” आई…डॉक्टरांनी मेघाला आराम घ्यायला सांगितला आहे…डॉक्टर म्हणाल्या की जास्त हालचाल करणे सध्या मेघा आणि बाळासाठी चांगले नाही…” मिलिंद आईला समजावत म्हणाला.
” अरे डॉक्टर असेच सांगतात…आराम करायला सांगतात आणि मग नॉर्मल डिलीव्हरी होत नाही…तसेही आजकाल सगळ्या गोष्टींसाठी यंत्र वापरतात…आम्ही तर गावी असायचो तेव्हा आम्हाला सडा, सारवण करायला लागायचे…बाहेरून पाणी आणावे लागत होते…पण आम्हाला नाही कधी काही झाले…आजकालच्या मुलींना फक्त काम करायला नको असतं…” आई म्हणाली.
” आई…मी विचार करतोय की काही महिन्यांसाठी घरकामासाठी एखादी बाई लावायची म्हणून… मेघाला सध्या आरामाची गरज आहे…दिवसभराच्या कामांमध्ये खूप थकायला होतं तिला…” मिलिंद त्याच्या आईला म्हणाला.
” म्हणजे…तुला काय म्हणायचं आहे…मी काय दिवसभर तिला घाण्याला जुंपल्या प्रमाणे काम सांगते का..? फक्त आपल्या तिघांचीच कामे करते ना ती…आणि घरात असे काय काम असतात…आणि पैसा काय झाडाला लागतो काय…तुला इतका बायकोचा पुळका आला असेल तर मला सांग…मी आहे ना…मी करत जाईल हो मोलकरणी सारखे काम…” आई चिडून म्हणाली.
आता मात्र मिलिंदचा नाईलाज झाला. मेघाला आठवा महिना सुरू होता. आणि काही मेडिकल कंडीशन मुळे डॉक्टरांनी तिला आराम घ्यायला सांगितला होता. पण मिलींदची आई मात्र डॉक्टरांचे म्हणणे पूर्णपणे धुडकावून लावत होती. त्यांच्या मते आता जर जास्त काम केले तर डिलीव्हरी नॉर्मल होईल. आराम केल्याने सीझरच होईल अशी त्यांची पक्की खात्री होती.
लग्न झाल्यावर चार वर्षांनी मेघा आणि मिलिंद च्या आयुष्यात बाळाची चाहूल लागली होती. मेघा आणि मिलिंद खूप आनंदात होते. मेघा ला सोबत म्हणून मिलिंद ने आईला गावाहून बोलावून घेतले होते. सासूबाईंच्या येण्याने मेघा सुद्धा खूप खुश होती. पण मेघाच्या सासुबाई पूर्णपणे जुन्या विचारांच्या होत्या.
मिलिंदच्या आई वडिलांचे लग्न झाले तेव्हा त्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे मिलिंद च्या आईने खूप गरिबीत दिवस काढले होते. देवाच्या कृपेने त्यांच्या मेहनतीचं चीज झालं आणि त्यांची दोन्ही मुले चांगल्या नोकरीवर लागली होती. लहान मुलगा शिक्षक होता आणि तो त्याच्या आईवडिलांजवळ गावीच राहायचा. मिलिंदची नोकरी मात्र दूर मुंबईला होती.
आई, बाबा तसे अधूनमधून मिलिंद कडे यायचे. मिलिंद सुद्धा मेघाला घेऊन सुट्ट्यांमध्ये गावी जायचा. पण यावेळी मात्र आई मिलिंदकडे बऱ्याच दिवसांसाठी राहायला आली होती. pregnancy च्या सुरुवातीलाच डॉक्टरांनी मेघाची परिस्थिती थोडी नाजूक असल्याचे सांगत तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सुरुवाती पासूनच घरकामासाठी एक मावशी यायच्या.
मात्र मिलिंदची आई आल्यावर त्यांनी त्या कामवाल्या मावशीला बंद करून टाकले. कारण त्यांच्या मते कामाला बाई लावणे म्हणजे पैशांची उधळपट्टी. त्यांनी मेघाला घरकामाला लावले. त्या मेघाला घरातील जवळ जवळ सर्वच कामे करायला लावायच्या.
सासुबाई सकाळी पाचलाच उठायच्या. आणि उठल्याबरोबर त्यांना चहा लागायचा. त्यामुळे त्या सकाळीच मेघाला झोपेतून उठवत असत. त्यामुळे मेघाचा दिवस सकाळी पाचपासून सुरू व्हायचा. दिवसभरात मेघा पार थकून जायची. पण मेघाच्या सासुबाई म्हणायच्या की कामे केल्याने नॉर्मल डिलीव्हरी होईल.
मेघा दिवसभराच्या कामाने थकून जाते हे मिलिंदला कळत होते. म्हणून त्याने आईकडे पुन्हा एकदा घरकामाला बाई लावायचा विषय आईकडे काढला होता. मात्र आई उलट मिलिंद वरच चिडली होती. आईने लहानपणापासूनच त्याच्यासाठी जे कष्ट घेतले होते त्याची मिलिंदला जाण होती. म्हणून मिलिंद आईसमोर जास्त काही बोलू शकला नाही.
मिलिंदच्या आईने खूप गरिबीत दिवस काढले होते आणि त्यामध्ये त्यांच्या सासूबाईंच्या स्वभाव खूप कडक होता. त्यामुळे मिलिंदच्या आईला गरोदरपणात देखील आराम मिळाला नाही. संपूर्ण आयुष्य सासूचा जाच सहन केल्याने त्यांच्या स्वभावात एक कडवटपणा आला होता. त्यामुळे मेघाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन एका परंपरागत सासू सारखा झाला होता. त्यामुळे त्यांना मेघाचा प्रेमळ स्वभाव कधी कळलाच नव्हता.
इकडे मेघा दिवसभर काम केल्याने थकत होती. आणि आता आठवा महिना लागल्यापासून तर मेघाला अजिबात बरं वाटत नव्हतं. परिणामी मेघा आजारी पडली. तिला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांना तिच्या आजारी पडण्याचे कारण समजले.
डॉक्टरांनी मेघा वर उपचार केले आणि तिच्या सासूबाईंना केबिन मध्ये बोलावून घेतले. त्यांनी मेघाच्या सासुबाईला मेघाची मेडिकल कंडीशन समजावून सांगितली. तसेच प्रत्येक आईची तब्येत सारखी नसल्यामुळे गरोदर पणात प्रत्येक आईला वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं हे ही चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. सासूबाईंनी डॉक्टरांचे म्हणणे न चिडता ऐकुन घेतले. आणि त्यांना कळून चुकले की मेघाच्या बाबतीत त्या खरंच चुकत आहेत.
त्यांना सासूच्या बाबतीत कटू अनुभव आले म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या सुनेच्या बाबतीत तसेच वागणे किती चुकीचे आहे हे त्यांना कळून चुकले. परिस्थितीचे चटके सहन करता करता आपला मूळ प्रेमळ स्वभाव आपण कुठेतरी हरवून बसलोय ह्याची जाणीव त्यांना झाली.
मेघाचा आजाराने उतरलेला चेहरा पाहून त्यांच्या मनातील आई पुन्हा जागी झाली. त्यांनी त्या दिवशीपासून मेघा ची स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली. तिला हवं नको ते बघितले. तिचे लाड पुरवले. आईमध्ये झालेला बदल पाहून मिलिंद आणि मेघा दोघे ही खूप खुश होते. काही दिवसांनी मेघाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आणि संपूर्ण कुटुंबा मध्ये आनंदी आनंद झाला.
कधी कधी आपल्या स्वभावात आणलेला छोटासा बदल सुद्धा आपले आयुष्य बदलून टाकतो हेच खरे…
समाप्त.
©® आरती लोडम खरबडकर.
फोटो साभार – गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.
खुप खुप खुपच छान आणि ह्रदयस्पर्शी