राँग नंबर – भाग १

खिडकीतून बाहेर दिसणारे गुलमोहराचे झाड वाऱ्याच्या झुळकीने हलत होते. लाल-केशरी फुले खाली साचली होती. समिधा त्या फुलांकडे एकटक पाहत होती. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. तिच्या घरात आज शांतता होती, पण ती शांतता कोणत्याही क्षणी स्फोट घडवून आणू शकेल अशी अस्वस्थ करणारी होती.

 

दोन दिवसांपूर्वीच तिच्या आणि प्रीतमच्या प्रेमसंबंधांबद्दल तिच्या आई-वडिलांना कळले होते. समिधाच्या भावाने, रोहनने, तिला आणि प्रीतमला एका कॅफेमध्ये एकत्र पाहिले होते. घरी आल्यावर झालेल्या गदारोळाचे सावट अजूनही भिंतींवर पसरलेले होते. बाबांचा तो संतप्त चेहरा आणि आईचे रडून लाल झालेले डोळे समिधाला सारखे आठवत होते.

 

“समिधा, आजपासून तुझा मोबाईल आमच्याकडे राहील. तू घर सोडून कुठेही जाणार नाहीस,” बाबांचा तो कडक आवाज तिच्या कानात अजूनही घुमत होता.

 

” तुझ्या फोनवर सतत येणारे राँग नंबर हे होते तर. आम्ही तुझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास तू.” भाऊ रोहन म्हणाला.

 

घरच्यांनी तिच्यावर कठोर बंधने लादली होती. तिला प्रीतमशी भेटायला, बोलायला पूर्णपणे बंदी घातली गेली होती. एवढेच नाही, तर तिच्या लग्नासाठी मुलांचे फोटो आणि बायोडेटा पाहणे तातडीने सुरू झाले होते. समिधाच्या घरातल्यांचा ठाम विश्वास होता की मुलीचे लग्न लवकरात लवकर करून दिले, की ही भानगड कायमची मिटेल.

 

समिधाचे हृदय मात्र प्रीतमसाठी धडधडत होते. तीन वर्षांचे प्रेम होते त्यांचे. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात झालेली ती पहिली भेट, मग हळूहळू वाढलेली मैत्री आणि प्रेमात झालेले रूपांतर हे सगळे स्वप्नवत होते तिच्यासाठी. हे सर्व इतक्या सहज कसे संपू शकत होते? प्रीतमने तिला अनेक स्वप्नं दाखवली होती. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. समिधाला प्रीतमवर आंधळा विश्वास होता. तिला वाटत होते की प्रीतम नक्कीच काहीतरी मार्ग काढेल.

 

त्या दिवशी दुपारी, आई बाजारात गेली होती आणि बाबा ऑफिसमध्ये होते. रोहनही मित्रांसोबत बाहेर गेला होता. हीच ती संधी होती. समिधाने घरातील लँडलाईन फोनजवळ धाव घेतली. तिचे हात थरथरत होते. तिने मनात पाठ असलेला प्रीतमचा नंबर डायल केला.

 

काही सेकंदांच्या रिंगनंतर पलीकडून आवाज आला, “हॅलो?”

 

“प्रीतम! मी समिधा बोलतेय…” तिचा आवाज गिळंगिळात झाला होता.

 

“समिधा? तू कुठून फोन करतेयस? मला तुझा मेसेज किंवा कॉल का आला नाही इतके दिवस?” प्रीतमच्या आवाजात काहीसा अस्वस्थपणा होता.

 

“प्रीतम, घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आपल्याबद्दल घरी कळलंय. बाबांनी माझा फोन काढून घेतलाय. माझ्यावर खूप पाळत ठेवली जात आहे आणि घरचे माझ्यासाठी स्थळे पाहायला लागले आहेत!” समिधा एकाच श्वासात सर्व सांगून गेली.

 

पलीकडून काही क्षण पूर्ण शांतता पसरली.

 

“प्रीतम, तू ऐकतोयस ना?” समिधाने विचारले.

 

“हो, ऐकतोय. पण घरच्यांना कसे काय कळले?”

 

“ते सोडून दे आता. परिस्थिती खूप बिघडली आहे. प्रीतम, तू तुझ्या आई-वडिलांना घेऊन आमच्या घरी ये ना. रीतसर मला मागणी घाल. आपण घरच्यांना समजावूया. माझ्या बाबांचा स्वभाव कडक आहे, पण जर तुझ्या घरच्यांनी पुढाकार घेतला, तर ते नक्की विचार करतील. निदान आपल्या प्रेमासाठी आपण प्रयत्न तरी करायला हवा ना.” समिधा विनवणी करत म्हणाली.

 

पण पलीकडून प्रीतमचा जो प्रतिसाद आला, त्याने समिधाच्या पायाखालची जमीन सरकली.

 

“समिधा, तू वेडी झाली आहेस का? तुझे बाबा मला ओळखतात. ते मला कधीही होकार देणार नाहीत. आणि मुख्य म्हणजे, मी माझ्या आई-बाबांना काय सांगू? ते अजून माझ्या लग्नाचा विचारही करत नाहीत. मी अजून सेटल व्हायचा आहे. तू प्लीज थोडा संयम ठेव. अजून २-४ वर्षे थांब, मग बघू आपण.” प्रीतमचा आवाज एकदम थंड आणि व्यावहारिक झाला होता.

 

“२-४ वर्षे?” समिधाच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहू लागले. “प्रीतम, तू समजतोयस का मी काय सांगतेय? घरचे माझे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून देतील! मी २-४ वर्षे कशी थांबणार? तू फक्त एकदा तुझ्या घरच्यांना घेऊन ये, बाकी मी सांभाळून घेईन.” समिधा म्हणाली.

 

“नाही समिधा, हे शक्य नाही. माझ्या बाबांचा राग तुला माहित नाही. मी आता अशी रिस्क घेऊ शकत नाही. तू घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न कर किंवा जरा थांब,” प्रीतमने स्पष्ट सांगून टाकले.

 

प्रीतम चे बोलणे ऐकून समिधाचे हृदय तुटले होते. तरीही, प्रेमात आंधळी झालेली ती स्वतःच्या मनाची समजूत घालत होती. ‘प्रीतम कदाचित घाबरला असेल, त्याला परिस्थिती हाताळता येत नसेल,’ असे वाटून तिने त्याला पुन्हा पुन्हा दोघांच्या प्रेमाची, दिलेल्या वचनांची आठवण करून दिली. पण प्रीतमने काही न काही कारण देऊन आपण असमर्थ असल्याचे सांगितले आणि फोन ठेवला. समिधाचा नाईलाज झाला.

 

इतक्यात तिची आई बाहेरून घरी आली. फोन चा रिसिव्हर तिच्या हातात बघून आई तिला म्हणाली.

 

” काय ग…कुणाचा फोन होता ?”

 

” काही नाही आई… राँग नंबर होता…” समिधा जरा घाबरत म्हणाली.

 

” इतकंच सांगेन की पुन्हा तीच चूक करू नकोस…” आई म्हणाली.

 

समिधाने मानेनेच होकार दिला. तसंही आता सर्वकाही संपलंच होतं.

 

दिवस वेगाने पुढे जात होते. समिधाच्या घरी स्थळे चालून येत होती. दोन-तीन मुले पाहून झाली. समिधा प्रत्येक मुलाला नकार देण्याचे कारण शोधत होती, पण घरच्यांसमोर तिचे काही चालत नव्हते. पहिली एक दोन स्थळं तिच्या घरच्यांना अनुरूप वाटली नाही म्हणून सोयरिक होऊ शकली नव्हती. पण चौथ्या स्थळाच्या वेळी परिस्थिती बदलली. ते स्थळ होते सुमितचे.

क्रमशः

राँग नंबर – भाग २

Leave a Comment