वैशाली बस मधून उतरली आणि तिच्या मुलाला सार्थकला कडेवर घेऊन खाली मानेने एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली.
रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होते की दरवेळी प्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली आहे तिला. जुनाट साडी, हाती सामानाची लहानशी बॅग, अंगभर लपेटून घेतलेला साडीचा पदर, आणि कडेवर चार वर्षांचा मुलगा. रस्त्याने भेटल्यावर कुणी उगाच प्रश्न विचारू नयेत म्हणून मुद्दामहून नजर चोरून चालत होती.
चालता चालता एकदाची गाडी पोहचली. तिला बाहेरून येताना पाहूनच तिच्या वहिनीने एकूण परिस्थितीचा अंदाज लावला होता. ती येताच तिचे थंडपणे स्वागत झाले. कारण ती आता इथे हवीहवीशी राहिलेली नव्हती. राहणार तरी कशी. दर दोन चार महिन्यांतून एकदा माहेरी यायची. ते ही तिच्या सासरहून कंटाळून.
नवऱ्याच्या माराला आणि सासूच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती. घरी तिच्या बाबांना तिच्याबद्दल खूप सहानुभूती होती. पण आईला मात्र लोक काय म्हणतील ह्याचे टेंशन होते. म्हणून तिची आई तिच्या सासूची माफी मागून वैशाली ला पुन्हा सासरी पाठवून द्यायची. आणि हिच्या माहेरून कोणी हिला मदत करत नाही
पण बोलायची काहीच सोय राहिलेली नव्हती. तिचा नवरा स्वभावाने खूपच तापट होता. दिवसभर बाहेर नोकरी करून आल्यावर जेव्हा सासू हीच्याबद्दल काहीबाही त्याला सांगायची. तेव्हा गोष्ट कितीही लहान असली तरीही हा वैशालीला खूपच मारायचा. हिचा भीतीने थरकाप उडायचा. त्यातच भर म्हणजे तिची नणंद सुद्धा जवळच राहायची. राहिलेली कसर ती भावाचे अन् आईचे कान भरून पूर्ण करायची.
तिला वाटले होते मूल झाल्यावर तरी परिस्थिती बदलेल. पण त्यानंतर परिस्थिती आणखीनच वाईट झाली. सासुबाई नेहमीच हिच्या मुलाला हीच्यापासून जास्तीत जास्त दूर कसे ठेवता येईल ह्याचा प्रयत्न करायची. पण तरीही मुलगा आईसाठी खूप रडायचा. म्हणून मग नाईलाजाने त्याला हिच्याकडे द्यायची.
मुलगा सहा महिन्याचा झाल्यावर वैशालीने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली होती. तसे पाहता तिला मुलाला सोडून कामाला जायची अजिबात इच्छा नव्हती पण सासुसमोर काहीच बोलू शकत नव्हती. आधीच घरी सासुबाई चहापत्ती अन् साखर सारख्या साध्या गोष्टीसुद्धा कुलूपात ठेवायची. घरातील शिळे अन्न वाया जाऊ नये म्हणून हिला आधी तेच खायला लावायची.
घरी नवऱ्याचा, तिचा, अन् दिराचा पगार सगळाच्या सगळा सासूबाईंना द्यावा लागत असे. म्हणून स्वतःसाठी एक रुपया सुद्धा खर्च करता यायचा नाही. सासूबाईंना एखाद्या गोष्टीसाठी पैसे मागितले तर पुन्हा तिच्या नवऱ्याचे तिच्या विरोधात कान भरायच्या. आणि मग पुन्हा त्याचा मार खायला लागायचा. आताशा तिला कळून चुकले होते की नवऱ्याला काहीही सांगून काही उपयोग होणार नाही म्हणून.
पण आता तर सासूबाईंनी हद्दच पार केली होती. त्या तिच्या मुलासमोरच नंदेच्या मुलाला चांगलं चुंगल खायला द्यायच्या. आणि जेव्हा हिचा मुलगा हट्ट करेल तेव्हा त्याला मारायच्या. सार्थक आता दोन वर्षांचा झाला होता. आणि त्याला खाण्या पिण्याच्या वस्तुंसाठी हट्ट करायचा.
पण सासुबाई मात्र त्याला घरी केलेलं साधं जेवण भरवायच्या आणि स्वतःच्या मुलीच्या मुलाला मात्र गोड धोड करून खाऊ घालायच्या. वैशालीने एक दोनदा बघितले. तिला वाटले आज ना उद्या सासुबाई आपल्या मुलाचा सुद्धा लाड करतीलच. पण ना सासूबाईंनी त्याचा लाड केला ना कधी त्याला आपुलकीने काही भरवले.
आता मात्र वैशालीच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. ती कामावर असताना तिचं मन मात्र सतत आपल्या बाळाच्या विचारात असायचं. त्याने काही खाल्ले असेल का. सासूबाईंनी त्याला मारले तर नसेल ना ह्याचं गोष्टीचा ती सतत विचार करायची. शेवटी सगळी हिंमत एकवटून तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की सार्थक अजुन थोडा मोठा होईपर्यंत ती कामाला जाणार नाही म्हणून.
आणि याच गोष्टीवर तिच्या नवऱ्याने तिला मार मार मारले होते. आणि म्हणूनच ती पुन्हा एकदा माहेरी निघून आली होती. तिला पाहून तिची आई म्हणाली.
” काय ग…आता काय झालं आणखी…अजुन किती दिवस हेच चालणार आहे तुझं…मला वाटलं होतं की मुलगा झाल्यावर सगळं सुरळीत होईल म्हणून…पण इथे तर सगळं पहिल्या सारखंच आहे…दर दोन तीन महिन्यात तुझा घरी चक्कर असतोच…तुझ्या वयाच्या लग्न झालेल्या मुली स्वतःच्या घरी चांगल्याच स्थायिक झाल्यात आणि तुझं तेच रडगाणे सुरू आहे…”
आईचे हे बोलणे वैशालीला अपेक्षितच होते. पण दरवेळी प्रमाणे हतबल न होता ती निर्धाराने तिच्या आईला म्हणाली.
” काळजी नको करुस आई…तुला अजुन जास्त दिवस त्रास नाही होणार माझा…” वैशाली म्हणाली.
वैशालीचे हे बोलणे ऐकून आईला नवल वाटले. वैशालीच्या बोलण्यात आईला निर्धार जाणवत होता. वैशालीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आईने तिला विचारले.
” म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू…तुझ्या मनात काय चाललंय…”
” मी ना माहेरी राहणार ना सासरी…मी एका वर्किंग वुमेंस हॉस्टेल मध्ये राहणार आहे…मी सगळी माहिती काढली आहे त्याबद्दल…तिथे निराधार महिलांना रोजगार मिळवून देतात आणि राहायला जागा सुद्धा…मी लवकरच निघून जाईल इथून…” वैशाली म्हणाली.
” काय…काय बोलत आहेस तू…हॉस्टेल मध्ये राहायला जाणार आहेस मुलाला घेऊन…तुला तुझं हक्काचं सासर असताना…तुझ्या सासरचे काय म्हणतील…आणि आम्ही लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे…” आई मोठ्याने म्हणाली.
आईचा आवाज ऐकून आता घरातील सगळेच तिथे आले. तिचा दादा, वहिनी आणि आतापर्यंत बाहेरच्या ओट्यावरून या मायलेकींचा संवाद ऐकणारे वैशालीचे वडील सुद्धा तिथे आले आणि तिच्या आईला म्हणाले.
” अगं आपली मुलगी तिचं माहेर अन् सासर दोन्हीही असताना निराधार महिलांसाठी असणाऱ्या हॉस्टेल मध्ये राहायला जायचं म्हणतेय…अन् तिला आधार देण्या ऐवजी तू लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत आहेस…आणि कसलं हक्काचं सासर म्हणतेय स तू…जेव्हा तिचं माहेर तिला आधार देऊ शकलं नाही तिथे सासर काय हक्काचं होईल…”
” अहो पण…” आई म्हणाली. पण आईला मध्येच थांबवत बाबा म्हणाले.
” बस कर आता…आजवर मी तुला कितीदा म्हटलं की आपण आपल्या मुलीच्या मागे ठामपणे उभे राहायचे…पण तू माझं काहीच ऐकून घेतलं नाहीस…तिला आजवर किती तरी सहन करावं लागलं…पण आपण मात्र तिच्या मागे खंबीरपणे उभेच राहिलो नाही…तिचा त्रास समजून घेतला नाही…आणि म्हणूनच आई वडील असताना सुद्धा ती निराधार लोकांच्या सारखी जगायचं म्हणतेय…आतातरी लोक काय म्हणतील ह्यापेक्षा आपल्या मुलीच्या मनाला काय वाटेल ह्याचा विचार कर…”
तिच्या बाबांचे बोलणे ऐकून तिचा भाऊ म्हणाला.
” हो आई…बाबा बरोबर बोलत आहेत…आपण आजपर्यंत कधीच वैशूच्या मनाचा विचार केला नाही…तिच्या सासरचे तिच्याशी कसे वागतात हे आपण स्वतः पाहिलेले आहे…आपल्याकडे कशाचीच कमी नाही…ताई नेहमीसाठी इथेच राहिली तरीसुद्धा आपल्याला भारी होणार नाही…मग असं असताना सुद्धा लेक सासरीच शोभून दिसते असे म्हणून आपण तिला पुन्हा पुन्हा तिच्या मनाविरुध्द तिथे पाठवणे गरजेचे आहे का…ताई इथेच राहिली तर असा काय फरक पडणार आहे…”
सासरेबुवांचे आणि नवऱ्याचे बोलणे ऐकुन तिच्या वहिनीला सुद्धा त्यांचे म्हणणे पटले. खरंतर आपल्या नवऱ्याचे इतके चांगले विचार आहेत ह्याचा तिला अभिमानच वाटला. ती सासूबाईंना म्हणाली.
” मला पण बाबांचं आणि ह्यांचं म्हणणं पटलय आई…आपण वैशाली ताईंना समजून घ्यायला हवे…”
सगळ्यांचे बोलणे ऐकून वैशालीला भरून आले. आज पहिल्यांदा तिला माहेरच्यांनी भक्कम साथ मिळत होती. तिच्या आईला सुद्धा आपली चूक कळून आली. दोन वर्षांच्या सार्थक कडे पाहून तिच्या आईलाही भरून आले. वैशाली घरी आली की शेजारच्या बायका तिच्या आईला टोचून बोलायच्या, हिणवायच्या म्हणून तिच्या आईला नेहमीच तिला माहेरी परत पाठवायची घाई व्हायची.
त्यांना वाटायचं की आज ना उद्या परिस्थिती बदलेल. पण परिस्थिती काही बदलली नाहीच पण लेकीवर इतके वाईट दिवस आलेत की हॉस्टेलवर राहायच्या गोष्टी करतेय ह्याचं त्यांना मनोमन वाईट वाटलं. त्यांनी वैशालीला प्रेमाने जवळ घेतले आणि तिला सांगितले की आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत आणि तुझा कुठलाही निर्णय आम्हाला मान्य असेल म्हणून.
त्यानंतर बरेच दिवस झाले तरीही यावेळी वैशाली घरी परत आली नाही म्हणून वैशालीचा नवरा स्वतःच काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी तिच्या माहेरी आला. त्याला वाटलं नेहमीप्रमाणे तिच्या माहेरचे तिला दोषी मानून आपली माफी माग तील आणि तिला आपल्यासोबत घरी पाठवून देतील.
पण यावेळी मात्र तिच्या माहेरच्यांनी तिला परत पाठवायला साफ नकार दिला आणि निक्षून सांगितले की जोपर्यंत तुम्ही तुमची वागणूक सुधारत नाही तोवर वैशाली घरी परत येणार नाही. वैशाली च्या माहेरच्या लोकांचा निर्धार पाहून वैशालीच्या नवऱ्याला कळून चुकले होते की वैशाली च्या घरचे नेहमी प्रमाणे इतक्या सहजपणे तिला परत पाठवणार नाहीत. म्हणून तो तिला सोबत न घेता एकटाच परत गेला.
त्यानंतर सुद्धा बऱ्याच दिवसां पर्यंत वैशाली घरी आली नाही तेव्हा त्याला त्याची चूक कळली. वैशालीच्या घरचे तिला आधार देत नाहीत म्हटल्यावर आपण तिला कधीच महत्त्व दिले नाही. किंवा कधीच चांगले वागवले नाही ह्याची त्याला जाणीव झाली. म्हणून त्याने ठरवले की यावेळी आपण स्वतः तिची आणि तिच्या माहेरच्या लोकांची माफी मागावी आणि तिला आणि सार्थकला पुन्हा घरी घेऊन यावे. कारण इतक्या वर्षात त्याला वैशालीचा चांगुलपणा चांगलाच कळून आला होता.
मात्र या गोष्टीला त्याच्या आईने तीव्र विरोध केला. तेव्हा त्याने त्याच्या आईला निक्षून सांगितले की आजवर तिचे ऐकून त्याने वैशालीवर खूप अत्याचार केलाय. पण यापुढे त्याच्या संसारात मिठाचा खडा टाकू नको म्हणून. मुलगा आपलं आता यापुढे डोळे झाकून ऐकणार नाही ह्याची त्याच्या आईला जाणीव झाली आणि त्यांचा विरोध मावळला.
मग वैशालीचा नवरा तिच्या माहेरी गेला आणि वैशाली सहित सगळ्यांची माफी मागितली. व आपण यानंतर कधीच चुकीचे वागणार नाही अशी हमी दिली. मग वैशाली ने सुद्धा त्याला एक शेवटची संधी देण्याचे ठरवले आणि तिला थोडा जरी त्रास झालं तर ती सरळ माहेरी निघून येईल या अटीवर तिच्या माहेरच्या लोकांनी तिला सासरी पाठवले.
त्यानंतर कधीच वैशालीला तिच्या सासरच्यांनी त्रास दिला नाही. तिला कधीच गृहीत धरले नाही. ती खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी झाली आणि तिचा संसार सुखाचा झाला.
आधी जेव्हा तिला तिच्या माहेरच्यांनी साथ दिली नाही तेव्हा तिला तिच्या सासरी कुठलाही मान नव्हता पण जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांनी तिला भक्कम पाठिंबा दिला तेव्हा तिला तिच्या सासरी मान ही भेटला आणि सन्मान ही. एका मुलीसाठी तिच्या आई वडिलांची साथ खूप महत्त्वाची असते. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावर ती कुठल्याही समस्येला परतून लावू शकते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.
उत्तम लिहिले आहे .वाचताना कुठे तरी मला माझी स्टोरी असल्या सारख वाटलं फरक इतकाच की मला नानंद नव्हती तर तिची जागा सासू सासरे काढायचे. 4 वर्ष सहन केला आहे अजून ही करत आहे.माहेरी गेली की आई पण फार दिवस बसू देत नाही.
तुमच्या स्टोरी मध्ये atleast आई बदलली माझ्या स्टोरी मध्ये अजून तशीच आहे.असो.