” वसुधा…झाली का सगळी तयारी…पाहुणे यायची वेळ झाली असेल…” वसंतरावांनी हॉलमधून त्यांच्या पत्नीला आवाज दिला.
” हो…जवळपास सगळच झालंय…विविधा पण तयार आहे…” वसुधाताई म्हणाल्या.
” चला…सगळं काही व्यवस्थित पार पडलं म्हणजे झालं…तसा राजेश सांगत होता की मुलाकडचे खूप चांगले आहेत…मुलगा सुद्धा चांगल्या नोकरीला आहे…” वसंतराव कौतुकाने सांगत होते.
वसंतरावांच्या मित्राने त्यांच्या मुलीसाठी त्यांना हे स्थळ सुचवले होते. मुलगा चांगल्या बँकेत नोकरीला होता. वसंतरावांना दोन मुली होत्या. विविधा आणि वृषाली. दोघीही चांगल्या शिकल्या होत्या. वसंतरावांनी आता दोघींची लग्ने करावी म्हणून स्थळ पाहायला सुरुवात केली होती. हे पहिलेच स्थळ होते.
घरात पाहुण्यांसाठी छान स्वयंपाक केला होता. पाहुण्यांसाठी वसंतरावांनी पुण्यातील नामवंत मिष्ठान्न भांडार रातून मिठाई आणली होती. त्यांना पाहुण्यांच्या स्वागता मध्ये कुठलीच कमी ठेवायची नव्हती.
वसंतरावांच्या मित्राचा फोन आला आणि ते जवळच पोहचल्याचे कळवले. वसंतराव त्यांच्या स्वागतासाठी स्वतः बाहेर गेले. पाहुण्यांना घेऊन वसंतराव आत आले. सुरुवातीला चहा पोहे दिले. आणि नंतर लगेच मुलीला बैठकीत बोलावण्यात आले.
मुलीला पाहुण्यांनी नाव, शिक्षण, छंद, स्वयंपाक येतो का वगैरे जुजबी प्रश्न विचारले. आणि मुलाच्या वडिलांनी तिथेच जाहीर करून टाकले की त्यांना मुलगी पसंत आहे. इतक्या लवकर त्यांची पसंती होईल हे माहिती नसल्याने वसंतरावांची जरा धांदल उडाली होती. पण मनातून मात्र ते खुश होते. मुलगा निषाद त्यांना चांगला वाटला होता. आणि घरचे पण चांगले वाटत होते.
त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला. सगळेजण आनंदात होते. इतक्यात मुलाचे वडील म्हणाले.
” आता आमची पसंती तर झालेलीच आहे…तुमची पण पसंती असेल तर लवकरच साखरपुडा उरकून घेऊ…”
” जास्त घाई नाही का होणार साखरपुड्याला…म्हणजे आपण आजच पहिल्यांदा भेटतोय…आधी सर्वकाही बोलून आणि मग पुढील कार्यक्रम ठरवू…” वसंतराव म्हणाले.
” तुम्हाला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही घ्या…पण मला तर असच वाटतं की एकदा पसंती झाली की लवकर लग्न उरकून टाकावं…बाकी देण्या घेण्याचं म्हणाल तर आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे…आम्हाला इतर कशाचीही अपेक्षा नाही…” निषादचे वडील म्हणाले.
मुलाकडच्यांच्या काहीच अपेक्षा नाहीत हे ऐकून वसंतरावांना चांगले वाटले. नाहीतर आजकाल हुंड्याच्या नावाखाली काय काय मागण्या असतात मुलाकडच्या लोकांच्या. तसे पाहता वसंतरावांकडे कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. सरकारी नोकरीत मोठ्या पदावर कार्यरत होते ते. आणि गावी सुद्धा भरपूर शेती होती. वसंतरावांनी कशाचीही कमतरता नव्हती. आणि न मागता सुद्धा त्यांनी मुलीच्या लग्नात भरपूर दिले असतेच.
पण इतकं सगळं असूनही मुलाच्या वडिलांना त्यांच्याकडून कशाचीही अपेक्षा नव्हती म्हणून आपली मुलगी ह्यांच्या घरी सुखाने नांदेल असा वसंतरावांना विश्वास वाटत होता. म्हणून त्यांनीही जात आढेवेढे न घेता लवकर साखरपुडा करायला हो म्हटले. अर्थातच त्यांनी आधी विविधाचे मत सुद्धा विचारले. तिला पण मुलगा आवडला होताच.
त्यानंतर साखरपुड्याचे निमित्ताने दोन्ही कडील मंडळींच्या भेटी होतच होत्या. विविधा आणि निषादचे एकमेकांशी फोनवर बोलणे सुद्धा सुरूच होते. दोघांनीही आवडीने साखरपुड्याची शॉपिंग केली. आणि बघता बघता साखरपुड्याचा दिवस उजाडला.
वसंतरावांनी साखरपुड्याची अगदी जय्यत तयारी केली होती. विविधा तर आज नटून थटून अगदी लक्ष्मी सारखी दिसत होती. दोन्हीकडून भरपूर पाहुणे मंडळी आली होती. दोघांनीही सर्वांच्या साक्षीने एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि साखरपुडा पार पडला. सर्वजण खूप आनंदात होते.
मात्र साखरपुडा झाल्यावर दुसऱ्या दिवशी विविधाने निषादला फोन केल्यावर तो तिच्याशी चांगला बोलला नाही. विविधाला थोडे विचित्र वाटले पण तिला वाटले की कालच्या कार्यक्रमामुळे थकला असेल म्हणून नीट बोलला नाही. पण पुढचे दोन दिवस असेच चालले. विविधाने त्याला फोन केला की तो तिच्याशी व्यवस्थित बोलायचा नाही. एरव्ही रोज सकाळपासून रात्रीपर्यंत दहा पंधरा फोन करणारा निषाद तिचा फोन सुद्धा उचलत नव्हता.
नंतर मात्र विविधा काळजीत पडली की निषाद तिच्याशी असे का वागतोय. तिने ही गोष्ट तिच्या आईच्या कानावर घातली. आणि आईने बाबांना सांगितले. बाबांनी याबाबत निषाडच्या वडिलांशी बोलायचे ठरवले. पण त्या आधी निषादच्या वडिलांचा फोन आला आणि ते म्हणाली की त्यांना वसंतरावांशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे.
वसंतराव सुद्धा काळजीत पडले की ह्यांना नेमके काय महत्त्वाचे बोलायचे आहे. वसंतरावांनी त्यांना संध्याकाळी घरी बोलावले. ते घरी येईपर्यंत वसंतराव काळजीत होते. शेवटी संध्याकाळी निषादचे वडील घरी आले. चहापाणी झाल्यानंतर वसंतरावांनी थेट विषयाला हात घातला.
” काय झालंय…तुम्हाला काय बोलायचे होते…काही चुकलं का आमचं…?”
” नाही…तुमचं काही चुकलं नाही पण आमचं चुकलं…आम्ही लग्न ठरवण्या आधी नीट सगळी माहिती घ्यायला हवी होती…” निषादचे वडील म्हणाले.
” म्हणजे… नेमकं काय झालंय…?” वसंतरावांनी विचारले.
” विविधा तुमची मुलगी नसून ती लहान असताना तुम्ही तिला दत्तक घेतलंय हे तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं…?” निषादच्या वडिलांनी विचारले.
निषाद च्या वडिलांनी विचारलेल्या प्रश्नावर वसंतरावांनी चमकून त्यांच्याकडे वर पाहिले. विविधा ही त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे हे फक्त त्यांच्या गावातील लोकांना आणि काही निवडक नातेवाईकांना माहिती होतं.
विविधा त्यांच्या लहानपणीच्या मित्राची सुरेशची मुलगी होती. तिचा जन्म झाल्या झाल्या तिची आई वारली होती. पण मुलीला सावत्र आई नको म्हणून त्याने दुसरे लग्न केले नाही. सुरेश ची परिस्थिती गरीब होती. पण तरीही वसंतराव आणि सुरेशची मैत्री लहानपणी पासून जशी होती आताही अगदी तशीच राहिली होती.
लहानपणी पासून विविधा वसंतराव आणि वसुधाताईच्या अंगा खांद्यावर खेळली होती. पण एके दिवशी अचानक सुरेशचा सुद्धा एका अपघातात मृत्यू झाला आणि पाच वर्षांची विविधा अनाथ झाली. त्यानंतर विविधा ला अपशकुनी म्हणत तिच्या घरच्यांनी नाकारले. तिच्या नातेवाईकांमध्ये कुणीच तिची जबाबदारी घ्यायला पुढे आले नाही.
सुरेशची परिस्थिती तशी गरीबच होती. त्यामुळे विविधा च्या नावाने काही संपत्ती सुद्धा नव्हती म्हणून कोणीच तिला वागवायला तयार झाले नाही. स्वतःच्या आईवडिलांना खाणारी मुलगी आम्हाला नको म्हणून तिचे काका, काकू आणि मामा, मामी यांनी सुद्धा आपले हात वर केले. आणि तिला अनाथ आश्रमात द्यायचा निर्णय घेतला.
क्रमशः
लेक माहेराच सोनं – भाग २ (अंतिम भाग)