ऑफिस मधून घरी जाण्यासाठी नुकत्याच बाहेर पडलेल्या सुप्रियाला तिच्या नवऱ्याचा फोन आला. तिने घाईतच फोन उचलला. तर समोरून तो म्हणाला.
” अग सुप्रिया…आईच्या वाढदिवसाचा केक मी बनवायला टाकला होता पण येताना गडबडीत तो केक घ्यायचा लक्षातच आलं नाही बघ…जरा येताना ती केक घेऊन येशील का…तुला रस्त्यातच पडेल ते दुकान…” साकेत म्हणाला.
तिने त्याला होकार दिला आणि फोन ठेवून दिला. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर ती पोहचली आणि दुकानातून केक घेतला. ती केक व्यवस्थित गाडीत ठेवताना तिची नजर समोरच असणाऱ्या एका जोडप्यावर गेली. ते दोघे एकमेकांशी जरा गरजेपेक्षा जास्तच लगट करत होते. त्यामुळे दुर्लक्ष करूनही तिची नजर आपसूकच तिकडे वळली.
जवळपास चाळिशीचा असेल तो माणूस. आणि ती मुलगी साधारण पंचवीसची असेल. त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले सुप्रियाला. पण नीट काहीच आठवत नव्हतं. पण कुठेतरी पाहिलं हे मात्र नक्की. ती विचारातच तिथून निघाली.
आज तिच्या सासूबाईंचा साठावा वाढदिवस होता. त्यांना सरप्राइज देण्यासाठी सुप्रिया आणि साकेतने छान तयारी केली होती. दोघांनीही मिळून सासूबाईंचा छान वाढदिवस साजरा केला.
पण राहून राहून सुप्रियाला त्या मघाच्या माणसाची आठवण येत होती. त्याला बहुधा तिने कुठेतरी पाहिले होते. आणि अचानकच तिला आठवले की हा तर तिच्या मैत्रिणीचा रोहिणीचा नवरा होता. साधारण आठ वर्षांपूर्वी तिने त्याला त्याच्या लग्नात पाहिलं होतं. तेव्हा थोडा वेगळा दिसायचा. आता मात्र जरा जास्तच स्थूल झाल्याने त्याला नीट ओळखता आलेलं नव्हतं.
पण तो तिथे त्या मुलीसोबत काय करत असेल या विचाराने सुप्रियाला चैन पडत नव्हतं. ते दोघे ज्या पद्धतीने एकमेकांशी लगट करत होते ते पाहून ती त्याची मैत्रीण असावी असे तिला अजिबात वाटले नव्हते. म्हणजे त्या दोघांचं अफेअर सुरू आहे हे तर नक्कीच. म्हणजे तो अन् रोहिणी आता एकत्र राहत नसतील का…? की तिला यातलं काही माहितीच नसेल..? अशा एक ना अनेक विचारांनी सुप्रियाच्या डोक्यात थैमान घातले होते.
तिने हे सगळं विसरण्याचा प्रयत्न केला पण राहून राहून रोहिणी चा चेहरा तिला आठवत होता. रोहिणी आणि ती आठव्या वर्गापासून ते बारावीपर्यंत सोबतच शिकायच्या. त्यांच्या मैत्रिणीचा एक ग्रुप होता. रोहिणी तिची सर्वात जवळची मैत्रीण नसली तरी त्या दोघींची चांगली मैत्री होती.
रोहिणी दिसायला खूप सुंदर होती. अभ्यासात तर सगळ्यात पुढे. अगदी बारावीपर्यंत केसांच्या दोन वेण्या पाडायची. स्वभावाने गोड आणि बोलायला लाघवी. तिला अभ्यासात कसलीही मदत मागितली तरी एका पायावर तयार असायची. सगळ्या शिक्षकांची आवडती होती रोहिणी. बारावीत चांगले मार्क्स मिळाल्यावर ती नक्कीच तिच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच इंटेरियर डिझायनिंग मध्ये पुढील शिक्षण घेईल असे वाटले होते. पण तिने मात्र बी. ए. ला एडमिशन घेतली. सुप्रियाने बारावीनंतर इंजिनिअरिंग करायचे ठरवले होते. त्यामुळे दोघींची कॉलेज बदलली आणि मग संपर्क कमी होत गेला.
त्यानंतर पाच ते सहा महिन्यात तिच्या लग्नाची पत्रिका घरी आली. पत्रिका पाहून सुप्रिया अगदीच शॉक झाली. तिला अजिबात कल्पना नव्हती की शाळेत हुशार असणारी रोहिणी इतक्या लवकर लग्नाचा निर्णय घेईल.
सुप्रिया सगळ्या मैत्रिणींसोबत तिच्या लग्नाला गेली होती. जांभळ्या रंगाच्या शालुत रोहिणी खूप सुंदर दिसत होती. पण तिचा नवरा मात्र खूप वयस्कर वाटत होता. दिसायला सुद्धा रागीट वाटत होता. तिचं लग्न लागल्यावर सुप्रिया आणि तिच्या मैत्रिणी नवरा नवरी ला भेटायला स्टेज वर गेल्या होत्या. त्यानंतर रोहिणीने तिच्या नवऱ्याला तिच्या मैत्रिणींची ओळख करून दिली. पण त्याने मात्र हिच्या मैत्रिणीकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. त्या दिवशी सुप्रियाने त्याला पाहिलं होतं आणि त्यानंतर आज.
आधी शिक्षण आणि नंतर जॉबच्या निमित्ताने रोहिणीला भेटायचं राहूनच जायचं. त्यानंतर सुप्रिया चे जेव्हा लग्न ठरले तेव्हा तिने आठवणीने रोहिणी च्या भावाकडून रोहिणी च्या सासरचा पत्ता घेतला होता आणि तिला लग्नाची पत्रिका पाठवली होती. सुप्रियाच्या सगळ्याच मैत्रिणी लग्नाला आल्या होत्या पण रोहिणी मात्र आली नव्हती.
आज मात्र सुप्रियाला खूप इच्छा होत होती रोहिणीला भेटायची. तिने तिची जुनी डायरी शोधली. आणि त्यामध्ये तिला रोहिणीचा पत्ता सापडला सुद्धा. सुप्रियाने रविवारीच रोहीनिकडे जायचे ठरवले.
त्यानंतर रविवारी सुप्रिया रोहिणी कडे जायला निघाली. आणि बरोबर रोहिणीच्या घराचा पत्ता शोधत तिच्या घरापर्यंत पोहचली. तिचं घर म्हणजे छान बंगला होता. गेटच्या आतमध्ये गेल्यावर आतमध्ये सुंदर गार्डन दिसत होते. त्यानंतर सूप्रियाने आतमध्ये जाऊन दारावरची बेल वाजवली. आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे दार उघडताच समोर रोहिणी दिसली.
सुंदर महागतली साडी घातलेली. गळ्यात मोठं मंगळसूत्र आणि कपाळावर छान मोठी टिकली. तिने सुप्रियाला ओळखलं आणि तिला मिठी मारली. सुप्रियाला भेटण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. सुप्रियाला पाहून काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला.
” सुप्रिया…तिला पाहून किती आनंद झालं म्हणून सांगू तुला…तुझी माझी अशी भेट होईल असे काही वाटलेच नव्हते ग मला…” रोहिणी म्हणाली.
” तुझी आठवण आली आणि तुझा पत्ता शोधून तुझ्या घरी आली…मलापण खूप आनंद झालाय तुला भेटून…” सुप्रिया म्हणाली.
” हल्ली कुठे असतेस…आणि काय करतेस…?” रोहिणी ने विचारले.
” लग्न करून याच शहरात स्थायिक झालेय…आणि जॉब पण इथेच आहे…तू काय करतेस…?” सुप्रिया म्हणाली.
” गृहिणी आहे…लग्न झाल्यावर शिकायची संधीच नाही मिळाली…त्यानंतर दोन मुलं झाली…आता मुलांना आणि घराला सांभाळते आहे…” रोहिणी म्हणाली.
आमच्या गोष्टी ऐकुन तिच्या सासुबाई आतमधून आल्या आणि तिरकस पणे सुप्रियाकडे पाहून म्हणाल्या…
” मैत्रीण आहे वाटतं…?”
” हो आई…ही माझी मैत्रीण सुप्रिया आहे…मला भेटायला आली आहे…” रोहिणी उत्तरली.
” मग जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारा…” सासुबाई जरा कठोर आवाजात म्हणाल्या. पण लगेच त्यांनी सुप्रिया कडे पाहिलं आणि म्हणाल्या…” नाही म्हणजे मुलं झोपली आहेत आत…आवाजाने उठतील…”
” ठीक आहे आई…जाते आत…” रोहिणी म्हणाली.
सुप्रिया समोर तिच्या सासूबाईंनी तिला असे म्हटल्याने रोहिणी जरा खजील झाली होती. पण सुप्रियाला मात्र तिच्याशी एकांतात बोलायचं असल्याने तिला चांगलच वाटलं. रोहिणीने तिला तिचं घर दाखवलं आणि तिच्या रूममध्ये गेली. कॉलेज मध्ये असताना तिच्या इंटेरियर डिझायनिंगची आवड तिने स्वतःच घर सजवून जोपासली होती. घर अगदी सुंदर सजवले होते रोहिणीने.
त्या दोघीही तिच्या रूममध्ये आल्या. आणि आल्याबरोबर सुप्रिया ने रोहिणीला प्रश्न विचारला…
” रोहिणी…तू खुश तर आहेस ना…?”
तिच्या प्रश्नावर रोहिणीने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात नकळतपणे अश्रू दाटून आले.
क्रमशः
लाचारी अशीही असते – भाग २ (अंतिम भाग)