वसुधा ताईंना विविधा अनाथ आश्रमात गेलेली नको होती. लहानपणी पासून त्यांनी अगदी आईच्या मायेने तिचा सांभाळ केला होता. मग वसुधा ताई वसंतरावांना म्हणाल्या.
” अहो…माझ्या मनात एक गोष्ट आहे…तुम्हाला राग येणार नसेल तर बोलू का…?”
” बोल ना…”
” आपणच विविधाला दत्तक घेतले तर…”
” अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ…फक्त मी ह्याची वाट पाहत होतो की कुणी तिच्या घरातील व्यक्ती तिला सांभाळायला तयार होतात की नाही… तसे झाले नसते तर मी स्वतःहून तुझ्याशी या विषयावर बोलणार होतो…तू काय म्हणशील याची धाकधूक होतीच माझ्या मनात…पण तू स्वतःहून म्हटलं म्हणजे माझी काळजी मिटली…मी विविधाला आपल्या घरी घेऊन येतो आणि जे काय कायदेशीर सोपस्कार करायचेत ते करून टाकू…” वसंतराव म्हणाले.
आणि विविधा वसंतरावांच्या कुटुंबाचा एक भाग बनली. विविधा आणि वृषाली सारख्याच वयाच्या होत्या. दोघींमध्ये सख्ख्या बहिणी पेक्षा जास्त प्रेम होते. दोघीही एकमेकींवर जीव ओवाळायच्या. काही लोकांना माहिती होते की विविधा दत्तक घेतलेली मुलगी आहे पण ज्यांना माहिती नव्हते त्यांना वसंतराव आणि वसुधा ताई विविधा आमचीच मुलगी असल्याचे सांगायचे. त्यांनी गाव सोडल्यानंतर विविधाला नेहमी स्वतःची सख्खी मुलगीच सांगितले होते. आणि तिच्यावर अगदी सख्ख्या मुलीसारखं प्रेम सुद्धा केलं होतं. विविधा आणि वृषाली मध्ये त्यांनी कधीच कुठलाच फरक केला नव्हता.
दोघांनीही दोन्ही मुलींमध्ये कधीच भेद केला नाही. आणि विविधा दत्तक घेतलेली मुलगी आहे हा उल्लेख सुद्धा कुणी करायचा नाही असे बजावले होते. पण बहुतेक साखरपुड्याच्या कार्यक्रमात आलेल्या कुण्या पाहुण्यांनी निषादच्या घरच्यांना सांगितले होते. निषादच्या वडिलांना उत्तर देताना वसंतराव म्हणाले.
” आम्ही हे तुम्हाला सांगितले नाही कारण आता ती आमची मुलगी आहे…ज्या दिवशीपासून आम्ही तिला दत्तक घेतलं त्या दिवशीपासून ती आमचीच मुलगी झाली…म्हणून आम्ही तिचा कधीच दत्तक घेतलेली मुलगी म्हणून चुकूनही उल्लेख करत नाही…” वसंतराव म्हणाले.
” पण लग्न जुळवता ना हे सांगणं गरजेचं नाही का वाटलं तुम्हाला…” निषादच्या वडिलांनी प्रश्न केला.
” नाही…कारण मला नाही वाटत की आम्ही तिला दत्तक घेतलंय ह्या गोष्टीचा तिच्या लग्नावर काही फरक पडेल…” वसंतराव म्हणाले.
” का नाही पडणार फरक…तुम्हाला दोन मुली आहेत ना…आणि दोन्ही पण लग्नाच्या आहेत…मग तुम्ही तुमच्या सख्ख्या मुलीचं लग्न का नाही जुळवल आमच्या निशादसोबत…” निषाद चे वडील म्हणाले.
” अहो…पण त्याने काय फरक पडतोय…दोंहीपण आमच्याच मुली आहेत आणि तुम्हाला विविधा पसंत सुद्धा पडली होती ना…मग आता काय झालंय…” वसंतरावांनी विचारले.
” अहो…कारण तुमच्या मागे तुमच्या संपत्तीची वारस तुमची सख्खी मुलगीच असणार ना…दत्तक मुलीला काय देणार तुम्ही…नुसते आशीर्वाद…” निषादचे बाबा म्हणाले.
” पण तुम्हाला तर काहीच नको होते…तुमच्या आमच्याकडून कसल्याच अपेक्षा नव्हत्या…” वसंतराव म्हणाले.
” अहो ते फक्त बोलण्यासाठी होते…आता तुम्हाला मुलगा नाही म्हटल्यावर तुमची सगळी संपत्ती तुमच्या दोन्ही मुलींच्या नावानेच होणार ना…आणि मुलींच्या नावे म्हणजे तुमच्या जावयाच्या मालकांची…पण विविधा दत्तक घेतलेली मुलगी निघाली…तिला काय मिळणार..?” निषादचे बाबा नाक मुरडून म्हणाले.
” अच्छा…माझ्या मुलीशी तुमच्या मुलाचे लग्न लावून देण्यामागे हा हेतू होता तर तुमचा…आणि विविधाला मी दत्तक घेतलेलं आहे हे माहिती पडल्यावर आता काय म्हणणे आहे तुमचे…” वसंतरावांनी विचारले.
” आता हे लग्न नाही होऊ शकत…पण दोघांचा साखरपुडा झालेला आहे…त्यात तुमची मुलीकडील बाजू…एकदा मुलीचे लग्न तुटले की पुन्हा जुळणे कठीण…म्हणून माझ्याजवळ ह्या सगळ्यांवर एक तोडगा आहे…” निषाद चे वडील म्हणाले.
” आणि तो काय…?” वसंतरावांनी विचारले.
” तुम्ही तुमची अर्धी संपत्ती जर विविधाच्या नावाने केली तर आम्हाला हे लग्न मान्य आहे…” निषादचे वडील म्हणाले.
” आणि जर मी असे केले नाही तर…?” वसंतरावांनी विचारले.
” तर मात्र आम्ही हे लग्न मोडू…” निषादचे वडील म्हणाले.
” तुम्ही काय हे लग्न मोडाल…मीच आज हे लग्न मोडतो आहे… तुमच्यासारख्या लालची लोकांच्या घरी मी माझी मुलगी कधीच देणार नाही…एका वेळी अर्धी संपत्ती तुम्हाला देऊन टाकेन पण माझ्या काळजाचा तुकडा असलेल्या माझ्या मुलीला मी कधीच तुमच्यासारख्या लोकांच्या घरी देणार नाही…विविधाला आम्ही दत्तक घेतलंय ह्याची माहिती तुम्हाला ज्यांनी दिली त्यांचा तर मी आजन्म आभारी राहीन…कारण त्यामुळेच मला तुमचा खरा चेहरा कळलाय…आणि इतकं सर्व झाल्यावर मी माझी मुलगी तुमच्या घरात कधीच देणार नाही…”
” मग काय मुलीला आयुष्यभर घरीच बसवून ठेवणार की काय…कारण प्रत्येकाला तुमच्या संपत्तीचा मोह तर होणारच ना…हीच जगाची रीत आहे…कितीही नाही म्हटलं तरी देण्याघेण्याची पद्धत आजही पूर्वापार प्रमाणे चालतच आहे…फक्त त्याचे स्वरूप बदललेय…कुठे शोधाल असा मुलगा ज्याला तुमची संपत्ती नको असेल…” निषाद च्या वडिलांनी वसंतरावांना विचारले.
” मला अजूनही चांगुलपणावर विश्वास आहे…जो माझ्या संपत्ती पेक्षा माझ्या मुलीचे गुण पाहिल…तिच्यावर मनापासून प्रेम करेन…आणि असा मुलगा भेटे स्तोवर मी माझ्या मुलीला माझ्याकडेच ठेवेन पण तुमच्या सारख्या इस्टेटीला हलापलेल्या माणसांच्या घरात तिचं लग्न कधीच करून देणार नाही…तुम्ही आता येऊ शकता…” वसंतराव रागाने म्हणाले.
निषादचे वडील निघून गेल्यानंतर मात्र वसंतरावांना आपण मुलीसाठी मुलगा निवडण्यात चूक केली ह्याचे खूप वाईट वाटले. त्यानंतर त्यांनी विविधा ला निषाद च्या घरचे किती चुकीचे आहेत हे समजावून सांगितले आणि तू निषादचा आणखी जास्त विचार करू नकोस असा प्रेमळ सल्ला ही दिला आणि वरून तिचे लग्न जमवताना त्यांच्याकडून चूक झाली ही कबुली सुद्धा दिली.
निषादच्या घरच्यांबद्दल कळल्यावर विविधाला वाईट वाटले पण निषाद आजच्या काळातील असूनसुद्धा त्याचे विचार असे आहेत ह्याचे सर्वात जास्त वाईट वाटले. पण काही काळ गेल्यानंतर ती निषादला पुर्णपणे विसरली.
ह्या घटनेनंतर सावध झालेल्या वसंतरावांनी मात्र ठरवले होते की आता कोणतेही स्थळ आले की आधी त्यांना नीट पारखून घेतील आणि मगच मुलगी त्यांच्या घरी द्यायची की नाही ते ठरवतील.
मुलीच्या संगोपनात मुलीच्या वडिलांना तितक्या खस्ता खाव्या लागत नाही जितक्या तिच्या साठी योग्य मुलगा निवडण्यात खाव्या लागतात. पण प्रत्येक वडील आपल्या मुलीसाठी नेहमी एका चांगल्या जोडीदाराचीच अपेक्षा करतात.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.