तो इतरांपेक्षा वेगळा होता. त्याला समाजसेवेचे भारी वेड. इतरांच्या वेदना पाहून दुःखी होणारा तो.
ती मात्र साधी सरळ. चारचौघां सारखी. आपण बरं नी आपलं जग बरं हे मानणारी.
पण ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
तो तिच्या साधेपणाच्या प्रेमात आणि ती त्याच्या निरागस तेच्या प्रेमात.
त्याच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हते.
त्याची चाललेली समाजसेवा आणि त्याच्या साथीदाराची निवड.
तो मात्र त्याच्या निर्णयापासून तसूभर देखील हलला नाही.
दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केले.
घरच्यांना हे कळताच त्यांचा संताप अनावर झाला.
दोघांनाही दारावरूच माघारी फीरायला सांगितले.
दोघांनीही घर सोडले. मित्रांच्या मदतीने एके ठिकाणी निवारा मिळवला.
आणि दोघांचाही कष्टाचा पण राजाराणीचा संसार सुरू झाला.
त्याला चांगली नोकरी होती. पण स्वतः गरजेपुरते ठेवून बाकीचे तो इतरांसाठी वापरायचा.
तिला मात्र हे जरा विचित्रच वाटायचे. आपण स्वतः कष्ट करायचे आणि आपल्या वाट्याचे इतरांना द्यायचे.
तिने सुरुवातीला त्याला शक्य तेवढा विरोध केला.
तो मात्र हसून तिला म्हणायचा…”अगं…स्वतःसाठी तर सर्व करतात पण मोठा तर तोच असतो जो इतरांसाठी काही करतो.
देवाने आपल्याला एवढे सामर्थ्यवान केले आहे तर इतरांना मदत नको करायला.
सुरुवातीला त्याला विरोध करणारी ती हळूहळू त्याला समजून घ्यायला लागली.
जिथे दोन मनांचे मिलन झाले तिथे विचार तरी कसे वेगळे राहतील.
हळूहळू तिला तो कळायला लागला. त्याच्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू पाहून तिला त्याचा अभिमान वाटला.
आता ती खऱ्या अर्थाने त्याची सहचारिणी झाली.
त्याच्या बरोबरीने तिनेही स्वतःला समाजकार्यात झोकून दिले.
तो स्त्रियांचा खूप आदर करायचा. स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळावी ह्यासाठी तो झटत होता.
अशिक्षित, विधवा यांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देण्यासाठी.
पुरुषांविना स्त्रिजीवन व्यर्थ आहे ह्या विचारसरणीला चुकीचं ठरवणारा तो.
त्यांनी कितीतरी स्त्रियांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
तिने स्वतः जातीने याकडे लक्ष दिले. गरजूंना प्रशिक्षण दिले.
एका सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून त्यांनी विधवा आणि निराधार महिलांसाठी आश्रम उभारला.
तिथल्या सर्व महिलांना त्यांनी मायेने जपले.
त्यांना रोजगारा सोबतच आयुष्य आनंदाने जगण्याचा मार्ग दिला.
अनेक लोकांचे मायबाप झालेल्या त्यांना मात्र देवाने निपुत्रिक ठेवले.
पण दोघांनाही ह्याचे वाईट वाटले नाही. कारण इतक्या कमी वयात अनेकांचे मायबाप झाले होते दोघेही.
अशा त्यांच्या सुखी संसाराला कुणाची नजर लागली काय माहीत ?
एके दिवशी दुपारी तो जेवण झाल्यावर थोडावेळ झोपायला म्हणून पहुडलेला तो परत कधीच न उठण्यासाठी
ती रडली. तिने आकांत केला. पण काहीच फायदा झाला नाही. तिची हाक त्याने ऐकलीच नाही.
तो तिला माघारी एकटीला सोडून या जगातून निघून गेला.
तिचे त्याच्याशिवाय कोणीच नव्हते.
तो असताना ज्यांनी त्याची कदर केली नाही त्या नातेवाईकांकडून ती तरी काय अपेक्षा ठेवणार ?
एके क्षणी तिला वाटले की हे जग सोडून आपण सुद्धा त्याच्याजवळ निघून जावे.
सर्वांना वाटले की ती आता तुटेल. त्याच्याशिवाय कोलमडून जाईल. जगणं विसरेल.
पण ती मात्र पुन्हा त्याच जोमाने कामाला लागली.
त्याच्या अपूर्ण राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी.
त्याने सुरू केलेले कार्य अखंडित सुरू ठेवण्यासाठी.
तिने तिच्या दुःखाला कधी तिच्या चेहऱ्यावर दिसू दिले नाही.
ती सतत आत्मविश्वासाने वावरायची.
शेवटी न राहवून तिला लोकांनी विचारलेच.
तुझा नवरा तुला कायमच सोडून निघून गेला आणि तू मात्र पुन्हा कामाला लागलीस.
तिने हसून उत्तर दिले,” त्याचे काम अर्ध्यावर सोडून त्याच्यासाठी अश्रू गाळणे त्याला कधीच आवडणार नाही.
जो अवघे आयुष्य स्त्रियांच्या कल्याणासाठी, सुखासाठी झटला त्याच्याच सहचारिणी ने आत्मविश्वास गमावून कसे चालेल.
ज्याचे ध्येय इतरांना आनंद द्यायचे होते त्याची अर्धांगिनी दुःखी असणे त्याला अजिबात आवडणार नाही.
त्याचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे हीच त्याला माझी खरी श्रद्धांजली असेल.
मला माहिती आहे तो आजही मला पाहतोय.
तो नसूनही सतत माझ्या सोबत असतो.
म्हणून मी जगणार आहे. अगदी आनंदाने जगणार आहे. आम्ही दोघांनी मिळून जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी.
तिच्या उत्तराने प्रश्न विचारणारा निरुत्तर झाला.
त्याने पाहिलेले स्वप्न ती आजन्म जगली.
खरं प्रेम याहून वेगळं काय असेल ?
समाप्त.
©® आरती लोडम खरबडकर.
Khup chan katha aahe…👌👍