सगळी कामे आटोपून सुमेधासुद्धा तिच्या रूम मध्ये गेली. रूम मध्ये जाऊन बघते तर निशांतने आधीच स्वतःची झोपण्याची व्यवस्था खाली केली होती. आणि दुसरीकडे चेहरा करून गाडीवर झोपी सुद्धा गेला होता. म्हणजे तो फक्त असे दाखवत होता की तो झोपला आहे. पण खरे तर त्याला अजिबात झोप येत नव्हती.
एकीकडे त्याची तीव्र इच्छा होत होती की सगळं काही विसरून सुमेधाला मिठीत घ्यावे. झालं गेलं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी. पण मनात कुठेतरी तिच्याबद्दल राग सुद्धा होता. कारण ती त्याला अशी अर्ध्यावर सोडून गेली होती. खरे तर त्याच्या मनात नेमके काय चालले आहे हे त्याचे त्याला सुद्धा कळत नव्हते. पण त्याचे एक मन मात्र त्याला इतक्या लवकर पुन्हा सुमेधा च्या स्वाधीन होण्यापासून रोखत होते.
दुसरीकडे सुमेधा सुद्धा निशांतशी मनमोकळे बोलायला आतुरली होती. कित्येक दिवसांपासून ती प्रेमाच्या दोन शब्दांनाही पारखी झालेली होती. एका वर्षांचं अंतर मिटू पाहत होतं. पण आपण स्वतःहून कसा पुढाकार घ्यायचा हा विचार तिला त्याच्याकडे जाण्यापासून रोखत होता.
शेवटी ती रात्र दोघांनीही अक्षरशः जागून काढली. पहाटे उशिरा कुठेतरी त्याचा डोळा लागला. इथून बघतो तर ती तयार होऊन रूम मधून बाहेर सुद्धा निघून गेली होती. निशांत सुद्धा मग फ्रेश होऊन बाहेर गेला. तेव्हा दोघी ही सासू सूना हसत गप्पा मारत होत्या. आईला इतकं उत्साही त्याने अनेक दिवसानंतर पाहिले होते. आईच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज जाणवत होते. आणि सुमेधाच्या चेहऱ्यावर निरागसता.
तो पुन्हा सुमेधा कडे खेचल्या जात होता. पण मनात कुठेतरी त्याची इच्छा होतीच की सुमेधा मुळे आपल्याला जितका त्रास झालाय त्याची थोडी तरी परतफेड तिला करावी म्हणून. त्याचा इगो त्याला तिच्यापासून दूर राहायला सांगत होता. आणि निशांत सुद्धा अगदी तसेच वागत होता. आई समोर असताना तो सुमेधाशी अगदी नॉर्मल वागायचा आणि सुमेधा एकटी असली की तिच्याशी अजिबात बोलायचा नाही.
सुमेधा सुद्धा त्याचे मन जाणून होती. सगळं काही पुन्हा चांगले व्हायला वेळ लागेल ह्याची तिलाही कल्पना होतीच. तिने त्याला वेळ द्यायचे ठरवले. तो जे काही वागेल ते सहन करण्याची तिची तयारी होतीच. तसेही सासूबाईंच्या सोबत तिला छान वाटायचे. ती सासूबाईंना नव्याने जाणत होती. पण रात्री रूम मध्ये जाताना मात्र तिला नकोसे होत होते. त्याचा हा अबोला तिच्यासाठी असह्य व्हायचा.
पण सासूबाईंच्या सोबत मात्र आता तिची छान गट्टी जमली होती. तिच्या सहवासाने त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा होत होती. तिच्या सोबत चालता बोलता त्या सुद्धा अगदी तिच्याच वयाच्या होऊन जायच्या. सासू सूना कधी चांगल्या मैत्रिणी झाल्या तिलाही कळलं नाही. दोघीही फिरायला जायच्या. शॉपिंग ला जायच्या.
नातेवाईकांकडे किंवा मैत्रिणीकडे सुद्धा एकत्र च जायच्या. त्या दोघींना पाहून लोकांना खूपच नवल वाटायचे. आधीच घटस्फोट झालेल्या सुनेला त्यांनी पुन्हा स्वीकारले आणि ते ही इतक्या चांगल्या पद्धतीने ही बाबा लोकांच्या आकलनाच्या बाहेर होती. तिकडे मनीषा सुद्धा आपले गरोदरपण आनंदाने अनुभवत होती.
वृंदाताईंना तर तिचे लाड पुरवताना काय करू आणि काय नको असे होऊन जायचे. निशांत आणि सुमेधा सुद्धा अधून काढून घरी जायचे. त्या वेळेला निशांत तिच्याशी अगदीच नॉर्मल वागायचा. पण एकांत असला की पुन्हा तेच. आता मात्र सुमेधाचा संयम सुटत चालला होता. पण कसेतरी करून ती पुन्हा स्वतःला रोखायची.
असेच एकदा दोघेही सुमेधाच्या माहेरी जेवायला म्हणून गेले होते. वृंदा ताईंनी दोघांनाही त्या गेली तिथेच राहायचा आग्रह केला. पण घरी आई एकटीच असेल म्हणून दोघांनीही घरी जाण्याचे ठरवले. त्या रात्री जोराचा पाऊस होता. दोन घरांमध्ये अंतर तसे जास्त नव्हते. पण थोड्या अंतरावर गेल्यावर खूप विरळ अशा इमारती होत्या. म्हणजे तो भाग अजूनही इतका विकसित झालेला नव्हता. शिवाय सोबत चारचाकी असल्याने त्यांना काही विशेष फरक पडणार नव्हता.
दोघेही घरी जायला निघाले. गाडीत बसल्यावर दोघेही अगदीच शांत झाले. पाऊस असल्याने गाडी जरा संथ गतीने चालत होती. इतक्यात अचानकपणे गाडी बंद पडली. आधीच पाऊस आणि त्यातच रस्ता जरा सूनसान वाटत होता. आजूबाजूला विरळ घरे होती पण ती सुद्धा जरा जास्तच अंतरावर. गाडीला काय झालंय हे पाहायला निशांत खाली उतरला.
खाली उतरल्यावर तो पावसाने चिंब ओला झाला. शिवाय बराच वेळ त्याने प्रयत्न केला तरीही गाडी सुरू होत नव्हती. शेवटी सुमेधासुद्धा गाडीतून बाहेर उतरली. गाडीत छत्री नसल्याने सुमेधा सुद्धा ओलीचिंब झाली होती. अधून मधून विजा देखील चमकत होत्या. ती बाहेर येऊन निशांतला म्हणाली.
” काय झालंय…गाडी सुरू होणार नाही का…?”
निशांतने तिला पाहिले. तो तिला म्हणाला.
” तू कशाला बाहेर उतरलीस…पूर्ण ओली झाली आहेस…” निशांत म्हणाला.
त्यावर ती काहीच बोलली नाही. ती पुन्हा गाडीमध्ये बसायला जाणार इतक्यात तिची सँडल रस्त्यावर डगमगली. तसा तिचा तोल गेला. ती खाली पडणार इतक्यात निशांतने तिला सावरले. आपल्याला निशांतने पडण्यापासून वाचवले हे लक्षत येताच तिचा जीव भांड्यात पडला. पण दुसऱ्याच क्षणी त्याचा ओलाचिंब स्पर्श तिच्या मनाला मोहरुन गेला.
तिचे सर्वांग शहारले होते. निशांतची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. पण लगेच त्याच्या लक्षात आले. तो लगेच तिच्या पासून दूर झाला. पण इतक्यात अचानकपणे विजेचा गडगडाट झाला आणि ती घाबरून त्याला आणखीनच बिलगली. ह्यावेळी त्याने स्वतःला तिच्या मिठीतून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र तिने त्याला घट्ट पकडुन ठेवले. त्याने जरा झटक्यातच स्वतःला तिच्यापासून वेगळे केले.
पण आज मात्र ती इतक्या सहजतेने त्याला जाऊ देणार नव्हती. तिने मागून त्याचा हात घट्ट पकडला. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले. पाऊस वाढतच होता आणि हिच्या भावनांचा आवेग सुद्धा आज चढताच होता. हिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारले.
” काय झालंय…का तुम्ही असे दूर राहता माझ्यापासून…?”
तो यावर काहीच बोलला नाही. आता मात्र ती जरा चिडलीच. ती त्याला म्हणाली.
” जर माझ्याशी बोलायचंच नव्हतं…माझ्या जवळ यायचंच नव्हतं तर लग्न का केलं माझ्याशी…? इतके दिवस झालेत तरीपण काहीच बोलला नाहीत तुम्ही माझ्याशी…इतरांसमोर वेगळे आणि माझ्यासमोर वेगळे असे का वागताय…मी काहीतरी विचारत आहे…मला उत्तर द्या…”
आता मात्र तो तिला म्हणाला.
” काय झालं…माझ्या फक्त अबोल्या ने तुला इतका त्रास होतोय…तू कधी विचार केलास का की तू माझ्याशी जशी वागलीस त्याचा किती त्रास झाला असेल मला…माझ्या मनाचा कधी विचार केलास का तू…इतके दिवस मी कसा राहिलो असेल…?”
” ठीक आहे…झाली माझ्या कडून चूक…मान्य आहे मला…मग रागाने का असे ना…माझ्याशी बोला…माझ्यावर रागवा…कसेही वागा…पण असे अबोला धरून तरी राहू नका…” सुमेधा म्हणाली.
” नाही बोलणार… मुळात तुझ्यासोबत हेच व्हायला पाहिजे…जे तू वागलीस त्यानंतर तू माझ्याकडून पहिल्यासारखं राहण्याची अपेक्षा करू नकोस…हीच शिक्षा आहे तुझी…आपण सोबत असूनही सोबत नसू हीच शिक्षा तुझ्यासाठी उत्तम आहे…तुझ्यामुळे जे दुःख माझ्या वाट्याला आले तेच दुःख मी सुद्धा तुला देणार आहे…” निशांत म्हणाला.
” मग असे असेल तर माझ्याशी पुन्हा लग्नच का केले…का सर्वांसमोर कबुली दिली की तुमचं आजही माझ्यावर प्रेम आहे म्हणून…?” सुमेधाने विचारले.
” कारण माझे प्रेम आहे तुझ्यावर…पण त्या प्रेमापेक्षा ही जास्त काहीतरी आहे…तो म्हणजे राग…मला असे बनवण्यामागे तुझ्याच दिलेल्या जखमा कारणीभूत आहेत…आणि आता मी जसा आहे तसा तुला सहन करावाच लागेल…तुझा चेहरा पाहिला की मला सगळं काही जसच्या तसं आठवतं… आय लव्ह यू बट आय हेट यू मोअर दॅन आय लव्ह यू…” निशांत म्हणाला
असे म्हणून निशांत बेफिकिरीने गाडी दुरुस्त करायला लागला. सुमेधा मात्र अजूनही धक्क्यातच होती. नेमकं काय म्हणावं आणि काय करावं हे तिला कळतच नव्हते. इतक्यात गाडी दुरुस्त झाली. तसा निशांत जाऊन गाडीत बसला. आणि तिला म्हणाला.
” आता तुला निमंत्रण द्यावं लागेल का गाडीत बसायला…?”
त्याच्या बोलण्याने ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली आणि यंत्रवत गाडीत जाऊन बसली. निशांतने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि गाडी सुरू केली. घरी पोहचले तेव्हा बरीच रात्र झालेली होती. आई बहुतेक झोपली सुद्धा होती. निशांत गाडीतून उतरून सरळ दाराजवळ गेला. त्याच्या जवळ असलेल्या चावीने दार उघडले आणि घरात गेला.
सुमेधाकडे त्याने वळून सुद्धा पाहिले नाही. सुमेधा गाडीच्या बाहेर कितीतरी वेळ तशीच उभी होती. तिच्या कानात अजूनही निशांतचा आवाज घुमत होता. आय लव्ह यू बट आय हेट यू मोअर दॅन आय लव्ह यू असा. मनात कितीतरी विचारांनी थैमान घातले होते. ती तिथेच बाहेरच्या पायऱ्यांवर जाऊन बसली. वर टेरेसवर जायला बाहेरून पायऱ्या होत्या त्यावरच ती कितीतरी वेळ बसून होती.
आज तिच्या डोळ्यासमोर तिच्या पहिल्या लग्नापासून झालेला सगळं घटनाक्रम येत होता. निशांत आत गेला. ओले झालेले कपडे बदलून झोपी सुद्धा गेला. आज त्याला लगेच झोप देखील आली. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठला तेव्हा सुमेधा रूम मध्ये नव्हती. तो काळ तिच्याशी जे बोलला त्याचे आता त्याला खूप जास्त वाईट वाटत होते. खरे तर त्याच्या कानातबित्के सगळे नव्हते सुद्धा.
त्याला फक्त काही दिवस तिच्याशी अबोला ठेवून तिच्या वागण्याची परतफेड करायची होती. मनातून त्याचे तिच्यावर खूपच प्रेम होते. तिचे त्याच्या आयुष्यातील स्थान सगळ्यात जास्त महत्वाचे होते. राग असो वा प्रेम असो. दोन्ही मध्ये त्याला ती हवी होती. तिच्याशिवाय त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नव्हता. त्याच्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम होते. पण मानवी अहंकार ह्या सगळ्याच्या आड येत होता. त्याला वाटले की ती सकाळीच उठून बाहेर गेली सुद्धा असेल. तो फ्रेश होऊन बाहेर गेला.
आज किचन मध्ये काहीच हालचाल होत नव्हती. ना सुमेधा दिसत होती ना आई. त्याला नवल वाटले. तो तिथेच थांबून त्यांची वाट पाहू लागला. त्याला वाटले सुमेधा आईच्या खोलीत वगैरे असेल. थोड्याच वेळात त्याची आई रूमच्या बाहेर आली. तेव्हा त्याने आईला विचारले.
” काय ग आई…आज किचन मध्ये काहीच हालचाल नाही…चहा, नाश्ता काहीच नाही…”
” हे तर मीच तुला विचारणार होते…आज सुमेधाला उठायला बराच उशीर झाला…रोज एव्हाना नाश्ता तयार असतो तिचा…रात्री उशीर झाला वाटते बाहेरून यायला…” आई म्हणाली.
” म्हणजे…सुमेधा आज सकाळपासून बाहेर दिसलीच नाही तुला…?” निशांतने दचकून विचारले.
” नाही…पण असे का विचारतो आहेस…सुमेधा ला बरं आहे ना…म्हणजे तिच्या रूम मध्येच आहे ना ती…?” आई म्हणाली.
” नाही…म्हणजे मी उठलो तेव्हा ती रूम मध्ये नव्हती…” निशांत भांबावून म्हणाला.
” अरे…रूम मध्ये नाही तर इतक्या सकाळी कुठे गेली असेल ती…?” आई ने विचारले.
” अगं मला काही कळत नाही आहे…” निशांत उत्तरला.
” रात्री झोपताना काही बोलली का तुला ती…सकाळी कुठे जाणार आहे किंवा काही…?” आईने विचारले.
” नाही आई…म्हणजे आमचं असं काही बोलणं नाही झालं…” निशांत म्हणाला. तसे त्याच्या लक्षात आले की ती रात्री रूम मध्ये आलीच नाही बहुतेक. त्याने बाहेर जाऊन बघितले. तर ती कुठे दिसली नाही त्याला. मग त्याने तिला फोन केला. तिचा फोन वाजत होता पण ती उचलत नव्हती. क्षणा क्षणाला त्याचा जीव घाबरा होत होता. इकडे त्याची आई त्याला विचारत होती की काय झाले. पण हा मात्र काही बोलण्याच्या मूड मध्ये नव्हता.
इतक्यात त्याच्या लक्षात आले की तिचा फोन गाडीमध्येच वाजत आहे. म्हणजे काल रात्री तिचा फोन गाडीतच राहिला बहुतेक. तो स्वतःशीच म्हणाला. पण ती काही कुठेच दिसत नव्हती. त्याने तिचा फोन बघितला. तिच्या फोनवर मनीषाचे दोन कॉल आलेले दिसत होते. त्यामुळे सुमेधा तिथे असण्याची शक्यता सुद्धा वाटत नव्हती त्याला.
क्रमशः
सुमेधा नक्की कुठे गेली असेल…? ती पुन्हा परत येईल का…? निशांतला त्याच्या वागण्याचा पश्चात्ताप होईल का..?
©®आरती निलेश खरबडकार.
Mast 👌👌👌👌👌❤❤❤
Thank you 😊