काकांनी लगेच दोन दिवसात मुलाकडच्यांना मुलीला पाहायला घरी बोलावले देखील. सगळे सोपस्कार त्यांच्या घरीच पार पडले. मुलाकडच्यांनी मुलीला पसंत केले आणि लवकरच लग्नाचा मुहूर्त देखील निघाला. साधेपणाने लग्न करायचे ठरले आणि महिन्याभरात गौरी आणि प्रशांतचे लग्न झाले देखील.
गौरीचे लग्न झाल्याने शारदा निश्चिंत झाली. तिला वाटले आता गौरीचे पुढचे शिक्षण तिच्या नवऱ्याच्या साथीने उत्तम रित्या पार पडेल. गौरी सुद्धा तिच्या सासरी आली. पण सासरी आल्यावर तिला इथले वातावरण जरा वेगळेच वाटले. सासरची मंडळी तिला जरा जास्तच जुन्या विचारांची वाटली.
नवरा सुद्धा जरा अशिक्षितच वाटत होता. टीव्ही वर येणारी इंग्रजी अक्षरे अडखळत वाचायचा. तिथे गेल्यावर त्यांनी गौरीचे नाव सुद्धा बदलले. गौरीचे नाव प्रशांत च्या नावाशी जुळावे म्हणून त्यांनी प्रतिभा हे नाव तिला दिले. आणि एक हुशार, अल्लड, डोळ्यात अनेक स्वप्ने घेऊन सासरी आलेली गौरी काहीच दिवसात एक पोक्त, घरकामात जुंपलेली, आणि घरचे जे म्हणतील त्याला मुकाटपणे हो म्हणणारी प्रतिभा झाली होती.
इथे नेमकं काय चाललंय हे तिला कळत नव्हतं. पण हळूहळू तिच्या लक्षात यायला लागलं. लग्न होऊन महिना झाला तरीही नवरा घरीच होता. एकही दिवस शाळेत गेला नव्हता. त्यांचे घर सुद्धा साधारणच होते. घरी गाई म्हशी आणि दोन एकर शेत वगळता काहीच नव्हते. आपली फसवणूक झाली आहे हे गौरीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
पण आता तिचे लग्न झाले होते. आणि आपल्या हातात आता इथे राहण्यावाचून कुठलाही पर्याय नाही हे मानून गौरी तिथे राहत होती. कारण गावात मुलगी नवऱ्याला सोडून माहेरी आली की तिची चूक असो व नसो दोषी मात्र तिलाच ठरवले जाते. आणि ह्या सर्वांमध्ये बोट फक्त तिच्या वरच उचलल्या गेले असते.
गौरीसुद्धा ह्याला अपवाद ठरली नव्हती. आईला सांगावे तरी कसे ह्याच विवंचनेत होती. तिला वाटले की हे ऐकून आईला सुद्धा खूप दुःख होईल. म्हणून जोपर्यंत हे सगळे आईला कळत नाही तोवर तिला सुद्धा आपली लेक सुखात नांदते आहे ह्याचे सुख घेऊ देत.
असेच लग्नाला दोन महिने पूर्ण होत आले होते. गौरीच्या सासूबाईंनी घरातील सगळ्या कामांची जबाबदारी गौरीवर टाकली आणि त्या निवांत झाल्या. गौरी घरातील कामे चांगलीच पार पाडायची. पण गाई म्हशीचं अजुन तिला नीट जमायचं नाही. असेच एके दिवशी तिच्या मुळे म्हशीच्या दुधाची पूर्ण कॅन खाली सांडली. आणि तिच्या सासूच्या रागाचा उद्रेक झाला.
सासुने तिला चांगलेच धारेवर धरले. तिला काहीच येत नाही म्हणून नवऱ्याचे कान भरले. नवरा सुद्धा काहीच विचार न करता तिच्यावर धावून गेला. आजवर आईने तिला कधी मोठ्या शब्दात सुनावले सुद्धा नव्हते. पण सासूचे बोलणे आणि नवऱ्याचा मार खाऊन दुःखातिवेगाने ती तिच्या नवऱ्याला म्हणाली.
” माझ्याकडून नकळत झालेल्या एका चुकीसाठी तुम्ही मला इतके मारले पण तुम्ही जाणूनबुजून जी माझी फसवणूक केलीय त्यासाठी स्वतःला काय शिक्षा देणार?”
आणि गौरीने असे म्हणताच तिच्या नवऱ्याचा राग अनावर झाला. सासू आणि सासरे सुद्धा तिला नको ते बोलले. जवळच्याच गावात राहणाऱ्या दोन्ही नणंदा ना तातडीचे बोलावणे पाठवून घरी बोलावण्यात आले. आणि त्या दिवशी रात्री तीन वाजेपर्यंत तिला सगळेच बोलले. नवरा सगळ्यांसमोर बोलायचा आणि मध्येच तिला मारायचा सुद्धा. ती मात्र इतक्या सर्वांमध्ये एकटी पडली.
तिचा आवाज ह्या सगळ्यांनी दाबून टाकला होता. आपण बोललो की मार खावा लागेल हे कळल्याने ती गप्प बसून होती. पण तिच्या सासरच्यांनी सर्वानुमते ठरवले की हिला काही दिवस माहेरी पाठवून द्यायचे. काही दिवसातच हीचा उरला सुरला माज उतरेल. म्हणून मग प्रशांत आज तिला घरी घेऊन आला होता. शारदाला आता सगळंच कळलं होतं. ह्यांनी आपल्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलं हे समजल्यानंतर तिचा राग अनावर झाला. पण ह्यावेळी ती काहीही करू शकत नव्हती. सध्या तिला गौरीला ह्या सगळ्यातून सावरायचे होते.
त्यानंतर आठ दिवस गौरी घरातच राहिली. अजिबात घराबाहेर निघाली नाही. तरीही शेजारी कुणकुण लागलीच. गौरीला तिच्या घरच्यांनी घरातून काढून टाकले म्हणून. शेजारच्या बायका आता शारदा ला आडून आडून विचारू लागल्या होत्या. पण शारदा मात्र सगळ्यांचं सगळं ऐकून गप्पच होती.
गौरीच्या सासरच्यांना वाटले होते की गौरीची आई तिला स्वतः सासरी आणून सोडेल आणि त्यांचे हातपाय पडून तिला स्वीकारा अशी विनंती करेल. पण इतके दिवस झाल्यावरही गौरीच्या आईने त्यांना साधा फोन सुद्धा केला नाही ही गोष्ट त्यांना खटकली. त्यांनी गौरीच्या काकांना फोन केला. शेवटी सगळेजण मिळून एका जागी बसून ह्या विषयावर चर्चा करावी म्हणून गौरीच्या काकांनी एक बैठक घ्याचे ठरवले.
ठरलेल्या दिवशी गौरीच्या सासरहून तिकडच्या नातेवाईकांची एक मोठी गाडी आली. सगळेजण काकांच्या घरी जमले होते. गौरीच्या आईला आणि गौरीला तिथे बोलावण्यात आले. गौरीच्या बाजूने बोलणारी फक्त तिची आई होती. कारण मुलीची बाजून म्हणून तिच्या नातेवाईकांनी हात वर केले होते. गौरी अन् तिची आई तिथे आली. गौरी खूप घाबरलेली होती म्हणून आईने तिला एका रूम मध्ये जाऊन बसायचे सांगितले. आता त्या सर्वांना वाटले ही एकटी बाई आपल्यासमोर काय बोलणार. मग गौरीची सासू पुढे आली आणि गौरीच्या आईला म्हणाली.
” तुमची गौरी इतकी मोठी झाली पण साधं काम करण्याचं वळण नाही लावले तुम्ही तिला…”
” आणि नवऱ्याला उलटून बोलायचं बरी शिकली…” नणंद म्हणाली.
” इतके दिवस आम्ही काही बोललो नाही म्हणून खूपच डोक्यावर बसली…” दुसरी नणंद म्हणाली.
” नवऱ्याला सुद्धा जाब विचारते ती…” नवरा सुद्धा बोललाच.
” आम्ही लग्नात जास्त हुंडा मागितला नाही तरीही तुमच्या मुलीची ही तऱ्हा…” सासरे बुवा सुद्धा बोलले.
गौरीच्या आईने सगळ्यांचे ऐकून घेतले. आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाली.
” आधी मला सांगा…तुमचा मुलगा शिक्षक आहे ना…” गौरीची आई तिच्या सासूला म्हणाली.
तिची सासू गप्प बसली.
” शहरात राहतो तो…आणि गौरीला पण त्याच्यासोबत तिथेच नेणार होता…बरोबर ना…” गौरीची आई गौरीच्या सासरेबुवांकडे पाहून म्हणाली. मग ते सुद्धा गप्प बसले.
” गौरीला तो पुढे शिकवणार होता ना…” तिच्या दोन्ही नणंदाकडे पाहून म्हणाली. त्या दोघी सुद्धा एकमेकींकडे गप्प बसून पाहू लागल्या. आता मात्र कोणालाही काहीच..,……… सुचत नव्हतं. इतक्यात त्या गौरीच्या नवऱ्याला पाहून म्हणाल्या.
” काय झालं मग गौरीच्या एडमिशन च…?” ह्या प्रश्नाने तो इकडे तिकडे पाहू लागला. सोबत आलेले पाहुणे सुद्धा बिथरले. कोणालाच काय बोलावं हे कळत नव्हतं. इतक्यात गौरीचे सासरे म्हणाले.
” आमच्या प्रशांत ला बिजनेस करायचा आहे म्हणून त्याने नोकरी सोडली…”
हे ऐकून गौरीची आई चिडली आणि म्हणाली..
” बरोबर लग्नाच्या दिवशीच हे सुचलं का…त्या आधी आम्हाला का नाही कल्पना दिली…”
” आम्ही सांगणार होतो…” ते म्हणाले.
” खोटं…साफ खोटं…तुम्ही फसवणूक केलीत आमची…तुमच्यावर विश्वास ठेवून मी माझी मुलगी तुमच्या घरी सून म्हणून दिली आणि तुम्ही मात्र तिचा अनादर केलात…तिला शिक्षण देऊ म्हणून सांगितलं आणि तिला सासुरवास करायला निघालात…तुम्हाला काय वाटलं…तिला बाप नाही म्हणजे ती काहीही सहन करेन…तुम्ही तुला कसेही वागवणार…” शारदा म्हणाली.
क्रमशः
लोक काय म्हणतील ? – भाग ३ (अंतिम भाग)