ती पाणी घेऊन बाहेर आली. सर्वजण पाणी पिले. पण बोलायला कोणीच सुरुवात करत नव्हतं. म्हणून शेवटी जान्हवीनेच विषय काढला…
” तुम्ही इथे कसे काय येणे केले…?”
” बरं झालं तूच विचारलस…कारण नेमका विषय कुठून काढावा हे मला कळत नव्हतं…आम्ही आरुष बद्दल बोलायला आलो आहोत…” तिच्या सासुबाई म्हणाल्या.
” त्याचे नाव आरुष नाही आयुष आहे …आणि तुम्हाला त्याच्याबद्दल बोलायचे काय आहे…?” जान्हवीने विचारले.
” आम्हाला आयूष हवाय…म्हणजे आम्ही आयुष्याला आमचा नातू म्हणून स्वीकारायला तयार आहोत…” तिचे सासरे मध्येच बोलले.
तिच्या सासर्यांचे बोलणे ऐकून तिला नवल वाटले. आधी तिने आणि आदेशने सुद्धा किती प्रयत्न केले होते की घरच्यांनी त्यांना आणि आयुषला स्वीकारावं. पण तेव्हा मात्र घरच्यांनी त्यांना स्वीकारले नाही आणि आता स्वतःहून समोर येऊन आयुषला स्वीकारायला तयार होते. एकीकडे आदेशच्या घरच्यांनी आयुषला स्वीकारल्याचा आनंद तर झाला होता पण आज हे सर्व बघायला आदेश इथे नाही ह्याचे दुःख सुद्धा होत होते. पण स्वतःला सावरून तिने तिच्या सासूबाईंना विचारले.
” पण इतक्या वर्षांनी अचानकपणे का तुम्ही आम्हाला स्वीकारायला तयार झाले आहेत…?” जान्हवीने विचारले.
” कारण साकेत ला ( आदेशचा लहान भाऊ ) लग्नाच्या पाच वर्षानंतर देखील मूलबाळ होऊ शकले नाही…म्हणून आम्ही मूल दत्तक घेण्याचे ठरवले…मग आमच्या मनात विचार आला की आदेशचा मुलगा सुद्धा बापाविना वाढत आहे…त्यालाच स्वीकारले तर चांगलेच होईल…नाही का…?” सासुबाई म्हणाल्या.
त्यांचा स्वार्थी विचार ऐकुन त्यांच्या आयुषला स्वीकारण्या मागचे कारण जान्हवीच्या लक्षात आले होते. तिला या सर्वांची खूप चीड आली होती. पण तरीही स्वतःचा राग न दाखवता ती म्हणाली.
” अच्छा…खूप विचार केलात तुम्ही आयुषचा…” जान्हवी स्वतःचा राग लपवत म्हणाली. त्यांच्या मनात काय आहे हे तिला आधी जाणून घ्यायचे होते. म्हणून ती शांतपणे त्यांच्याशी बोलत होती.
” होय…ही आयडिया मीच दिली होती घरच्यांना…” तिची जाऊ अभिमानाने म्हणाली.
” हो का..” जान्हवी उद्गारली.
” हो…पण आमच्या दोन अटी आहेत…” तिची सासू म्हणाली.
” कोणत्या अटी..?” जान्हवी ने विचारले.
” आम्ही त्याला घरी घेऊन गेल्यावर तू सुद्धा दुसरं लग्न करावं आणि नव्या आयुष्याला सुरुवात करावी…आणि हे आमच्या आदेशने घेतलेलं घर आयुषच्या नावाने करून द्यावे…” तिची सासू म्हणाली.
या गोष्टीवर जान्हवी काही बोलेल इतक्यातच तिची जाऊ म्हणाली.
” हो…जेणेकरून तुम्ही आयुषच्या बाबतीत ढवळाढवळ करणार नाही…” तिच्या जावेने असे बोलताच तिच्या सासूबाईंनी तिच्याकडे पाहून डोळे वटारले तशी तिची जाऊ खाली मान घालून बसली.
” आणि दुसरी अट…?” जान्हवी ने विचारले.
” आम्ही आधी आयुषची वैद्यकीय तपासणी करून ह्याची खात्री करून घेऊ की त्याला शरीरावर कोड नाही आहे…आणि पुढे जर त्याला कोड उद्भवला तर आम्ही त्याला आमच्या संपत्तीतून काहीच देणार नाही ” तिचे सासरे म्हणाले.
” माझ्या शरीरावर असणाऱ्या कोडाच्या डागांना मी कधीच माझी कमजोरी मानले नाही…आदेश सुद्धा बाह्य सौंदर्या पेक्षा मनाच्या सौंदर्याला महत्त्व द्यायचा..पण तुम्ही मात्र नेहमीच माझा तिरस्कार केला…पण हे कुठेतरी थांबवा आता…निदान या सर्व गोष्टींची झळ माझ्या मुलाला तरी लागू देऊ नका…मी त्याची कुठलीच वैद्यकीय तपासणी करणार नाही…”. जान्हवी रागाने म्हणाली.
” मग आम्ही त्याला स्वीकारणार नाही…” तिची सासू म्हणाली.
” तुम्ही कोण त्याला स्वीकारणार…तो झाला तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही त्याला बघायला सुद्धा आला नाहीत…आदेश ला सुद्धा घरातून काढून दिल्यावर त्याच्याशी कुठलाच संबंध ठेवला नाही… एवढंच नाही तर तो हॉस्पिटल मध्ये त्याचे शेवटचे श्वास मोजताना जेव्हा तुम्हाला भेटायचं म्हणत होता तेव्हा पण तुम्ही आधी तो खरंच सिरीयस आहे का ह्याची आधी खात्री करून मगच भेटायला आला होतात…आणि तो गेल्यावर त्याच्यासाठी अश्रू गाळण्याऐवजी तुम्ही मला मला शिव्या देण्यात धन्यता मानली…आणि आज जेव्हा तुम्हाला मुलं होत नाही आहे तेव्हा तुम्हाला आमच्या मुलाची आठवण आली…” जान्हवी रागाने म्हणाली.
” आज मोठी आम्हाला नाकारत आहेस…पण पुढे तुझ्या मुलाचा वापर करून तू आमच्या संपत्ती मध्ये वाटा मागितला तर…” तिचे सासरेबुवा म्हणाले.
” कसल्या संपत्ती बद्दल बोलत आहात तुम्ही…माणसांची खरी संपत्ती ही त्याचे संस्कार असतात…ते मी देईल माझ्या आयुषला…तुम्ही कधी आदेशची काळजी केली नाही तर माझ्या मुलाची काय करणार…तुम्हाला अजूनही तुमच्या नातवाची काळजी नाही तर ह्याचा पुढे संपत्तीत वाटा पडेल ह्याची काळजी आहे…तुम्ही खरंच आमची काळजी करू नका…आम्हाला तुमच्यापासून काहीच नकोय…आदेश ने आमच्यासाठी जे केलंय तेच आमच्यासाठी पुरेसं आहे…”
” तू एक चांगली संधी हातातून घालवते आहेस…आयुष ला आम्हाला दिलंस तर तू सुद्धा तुझ्या जबाबदारीतून मोकळी …” तिची सासुबाई म्हणाली.
” आयुष माझ्यासाठी जबाबदारी नाही तर तो माझ्या जगण्याचे कारण आहे…आणि आम्ही एकटे नाही…आदेश चे प्रेम प्रत्येक पावलावर माझ्या सोबत असते…तुम्ही खरंच आमचा विचार नका करू…आणि झाला खरोखरच एका घराची गरज आहे आणि तुम्हाला आवडेल असं एखादं दुसरं मूल दत्तक घ्या…” जान्हवी म्हणाली.
जान्हवीचे बोलणे ऐकून सगळे जन रागारागाने जायला निघाले. घरी आल्यावर आयुष च्या डोक्यावर हात फिरवनाऱ्या आजीने जाताना मात्र त्याच्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही…त्यांना घराबाहेर जाताना जान्हवीला आज पहिल्यांदा वाटले होते की तिच्या शरीरावर हे डाग नसते तर तिचे आयुष्य कदाचित आज वेगळे असते.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.