अंकिताने पटापट घरातील कामे आवरली आणि लगेच ऑफिस ला जाण्याची तयारी केली. ती तयार झाली सुद्धा पण तिचा भाऊ सचिन जो तिची स्कूटी घेऊन बाहेर कसल्यातरी कामाला गेला होता तो अजुन आलेला नव्हता. आणि तिला तिची स्कूटी हवी होती. म्हणून ती वारंवार बाहेरच्या गेटकडे बघत होती. सचिनची बायको आरामात हॉलमध्ये बसून नाश्ता करत होती. इतक्यात सचिन घरी आला. त्याला पाहून अंकिता म्हणाली.
” बरं झालं लवकर आलास…मला वाटलं आज ऑफिसला जायला उशीर होतो की काय…?”
” एक दिवस ऑटोने किंवा बसने ऑफिसला गेलीस तर काय फरक पडणार आहे तुला…”
” तसं काहीच नाही…तू सांगितले असते की तुला स्कूटीचे काम आहे तर मी ऑटोनेच निघून गेले असते…” अंकिता म्हणाली.
” ठीक आहे…घेऊन जा आता स्कूटी…तशी माझी बाईक पण दुपारपर्यंत मिळेल…आणि ऑफिसला जाताना जरा कमी तयार होत जा…इतकं नटून थटून कशाला जायचं ऑफिसला…” सचिन म्हणाला.
आपल्या लहान भावाच्या तोंडून स्वतःबद्दल असे काहीतरी ऐकुन अंकिताला कसेतरी वाटले. तरीपण उगाच वाद वाढेल म्हणून ती काहीच न बोलता गाडीने तिच्या ऑफिसला जायला निघाली. तिच्या मनात विचार सुरूच होते.
ती विचार करत होती की मी अशी काय नटून थटून येते रोज ऑफिस ला. घरातील कामे करून वेळ तरी मिळतो का तयार व्हायला. लांब केस असल्याने रोज नीटनेटकी वेणी घालावी च लागते. आणि ती मुळातच गोरी असल्याने चेहऱ्यावर काही न लावता ही सुंदरच दिसायची. आणि इस्त्री करायची सवय तिला शाळेपासूनच होती.
आता ऑफिसला जाताना ती गबाळी बनून तर नाही ना जाऊ शकत. ती तहसील मध्ये लिपिक होती. तिच्याकडे दिवसभर अनेक लोक आपली कामे घेऊन यायची. मग थोडं नीटनेटक राहायला काय होतंय. आणि हा लहान असूनसुद्धा आपल्या बहिणीला नीटनेटक राहण्याबाबत सूनावतोय म्हणजे काय…?”
अंकिता विचार करत होती इतक्यात तिच्या गाडीचा एका बाईक ला धक्का लागला आणि ती भानावर आली. तिने लगेच तिची गाडी रस्त्याच्या एका कडेला उभी केली आणि त्या बाईक स्वाराला काही लागले तर नाही ना ह्याची चौकशी करायला पुढे सरसावली.
” खूप खूप सॉरी…तुम्हाला लागलं तर नाही ना…मला कळलंच नाही कसा तुम्हाला धक्का लागला ते…मी माझ्याच विचारात गाडी चालवत होते…माझ्यामुळे तुम्हाला लागलं…खरंच खूप सॉरी…मला माफ करा प्लिज…” ती म्हणाली.
इतक्यात त्या बाईक वरच्या तरुणाने त्याचे हेल्मेट काढले. उंच पुरा, सुंदर बोलके डोळे, कुरळे केस, गोरा वर्ण असलेला तो तरुण दिसायला देखणा होता. एक तरुणी हात जोडून दोन तीनदा त्याची माफी मागते हे पाहून तो म्हणाला.
” मला माहिती आहे तुम्ही जाणूनबुजून नाही केले ते…आणि मला काही लागलं सुद्धा नाही…तुम्ही खरंच माझी इतकी माफी मागू नका…तुमची फारशी चूक सुद्धा नाही…” तो म्हणाला.
” पण खरंच सॉरी…मी लक्ष द्यायला हवे होते…” ती म्हणाली.
” जाऊद्या हो…होते कधी कधी…फार टेंशन नका घेऊ…येतो मी..ऑफिसला जायला उशीर व्हायला नको…” तो म्हणाला आणि तिच्या उत्तराची वाट देखील न पाहता त्याच्या बाईक वर बसून निघून सुद्धा गेला.
अंकिताला सुद्धा हायसे वाटले. त्याला जर काही लागलं असतं तर उगीच प्रॉब्लेम झाला असता. बरं झालं काही जात नाही झालं. तसं ही गाडी चालवताना तिने जरा सावध राहायला हवे हे तिने आज मनाशी ठरवले होते. तिने मग तिची स्कूटी सुरू केली आणि ती सुद्धा तिच्या ऑफिसला निघून गेली.
तसा तिला ऑफिस मध्ये यायला जरा उशीरच झाला होता. आणि नेमके आजच नवीन साहेब येणार होते. ती पटकन जाऊन आपल्या टेबल वर बसली. इतक्यात समोरून तिचं मघाशी स्कूटी ला धडकलेला मुलगा समोर आला.
त्याला पाहून तिच्या मनाने वेगळेच तर्क लावायला सुरुवात केली. इतक्यात तिची ऑफिसमधली मैत्रीण रेणू आली आणि तिच्या कानात म्हणाली…
” अंकिता…हे आपले नविन साहेब आहेत…बसली होऊन आजच रुजू झालेत इथे…”
हे आपले नवीन साहेब आहेत हे माहिती पडताच ती खुर्चीवरून उठली आणि म्हणाली..
” गूड मॉर्निंग सर…मी अंकिता वाघमारे…आपल्या ऑफिसमध्ये सिनियर लिपिक आहे…”
” हॅलो… मिस अंकिता…मी आदित्य देशमुख…” तो म्हणाला.
दोघांनीही एकमेकांना औपचारिक ओळख करून दिली आणि तो त्याच्या केबिन मध्ये निघून गेला.
अंकिता मात्र अजूनही तिच्या भावाच्याच विचारात होती. तिचा लहान भाऊ सचिन दहा वर्षांचा आणि मधली बहीण स्वाती तेरा वर्षांची होती तेव्हाच त्यांचे बाबा वारले होते. तेव्हा अंकिता सोळा वर्षांची होती. तिने तेव्हापासून आपल्या आईला कामात मदत करायला सुरुवात केली होती. आई मशीनवर कपडे शिवायची आणि अंकिता शाळेतून आल्यावर आईला घरकामात मदत करायची. अंकिताचे घर बरेच मोठे असल्याने त्यांनी त्यांचा वरचा मजला भाड्याने राहायला दिला होता. त्यातूनही काही उत्पन्न मिळायचे.
त्यानंतर तिने खूप मेहनतीने दहावीत चांगले मार्क्स मिळवले. त्यानंतर आईच्या मदतीने बारावीला चांगला अभ्यास केला आणि कॉलेजमधून पहिली आली.त्यानंतर पुढे चांगले शिकायचे खूप मनात होते पण लहान बहीण भावाला चांगले शिक्षण घेता यावे म्हणून तिने एक छोटी नोकरी शोधली. आणि मुक्त विद्यापीठात पदवीला एडमिशन घेतली. आणि सोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. आणि लवकरच तिच्या मेहनतीचे चीज झाले.
तिला चांगली नोकरी मिळाली. आणि घरी सर्वांना आनंद झाला. तर घरच्यांसाठी काय करू आणि काय नको असे झाले होते. पण ह्या सुखावर विरजण झाल्यासारखे अचानकपणे तिची आई हलक्याशा आजारातच जे जग सोडून निघून गेली. आणि पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्या अंकितावर येऊन पडली.
तिने दोघा बहीण भावांसाठी खूप काही केले. त्यांना चांगल्यात चांगले शिक्षण दिले. पण त्या दोघांचे शिक्षणात हवी तशी प्रगती नव्हती. स्वातीने काही दिवसातच तिच्या कॉलेज मधल्या एका सिनियर मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाला ना धड नोकरी होती ना नोकरी मिळेल अशी अपेक्षा. कॉलेज मध्ये तो फक्त उनाडक्या करण्यासाठी यायचा. अंकिता ने तिला खूप समजावून सांगितले पण ती मात्र हट्टाला पेटली होती. शेवटी नाईलाजाने साध्या पद्धतीने तिचे त्या मुलाशी लग्न लावून द्यावे लागले. आणि अंकिताच्या आधी तिच्या लहान बहिणीचे लग्न झाल्याने अंकिताला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले.
नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या बद्दल फार उलटसुलट प्रतिक्रिया दिली. आईबाबा नसलेली मुलं आहेत. यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. आणि लक्ष ठेवायला कुणी नाही म्हणून ह्या मनात येईल तसेच वागतात वगैरे वगैरे. पण लहान भावाकडे पाहून अंकिता या सर्वातून सावरली.
तिने त्याला चांगले शिक्षण देण्याचे ठरवले. पण त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. तो ही कॉलेज मधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला. आणि त्याने अंकिता ला तिच्याशी लग्न करायचे आहे असे सांगितले. अंकिताने त्याला समजावून सांगितले की आधी शिक्षण पूर्ण कर. नोकरी मिळव आणि मग लग्न कर. पण तो सुद्धा काही ऐकायला तयार नव्हता.
शेवटी अंकिताला न सांगता त्याने सुद्धा मंदिरात जाऊन तिच्याशी परस्पर लग्न केले. आणि त्याच्या बायकोला सुजाताला घेऊन घरी आला. त्याने परस्पर लग्न केल्याने अंकिता चा सुद्धा नाईलाज झाला. आपल्या लवकर लग्न करण्याच्या निर्णयाला अंकिताने विरोध केला होता म्हणून आपल्याला मंदिरात जाऊन लग्न करावे लागले ह्याचा राग सचिनच्या बायकोच्या मनात होता. म्हणून तिने पहिल्या दिवसापासूनच अंकिताचा राग करायला सुरुवात केली.
क्रमशः
फिरून नवी जन्मेन मी – भाग ३ (अंतिम भाग)