मग सुमेधा सुद्धा मुद्दाम निशांत घरी येण्याच्या वेळेला घरातील काम करायला बसायची. तिच्या सासूबाईंना वाटायचे की सुमेधा हळूहळू काम शिकत आहे म्हणून कधीकधी किचन मध्ये येत असावी. पण सुमेधाच्या मनात मात्र वेगळेच विचार असायचे. रात्री सुद्धा खोलीत गेल्यावर त्याला सांगायची की आज दिवसभर खूप कामे केलीत म्हणून थकले आहे. निशांत तिच्या हो ला हो लावायचा.
पण तो स्वभावाने एवढा साधा होता की सुमेधा त्याला जे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होती तो विचार दुरूनसुद्धा त्याच्या मनाला शिवला नव्हता. घरात कोणते काम कोण करते हे त्याच्या कधी लक्षात सुद्धा आले नव्हते. निशांत घरातील प्रत्येक गोष्टीत आईचा सल्ला घ्यायचा. आई सुद्धा आपल्या परीने तिला जमेल तसा सल्ला त्याला द्यायची. पण ह्यात सुद्धा सुमेधाला प्रॉब्लेम होता.
तिच्या मते आता लग्न झाल्यावर निशांतने आईकडून सल्ला न घेता प्रत्येक बाबतीत तिच्याकडून सल्ला घ्यायला हवा. पहिल्या दिवाळसणाला निशांतने सुमेधा साठी सोन्याचा दागिना केल्यावर ती खूपच आनंदी झाली. पण जेव्हा तिला कळले की निशांतने त्याच्या आई साठी सुद्धा एक दागिना केलाय तेव्हा मात्र तिला राग आला.
ती आयुष्यातील लहान मोठे आनंद सासूवर असलेल्या असुये पायी अनुभवू शकत नव्हती. तिच्या मनात केवळ निशांतच्या आयुष्यावर तिचाच ताबा असावा असे वाटत होते. तिला हे अजिबात कळत नव्हते की नवऱ्याच्या जीवनात जसे बायकोचे एक वेगळे स्थान असते तसेच एका मुलाच्या जीवनात आईचे सुद्धा अढळ असे स्थान असते. आणि दोघीही आपापल्या जागी त्यांना महत्त्वाच्या असतातच.
लग्नाला जेमतेम सहा महिने झाले असतील तोच सुमेधाने निशांतच्या मागे तगादा लावला की आईला वृद्धाश्रमात सोडून ये म्हणून. सगळं काही सुरळीत सुरू आहे असे समजणारा निशांत बायकोच्या या अमानुष मागणीमुळे अचानकच कोलमडला. सुमेधाच्या मनात हा विषय येऊ तरी कसा शकतो ह्याचे त्याला खूप जास्त वाईट वाटले होते.
त्याने त्याचवेळी तिला कडक शब्दात सुनावले होते की असे कधीच होऊ शकणार नाही. तो आयुष्यात काहीही सोडेल पण आईला सोडणार नाही. अगदी जीव गेला तरीही नाही. पण सुमेधा सुद्धा आता जिद्दीला पेटली होती. तिने अनेक प्रकारे स्वतःचा हट्ट मनवू पाहिला. निशांतला इमोशनल ब्लॅकमेल केले. पण निशांत मात्र तिच्या एकाही युक्तीला बधला नाही.
मग तिने आपला मोर्चा सासूबाईंकडे वळवला. प्रत्येक गोष्टीवरून भांडण उकरून काढत बसायची. सासुबाई बिचाऱ्या भोळ्या होत्या. सुमेधाच्या अशा वागण्याने त्या कोलमडून गेल्या होत्या. आयुष्यात अनेक संकटांवर मात करत त्या इथवर पोहचल्या होत्या. आणि आता एकुलत्या एक सुनेला त्या घरात नकोशा झाल्या होत्या.
रोजच्या भांडणाला त्या कंटाळल्या होत्या. शेवटी त्यांनी स्वतःच एक दिवस निशांतला म्हटले की मला गावातल्या घरी राहायला जायचंय काही दिवसांसाठी म्हणून. पण निशांतला सगळेच कळून चुकले होते. त्याला माहिती होते की सुमेधा आणि त्याची आई एका ठिकाणी राहणे अशक्य आहे म्हणून. त्याने सुमेधा ला निर्वाणीचे सांगितले की यापुढे आई विरोधात एकही शब्द तो खपवून घेणार नाही म्हणून. आणि यापुढे जर तिने याबद्दल एक शब्द जरी उच्चारला तर तो तिला घ’टस्फो’ट देईल म्हणून.
सुमेधाने लगेच ही गोष्ट तिच्या आईला सांगितली. आणि सुमेधाची आई अगदीच तावातावाने तिच्या घरी भांडायला आली. निशांत तेव्हा घरी नव्हता. तिच्या घरी पोहचताच सर्वात आधी तिच्या सासूबाईंजवळ गेली आणि म्हणाली.
” काय हो विहिणबाई…काय चालवलय तुम्ही हे…तुमच्यामुळे तुमच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होत आहे आणि तुम्ही मात्र आरामात दोघांची भांडणे पाहत बसलाय…एका वयानंतर मुलाला आपल्या मुठीतून सोडावं लागतं…पण तुम्ही तर तुमच्या मुलाला तुमच्या मुठीत घट्ट पकडुन ठेवलंय…फक्त आणि फक्त तुमच्या मुले आज जावईबापुंनी माझ्या मुलीला घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे…तुम्हीच त्याच्या मनात भरवले असेल ना हे…”
” अहो हे काय बोलताय तुम्ही वृंदाताई…मी कशाला करेन हे सगळं…सुमेधा मला मुलीसारखी आहे हो…” निशांतची आई काकुळतीला येत त्यांना समजावून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.
इतक्यात सुमेधा मध्येच बोलली.
” आई…ह्यांनीच निशांतला सांगितले असेल असे वागायला…नाहीतरी निशांत ह्यांना विचारल्या शिवाय काहीच करत नाही…ह्या सतत त्याच्या मागेपुढे काम करत असतात…जेणेकरून त्यांच्या मुलाला वाटावे की माझी आई किती काम करते आणि बायको काहीच करत नाही…”
” कळतंय ग मला सगळं… साध्या भोळ्या दिसणाऱ्या तुझ्या सासुबाई खूपच छळतात ना तुला… तुमच्या नवरा बायकोचा चांगला चाललेला संसार बरा नाही दिसत ना ह्यांना…स्वतः तर अर्धवट संसार केला आणि आता मुलाचा संसार बघवल्या जात नाही ह्यांना…तुमच्या जागी एखादी बाई असती तर मुलाचा संसार टिकावा म्हणून कुठेतरी दूर निघून गेली असती…” वृंदा ताई मनात येईल तसे बरळत होत्या.
सगळं काही ऐकून निशांत च्या आईला काय बोलू आणि काय नको ते सुचतच नव्हते. त्या मटकन खाली बसल्या.
आणि नुकताच बाहेरून आलेल्या निशांत ने वृंदा ताईंचे हे बोलणे ऐकले. आणि आईला असे हतबल होऊन जमिनीवर बसताना बघीतले आणि तो धावतच आईच्या आधाराला आला. त्याला घरी आलेले पाहून वृंदा ताई आणि सुमेधा जरा घाबरल्याच. आईला सोफ्यावर बसवत निशांत रागातच वृंदाताईंना म्हणाला.
” तुम्ही माझ्या आईच्या जागी होतात मला…खूप आदर करायचो मी तुमचा…मला वाटले होते की तुम्ही सुमेधा ला समजावून सांगाल की तिचे वागणे किती चुकीचे आहे ते…पण इथे तर तुम्ही तिला समजवण्याचा ऐवजी तिला दुजोरा देताय…माझ्या आईला असे काही बोलायची हिंमत काही झाली तुमची…मी एकही वाईट शब्द माझ्या आईबद्दल ऐकून घेऊ शकत नाही…तुम्ही आताच सुमेधा ला घेऊन निघून जा येथून…बाकीची कायदेशीर प्रक्रिया मी लवकरच पूर्ण करेन…” निशांत म्हणाला. आणि सुमेधा आणि वृंदा ताईंचे काहीही ऐकुन न घेता आईला तिच्या खोलीत घेऊन गेला.
सुमेधा वृंदा ताईंसोबत घरी आली. पण मनात मात्र अजूनही खूप जास्त राग धुमसत होता तिच्या. तिला अजूनही वाटत होते की निशांत नाक घासत तिच्या समोर येईल आणि तिची माफी मागून तिला घरी घेऊन जाईल. पण तिनेही ठरवले होते की जोवर त्याची आई त्या घरात आहे तोवर ती अजिबात त्याच्या गाहरी जाणार नाही म्हणून.
पण यावेळी निशांत सुद्धा काहीच ऐकणार नव्हता. त्याने ठरवले होते की तो सुमेधा ला घटस्फोट देणार म्हणून. त्याची आई त्याला खूप समजाऊन सांगत होती की सुमेधा ला समजाऊन घरी घेऊन ये. पण निशांत सुद्धा आता काहीच ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्याची आई मात्र ह्या सगळ्याला कारणीभूत स्वतःला मानत होती आणि म्हणूनच तिची प्रकृती ढासळत चालली होती.
सुमेधा आणि निशांत चे नाते अगदीच तुटण्याच्या मार्गावर असताना त्या नात्याला बहर आणणारा अंकुर सुमेधा च्या उदरात वाढत आहे ही बातमी आली. सुमेधा ने ही बातमी निशांत ला कळवली तेव्हा निशांत तर अगदी आनंदाने वेडाच व्हायचा बाकी होता. त्याने त्याच्या आईला हे सांगितल्यावर तर त्याच्या आईमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. त्यांची तब्येत अचानकच चांगली झाली.
त्यांनी निशांत ला तगादा च लावला की सुमेधा ला घरी घेऊन ये म्हणून. निशांत ला सुद्धा या आनंदाच्या क्षणी दुसरे काहीच सुचत नव्हते. आधीचे सगळे तो जणू विसरला होता. त्याचा आनंद पाहून सुमेधा आणि वृंदाताईंना नवीच कल्पना सुचली. कारण दोघींनाही निशांतने त्याच्या आईसमोर अपमानित करून घरून निघून जायला सांगितले होते. आणि ह्यामुळे त्या दोघींचा निशांतच्या आईवर असणारा राग अजूनच वाढला होता.
निशांत जेव्हा सुमेधाला न्यायला तिच्या घरी आला तेव्हा सुमेधा आणि वृंदाताईंनी त्याच्यासमोर एक अट ठेवली. आणि आतापर्यंत आनंदाने नाचणारा निशांत अचानक पणे शांत झाला. वृंदा ताई त्याला म्हणाल्या की त्याला जर सुमेधा त्याच्या सोबत यायला हवी असेल तर त्याला त्याच्या आईला वृद्धाश्रमात सोडून यावेच लागेल. आता मात्र निशांत हतबल झाला. तो वृंदा ताईंना म्हणाला.
” सासुबाई…असे नका करू हो…आजी होण्याच्या आनंदात माझ्या आईची तब्येत एकदमच चांगली झाली आहे…तिच्यापासून हा आनंद नका हिरावून घेऊ…माझी आई सुमेधाला कधीच कसलाही त्रास होऊ देणार नाही…”
” ते काही नाही…माझ्या मुलीला त्या घरात त्या नको आहेत…म्हणून एक तर तिथे त्या राहतील नाहीतर सुमेधा…” वृंदाताई हेक्यातच म्हणाल्या.
आता मात्र निशांतच्या संयमाचा बांध फुटला. तो वृंदाताईंना म्हणाला…
” सासुबाई…तुम्हाला सुद्धा एक मुलगा आहे ना…उद्या त्याचे लग्न झाले आणि त्याच्या बायकोने सुद्धा त्याच्यासमोर ही अट ठेवली तर काय कराल तुम्ही…तुम्ही माझ्या बाजूने जरा तरी विचार करा…”
आता मात्र सुमेधाला चेव आला आणि ती निशांतला म्हणाली.
” तुम्ही माझ्या आईची बरोबरी तुमच्या आईबरोबर करू नका…माझी आई तुमच्या आईसारखी अजिबात नाही…तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात पाठवता की नाही ते सांगा आधी….”
” मी माझ्या आईला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही…वृद्धाश्रमच काय तर कुठेही नाही…” निशांत रागाने लालबुंद होत म्हणाला.
” तुम्हाला माझ्या अन् आपल्या बाळाच्या पेक्षा जास्त महत्त्वाची तुमची आई आहे ना…मग मी सुद्धा तुम्हाला सांगून ठेवते…तुम्हाला जर बाळाची अजिबात काळजी नसेल तर मी अ’बॉर्श’न करून टाकेल…” सुमेधा सुद्धा रागाने बोलली.
” वेडी झाली आहेस तू…तुला स्वतः पुढे काहीही दिसत नाही…तू काय बोलत आहेस आणि कशी वागत आहेस हे आजिबात कळत नाही आहे तुला…एकदा नीट विचार कर तू किती चुकीची वागत आहेस त्याचा अन् मग माझ्याशी बोल…” निशांत म्हणाला आणि रागातच तिथून निघून गेला.
वृंदाताई सुमेधाला म्हणाला…
” ती काळजी करू नकोस…बाळासाठी स्वतःच नाक घासत येईल तो तुझ्यासमोर…”
आणि दोघीही मायलेकी निश्चिंत झाल्या. निशांत च्या एकंदर वागणुकीवरून त्याला बाळाची किती काळजी आहे हे दिसून येत होते. आणि याच गोष्टीचा दोघी मायलेकी फायदा उचलणार होत्या.
निशांतच्या डोक्याचा तर पर भूगा झाला होता विचार करून. त्याला कळत नव्हते की कुणी असे कसे वागू शकते. तरीही त्याला वाटत होते की सुमेधाचा राग थोडा शांत झाला की आपण तिला पुन्हा समजावून सांगू म्हणून.
क्रमशः
सुमेधा प्रेग्नेंट होती तर पुढे तिच्या प्रेग्नेन्सी चे काय झाले…? सुमेधा आणि निशांत चा घटस्फोट नेमक्या कोणत्या कारणाने झाला…? सुमेधा ला आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप होईल का…?” हे पाहूया पुढील भागात.
पुढील भाग उद्या प्रकाशित होईल.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
Nice story
Thank you 😊🙏
Khupch chan ani manovedhak kahani
धन्यवाद 😊🙏