पल्लवी चे बोलणे ऐकुन नणंद ने शरमेने मान खाली घातली. पल्लवी काहीच चुकीचं बोलली नव्हती. तिच्या नणंद जवळ बोलायला एक शब्द सुद्धा नव्हता. तिची सासू मात्र पंकजच्या मुलाच्या उल्लेखाने क्षणभर विचारात हरवली. आणि पल्लवीला म्हणाली.
” तू बघितलंस माझ्या पंकजच्या मुलाला…?”
” हो…एकदा नाही तर खूपदा…” पल्लवी म्हणाली.
” कसा दिसतो तो…” सासूबाईंनी विचारले.
” जसे लहान मुलं दिसतात…खूप गोड, निष्पाप…त्याला पाहिलं की पाहत राहावं वाटतं…त्याला सोडून यायची इच्छाच होत नाही…आणि इतक्या गोड मुलाला भेटायची तुमची आजवर कधी इच्छा सुद्धा झाली नाही ह्याचं खूप नवल वाटतं मला…” पल्लवी म्हणाली.
” मला घेऊन जाशील त्याच्याकडे…?” सासूबाईंनी विचारले.
” तुम्हाला जर मनापासून इच्छा असेल तर नक्कीच घेऊन जाईल…” पल्लवी म्हणाली.
आणि थोड्याच वेळात प्रणित बाहेरून घरी आल्यावर ते दोघे आईला घेऊन पंकजकडे आले. आईला घरी येताना पाहून पंकजला भरून आले. आई घरात आली तेव्हा पार्थ तिथेच हॉल मध्ये खेळत होता. आईने त्याला पाहिले. अगदी पंकज लहानपणी दिसायचा तसाच दिसत होता. त्यांच्यातले आईपण जागे झाले. त्यांनी पार्थ ला जवळ घेतले. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. आणि त्याला मिठीत घेऊन हमसून हमसून रडू लागली. कितीतरी वेळ कुणीच काही बोलत नव्हतं. बऱ्याच वेळानंतर आईची नजर प्रीतीवर गेली. आईने पार्थला बाजूला केले आणि प्रितिजवळ जावून तिच्या पायावर डोके ठेवायला लागली. प्रीतीने लगेच त्यांना खांद्याला पकडून उभे केले. आणि सोफ्यावर बसवले. आई अजूनही खाली मान घालून बसून होती. म्हणून प्रितीनेच बोलायला सुरुवात केली.
” आई…काय झालंय…काहीतरी बोला ना…अशा गप्प नका राहू…तुम्हाला इतकं हतबल आणि लाचार होताना पहिल्यांदा पाहत आहे…आणि मला हे पाहवत नाही य…” प्रीती म्हणाली.
” कुठल्या तोंडाने बोलू तुझ्याशी…मी काय केलं ते आता आठवलं तरी मला कापरे भरत आहेत…मी आता स्वतःच्या नजरेतून पण पडली आहे…माझ्यासारखी आई देव कोणत्याच मुलाला न देवो…” आई म्हणाली.
” आई…खर सांगायचं म्हणजे मला आधी खूप राग आला होता तुमचा…खूप वाईट वाटलं होतं तुमच्या वागणुकीमुळे…मी जे सहन केलं त्यापेक्षा माझ्या लहान मुलाला जे सहन करावं लागलं त्यामुळे माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप राग होता…त्यावेळी तुम्हाला असं लाचार आणि हतबल झालेले पाहून मला आनंदच झाला असता…पण आज का माहिती नाही पण तुम्हाला असं पाहवल्या जात नाही आहे…कारण पंकजने माझ्या दुःखावर त्याच्या प्रेमाची फुंकर घातली आहे…आणि मी मागचे सर्वकाही विसरून एक नवी सुरुवात केली आहे…माझा आता कोणावरच राग नाही…” प्रीती म्हणाली.
” इतक्या सहजासहजी मला माफ करू नकोस…मला आधीच मेल्याहून मेल्यासारखे झाले आहे…आणि त्यात तू मला इतक्या सहजतेने माफ केलं तर माझ्या मनावरचं ओझं कमी होणार नाही…मला अशी काहीतरी शिक्षा दे जेणेकरून एक आई स्वतःच्या मुलाच्या संसारात कधी विष कालवणार नाही…” आई म्हणाली.
” नाही आई…मी आधीचे सर्वकाही विसरली आहे…तुम्हीपण विसरून जा…आपण सगळे जण पुन्हा नव्याने सुरुवात करू…” प्रीती म्हणाली.
” खरंच…अजूनही आपण नव्याने सुरुवात करू शकतो का…तुम्ही दोघे आणि माझा नातू पुन्हा माझ्या घरी येणार… असे असेल तर माझ्या इतकी भाग्यवान मीच असेल…तुम्ही चला आपल्या घरी…हवं तर मी हात पसरते तुमच्या समोर…” आई म्हणाली.
” आई…हात नका पसरू…आम्ही नक्की येऊ आपल्या घरी राहायला…आम्ही सुद्धा आपल्या घरी येण्यासाठी आसुसलो आहोत…” प्रीती म्हणाली.
” हो आई…आम्हाला कधीच तुझ्यापासून दूर राहायचं नव्हतं…म्हणूनच आपल्या घराच्या मागच्याच गल्लीत हे घर भाड्याने घेतलं होतं…आम्ही मनाने तुझ्यापासून दूर कधीच नव्हतो आई… तू प्रीती आणि पार्थ ला मनापासून स्वीकार शील ह्या दिवसाची खूप वाट पाहिली…आणि आज तो दिवस आला आहे तर मी उशीर करणार नाही…आम्ही आजच घरी येऊ राहायला…” पंकज म्हणाला.
” इतक्यात नाही…त्या आधी मला काहीतरी सांगायचं आहे…” पल्लवी म्हणाली.
पल्लवीला नेमकं काय सांगायचं होतं हे कुणाला माहिती नसल्याने सगळ्यांनी पल्लवीकडे उत्सुकतेने पाहिलं. पल्लवी पुढे म्हणाली…
” आज तुम्ही सर्वजण एकमेकांकडे आपापल्या चुकांची माफी मागून नवीन सुरुवात करणार असाल तर मलासुद्धा माझ्या चुकांबद्दल माफी मागायची आहे..” पल्लवी म्हणाली.
” पण तू काय चूक केलीस पल्लवी…?” प्रीती ने तिला विचारले.
” मी आईशी खूप वाईट वागले…त्यांना सतत उलटून बोलायचे…त्यांनी तुमच्या सोबत जे काही केले ते मी सुद्धा त्यांच्या सोबत केले…जेणेकरून त्यांना जाणीव व्हावी की त्या तुमच्याशी किती वाईट वागल्या आहेत ते… मी सतत त्यांना आठवण करून द्यायचे की तुमच्यासोबत त्यांची वागणूक कशी होती…” प्रीती म्हणाली.
” आणि ह्यात पल्लवी एकटी नव्हती…आम्ही दोघे ठरवून आईशी वाईट वागलो होतो…मी सुद्धा आईला सतत उलटून बोलायचो…आई मलासुद्धा माफ कर ना…” प्रणित म्हणाला.
” पण तुम्ही असं का वागलात आईशी…?” पंकज ने विचारले.
” कारण आम्हाला सतत वाटायचं की तुम्ही दोघांनी आपल्या घरी राहावं…पार्थ ला त्याच्या पूर्ण कुटुंब सोबत राहायला मिळावं…आम्हाला सुद्धा तुमची खूप आठवण यायची…आणि आईला मात्र अजूनही ह्याची जाणीव होत नव्हती…मग मलाच सुचलं की आई शी आईच्याच पद्धतीने वागून बघावं…म्हणजे आईला तिच्या चुकांची जाणीव होईल आणि ती तुम्हाला पुन्हा घरी बोलावून घेईल…” प्रणित म्हणाला.
” मी ह्यासाठी तुमची जन्मभर ऋणी राहीन…पल्लवीने मला जाणीव करून दिली नसती तर मी कधीच बदलले नसते…आणि माझ्या अहंकारात की आपल्या सुखी कुटुंबाला उद्ध्वस्त केले असते…तुम्हाला माझी माफी मागायची काहीच गरज नाही…” आई म्हणाली.
” अच्छा…म्हणजे आईमध्ये हा बदल तुम्हा दोघांमध्ये झाला तर…” पंकज म्हणाला.
” तुम्ही दोघं जे वागलात ते चुकीचंच होतं…पण त्या मागचा हेतू चांगला होता…स्वतः सगळा वाईटपणा अंगावर घेऊन तुम्ही आमचं चांगलं व्हावं म्हणून असं वागलात…आजकालच्या काळात सख्खी बहीण सुद्धा बहिणीसाठी जे करू शकत नाही ते तू माझी जाऊ म्हणून करून दाखवलं…आज तुमच्या दोघांमुळे आम्ही पुन्हा त्या घरात सन्मानाने येत आहोत…मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही…” प्रीती म्हणाली.
” बास्स काय वहिनी… उपकार म्हणून लगेच परक करणार का आम्हाला…आधी मी तुमच्या साठी काहीच करू शकलो नव्हतो म्हणून आता केलं…शिवाय आमचा स्वार्थ आहेच की यात…” प्रणित म्हणाला.
” स्वार्थ कसला…?” प्रीतीने विचारले.
” आम्हाला पार्थ सोबत खूप खेळायचे होते ना म्हणून…” प्रणित म्हणाला.
आणि सर्वजण हसले. आणि त्याच दिवशी संध्याकाळी पंकज, प्रीती आणि पार्थ तिघेही त्यांच्या घरी आले. घरात आनंदी आनंद झाला. घराचं गोकुळ झालं.
समाप्त.
तुम्ही माझ्या या कथेला दिलेल्या प्रतिसादा बद्दल मी तुम्हा सर्व वाचकांची खूप आभारी आहे. ही माझी पहिली दीर्घकथा आहे. ही कथा मी लहानपणी पाहिलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. आमच्या ओळखीत एका मुलीला असेच तिच्या सासरच्यांनी माहेरी पाठवून दिले होते. आणि माहेरी आल्यावर तिची परिस्थिती आणखीनच दयनीय झाली होती.
सासरी आणि माहेरी साऱ्यांनीच तिला परके केले होते. अगदी स्वतःचा आणि मुलाचा खर्च करण्यासाठी तिला मुलगा लहान असतानाच मजुरीला जायला लागायचे. तिच्या सासरच्या मंडळींविरुद्ध जेव्हा तिने कोर्टात दाद मागितली तेव्हा तिला पोटगी द्यायला लागू नये म्हणून त्यांनी तिला पुन्हा सोबत न्यायला होकार दिला.
पण त्यासोबतच एक अट सुद्धा घातली. ती म्हणजे तिने पुण्यातच एखाद्या कंपनीत नोकरी करावी आणि स्वतःच्या खर्चाने पैसे बाजूला काढून उरलेले सासूच्या हाती द्यावे. आणि आपला संसार पुन्हा एकदा सुरळीत व्हावा आणि मुलाला वडिलांचं प्रेम मिळावं ह्यासाठी तिने स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून त्यांची अट मान्य केली होती.
मला नेहमीच वाटायचं की असं व्हायला नको होतं. तिच्या नवऱ्याने तिला पुन्हा सन्मानाने परत न्यायला हवं होतं. तिचा स्वाभिमान असा चिरडला जायला नको होता. आणि ह्याच विचारातून मला ही कथा सुचली. आणि तुम्ही सर्व वाचकांनी या कथेला खूप चांगला प्रतिसाद दिला ह्याबद्दल खूप खूप आभार.
पुन्हा भेटू नवीन कथेसह…
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार इंस्टाग्राम
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
खुपच छान आणि अप्रतिम