बराच वेळ झाला तरीही सुमेधा काही घरी आलीच नाही. निशांत मात्र आता तिला भेटायला, तिची माफी मागायला उतावीळ झाला होता. त्याने आईला विचारले.
” आई…कधी येईल ग ही…?”
” अरे येईल ना…नाहीतर तू तिला फोन लावून स्वतःच विचारून घे ना…?”
” ठीक आहे…” असे म्हणून निशांत ने तिला फोन लावला. पण ती फोन सुद्धा उचलत नव्हती. आता मात्र त्याला टेंशन यायला लागले. त्याने आईला विचारले.
” सुमेधा कोणत्या मार्केटला गेली ग आई…”
” ते तर सांगून गेली नाही ती…” आई म्हणाली.
” ठीक आहे आई… मी जरा बाहेर जाऊन येतो…” तो म्हणाला.
आई मनातल्या मनात हसतच हो म्हणाली.
तो बाहेर निघून गेल्यानंतर आईंनी लगेच आपल्या फोन वरून ती निघाल्याचा मॅसेज मनिषाला केला. इकडे मनीषाने सुद्धा सुमेधाचा फोन स्वतःजवळ ठेवला होता. मनीषा आज सुमेधाला स्वतःसोबत बाहेर शॉपिंगला घेऊन आली होती. जाणून बुजून आज मनीषा शॉपिंगला जास्त वेळ लावत होती. शिवाय सगळी पसंती सुमेधा करवी करून घेत असल्याने सुमेधा त्या मध्येच व्यस्त होती. मनीषाने तिचा फोन सायलेंट वर ठेवला होता.
सुमेधाच्या सासूबाईंचा निशांत घरून निघाल्याचा मेसेज मिळाल्यावर मनीषाने आपली शॉपिंग आटोपती घेतली. शहर तसे फार मोठे नव्हते. सुमेधा शॉपिंगला नेहमी कुठे जाते म्हणजे तिचे आवडीचे ठिकाण कोणते आहे ते निशांतला नाहीत होते. त्यामुळे इतर कुठेही शोध न घेता तो सरळ तिथेच जायला निघाला.
इकडे मनीषा सोबत सुधीर आलेला होताच. ह्या दोघींची शॉपिंग होईस्तोवर तो बाहेर बसलेला होता. ह्यांची शॉपिंग आटोपली आणि ह्या बाहेर आल्या. सुधीर मनिषाला म्हणाला.
” काय ग…किती उशीर केला…?”
” सॉरी…जरा उशीरच झाला म्हणा…पण आता झालंय आमचं सगळं…चला निघुयात…” मनीषा म्हणाली.
” बरं सुमेधा… चल तुलाही सोडून देतो…” सुधीर म्हणाला.
” नाही रे दादा… मी घरून येताना स्कूटी आणलेली आहे…नाहीतर तुझ्या सोबतच आले असते…” सुमेधा म्हणाली.
” बरं ठीक आहे…नीट जा…आणि घरी पोहचल्यावर कॉल करशील…” सुधीर म्हणाला.
सुमेधा त्यांना गाडीत बसवून स्वतःच्या गाडीकडे निघाली. निशांत सुद्धा तिला पाहायला त्याच मार्केट मध्ये पोहचला होता. त्याने त्याची गाडी पार्क केली आणि रस्त्यावरच तिला शोधायला लागला. आधीच डोक्यात विचारांची गर्दी, आपल्या चुकीची आणि सुमेधा वर असणाऱ्या प्रेमाची होणारी जाणीव, आपल्या वागणुकीमुळे तिला गमावण्याची भीती आणि तिला पाहण्याची अतीव इच्छा ह्यामुळे रस्त्यावर त्याचे लक्ष नव्हतेच मुळी.
अशातच एक नवशिक्या गाडीवाला वेगाने गाडी चालवत होता. गाडीवर त्याचा कंट्रोल व्यवस्थित नव्हता आणि निशांत विचारांच्या गर्दीत हरवलेला होता. गाडी वेगाने त्याच्या दिशेला येणार इतक्यात कुणीतरी त्याला जोरात मागे खेचले. त्यासरशी तो एकदम भानावर आला. त्याने समोर पाहिले तर समोर सुमेधा होती. ती त्याला म्हणाली.
” तुम्हाला दिसत नाहीये का समोर…जर कशाने काही झालं असतं तर…तुम्हाला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं…”
त्याने सुमेधाकडे पाहिले. आणि तिला रस्त्यावरच कडकडून मिठी मारली. नक्की काय होतंय हे सुमेधाला काही कळतच नव्हतं. तिने पुन्हा एकदा चिडून त्याला विचारले.
” मी काय विचारतेय तुम्हाला…तुम्ही रस्त्याने असे का चालत होतात…तुम्हाला समोर काही दिसत नव्हतं का…?”
” नाही दिसलं मला समोरचं काही…पण तुला तर दिसतंय ना…तरीही अशी का वागतेस…?” तो सुद्धा आता चिडला होता.
” काय दिसतंय…तुम्ही काय म्हणताय ते कळत नाहीये मला काहीच…” सुमेधा गोंधळून म्हणाली.
” इतके दिवस मी तुझ्या मागेपुढे घुटमळतोय…तुझ्याशी बोलायला व्याकूळ असतो…तुला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही मला…माझी ही अवस्था दिसत नाहीये का तुला… तू कशी वागतेस माझ्याशी…?” निशांत चिडून बोलत होता.
” कशी वागते म्हणजे…?” सुमेधा ने विचारले.
” माझ्याशी शब्दानेही बोलत नाहीस तू…मी काहीही बोललो तरी उत्तर देत नाहीस…माझ्याकडे पाहत सुद्धा नाहीस…सतत मला टाळत असतेस…इतकंच नाही तर आता तर रूममध्ये सुद्धा येणं कमी केलं आहेस…” निशांत जीव तोडून बोलत होता.
” मग काय करायला हवं होतं मी…?” सुमेधाने आश्चर्याने विचारले.
” म्हणजे…?” निशांत ने विचारले.
” तुम्हीच तर त्या दिवशी म्हणाला होतात ना की माझा चेहरा पाहिला की तुम्हाला त्रास होतो… पहिलं सगळं काही आठवतं..” हे बोलताना सुमेधाचा चेहरा उतरला होता.
” मूर्ख आहे मी…काहीही आणि कसेही बोलतो…पण तू तर आहेस ना समजदार…आणि या आधी माझी एकही गोष्ट ऐकली नाहीस ना तू…मग ही तरी कशाला ऐकलीस…?” निशांत म्हणाला.
” तुम्ही म्हणालात ना की हीच माझी शिक्षा असेल…म्हणून मग मी सुद्धा ही शिक्षा स्वीकारली…हेच आपले प्रायश्चित्त आहे असे समजून…तुम्हाला माझा त्रास नको म्हणून मी तुमच्या समोर येणे टाळत होते…” सुमेधा म्हणाली.
” त्रास तू असल्याचा नाही होत मला…तू नसल्याचा होतो…इतक्या दिवसांनंतर तू पुन्हा माझ्या आयुष्यात आली हे माझ्यासाठी एक सुखद स्वप्न आहे…तू माझ्यावर रुसली आहेस ह्याची जाणीव झाल्यावर तुला पुन्हा गमवायच्या भीतीने रात्रभर झोप येत नाही मला…तू जवळ नसली की सैरभैर झाल्यासारखं होतं…”
” पण तुम्हाला तर माझा खूप राग येतो ना…” सुमेधा आश्चर्याने म्हणाली.
” माझा राग दिसतो…पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असणारं माझं प्रेम नाही का दिसत तुला…माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर…खूप जास्त…सगळ्यात जास्त…” निशांत म्हणाला.
” मग इतके दिवस माझा राग राग का करायचे…?” सुमेधाने विचारले.
” राग येणार नाही का…अगं माझं किती प्रेम होतं तुझ्यावर…पण तू मात्र क्षुल्लक कारणावरून मला सोडून दिलंस…जराही विचार केला नाहीस की आपल्याशिवाय ह्याचं काय होईल…कसा जगेल आपला नवरा…इतकंच नाही तर की डिव्होर्स मागितल्यावर लगेच दिलास…मला वाटलं डिव्होर्सच नाव काढल्यावर तू माझ्याकडे परत येशील…
आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू म्हणून मला मनवशिल….पण तू मला समजावण्याचा जराही प्रयत्न केला नाहीस… डिव्होर्स टाळायचा सुद्धा प्रयत्न केला नाहीस… मला वाटायचं की तुझं माझ्यावर कधीच प्रेम नसेल का…फक्त मीच एकटा वेड्या सारखं प्रेम करायचो तुझ्यावर…माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा विचार तरी केलास का तू कधी…मग मला राग नाही येणार का…?
अगं रात्र रात्र झोप यायची नाही मला…या मागच्या एक वर्षात असा एकही दिवस नसेल जेव्हा मला तुझी आठवण आली नाही…त्या दिवशी माझ्या गाडीने तुझा अपघात झाल्यावर माझा जीव कासावीस झाला होता तुला तसे पाहून…वाटत होतं की तूझ्या जवळच बसून राहावं.. तुझा हात हातात घेऊन…पण मला वाटलं की तू इतक्या दिवसात मला विसरली सुद्धा असशील…म्हणून मग मागे सरलो…” निशांत एका दमात म्हणाला.
” पण तुम्ही तर मला आपल्या बाळाच्या जाण्यासाठी कारणीभूत मानत होतात ना…?” सुमेधा डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
” त्यावेळी त्याशिवाय दुसरं काही लक्षातही आलं नसतं…कारण जे घडलं ते घडवण्याबद्दल तू आधीच मला धमकी दिली होतीस…त्यामुळे सगळ्यात आधी तेच डोक्यात येणार ना…त्या वेळी भयंकर रागात होतो मी…म्हणून मग घ’टस्फो’टाचा निर्णय घेतला…पण मनातून कुठेतरी आशा होती की तू स्वतःहून घ’टस्फो’टाला नकार देशील…पण तू तर काहीच बोलली नाहीस…
जणू काही तुलाही तेच हवे होते…मग सगळं काही संपल्यावर आपल्या चुकांची जाणीव व्हायला लागली…रागाच्या भरात चुकीचा निर्णय तर नाही ना घेतला असा वारंवार प्रश्न पडायचा…बाळाच्या बाबतीत तू जर खरंच निर्दोष असशील तर हे वाटून मन अस्वस्थ व्हायचे…
मग जेव्हा तू तुझ्या वहिनीच्या बाळाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला तेव्हाच जाणीव झाली होती की तू निर्दोष असशील ह्याची. अगं जी व्यक्ती दुसऱ्याच्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही ती स्वतःच्या बाळाला कशी काय इजा पोहचवेल…” निशांत म्हणाला.
” मग तुम्हाला हे कळले होते तरीही तुम्ही माझ्यावर रागे का भरला होतात…?असे का वागत होतात माझ्याशी…?” सुमेधाने विचारले.
” तो माझा मूर्खपणा होता…पण मनातून कुठेतरी आशा होती की माझ्या अशा वागण्याने तू माझ्या मागेपुढे करशील…मला समजावून सांगशील…मला मनविण्यासाठी काहीतरी करशील…पण तू मात्र लगेच हार मानून मोकळी झालीस…माझ्यापासून दूर व्हायला लागलीस…
तुझ्या प्रेमात मी इतके दिवस झुरलो होतो मग एका क्षणातच सगळं काही पूर्ववत व्हायला हवे होते का…पण नाही…तू काहीच प्रयत्न केला नाहीस… मी बोलत नाही म्हटल्यावर लगेच माझ्यापासून दूर व्हायला तयार झालीस तू…तू स्वतःहून का नाही प्रयत्न केलास माझा राग घालवण्याचा…तुझं खरच प्रेम नाही का ग माझ्यावर…?” निशांत ने विचारले.
तशी सुमेधा त्याचा हात हातात घेत म्हणाली.
” माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर…एव वर्ष तुम्ही जितके झुरलात माझ्यासाठी त्यापेक्षा कितीतरी पटीने मी व्याकूळ झाले होते तुमच्या आठवणीत…पण तुमच्या समोर येणार तरी कशी…मनात सतत अपराधीपणाची भावना होती…असे वाटायचे की मी तुमच्यासमोर आली तर तुम्हाला खूप राग येईल माझा…सगळं काही पुन्हा पुन्हा आठवेल…तुम्ही घ’टस्फो’ट मागितल्यावर माझी काय अवस्था झाली ते माझे मलाच माहीत…
पण मी घ’टस्फो’टाला नकार सुद्धा काही देणार होते…मी तुमच्यासोबत खूप वाईट केलंय हे नाहीत होते मला…मला वाटले होते की मी तुमच्या लायकीची नाही म्हणून…म्हटलं आयुष्यात तुम्हाला सुख तर देऊ शकले नाही…निदान तुमच्या मनाप्रमाणे वागून तुम्हाला थोडं तरी समाधान द्यावं…म्हणून मग नाईलाजाने मला तो निर्णय घ्यावा लागला…त्यानंतर मी खूप एकटे पडले होते…एकेक दिवस मी कसा घालवला ते माझं मला माहित…”
” मग तेव्हाच का नाही मागे वळून आलीस माझ्याकडे…माझ्यावर एवढाही विश्वास नव्हता का तुझा…?” निशांत म्हणाला.
” कशी येणार… मला भीती वाटायची…माझ्या दिसण्याने तुम्ही दुखावल्या गेले तर…तुम्ही माझं काही ऐकून घेतलं नाही तर…” सुमेधा म्हणाली.
” भीती तर मलाही खूप वाटली…तू जेव्हा माझ्याशी बोलणं बंद केलं तेव्हा तुला पुन्हा गमवायची भीती वाटली मला…अस्वस्थ झालो होतो मी…म्हटलं आयुष्याने पुन्हा एक संधी दिली आहे प्रेम करण्याची…म्हणून आता फक्त प्रेम करायचं…बाकी काहीच नाही…पुरे झाला आता दुरावा…आता यापुढे फक्त आणि फक्त एकमेकांवर प्रेमच करायचं…” निशांत म्हणाला.
त्यासरशी सुमेधाने त्याला पुन्हा एकदा मिठी मारली. आपण रस्त्यावर आहोत हे दोघेही विसरले बहुतेक. येणारे जाणारे लोक त्यांच्याकडे पाहत होते. रस्त्यावर गाड्या सुद्धा ये जा करत होत्या. अचानक निशांतला काहीतरी आठवले आणि तिला मिठीतून सोडवत त्याने सुमेधाला विचारले.
” माझ्या समोर यायची भीती वाटत होती तुला तर तू पुन्हा लग्नाला कशी काय तयार झालीस…?”
” ह्याच सगळं श्रेय माझ्या वहिनीला जातं… घटस्फोटा नंतर मी खूप वाईट मनस्थितीत होते…मग मी काय वागत गेले ते माझं मलाही कळलं नाही…स्वतःच्या सभोवती एक वाईटपणाचं आवरण तयार केलं होतं मी…स्वतःच्या डोक्याने अजिबात विचार करत नव्हते…आई जे म्हणेल आणि जसे म्हणेल तशीच ऐकायचे…
इतकंच नाही तर स्वतःच्या वहिनीला सुद्धा त्रास दिला…पण तिने मला फक्त माझ्या चुकांची जाणीवच करून दिली नाही तर माझ्या चुका दुरुस्त करण्यासाठी मला मदत सुद्धा केली…आणि इतकेच नव्हते तर माझं प्रेम… जे परत मिळण्याची काहीच आशा नव्हती ते सुद्धा मला तिच्यामुळेच मिळाले…तुम्ही पुन्हा माझ्या आयुष्यात येणे ही अशक्य प्राय गोष्ट फक्त आणि फक्त तिच्यामुळे शक्य झालीय…” सुमेधा म्हणाली.
” माझे आभार नंतर कधीतरी माना…आता फक्त जे करायचे ठरवले आहे तेच करा…”
हा आवाज ऐकून दोघांनीही चमकून वर पाहिले. ते एका गाडीच्या आडोशाला उभे असलेले सुधीर आणि मनीषा त्यांच्याकडे येत म्हणाले. आपले आतापर्यंतचे सगळे बोलणे त्यांनी ऐकले हे कळल्याने दोघेही अगदीच ओशाळले होते. सुमेधा ने खाली मान घालूनच विचारले.
” म्हणजे…?”
” अहो म्हणजे आता फक्त प्रेम करायचे ठरवले आहे ना तुम्ही… मग आता फक्त तेच करायचे…” मनीषा म्हणाली.
तसे ते दोघे पुन्हा लाजले. दोघांचं सगळं काही आलबेल झालंय हे पाहून दोघेही आनंदले. बायकोच्या हुशारी वर सुधीरला खूप गर्व वाटला तेव्हा. मग त्यांचा निरोप घेऊन मनीषा व सुधीर घरी निघून गेले. सुमेधा व निशांत सुद्धा घरी जायला निघाले. आपली दोन्ही प्रेम पाखरं प्रेमात इतके भान विसरले होते की आपण येताना दोन वेगवेगळ्या गाड्या घेऊन आलोत हे देखील विसरले आणि एकाच गाडीने घरी पोहचले.
त्यांना असे हातात हात घालून घरात येताना पाहून सुमेधा च्या सासुबाई मात्र खूप आनंदल्या. त्यांनी मनातून मनीषाचे आभार मानले. आणि विचार केला की बरे झाले आपण तिला सगळे सांगितले आणि यावर तिची मदत सुद्धा घेतली. सुमेधाला बाहेर घेऊन जाणे आणि निशांतचा फोन उचलू न देणे हा आपल्या मनिषाचाच प्लॅन होता बरं.
कारण तिच्यासारखं हुशार आपल्या स्टोरीमध्ये तरी दुसरं कुणी नाही. दुराव्याने प्रेम वाढतं हेच लक्षात ठेवून तिने ती शक्कल लढवली. म्हणूनच निशांत काळजीत पडला आणि मनातल्या भावना प्रभावीपणे त्याच्या ओठांवर आल्या. सुमेधा आणि निशांतचा संसार त्या दिवशी खऱ्या अर्थाने सुरू झाला.
त्या नंतर काहीच दिवसात मनिषाला सुद्धा मुलगी झाली. घरात आनंदी आनंद झाला. वृंदा ताईंनी आनंदाने मुलीला आपल्या जवळ घेतले. मुलगी दिसायला अगदीच सुधीर सारखी झाली होती. तिला पाहून वृंदा ताई म्हणाल्या.
” दिसायला जरी बाबांसारखी झाली असली तरी हुशार मात्र आपल्या आई सारखी हो बरं का…?” आणि सगळेच हसायला लागले.
समाप्त.
आपण माझ्या ” वर्चस्व” या कथेला दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. वाचकांनी या कथेला भरभरून प्रेम दिले. लाखोंच्या संख्येत वाचकांनी कथेला पसंती दिले. हजारो लाईक्स आणि कॉमेंट्सनी अगदीच भारावून गेल्यासारखे झाले. मेसेंजर वर सुद्धा अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कळवल्या. अनेकांनी ही कथा आपण स्वतः जगत असल्याचे सांगितले. आपली एखादी कलाकृती जेव्हा वाचकांना आवडते तेव्हा मिळालेले समाधान शब्दात वर्णन करू शकत नाही.
कथा जेव्हा सुरू केली तेव्हा तीन ते चार भागात संपवेल असा विचार केला होता. पण जसजशी लिहीत गेले तसतशी कथा आणखीनच विस्ताराला लागली. मनीषा, सुधीर, निशांत, सुमेधा आणि वृंदाताई हे तर जणू आपल्या सभोवताली असणारी पात्रे असावीत इतकी आपल्याशी एकरूप होतात. ह्याचे कारण म्हणजे ही पात्रे आणि कथा सत्यघटनेपासून प्रेरित आहेत. फक्त खऱ्या आयुष्यात कथेचा शेवट गोड झालेला नाही.
माणूस म्हटलं की भावना आल्याच. भावना म्हटलं की त्यांची सरमिसळ सुद्धा आलीच. अशाच विविध भावनांमध्ये गुंफलेली ही कथा आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा. पुन्हा एकदा नव्याने भेटुयात एका नव्या कथेसह.
धन्यवाद
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
मला कथा खुपच आवडली. कथेतील मनीषा चे पात्र खूप आवडले कथा अप्रतिम आहे
धन्यवाद 😊🙏