” सूनबाई…अजुन चहा झालाच नाही का…किती वेळ वाट पाहू मी…” सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असलेल्या सासुबाई त्यांच्या सुनेला शारदाला म्हणाल्या.
” आणतेच आहे आई…” शारदा म्हणाली आणि चहाचा कप घेऊन येऊ लागली. ती स्वयंपाक घरातून बाहेर निघणार इतक्यात तिचा तीन वर्षाचा मुलगा शर्विल बाहेरून खेळून आला आणि पाणी प्यायचे म्हणून सरळ स्वयंपाक घरात शिरला. पण घाईघाईने चहाचा कप घेऊन बाहेर येत असणाऱ्या शारदाची आणि त्याची टक्कर झाली अन् गरम गरम चहाचा कप शारदाच्या अंगावर पडला.
आणि शारदा वेदनेने जोरात किंचाळली. चहा खूप गरम असल्याने शारदाला बरंच भाजलं. तिचा आवाज ऐकून तिच्या सासुबाई तिच्याजवळ आल्या. शर्विल सुद्धा खूप घाबरला होता. सासूबाईंनी आधी त्याला शांत केले आणि मग त्यांच्या मुलाला म्हणजेच मोहनला फोन केला. सुदैवाने तो ऑफिस मधून घरीच यायला निघाला होता आणि घराजवळच होता.
तो घरी आला आणि शारदाला घेऊन जवळच्याच एका दवाखान्यात गेला. सुदैवाने जास्त भाजलेलं नव्हतं. तरीपण दोन चार दिवस तरी थोडी काळजी घ्यावीच लागणार होती. शारदा आणि मोहन दोघेही घरी आले आणि त्या दिवशी शारदा औषध घेऊन लवकर झोपली. त्या दिवशीचा स्वयंपाक सासूबाईंनीच केला.
पण दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी सकाळीच उठून शारदाला आवाज दिला. रोजची उठण्याची वेळ झाली तरीही शारदा उठलेली नव्हती. आज तिला अजिबात बरं वाटत नव्हतं. शिवाय भाजल्या ठिकाणी अजूनही वेदना होत होती. आणि रात्री झोपताना सहज वाटावं म्हणून तिने गाऊन घातलेला होता.
लग्न होऊन सासरी येताना तिने दोन गाऊन सोबत आणलेले होते. हा त्यातीलच एक होता. आजपर्यंत तिने घरात सगळ्यांसमोर कधीच घातला नव्हता. फक्त कधीतरी रूम मध्ये आल्यावर घालायची. पण आज परिस्थिती जरा वेगळी होती. तिला भाजले होते आणि तिथे अजूनही वेदना होत होती. त्यामुळे आज साडी नेसून वावरणे तिला जमणार नव्हते.
म्हणून मग सासूबाईंचा आवाज ऐकून ती कशीबशी उठून बाहेर आली. आणि तिला गाऊन मध्ये बाहेर आलेलं पाहून सासूबाईंच्या रागाचा पारा एकदमच चढला. त्या शारदाला म्हणाल्या.
” हे काय घातलं आहेस तू…तुला माहिती आहे ना असे कपडे घातलेले मला चालत नाही…तुझे सासरे पाहतील तर काय म्हणतील…?”
” पण आई मला भाजलय आणि त्रास पण होतोय… अशात साडीत वावरणे मला जमणार नाही म्हणून…” शारदा सासूबाईंना म्हणाली.
” थोडासा चहा काय पडला तर अशी वागत आहेस जणू काही खूपच लागलय तुला…मला माहिती आहे हे सगळे तुझे बहाणे आहेत कामं करायला लागू नयेत म्हणून…” सासुबाई म्हणाल्या.
” पण आई मी असे का करेन…मी आजवर कधी घरातील कामांचा कंटाळा केलाय का…मला खरंच बरं वाटत नाही आहे…” शारदा समजावणीच्या सुरात म्हणाली.
” मला काही शिकवू नकोस…आणखी काय काय दिवस दाखवणार आहे देव जाणे…आज घरात गाऊन घालतेय उद्या ड्रेस घालायचा लागणार अन् नंतर जीन्स आणि काय काय…आधी जा आणि साडी नेसून ये…मगच घरातील कामे कर…” सासुबाई म्हणाल्या.
सासूबाईंचे बोलणे ऐकुन शारदाला खूप वाईट वाटले. आजवर कधीच शारदा आपल्या सासूबाईंच्या विरोधात गेली नव्हती. सासूबाईंना आवडत नाहीत म्हणून तिने लग्नानंतर घरी पंजाबी ड्रेस सुद्धा घातला नव्हता. सासूबाईंच मन तिने पदोपदी राखलं होतं पण जेव्हा सासूबाईंनी तिला समजून घेण्याची गरज होती तेव्हाच सासूबाईंनी तिला असे बोलून दुखावले होते. आजवर ती कधीच सासूबाईंना उलट बोलली नाही पण आज तिने सासूबाईंना उलट प्रश्न केलाच. ती सासूबाईंना म्हणाली.
” आई…जर तुम्हाला साडी शिवाय इतर काही आवडत नाही तर कांचन ताईंना का नेहमी नेहमी फॅशनेबल कपडे घेऊन देता तुम्ही…ते ही स्वतःहून…”
तिचा प्रश्न ऐकून सासूबाईंना राग आला. कारण आज पहिल्यांदाच तिने त्यांना उकात प्रश्न केला होता. सासुबाई जरा रागातच म्हणाल्या.
” तू तिची आणि स्वतःची तुलना कशी करू शकतेस…ती मुलगी आहे या घरची…हे घर तिचेच आहे…ती तिला आवडेल ते परिधान करू शकते…पण तू सून आहेस…तुला मर्यादा आहेत…आणि तुझं मर्यादा सोडून वागणं आणि बोलणं दोन्हीही शोभत नाही…” सासुबाई म्हणाल्या.
” पण कांचन ताईंच सुद्धा लग्न झालेलं आहे ना…आणि तुम्ही त्यांना आवर्जून साडी ऐवजी ड्रेस घेऊन देता दरवेळी…मग त्या सुद्धा त्या घरच्या सून आहेत…मग त्यांना का नाही सांगत तुम्ही मर्यादा पाळायला…सुनेला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा न्याय असे का…” शारदा म्हणाली.
” सूनबाई…तू जरा जास्तच बोलत आहेस असे तुला वाटत नाही का…?” सासुबाई तावातावाने बोलल्या.
” मी आजवर कधीही तुम्हाला आवडणार नाही असे वागले नाही…घराच्या बाबतीत असलेली माझी सगळी कर्तव्ये मी अगदी आनंदाने पूर्ण केली…कधीही कसलीही तक्रार केली नाही…मला ह्यांनी अनेकदा म्हटले की घरी ड्रेस वापरत जा…बाहेर फिरायला जाताना तुला आवडेल ते घालत जा…पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून मी कधीच साडी शिवाय इतर कपड्यात वावरले नाही…
पण आज जेव्हा मला बरं नाहीये तेव्हा माझी मनस्थिती समजून घेण्याऐवजी तुम्ही मला कपड्यांवरून ऐकवत आहात…खरे म्हणतात लोक…सुनेने कितीही केलं तरी ती कधीच मुलीची जागा घेऊ शकत नाही…माझ्या जागी तुमची मुलगी असती तरी सुद्धा तुम्ही अशाच म्हणाल्या असत्या का…?” शारदा आज मनापासून बोलत होती.
शारदा चे बोलणे ऐकुन एरव्ही कधीही तोंडाचा पट्टा शांत न होणाऱ्या तिच्या सासुबाई सुद्धा क्षणभर गप्प बसल्या आणि विचार करू लागल्या. इतक्यात मघापासून ह्या दोघींचा संवाद ऐकणारा मोहन समोर आला आणि म्हणाला.
” शारदा बरोबर बोलत आहे आई…की अनेकदा तिला म्हणालो की तुझ्या आवडीचे कपडे घालत जा…आई काय म्हणेल ह्याची काळजी नको करू…पण शारदाने नेहमीच तुझ्या आवडी निवडींचा मान ठेवला…तिने या घराला पूर्णपणे आपलेसे केले…पण तू मात्र तिला दुसऱ्यांच्या घरातून आलेली लेक याच दृष्टीकोनाने पाहिलेस…
लग्न झाल्यावर मुलींनी का पूर्णपणे स्वतःला बदलायचे…जसे लग्नानंतर मुलांना आपले राहणीमान बदलावे लागत नाही तसे मुलींच्या बाबतीत का नाही…निदान त्यांना आपल्या मनाप्रमाणे राहण्याची मुभा असायला नको का…
मुलींच्या बाबतीत आई नेहमी हळवी होते पण तीच जेव्हा सुनेची गोष्ट असते तेव्हा मात्र मान मर्यादा ह्यांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे असते…मुलांच्या बाबतीत आधुनिक बदल स्वीकार करणारी आई सून घरात येताच एकदम पारंपारिक सासू बनते…असे का…?”
शारदा च्या बोलण्याने आधीच विचारात पडलेल्या सासूबाईंना मोहन च्या बोलण्याने स्वतःची चूक लक्षात आली. त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांनी स्वतः तिला सांगितले होते की लग्नाआधी जशी राहायची तशीच राहत जा. उलट त्या स्वतःच आवर्जून तिला साडी ऐवजी ड्रेस घेऊन द्यायच्या. पण शारदा सून बनून येताच तिच्या बाबतीत त्यांनी कडक निर्बंध घातले.
शारदाने सुद्धा कधी विरोध केला नाही. तिच्या जागी एखादी दुसरी असती तर तिने कधीच ऐकून घेतले नसते पण शारदा मुळातच स्वभावाने खूप शांत होती. कधीच त्यांच्या विरोधात वागली नव्हती. आणि नकळत का होईना तिच्या या चांगल्या स्वभावाचा त्यांनी फायदाच घेतला होता. पण आज जेव्हा त्यांना स्वतःची चूक कळली तेव्हा मात्र त्यांनी स्वतःची चूक कबूल करायला वेळ लावला नाही. त्या शारदाला म्हणाल्या.
” मला खरंच माफ कर शारदा…सून सुद्धा कुणाची तरी लेकच असते हे विसरले होते मी… खरं सांगायचं म्हणजे तुझ्या जागी कांचन असती तर मी तिला दोन तीन दिवस आराम करायला सांगितला असता…पण तुझ्या बाबतीत मी फारच अविचाराने वागत आले आहे…आज जर तू मला ह्याची जाणीव करून दिली नसतीस तर कदाचित मला हे कळलेच नसते…
पण अजूनही फार उशीर झालेला नाही…मी माझी चूक सुधारणार आहे…तू आजपासून तुला हवी तशी घरात वावरत जा…तुला आवडतील तसे कपडे वापरत जा…ही तुझी खाष्ट सासू यापुढे स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आहे..आणि आता खोलीत जाऊन आराम कर…आजचा स्वयंपाक मी करणार आहे…” सासुबाई म्हणाल्या.
” हे काय बोलताय आई…माझं बोलणं मनावर नका घेऊ प्लिज… मी कशी काय तुम्हाला उलट बोलले हे माझ्या सुद्धा लक्षात येत नाहीय… माझं खरंच चुकलं…?” शारदा जरा घाबरूनच म्हणाली.
” तुझं काहीच चुकलं नाही बाळा…उलट तू आज माझे डोळे उघडलेस…आणि आता जास्त विचार नकोस करू…रूम मध्ये जा आणि आराम कर…मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी…आणि आता नीट पकडशिल चहा…नाहीतर पुन्हा सांडवशील…” सासुबाई म्हणाल्या.
आणि सगळेच हसले. आणि त्या हास्यात मागच्या सगळ्या चुका विरून गेल्या. आता या सासू सुनेच्या नात्याची नव्याने सुरुवात होत होती. आणि हे पाहून मोहन मनातल्या मनात खूप खुश झाला होता.
त्यानंतर शारदा जेव्हा पूर्णपणे बरी झाली तेव्हा तिच्या सासूबाईंनी स्वतः तिच्यासोबत जाऊन तिला ड्रेस घेऊन दिले.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.