” तिला घरची कामेच तर नीट जमत नाही…ती शिक्षणात काय दिवे लावणार आहे…?” तिची सासू म्हणाली.
” तो नंतरचा प्रश्न आहे…तुम्ही आधी संधी तर द्यायला हवी होती ना…आणि मुळात तुम्हाला हे करायचं नव्हतं तर आम्हाला आश्वासने का दिलीत खोटी…तुमचा मुलगा शिक्षक नाही हे का लपवले आमच्यापासून…” शारदा म्हणाली.
शारदाच्या बोलण्यावर सगळे जण एकटक तिच्या काकांकडे पाहू लागले. शारदाला आता हा अंदाज आला होता की त्यांच्या खोट्यात कुठे ना कुठे गौरीच्या काकांचा सुद्धा समावेश आहे. सगळे काही आपल्यावर उलटनार हे कळल्याने काका थोडे अडखळतच म्हणाले.
” ठीक आहे वहिनी…जे झालं ते झालं…ह्यांनी आपल्याला सांगायला हवं होतं की प्रशांतराव नवीन बीजनेस सुरू करणार आहेत म्हणून नोकरी सोडत आहेत…पण आता लग्न झालंय ना दोघांचं…आता आपण काय करू शकतो…त्यातच आपली मुलींची बाजू आहे…आपणच थोडं नमतं घ्यायला हवं…” काका म्हणाले.
” आपली मुलींची बाजू आहे हे म्हटल्यापेक्षा आपली सत्याची बाजू आहे हे का नाही म्हणत आहात तुम्ही…?” शारदा म्हणाली.
” अहो पण वहिनी…ते करतीलच ना नवीन बीजनेस…आणि झालं गेलं ते विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करुयात ना…ह्या वेळेला गौरी ला त्यांची माफी मागायला सांगा…ते सुद्धा विसरून जातील…”
” असे कसे भाऊजी…गौरी का माफी मागेल ह्यांची…उलट ह्यांनीच आमची माफी मागायला हवी आमची फसवणूक केल्या बद्दल आणि गौरीच्या आयुष्याशी खेळल्या बद्दल…” शारदा म्हणाली.
” आम्ही का म्हणून माफी मागायची…प्रशांत एका प्रायव्हेट शाळेवर काम करत होता हे गौरीच्या काकांना माहिती होते…त्यांनी तुम्हाला ते नीट सांगितले नाही ह्यात आमची काय चूक आहे…आणि ते म्हणाले होते की लग्न झाल्यावर तुम्ही काहीच बोलणार नाही म्हणून…” गौरीची नणंद अचानक पणे बोलून बसली. मग आपण काय बोलून बसलो हे तिला कळल्याने ती ओशाळला.
ह्यावर शारदा ने गौरीच्या काकांकडे रागाने बघितले. आणि विचारले.
” का केलत भाऊजी तुम्ही हे…काय साध्य झाले तुम्हाला हे करून…माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करून काय आनंद मिळाला तुम्हाला…?”
” मी तर तिच्या भल्याचाच विचार करत होतो…ह्यांनी लग्न करताना अजिबात हुंडा देखील मागितला नाही…आणि प्रशांत राव शाळेत शिक्षक होते हे चांगलच होतं की…” काका जरा चाचरत म्हणाले.
” मला वाटले होते की तुम्ही ह्या मुलींचे वडील बनून त्यांच्या लग्नाचा विचार करत आहात…पण तुम्ही तर जबाबदारी झटकण्यासाठी हा सगळा खटाटोप केलात…पण तुमच्यावर विश्वास ठेवला ही चूक माझी शेवटची चूक होती…यापुढे आमच्याशी तुमचा कुठलाही संबंध नसेल…” शारदा म्हणाली.
तशी गौरीची काकू समोर येऊन म्हणाली.
” आजवर आम्ही इतके काही केले तुमच्यासाठी आणि आमचे सगळेच उपकार विसरल्या तुम्ही…”
” कसले उपकार…आजवर तुमच्या मुलींसाठी तुम्ही जे केलंत ते माझ्या मुलींसाठी केलं का…त्यांना लग्नासाठी मुलगा शोधताना तुम्ही चांगल्यात चांगलं स्थळ शोधले…आणि माझ्या मुलीला या अशा लोकांची सोयरिक आणलीत तुम्ही…आणि आजवर आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा कुठलाही हिशेब मी तुम्हाला मागितलेला नाही…पण आता आमची शेती आम्हीच पिकवू…तुम्हाला आणखी जास्त उपकार करण्याची गरज नाही…आणि गौरी कुठेच जाणार नाही…ती इथेच राहील माझ्याजवळ…ह्या अशा लोकांच्या घरी मी तिला पुन्हा कधीच पाठवणार नाही…” शारदा म्हणाली.
” पण लोक काय म्हणतील ह्याचा तरी विचार करा…नवऱ्याला सोडून आलेल्या मुलीला समाज कोणत्या नजरेने बघतो माहिती आहे ना…आणि आता एका लग्नाचा डाग लागलाय तिला…दुसरं लग्न करणे एवढेही सोपे नाही…तुम्ही गौरीला तिच्या सासरीच पाठवायला हवं…लग्न म्हटलं की अशा गोष्टी होणारच…म्हणून का सरळ काडीमोड घ्यायचा का…?”
” मला आता फक्त माझ्या मुलीची काळजी आहे…लोक काय म्हणतील ह्या विचाराने मी माझ्या मुलीला अशा लोकांच्या घरी कधीच पाठवणार नाही ज्यांनी तिच्यावर हात उचलला…तिला मारहाण केली…माझी मुलगी मला अजिबात भार नाही…मी जास्त शहानिशा न करता केवळ भाऊजी वर विश्वास ठेवून गौरीचे लग्न ह्यांच्याशी लावून दिले ही माझी चूकच झाली…
पण माझ्याकडून झालेली चूक मीच सुधारणार…गौरी ह्यांच्या घरी जाणार नाही…आणि प्रशांत रावांनी तिला बऱ्या बोलणे घटस्फोट दिला नाही तर त्यांनी आमची फसवणूक केली म्हणून आम्ही पोलिसांकडे ही जाऊ शकतो…पण आधीच ह्या लग्नामुळे तिच्या शिक्षणाचे खूप नुकसान झाले आहे…त्यामुळे तिला कोर्ट कचेर्यांच्या फेऱ्या न मारता सगळे लक्ष आपल्या शिक्षणावर द्यावे म्हणून मी हा विचार केला नाही…” शारदा म्हणाली.
आता मात्र प्रशांतच्या घरच्यांची आणि गौरीच्या काका काकूंची शारदा समोर बोलती बंद झाली. कोणाजवळ बोलायला काहीच उरले नव्हते. शारदाच्या डोळ्यात निर्धार स्पष्ट दिसत होता. त्यामुळे सगळेजण बैठकीतून चुपचाप निघून गेले. प्रशांत च्या घरच्यांना वाटत होते की समाजाच्या भीतीने शारदा गौरीला काहीही आढेवेढे न घेता त्यांच्या सोबत पाठवेन. पण शारदा मात्र त्यांच्या कल्पने पलीकडची निघाली. आपल्या मुलीसाठी ती लोकांचे टोमणे आणि समाजाचा रोष पत्करायला तयार होती.
त्यानंतर लवकरच प्रशांत आणि गौरीचा कायदेशीर रित्या घटस्फोट झाला. मात्र ह्या सर्वात गौरीचे एक वर्ष वाया गेले होते. ह्या सर्वाने तिच्या मनावर सुद्धा परिणाम झाला होता. पण आईच्या साथीने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती पुन्हा अभ्यासाला लागली. गावातील काही लोकांनी गौरीला आणि तिच्या आईला नावे सुद्धा ठेवली. तिला मुर्खात काढले. पण काही चांगल्या लोकांनी शारदाच्या या निर्णयाचे कौतुक देखील केले.
गौरीला प्रोत्साहन दिले. पुढच्या गौरीने नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण करून लवकरच शासकीय सेवेत रुजू झाली. तिच्या पाठोपाठ चंदा सुद्धा लवकरच चांगल्या नोकरीवर लागली. दोन्ही मुलींनी शारदाचा विश्वास सार्थ केला होता. गौरीच्या काकांचे मात्र शारदा ची शेती बळकावण्याचे स्वप्न पार धुळीस मिळाले होते. दोन्ही मुलींना चांगली नोकरी लागल्यावर आधी ज्या नातेवाईकांनी नवऱ्याने टाकलेली म्हणून गौरीचा उपहास केला होता ते सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने वागायला लागले होते.
पुढे गौरी साठी अनेक स्थळं यायला लागली. यावेळी मात्र शारदा योग्य शहानिशा करूनच गौरीचे लग्न करणार होती. त्यांना असाच चांगला मुलगा लवकरच मिळाला. विजय त्याचे नाव. विजय चांगला मुलगा होता आणि त्याच्या घरचे सुसंस्कृत होते. विजयचे हे पहिलेच लग्न होते मात्र तरीही त्यांनी गौरीचे हे दुसरे लग्न असण्यावर काहीच आक्षेप घेतला नव्हता. पुढे दोघांचेही लग्न झाला आणि दोघांनीही सुखाचा संसार केला.
गौरीच्या आईने लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार न करता केवळ आपल्या मुलीच्या सुखाचा आणि भविष्याचा विचार केला. आणि त्यामुळेच गौरीच्या आयुष्यात सुख चालून आले. त्यांनीही समाजाचा विचार करून आपल्या मुलीला आहे त्या परिस्थितीत संसार करायला सांगितले असते तर आज गौरी अजूनही तिथेच खितपत पडली असती. सासरी जाच सहन करणाऱ्या मुलींना आज अशाच भक्कम आधाराची गरज आहे.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल.
कथा आवडल्यास माझ्या मितवा ह्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.