थोड्याच वेळात मनीषाने दरवाजा उघडला आणि सुमेधा दात ओठ खात तिला म्हणाली.
” काय ग वहिनी…तुला काही वाटत नाही आहे का…माझ्या आईचं वय बघ काय आहे…आणि या वयात तिला काम करावं लागत आहे…आणि तू दिवसभर नुसती लोळत बसली आहेस…फोनवर गप्पा काय मारत आहेस…बाहेरून नाश्ता काय मागवते आहेस…आपली म्हातारी सासू काम करत आहे हे तुझ्याच्याने पाहवते तरी कसे…? तूझ्या जागी दुसरं कुणी असतं तर आईला काम करताना पाहून सुद्धा असं आरामात बसवल्या गेलं नसतं…”
” जसे तुमच्या च्याने पाहवते तुमच्या आईला या वयातही काम करताना तसेच मलाही पाहवते…आणि माझ्याजागी कुणी दुसरं असतं तर आईला काम करताना पाहू शकलं नसतं असे म्हणताय तर मग तुम्ही का बघताय त्यांना असे काम करताना…पटकन जाऊन आईच्या हातचा झाडू घ्या अन् कामाला लागा…तसेही आईच्याने इतके सर्व काम तर होणार नाहीत ना या वयात…” मनीषा बेफिकिरीने म्हणाली.
” वहिनी…तू जरा जास्तच बोलत आहेस असे नाही का वाटत तुला…” सुमेधा रागाने म्हणाली.
” हो.. मला असं वाटतंय की मी तुमच्याशी जरा जास्तच बोलत आहे…म्हणजे तुमचा वेळ वाया जातोय ना बोलण्यात…जा अन् मदत करा आईला…” मनीषा मिश्कीलपणे म्हणाली.
” वहिनी….” सुमेधा जवळ जवळ ओरडलीच. पण मनीषाने तिला न जुमानता तिच्या तोंडावरच दार लावून घेतले.
हे सगळं काही वृंदा ताईंनी पाहिले आणि हे सगळे एवढे सोपे प्रकरण नाही जेवढे आपल्याला आधी वाटले होते हे त्यांना कळून चुकले. मनीषा सहज म्हणून अशी वागत नसून मुद्दामहून आज अशी वागत आहे हे त्यांना एव्हाना कळले होते. सुमेधा तावातावाने आईजवळ आली आणि म्हणाली.
” बघितलं आई…तुझ्या सुनेने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला…फार हिम्मत वाढली आहे हीची…तू आत्ताच्या आत्ता दादाला फोन कर आणि हीचे नखरे सांग त्याला…आज कशी वागते य ते सांग त्याला…”
” बरोबर बोलत आहेस तू…मी आताच त्याला फोन करते…” असे म्हणत सासुबाई आपला फोन शोधू लागल्या. फोन मिळाल्यावर त्या सुधीरला फोन लावणार तितक्याच त्या थांबल्या. आई फोन का करत नाही आहे हे न कळल्याने सुमेधा आईला म्हणाली.
” अगं आई…लाव ना फोन त्याला…आता तोच हीची कानउघडणी करू शकतो…”
” अगं पण त्याला कसं सांगणार…”
” म्हणजे…”
” त्याला आपण सांगणार की मनीषा आज असे वागत आहे म्हणून…पण असे सांगितले तर त्याला कळेल ना की मनीषा फक्त आजच म्हणजे आजच्या दिवसापूरतीच अशी वागत आहे…रोज ती अशी वागत नाही…आणि आपण तर त्याला सांगतो की मनीषा रोजच घरातील काही काम करत नाही…आणि त्याचा यावर विश्वास सुद्धा बसलाय…मग आजच्या वागण्याची तक्रार केली तर बोलाचाल वाढेल आणि मग हे सुद्धा कळेल की रोजची घरातील कामे मनिषाच करते म्हणून…” सासुबाई म्हणाल्या.
” अगं आई…म्हणजे त्याला सुद्धा सांगता नाही येणार का हे सर्व…” सुमेधा नाराजीच्या सुरात म्हणाली.
” नाही सांगता येणार…” सासूबाईंनी दुजोरा दिला.
” म्हणजे आता आपण काहीच नाही का करू शकत…” सुमेधा आईला म्हणाली.
” एक गोष्ट करू शकतो…” सासुबाई विचार करत म्हणाली.
” कोणती गोष्ट…” सुमेधा ने विचारले.
” आपण जे सगळं तिच्या माहेरच्या लोकांच्या कानावर घालूया…आणि त्यांना सांगू की तुमच्या मुलीची समजूत काढा म्हणून…आणि ऐकत नसेल तर घेऊन जा तिला माहेरी म्हणून…माहेरच्यांनी कान पिळले की आपोआप सरळ होईल ती…” सासुबाई शक्कल लढवत म्हणाल्या.
” मग आताच कर ना फोन तिच्या माहेरी…” सुमेधा म्हणाली.
” अगं आता सुधीर च्या ऑफिसमधून घरी यायची वेळ झाली आहे…आणि घरात पसारा बघ किती आहे…तो यायच्या आधी स्वयंपाक आणि इतर कामे झाली पाहिजेत…किचन मध्ये भांडी सुद्धा तशीच पडली आहे…उद्या सकाळी तो ऑफिसला गेला की आपण तिच्या घरच्यांना फोन करू आणि त्यांना तातडीने घरी बोलवून घेऊ…” वृंदाताई म्हणाल्या.
वृंदाताईंची आयडिया सुमेधाला खूप आवडली. त्या दोघी घरातील कामांना लागल्या. पण सवय नसल्याने कामांना खूपच वेळ लागत होता. सगळ्यात जास्त वेळ तर स्वयंपाकाला लागला. सासुबाई आणि नणंद बाई स्वयंपाक करून बाहेर येऊन फॅन सुरू करून सोफ्यावर बसल्या.
इतक्यात मनीषा तिच्या रूम मधून बाहेर निघाली. मनीषाने आता छान पैकी साडी घातली होती. मनीषा किचन मध्ये आली आणि सासूबाईंचा नेहमीच खलबत्ता घेऊन त्यामध्ये ठेचा कुटायला लागली. सुधीर घरी आला अन् मनीषाने आणखीनच जोरात मिरच्या कुटायला सुरुवात केली. जेणेकरून सुधीरचे तिच्याकडे लक्ष जावे.
सुधीरने तिच्याकडे पाहिले. ती सुधीरकडे बघून हलकेच हसली. सुधीरने सुद्धा आज तिला बघून स्माईल दिली. हे सगळं आई अन् सुमेधा पाहतच होत्या. मनिषाची चलाखी एव्हाना त्यांना कळू लागली होती. पण दोघीही काही बोलू शकत नव्हत्या. कारण हे सगळं मनीषा त्यांच्याकडूनच शिकली होती.
त्या दिवशी सगळेच जण अगदी शांत शांत होते. सर्वांचे जेवण सुरू होते. तेवढ्यात मनीषा आपले जेवण संपवून लवकरच उठली. तिने स्वतःचे ताट उचलून नेले. आणि सासूबाईंना म्हणाली.
” आई…तुम्ही सगळे जेवण करा…मी किचन आवरून घेते…बाकीची भांडी नंतर घासेल तुमचं जेवण झाल्यावर…”
सासूबाईंनी मानेनेच होकार दिला. त्याशिवाय त्या काहीच करू शकत नव्हत्या. पण मनातल्या मनात त्या म्हणाल्या की हिला उद्या चांगलीच अद्दल घडवते हिच्या माहेरच्या लोकांसमोर. तिकडे मनीषा मुद्दामहून आवाज करत भांडी घासत होती. सुधीर सुद्धा आज रागात दिसत नव्हता. तो दिवस सासुबाई आणि सुमेधाला जरा जास्तच कठीण गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मनीषा लवकर उठली. अंघोळ करून छान तयार झाली. आणि सुधीरला म्हणाली.
” अहो…आज नाश्त्याला काय करू…?”
आज तिने पहिल्यांदाच सुधीरला असे विचारले होते. हे ऐकून सुधीरला सुद्धा आनंद झाला. तो म्हणाला
” तुला जे आवडेल ते बनव…मला काहीही चालेल…”
आणि मनीषा किचन मध्ये गेली आणि सुधीर साठी ढोकळा बनवला. आज मनीषा किचन मध्ये नाश्ता बनवतेय हे पाहून सासूबाईंना आनंदच झाला. त्यांना वाटले की बरे झाले आज ही स्वतःहून कामाला लागली. त्यांनी सुद्धा सुटकेचा निःश्वास टाकला. पण नेहमीप्रमाणे आज मनीषा सुमेधा च्या खोलीत तिला चहा किंवा नाश्ता द्यायला गेली नव्हती.
नाईलाजाने सुमेधा सुद्धा बाहेर आली. आणि मनीषाला म्हणाली.
” काय वहिनी…आज चहा नाही केला काय सकाळी…”
” तुमचा चहा ठेवायचा बाकीच होता…ते काय आहे ना…तुम्ही कधी उठणार ह्याचा काही अंदाज नव्हता…रोज उशीर होतो ना तुम्हाला उठायला म्हणून म्हटलं उठल्यावर चहा ठेवता येईल…” मनीषा म्हणाली.
सुधीर तिथेच होता. विषय बदलण्यासाठी सासुबाई म्हणाली.
” अरे सुधीर…नाश्ता कर ना…गरम गरम आहे तर…नाहीतर थंड होऊन जाईल…”
” हो करा ना…की खूप आवडीने तुमच्यासाठी ढोकळा बनवलाय…” मनीषा मुद्दामहून म्हणाली.
” अगं हो…करतोच आहे…” सुधीर म्हणाला. ” खरंच छान झालाय नाश्ता…”
आता मात्र सासुबाई कोंडीत पकडल्या गेल्या होत्या. मनीषा असे मुद्दामहून आपण केलेली कामे सुधीर समोर बोलून दाखवत होती. सुधीर सुद्धा आनंदात होता. कारण त्याला वाटले की आईच्या समजावून सांगण्यामुळेच मनीषा मध्ये हा बदल झाला आहे.
सुधीर टिफीन घेऊन ऑफिसला निघून गेला. आणि किचन मधील पसारा तसाच मागे टाकून मनीषा सुद्धा आपल्या खोलीत निघून गेली. सासूबाईंना पुन्हा राग आला. त्यांनी आपला फोन घेतला आणि मनीषा च्या वडिलांना फोन लावला आणि म्हणाल्या.
” मनीषा चे बाबा…तुम्ही तातडीने आज आमच्या घरी या…मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे…अन् येताना मनिषाच्या आईला पण सोबत घेऊन या…”
” काय झालं ताई…आमचं काही चुकलं का…?” मनिषाचे वडील काळजीने म्हणाले.
” तुमचं कुठे काय चुकणार… आमचंच चुकलय…म्हणूनच तुमच्या मुलीला डोक्यावर बसवून घेतलं होतं आम्ही…” सासुबाई म्हणाल्या.
” अहो काय झालं ते सांगता का ताई…मला काळजी वाटत आहे हो…” मनीषाचे वडील केविलवाण्या सुरात म्हणाले.
” तुम्ही तातडीने निघून या.. मग सांगतेच तुम्हाला तुमच्या मुलीचे प्रताप…” एवढे म्हणून सासूबाईंनी फोन कट केला.
सुमेधा आणि सासुबाई मनातल्या मनात खुश झाल्या. तिचे आई बाबा आल्यावर चांगलीच अद्दल घडवतो असे म्हणत त्यांच्या येण्याची वाट पाहू लागल्या.
क्रमशः
सासुबाई मनीषाच्या आईवडिलांना नेमके काय सांगतील…? आई बाबांच्या समजावून सांगितल्याने मनीषा तिचे वागणे बदलेल का…? सासूबाईंना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा मनिषाचा प्रयत्न यशस्वी होईल का…? पाहूया पुढील भागात.
पुढील भाग उद्या प्रकाशित होईल.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
Katha chan ahe pn l=khup lahan ahe pratyek bhag.
अशाच वागण्यामुळे सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे.. परंतु सासरचे असे वागून मुलीच्या घरच्यांना मुलीबद्दल वाईट सांगून स्वतःची बाजू किती चांगली आणि मुलीकडच्यांना कसे कुठले संस्कार नाहीत हे दाखवून आपला इगो कुरवाळत बसतात आणि मग वेळ निघून जाते
अगदी खरंय 😊आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.🙏
Nice story
Thank you 😊🙏