ठरल्याप्रमाणे मनीषाचे आईवडिल अगदीच घाईघाईत मनिषाच्या सासरी यायला निघाले देखील. पण त्यांना खूपच काळजी वाटत होती. म्हणून त्यांनी मनिषाला फोन केला. पण मनिषाचा फोन त्यावेळी व्यस्त असल्याने तिचा फोन लागला नाही. आणि मनिषाला सुद्धा आई बाबांचा फोन आलेला कळला नाही.
मग काळजीने मनिषाच्या वडिलांनी सुधीरला फोन केला. तेव्हा सुधीरने त्यांचा फोन उचलला. मनिषाचे वडील सुधीरला म्हणाले.
” जावई बापू…आमच्या मनिषाच्या कडून काही चूक झालेली आहे का… “
” काय झालंय बाबा…तुम्ही असे अचानक का विचारताय…सगळं काही ठीक आहे ना…” सुधीर आश्चर्याने म्हणाला.
” थोड्या वेळापूर्वी तुमच्या आईचा फोन आला होता आणि म्हणाल्या की तातडीने घरी या…मनीषा बद्दल बोलायचं आहे म्हणून…” मनीषा चे वडील म्हणाले.
” सकाळी तर सगळं काही सुरळीत होतं…आईने मला काहीच सांगितले नाही याबद्दल…पण तुम्ही काळजी करू नका…मी बोलतो आईशी…तुम्ही आले नाहीत तरी चालेल…” सुधीर त्यांना म्हणाला.
” आता आम्ही निघालो देखील… अर्ध्यापर्यंत पोहचलो सुद्धा…आता तासाभरात घरी सुद्धा पोहचू…आणि विहिणबाईंनी बोलावलंय म्हटल्यावर काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणूनच बोलावलं असेल ना…पण मला खूप काळजी वाटत होती म्हणून तुम्हाला फोन लावला…” मनीषाचे बाबा म्हणाले.
” बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका…तुम्ही घरी पोहचा…तोवर मी सुद्धा येतो घरी…” सुधीर म्हणाला.
सुधीर मध्यंतरी मनिषावर नाराज आला तरीही तो तिच्या आईवडिलांचा खूप आदर करायचा. त्यामुळे त्यांना असे काळजीत पाहून त्याला सुद्धा काळजी वाटली. आणि म्हणूनच ऑफीसमध्ये सुट्टी टाकून तो घरी यायला निघाला देखील.
सुधीरशी बोलून झाल्यावर मनिषाच्या वडिलांनी पुन्हा एकदा मनिषाला फोन लावला. आता मात्र त्यांचा फोन लागला. मनीषा ने फोन उचलल्यावर बाबा तिला म्हणाले.
” हॅलो…मनीषा…अगं काय झालंय तिकडे…मला तर काही सुचत नाही आहे…तुझ्या सासूबाईंना काय बोलायचं आहे आमच्याशी…?”
” काय झालं बाबा…तुम्ही असे का बोलताय…?” मनीषाने आश्चर्याने विचारले.
तेव्हा बाबांनी तिला सगळी हकीकत सांगितली. आणि आपली काळजी सुद्धा बोलून दाखवली. त्यावर मनीषा त्यांना म्हणाली.
” बाबा…तुम्ही काळजी करू नका…तुमची मनीषा तुमची मान खाली जाईल असे कधीच वागणार नाही…तुम्ही या मग कळेलच तुम्हाला सगळं…”
बाबांना नीटसे काही कळले नव्हते. पण मनिषाच्या उत्तराने त्यांचं तात्पुरतं समाधान मात्र झालं होतं. तसेही मनीषा खूप समजदार मुलगी होती. तिच्याहातून चूक होणे म्हणजे जरा कठीणच होते आणि जाणूनबुजून वाईट वागणे तिच्यासाठी अशक्यच होते.
मनीषाचे आई बाबा घरी आले आणि दारावरची बेल वाजवली.
बेलचा आवाज ऐकून मनीषा रूम मधून बाहेर आली. पण सासुबाई तिच्या आई बाबांची आतुरतेने वाट बघत असल्यामुळे त्यांनी मनिषाला दार उघडण्याची संधी दिलीच नाही. त्या उत्साहाने दार उघडायला गेल्या.
मनीषाचे आईवडिल घरी आलेले पाहून सासूबाईंमध्ये वेगळाच उत्साह संचारला. त्या त्यांना म्हणाल्या.
” या… बरं झालं तुम्ही आलात ते…”
मनीषा चे आईबाबा कसनुसे हसले आणि आत आले. त्यांना पाहून मनीषा लगेच किचन मध्ये गेली. गॅस वर चहा ठेवला आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. तोवर सासुबाई हॉलमध्ये त्यांच्यासमोर बसूनच होत्या. मनीषा पाणी घेऊन आली हे पाहून सासुबाई म्हणाल्या.
” आता बरं तुला पटापट काम सुचत आहेत…पटकन पाणी काय आणत आहेस…चहा काय ठेवला…”
मनीषाने सासूबाईंना काहीच उत्तर दिले नाही. उलट त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेली. त्यामुळे सासूबाईंना आणखीनच चेव आला. त्या तिच्या आई बाबांकडे पाहत म्हणाल्या .
” बघितलं तुम्ही…हे असं चाललंय हिचं आजकाल…काही विचारलं तरी नीट उत्तर देत नाही…घरकामाला हात लावत नाही…दिवसभर नुसती फोन मध्ये असते…हेच शिकवलंय का तुम्ही हिला…”
” असे नाही…म्हणजे आमच्या मनिषाचा स्वभाव असा नाही हो…आता आहे का वागते आहे कळत नाहीय मला…” मनिषाची आई म्हणाली.
” अशी असते का घरची सून…आजकाल अजिबात काम करत नाही…कालपासून तर नुसती फोन वर बोलत बसते आणि खिदळते…स्वयंपाक झाला की बरोबर बाहेर येते…आणि नवरा कामाला गेला की रूम मध्ये जाऊन बसते…मी काही बोलली की दुर्लक्ष करते…तिच्या नणंदेला उद्धट उत्तरे देते…” सासुबाई पुन्हा तावातावाने म्हणाल्या.
” कालपासून अशी वागतेय म्हणजे या आधी चांगली वागत होती का…” मनीषाने एकदमच विचारले
” हो तर…आधी वेळेवर उठायची…घरातील सगळी कामे करायची…जेवढ्याला तेवढंच उत्तर द्यायची…सगळं काही हातात आणून द्यायची आम्हाला…” सासुबाई म्हणाल्या.
” मग तुम्ही सगळ्यांना असे का सांगत होत्या की तुमची सून अजिबात काम करत नाही…दिवसभर फक्त फोनवर बोलत असते…घरातील सगळी कामं तुम्ही अन् सुमेधा ताई करत असतात म्हणून…” मनीषा ने विचारले.
आणि सासूबाईंच्या चेहऱ्यावरील भाव एकदमच बदलले. त्या मनातल्या मनात एकदमच खजील झाल्या. मनीषा पुढे म्हणाली.
” मी तुमची मनापासून सेवा केली…कधी एक शब्दही वाईट बोलले नाही मी तुम्हाला…ना कधी सुमेधा ताईला वाईट वाटेल असे काही बोलले…दिवसभर नुसती कामे करायची…तेही आनंदाने…तुम्ही सुद्धा माझ्याशी गोडगोड बोलायच्या…माझं कौतुक करायच्या…मी स्वतःला धन्य मानत होते तुमच्यासारखी सासू भेटल्याबद्दल…पण तुम्ही माझ्याशी समोर वेगळ्या आणि माझ्या मागे वेगळ्या वागत होत्या…” मनीषा म्हणाली.
त्यावर सासुबाई काहीच बोलत नव्हता. मनिषाची आई म्हणाली.
” हे सगळं तू काय बोलत आहेस मनीषा…?”
” योग्य तेच बोलत आहे आई…अगं सासुबाई सगळ्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना आणि इतकंच नव्हते तर ह्यांना सुद्धा हेच सांगायच्या की मनीषा घरी काहीच काम करत नाही…दिवसभर नुसती मोबाईलवर बोलत असते…आणि घरातील कामे त्या आणि सुमेधा ताई करतात म्हणून…
बाहेरच्या लोकांच्या मनात स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून ह्यांनी मला सगळ्यांच्या नजरेतून पाडले… बरं सगळ्यांचं जाऊद्या…माझ्या नवऱ्याला सुद्धा ह्यांनी बोललेला शब्द न शब्द खरा वाटतो…मी सगळ्यांचा रोष सहन करू शकते पण नवऱ्याचा रोष कसा सहन करू…आधी ह्यांनी त्यांच्या ह्याच स्वभावामुळे सुमेधा ताईंचा संसार होऊ दिला नाही आणि आता आमच्यात सुद्धा गैरसमज निर्माण करत आहेत…
ज्यांना मी सासुबाई न मानता नेहमी आईच्या स्थानी ठेवले त्यांनी माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात गैरसमज निर्माण केले…माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल सन्मान न दिसत राग दिसतो…कारण काय तर ह्यांनी त्यांच्या मनात माझ्याबद्दल वाईट भरून दिले म्हणून…” मनीषा म्हणाली.
आता मात्र मनिषाच्या आईबाबांना मनीषा साठी खूप वाईट वाटले. मनीषाची आई वृंदाताईंना म्हणाली.
” वृंदाताई…मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती…अहो आम्ही किती विश्वासाने आमच्या मुलीला तुमच्या स्वाधीन केले होते…”
” अहो तुम्हा लोकांचा काहीतरी गैरसमज होत आहे… मी का असे सांगणार कुणाला…कुणीतरी हिचे कान भरलेत माझ्या विरोधात…मी तर जिथे जाईल तिथे हिचे गुणगान करत असते…” सासुबाई चाचरत म्हणाल्या.
” अच्छा…मग साठे काकूंना काय सांगितले होते तुम्ही…आणि तुमच्या भजनी मंडळात नेहमी का सांगायच्या की घरातील कामे करून तुमचे गुडघे आणि कंबर दुखते आणि सून घरात काहीच करत नव्हती म्हणून…इतकंच नव्हते तर त्या दिवशी तुम्ही ह्यांच्याशी जे काय बोललात ते सुद्धा ऐकलं मी…” मनीषा म्हणाली.
आता मात्र सुमेधा गप्प बसू शकत नव्हती म्हणून ती म्हणाली.
” घरातील काम करतेस म्हणजे काही फार मोठे काम करतेस असे नाही…तू घरची सून आहेस… तुझं कर्तव्यच आहे ते…?”
” अच्छा…घरातील सुनेचे कर्तव्य अगदी तोंडपाठ आहे तुमच्या…तसे तर मला हे बोलायचे नव्हते पण तुम्ही हा विषय काढलाच आहे तर मग मला सांगा… तुम्ही जेव्हा एका घरच्या सून होत्या तेव्हा तुम्ही तुमची किती कर्तव्ये पूर्ण केली…जेव्हा तुमच्या नवऱ्याला तुमच्या सोबतीची गरज होती तेव्हा तुम्ही त्यांच्याशी जे वागलात ते काय होते…” मनीषा म्हणाली.
” मी माझ्या आयुष्यात काहीपण करो…तुला काय करायचे आहे त्यात…तू स्वतःच घर सांभाळ फक्त…नाहीतर दादाला सांगून घरातून काढून देऊ तुला…आईने एकदा दादाला सांगितलं तर तो तुला कायमचं सोडून देईल…मी तर म्हणते तू तुझं सामान बांध आणि निघून जा तुझ्या भिकारड्या माहेरी…दादाला काय सांगायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ…” सुमेधा तिच्या आई बाबांसमोर हातवारे करत रागाने म्हणाली.
मनीषा सुमेधाला काही बोलणार त्याआधीच बाहेर दारात उभा असलेला सुधीर सुमेधाला म्हणाला.
” सुमेधा…ते मोठे आहेत तुझ्यापेक्षा…आणि मोठ्यांशी कसं बोलावं हे सांगण्या इतपत लहान नाहीस तू…”
सुधीरला असे अचानक दारात बघून सगळ्यांना वृंदा ताई आणि सुमेधाला आश्चर्य वाटले. सुधीरला सगळं काही कळेल म्हणून सासुबाई मनिषाला म्हणाल्या.
” हे बघ मनीषा…आता सुमेधाचा विषय काढण्यात काही अर्थ नाही…जे झालंय ते विसरून तुझ्या नेहमीच्या कामांना सुरुवात कर…”
” बघितलस दादा…तुझी बायको कशी बोलते ही आम्हाला…” सुमेधा त्याला पाहून म्हणाली.
क्रमशः
सुमेधाच्या आयुष्यात नेमके काय झाले होते…? तिच्या घटस्फोटाचे कारण काय होते…? सुधीरला हे सगळे कळेल का…?
हे पाहूया पुढील भागात. पुढील भाग उद्या प्रकाशित होईल…
©®आरती निलेश खरबडकर.
फोटो – साभार गूगल.