सुमित हा शहरातील एका नावाजलेल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. स्वतःचा कापड व्यवसाय असणारे ते कुटुंब श्रीमंत, पण तितकेच संस्कारित आणि नम्र होते. समिधाचे वडीलही सरकारी खात्यात मोठ्या पदावर होते, त्यामुळे दोन्ही कुटुंबांची सामाजिक आणि आर्थिक पातळी थोडीफार जुळत होती.
सुमित समिधाला पाहण्यासाठी तिच्या घरी आला. साध्या, पण अत्यंत प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सुमित पहिल्याच भेटीत समिधाच्या आई-वडिलांना भावला. त्याचे बोलणे, त्याची वागणूक यात एक सुसंस्कृतपणा होता.
जेव्हा समिधा आणि सुमितला एकांतात बोलायला सांगण्यात आले, तेव्हा समिधा शांत उभी होती. तिचे लक्ष कुठेच नव्हते.
“समिधा, मला माहित आहे की अशा प्रसंगी मुलींवर खूप दडपण असते. तुला माझ्याबद्दल काही विचारायचे आहे का? किंवा तुझ्या काही अटी किंवा स्वप्ने आहेत का?”सुमितने अत्यंत मृदू आवाजात सुरुवात केली
समिधाने वर पाहिले. सुमितच्या डोळ्यात एक वेगळाच प्रामाणिकपणा दिसत होता. पण समिधाचे मन अजूनही प्रीतमच्या आठवणीत गुंतलेले होते.
“नाही… मला काही विचारायचे नाही,” ती हळूच म्हणाली.
“बघ, लग्नानंतरही तुला तुझे शिक्षण किंवा करिअर पुढे चालू ठेवायचे असेल, तर माझा किंवा माझ्या घरच्यांचा अजिबात विरोध असणार नाही,” सुमितने स्मितहास्य करत सांगितले.
मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला समिधा खूप आवडली होती. समिधाच्या घरच्यांना तर हे स्थळ पूर्णपणे वाटत होती. सर्वांनी तात्काळ होकार दिला.
समिधाकडे आता हो म्हणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. जर प्रीतमने तिच्या घरी स्थळ आणण्याची तयारी दाखवली असती, तर तिने घरच्यांशी भांडून, अन्नत्याग करून किंवा विनवण्या करून का होईना, प्रीतमचे नाव लावून धरले असते. पण प्रीतमने तर आधीच हात वर केले होते. आता कोणत्या तोंडाने ती घरच्यांना सांगणार होती की तिला प्रीतमशीच लग्न करायचे आहे? जो मुलगा तिच्यासाठी साधे पाऊल उचलायला तयार नव्हता.
मनाविरुद्ध, नाईलाजाने आणि घरच्यांच्या दडपणाखाली समिधाने होकार दिला. काही दिवसांतच समिधा आणि सुमितचा साखरपुडा ठरला. एका मोठ्या हॉटेलमध्ये अत्यंत थाटामाटात साखरपुडा पार पडला. सुमितने समिधाच्या बोटात हिऱ्याची अंगठी घातली तेव्हा समिधाच्या चेहऱ्यावर एक औपचारिक हसू होते, पण आतून ती सुन्न झाली होती. सुमित मात्र या नात्याबद्दल खूप उत्सुक आणि आनंदी दिसत होता.
साखरपुडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. कुठे तरी, कोणाकडून तरी ही बातमी प्रीतमच्या कानावर पडली.
समिधा आपला आयुष्यातून पूर्णपणे निघून चालली आहे, आणि तीही एका अत्यंत श्रीमंत घरातील मुलाची पत्नी बनणार आहे, हे ऐकून प्रीतमच्या पोटात गोळा आला. ज्या समिधाला तो अगतिक मानत होता, ती आता त्याच्या हाताबाहेर जात होती.
आता मात्र त्याच्यातील मालकी हक्क जागा झाला. त्याला समिधा पुन्हा त्याच्या आयुष्यात हवी होती—किंवा कदाचित तिच्या नवीन श्रीमंतीचे सावट त्याला आकर्षित करत होते.लग्नाला आता फक्त १५ दिवस उरले होते. समिधाच्या घरात लग्नाची घाईगडबड सुरू होती. कपड्यांची खरेदी, दागिन्यांची निवड, आमंत्रण पत्रिका वाटणे… सर्व काही वेगाने चालू होते.
एका संध्याकाळी, समिधा तिच्या मैत्रिणीसोबत लग्नाच्या साड्यांच्या मॅचिंग ब्लाउजसाठी टेलरकडे गेली होती. तिची मैत्रीण दुकाना आत गेली असताना, समिधा बाहेर गाडीजवळ उभी होती. अचानक एका कोपऱ्यातून एक सावली पुढे आली.
“समिधा…”
समिधाने वळून पाहिले आणि ती दचकली. समोर प्रीतम उभा होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि डोळे लाल झाले होते.
क्रमशः