला.
अरुणा आरामात उशिरा उठली. रोज निमाताई तिच्यासाठी चहा नाश्ता करायच्या. पण आज त्या उठल्यापासून अर्णव जवळ बसून होत्या. म्हणून आज चहा नाश्ता अरुणालाच करावा लागला. त्यामुळे अरुणाची चिडचिड होत होती. थोड्या वेळाने अर्णव झोपेतून उठला. त्याला आता थोडे बरे वाटत होते. बघता बघता तो सार्थक आणि सानवी सोबत खेळायला सुद्धा लागला.
थोड्या वेळाने सानवी बाहेरून आत आली आणि किचनमध्ये येऊन तिने फ्रिज उघडला. तिने फ्रिजमध्ये काल शिल्लक असलेली चॉकलेट ठेवली होती. पण आता ती चॉकलेट तिथे नव्हती. म्हणून सानवी रडू लागली. अरुणा तिला समजावत होती की आपण दुसरी चॉकलेट आणुयात. पण सानवी काही केल्या ऐकत नव्हती.
तिचा आवाज ऐकून बाहेर खेळत आलेले सार्थक आणि अर्णव आतमध्ये आले. अर्णवला पाहताच आधीच वैतागलेल्या अरुणाने मागचा पुढचा काहीही विचार न करता त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. काय घडतंय ह्याची अजिबात कल्पना नसलेला अर्णव त्या धपाट्या ने एकदमच कळवळला.
निमाताईंनी अरुणाला अर्णव ला मारताना पाहिले आणि एक संतापाची तीव्र लाट त्यांच्या मस्तकात गेली. त्या अरुणाला म्हणाल्या.
” काय ग…तुला काही अक्कल आहे की नाही…आधीच तापाने आजारी आहे पोरगं…आणि तू त्याला मारलस…तुझा जीव नाही का कळवळला त्या पोरावर हात उचलताना…?”
” अगं मग काय करू आई…तिचं चॉकलेट मिळत नाहीय…घरातून कुठे जाणार आहे…ह्यानेच चोरून खाल्ल असेल…” अरुणा वैतागून म्हणाली.
” हा कशाला चोरून खाईल…बोलताना जरा भान ठेव…आजवर कधीही न विचारता काही खाल्लंय का त्याने…?” निमा ताई चिडून म्हणाल्या.
” मग कोण खाणार आहे…माझ्या मुलांना कशाचीच कमी नाही…ते कशाला खाणार आहेत चोरून…हाच असेल खाणारा…” अरुणा म्हणाली.
” एकतर नक्की खरं काय हे नाहीत नसताना कुणावर आरोप करू नये…आणि एका साध्याशा चॉकलेटसाठी तू एका तीन वर्षाच्या मुलावर हात उचलतेस…आणि अर्णव ला सुद्धा कशाचीच कमी नाही…त्याचा बाप त्याच्यासाठी काहीही घ्यायला समर्थ आहे हे तुलाही माहित आहे…” निमा ताई म्हणाल्या.
” अच्छा…म्हणूनच ह्याला असं आमच्या भरवशावर सोडून माझा करतोय ना त्याच्या दुसऱ्या बायकोबरोबर…अन् आम्ही आमचं सोडून त्याच्या मुलाला पोसत बसायचं…” अरुणा सुद्धा आता रागात बोलत होती.
” तुम्ही त्याला फुकटात पोसत नाही आहात…मी माझ्या पेन्शनची रक्कम आणि घरभाड्यातून मिळालेले पैसे देते ना तुला…” निमा ताई म्हणाल्या.
” तू माझी आई आहेस…तुझ्या पेन्शनच्या पैशांवर अन घरभाड्यावर मुलगी म्हणून माझाच अधिकार आहे…त्या हिशोबाने ह्याला तर फुकटात वागवते आहे ना मी…” अरुणा वैतागून म्हणाली.
” मला विश्वास बसत नाही की तू माझी तिच मुलगी आहे जिला मी एवढ्या लाडाकोडात वाढवली…हे पांग फेडलेस तू…माझा मुलगा वाईट वागला म्हणून तुझ्याकडे आधारासाठी आले मी…अन् तू सुद्धा या आईविना पोराशी अशी वागतेस…स्वतःच्या मुलांकडून अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती…कदाचित मीच तुम्हाला संस्कार देण्यात कमी पडली असेल…” निमाताई म्हणाल्या.
” आई…लहानशा गोष्टीवरून वाद नकोस घालू…आज रविवार आहे…जरा निवांत राहू दे आजच्या दिवस…” अरुणा बेफिकिरी ने म्हणाली आणि तिथून निघून स्वतःच्या खोलीत गेली.
लहानगा अर्णव अजूनही आजीच्या कुशीत घाबरून घट्ट बिलगून बसला होता. त्याला पाहून निमाताईंचे काळीज तुटत होते. अर्णव जेव्हा झाला तेव्हा घराला वारस मिळाला म्हणून किती मोठा सोहळा केला होता. वैदेही तर अर्णवला सतत नजरेसमोर ठेवायची. पण वैदेही वर काळाने घाला घातला अन् होत्याच नव्हतं झालं.
क्रमशः
मराठी कथा / वारस – भाग २