मनिषाला नेमके काय म्हणायचे ते सासूबाईंना जरा जरा कळत होते. मनीषाच्या वागणुकीत झालेला बदल हा फक्त गरोदरपणात होणारी चिडचिड नसून तिला पुन्हा आपल्याला काहीतरी समजावून सांगायचे आहे हे त्यांना कळत होते. त्या मनिषाला म्हणाल्या.
” तुला नेमके म्हणायचे तरी काय आहे सूनबाई…?”
” हेच की निशांतरावांच्या बाबतीत तुम्ही चुकल्या आहात…ते हे काही वागले ते अजिबात चुकीचे नव्हते…उलट एक चांगला मुलगा ह्याहून वेगळे काही वागणार नाही…फक्त बायकोचे सगळे ऐकले म्हणजे तो खूप चांगला नवरा आहे असे नाही ना होत…
आणि जर बायको स्वतः आणि नवऱ्याच्या आईच्या मध्ये एकीची निवड करायला सांगत असेल तर अशा वेळी नवऱ्याने काय करावे हे फक्त त्याच्या सद्सदविवेक बुद्धीने ठरवायचे असते…आणि त्या बाबतीत निशांतरावांचा निर्णय अजिबात चुकला नव्हता…त्यांच्या आईने किती कष्टाने त्यांना लहानाचे मोठे केले होते…
शिवाय त्यांचा काहीही त्रास नव्हता सुमेधा ताईंना…पण फक्त घरावर सुमेधा ताईंचे वर्चस्व राहावे म्हणून सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवावे हा अट्टाहास बरोबर होता का…तुम्हीच विचार करा…तुम्ही मात्र अजूनही त्यांनाच वाईट समजता…झालेल्या घटनांना त्यांना जबाबदार धरता…” मनीषा म्हणाली.
त्या सरशी वृंदा ताई मटकन खाली सोफ्यावर जाऊन बसल्या. चुका करताना माणसाला काहीच वाईट वाटत नाही. पण जेव्हा त्या चुकांची, त्या चुकांच्या आयुष्यावर झालेल्या वाईट परिणामांची जाणीव होते तेव्हा मात्र माणसाच्या हाती फक्त पश्चात्तापच उरतो.
इथे तर त्यांनी एवढ्या मोठमोठ्या चुका केल्या होत्या की त्यामुळे त्यांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. सुधीरच्या बाबतीत सुद्धा त्या असेच वागल्या होत्या. पण सुदैवाने मनीषा हुशार होती म्हणून वेळेवर त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. पण सुमेधाच्या आयुष्यात तर अंधार पसरला होता.
त्या कितीही खंबीरपणे मुलीच्या पाठीशी उभी असल्या तरीही एका जोडीदाराची कमतरता राहिलीच असती. शिवाय निशांत सारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. आणि त्याहून ही जास्त भाग्य लागतं ते तितकीच चांगली सासू मिळायला. सुमेधाला तर नशिबाने भरभरून दिले होते. पण फक्त वर्चस्व वाजवायच्या नादात त्यांनी ते सुख लाथाडले होते.
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ही की आजवर वृंदा ताईंना आपण काय गमावले आहे ह्याची कल्पना देखील नव्हती. पण आज मनीषाच्या कृतीने त्यांना एकदमच या गोष्टीची जाणीव झाली. त्यांच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्यांना तसे पाहून मनीषा घाबरली. आपला आजचा डोस जरा जास्तच झाला की काय अशी तिला भीती वाटली. सुमेधा आणि सुधीरसुद्धा आई जवळ आले. सुमेधा आईला म्हणाली.
” आई… काय होतंय तुला…?”
मनीषा सुद्धा म्हणाली.
” मला माफ करा आई…आम्ही तर नाटक करत होतो…तुम्हाला इतके वाईट वाटेल ह्याची जराही कल्पना नव्हती मला…”
तिचे बोलणे थांबवत वृंदाताई म्हणाल्या.
” तू माफी नको ग मागू पोरी…तुझे तर अनंत उपकार आहेत माझ्यावर…नक्कीच माझ्या मागच्या जन्मातल्या पुण्याई मुळे तुझ्यासारखी सून देवाने पदरात टाकली माझ्या…मला सगळं कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते…खरंच चुकलं माझं…वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की…” एवढे बोलून त्या गप्प बसल्या.
त्यावर सुधीरने त्यांना विचारले.
” कशाचं वाईट वाटतंय आई…?”
” ज्या वेळी मी सुमेधाच्या बाबतीत चूक करत होते त्यावेळी का नव्हतीस तू मला रोखायला…तुला माझ्या आयुष्यात यायला जरा उशीर झाला मनीषा…तेव्हा तू असतीस तर नक्कीच मला एवढी मोठी चूक करण्यापासून रोखले असतेस…आज माझी सुमेधा तिच्या संसारात सुखाने नांदत असती…” वृंदा ताई खिन्न पणे म्हणाल्या.
” तेव्हा मी नव्हते म्हणून काय झाले आई…आता सुद्धा आपण सुमेधा ताईंचा सुखाचा संसार बघूच शकतो की…” मनीषा म्हणाली.
” हो ग…आज ना उद्या सुमेधाच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करावाच लागणार आहे…पण दुसऱ्या वेळेला आधी च्या सारखे माणसं मिळतील ह्याची काय शाश्वती नाही…” वृंदा ताई म्हणाल्या.
” आणि जर पहिली माणसंच पुन्हा मिळत असतील तर…” मनीषाने विचारले.
” म्हणजे…तुला काय म्हणायचे आहे मनीषा…?” वृंदाताईंनी आश्चर्याने विचारले.
आणि मग मनीषा, सुधीर आणि सुमेधाने वृंदाताईंना सगळे काही सविस्तर सांगितले. ह्या तिघांनी आपल्या मागे एवढी सगळी खिचडी शिजत होती आणि आपल्याला अजिबात कल्पना सुद्धा नव्हती ह्याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या सुधीर ला म्हणाल्या.
” अच्छा…तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही तिघे जण इतक्या दिवसांपासून माझ्याशी वाद घालायचे नाटक करत आहात तर…”
” हो आई…बरेचदा आम्ही जाणूनबुजून तुझ्याशी वाईट वागलो त्याबद्दल खरंच सॉरी…पण तुला नेमकं कसं सांगावं ते आम्हाला काही कळत नव्हते…आणि निशांत रावांबद्दल तुझे मत चांगले नाही हे सुद्धा माहिती होते…म्हणून मग मनिषाला ही कल्पना सुचली…” सुधीर म्हणाला.
” अच्छा…आता कळतंय मला सगळंच…आणि इतकी हुशारी माझ्या दोन्ही मुलांजवळ नाही हे सुद्धा जाणून आहे मी…हे डोके तिचेच असेल ह्याची खात्री आहे मला…” वृंदा ताई किंचित हसून म्हणाल्या.
पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता दिसून येत होती. ते पाहून मनीषा त्यांना म्हणाली.
” काय झालं आई…तुम्ही अजूनही काळजीत दिसत आहात…तुम्हाला नाही का पटलं आमचं म्हणणं…?”
” तसे नाही ग…पण तुम्ही तिघेही अजुन लहान आहात…तुम्हाला जग अजुन तितकसं कळत नाही…शिवाय तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ती सोप्पी नाही…या आधी असे कुठेच घडले नसेल…घटस्फोट झाल्यावर पुन्हा संसार थाटायचा…ते ही त्याच व्यक्ती सोबत…
हे जरा पचनी न पडणारे आहे…निदान माझ्या सारख्या माणसाला तर पटणे खूपच कठीण आहे…आपण जरी सगळे काही विसरून नव्याने सुरुवात केली तरी समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमके तेच आहे का हे कसे कळेल…त्या व्यक्तीचा हेतू चांगला आहे की त्याला मागच्या घटनांचा बदला घ्यायचा आहे…
किंवा त्यांच्या मागच्या आयुष्याची सावली त्यांचा येणाऱ्या आयुष्यावर पडेल का हे सुद्धा पाहणे खूप गरजेचे असते…हे सगळे खूपच जगावेगळे आहे असे नाही का वाटत तुम्हाला…?” वृंदा ताई म्हणाल्या.
खरे सांगायचे म्हणजे त्यांना भीती वाटत होती. कारण काहीही झाले तरी सुमेधा त्यांची लाडकी मुलगी होती. तिच्या आयुष्यात पुढे काहीही त्रास व्हायला नको ह्याची काळजी त्यांना वाटणे साहजिकच होते. त्यावर सुमेधा त्यांना म्हणाली.
” आई…मला निशांत वर एवढा तरी विश्वास आहेच की तो जाणूनबुजून मला त्रास होईल असे काही वागणार नाही…त्याला माझा राग येऊ शकतो पण तो मनाने वाईट माणूस नाही…आणि मी यावेळेला त्याच्या आयुष्यात इतके प्रेम भरेल की तो मागचे सगळे विसरून जाईल…”
” हो आई…आणि यावेळेला तिचा भाऊ सुद्धा तिच्या जवळच आहे…आपल्या दोघांच्या घरामध्ये फारसे अंतर सुद्धा नाही…आपण नेहमीच सुमेधाच्या संपर्कात राहू…तिला जरा सुद्धा त्रास झाला किंवा तिला घरी परत यायचे असेल तर आपण आहोतच की…” सुधीर म्हणाला.
” सुमेधा ताईला जराही त्रास झाला तर सगळ्यात आधी मी त्यांच्या सोबत उभी राहेन…आणि तुम्हाला माझ्यावर तर विश्वास आहे ना आई…” मनीषा म्हणाली.
ह्या सगळ्यांचे मत ऐकल्यावर वृंदा ताई जास्त काही बोलूच शकल्या नाहीत. एकतर त्यांचे भूतकाळातील निर्णय खूप जास्त चुकले होते. त्यामुळे मुलांना नेमके काय बोलावे हे त्यांना कळत नव्हते. त्यांचे मन पूर्णपणे मानत नव्हते. लोक हसणार होते हे तर नक्की पण त्यांना वाटले की यावेळी निदान मुलांच्या मनात आहे म्हणून जगावेगळं वागायला काय हरकत आहे.
मग हो नाही करत त्यांनी सुद्धा या सगळ्याला होकार दिला. सुधीरने लगेच निशांतच्या घरी जाऊन बोलणी केली. लवकरात लवकर सगळं काही साध्या पद्धतीने आटोपून टाकू हे ठरलं. सुमेधा मनातून खूप खुश होती. पण कुठेतरी तिला भीती सुद्धा वाटत होती. त्यामध्ये इतक्या दिवसात एवढा वेळ मिळालाच नाही की निशांतशी एकांतात बोलावं. किंबहुना तिला या गोष्टीची भीती वाटत होती.
दुसरं लग्न आणि ते ही पहिल्याच नवऱ्याशी. त्यामुळे फार काही हौसमौज दोघांनाही करायची नव्हती. त्यामुळे जवळच्याच मुहूर्तावर एका मंदिरात दोघांचे लग्न करावयाचे ठरवले. खरेदी सुद्धा ज्याची त्यानेच करायचे ठरवले. म्हणजे मुलीकडची खरेदी मुलीकडच्यांनी आणि मुलाची खरेदी मुलाकडच्यांनी. मनीषा गरोदर असल्याने तिला धावपळ जमणार नव्हती आणि निशांतची आई आजारी असल्याने निशांतच्या आईलाही काही जमणार नव्हते.
सगळी तयारी आटोपली आणि लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. निशांत अनेक त्याची आई आधीच मंदिरात पोहचले होते. सुमेधा आणि तिच्या घरचे जरा उशिराच पोहचले होते. त्यातही सुमेधाचा जीव खूप जास्त धडधडत होता. निशांत ची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. त्याला तर काय करावे आणि काय नको हे कळतच नव्हते. पण जे काही होत होते ते त्याला चांगले वाटत होते हे मात्र खरे होते.
सुमेधा मंदिरात पोहचली खरी. पण तिची निशांतशी बोलायची किंवा त्याला पाहायची हिंमतच झाली नाही. ती तशीच तयार होऊन खाली पाहत उभी होती. सोबतीला मनीषा होती म्हणून बरे होते. वृंदाताईंनी आल्या आल्या निशांत च्या आईची भेट घेऊन आधीच्या त्यांच्या चुकांसाठी त्यांची माफी मागितली होती.
आणि निशांतच्या आईने मोठ्या मनाने त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी माफ सुद्धा केले होते. उलट निशांतची आई तर या सगळ्यात खूप जास्त आनंदात होती. कारण या आधी त्यांनी निशांतला खूपदा दुसऱ्या लग्नासाठी तगादा लावला पण तो तयार झालाच नव्हता. शिवाय ह्या दोघांचा काडीमोड व्हावा अशी त्यांची आधी इच्छाच नव्हती. पण त्यावेळी निशांतने त्यांचे काहीच ऐकले नव्हते.
पण सुमेधासोबत दुसऱ्यांदा लग्न करायला मात्र त्याने फारसे आढेवेढे घेतलेले नव्हते. सुमेधावर त्याचे प्रेम आहे हे त्या जाणून होत्याच. शिवाय सुमेधाने मनीषाच्या पोटातल्या बाळासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला हे सुद्धा त्यांनी ऐकले होते. सुमेधाचा बदललेला स्वभाव त्यांना दोघा उभयतांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप चांगला ठरेल हे त्यांना कळले होते.
लग्नाचा मुहूर्त जवळ आला तसे भटजींनी दोघा नवरा बायकोला आवाज दिला. सुमेधा आणि निशांत लग्नमंडपी आले. आणि दोघांची ही नजरानजर झाली. त्या सरशी दोघांच्याही काळजात धस्स झाले. त्यानंतर सुमेधा ने निशांत कडे पाहायची हिंमतच केली नाही. दोघेही एकमेकांना पाहून भान हरपून बसले होते. त्यांना बाकी काही कळत नव्हते. भटजी जसे सांगतील तसे ते करत होते.
शेवटी भटजींनी सांगितले की विवाह संपन्न झाला आणि दोघेही भानावर आले. आता सुमेधाच्या पाठवणीची वेळ आली होती. सुमेधा आईच्या गळ्यात पडून रडत होती. मनीषा आणि सुधीर सुद्धा यावेळी आपले अश्रू रोखू शकले नाहीत. शेवटी तिची जाण्याची वेळ झाली आणि ती निशांत सोबतच्या गाडीत बसली. निशांत आणि सुमेधा गाडीच्या मागच्या सीट वर बसले होते आणि आई ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीट वर बसली.
निशांत आणि सुमेधा दोघेही एकमेकांकडे पाहत नव्हते. सुमेधाला रडू येत होते पण ती गप्प होती. शिवाय एक अनामिक भीती सुद्धा होतीच.
क्रमशः
सुमेधा आणि निशांत चे वैवाहिक आयुष्य कसे असेल…? निशांत च्या मनात नेमके काय सुरू असेल…? सुमेधा पुन्हा एकदा आपल्या संसारात यशस्वी होऊ शकेल का…?” हे जाणून घेण्या साठी कथेचा दुसरा भाग वाचायला विसरु नका
©®आरती निलेश खरबडकार.