मनिषाचा प्रश्न ऐकून सुमेधा एकदमच गप्प झाली. कारण तिने अजूनतरी दुसऱ्या लग्नाचा विचारही केलेला नव्हता. आयुष्याने इतक्या कमी दिवसात इतके काही दाखवले होते की आता पुन्हा लग्न , पुन्हा संसार हा विचारही करणे दुरापास्त होते तिच्यासाठी.
पण आयुष्य म्हटलं की दुनियादारी आलीच. तिने म्हटलं की मला दुसरं लग्न नाही करायचं आणि घरच्यांनी पण तिचे ऐकून तिच्या समोर कधीच दुसऱ्या लग्नाचा विषय न काढणे हे शक्यच नव्हते. ते अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करणारच होते तिच्या लग्नाचा. कारण प्रत्येकाला जोडीदाराची गरज ही असतेच. फक्त आर्थिक बाबतीत नाही तर भावनिक, मानसिक, आणि शारीरिक गरजाही असतातच ना.
घरातील वयस्कर व्यक्तींना ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव असते. शिवाय चांगल्या वाईटाची जाण सुद्धा असते. सुमेधाच्या बाबतीत सुद्धा आज ना उद्या हा विचार करावाच लागणार होता. आणि त्या अनुषंगाने मनीषाने विचारलेला प्रश्न देखील चुकीचा नव्हता. सुमेधा जरा वेळ शांत बसली आणि म्हणाली.
” मला दुसरं लग्न नाही करायचं…पहिल्या लग्नात मला इतका चांगला जोडीदार, इतकी समंजस सासू भेटली होती…पण मी काय केले… मी चांगला संसार करू शकले नाही…मी चुकले…आणि माझ्या चुकीची शिक्षा निशांत भोगतोय…मी बघितलंय त्याला…कसा दिसत होता तो…वाढलेली दाढी, भकास नजर…अगदी हसता खेळता होता तो…पण काय झालाय आता…आणि ह्याची जबाबदार मीच आहे…त्याच्या आयुष्यात अंधार करून मी स्वतः झगमगाटात नाही राहणार…”
” तुम्ही का स्वतःला दोषी समजताय प्रत्येक गोष्टीसाठी…जे व्हायचं होतं ते होऊन गेलं…आता त्याचा विचार नका करू…” मनीषा म्हणाली.
” आपण म्हणून जातो की जे व्हायचं होतं तेच झालं…पण खरं तर हे असतं की त्या घडून गेलेल्या गोष्टींसाठी आपलेच निर्णय जबाबदार असतात…आणि म्हणून घडून गेलेल्या गोष्टींची जबाबदारी सुद्धा स्वतःलाच घ्यावी लागते…मी काही निर्णय आईचं ऐकून घेतलेले असले तरीही ते घेताना मी सज्ञान होते…चांगल्या वाईटाची जाणिव मला व्हायला हवी होती…आणि म्हणूनच मीच जबाबदार आहे या सगळ्यांसाठी…” सुमेधा म्हणाली.
” मग मी तुमचा दुसऱ्या लग्नाला नकार गृहीत धरू का…?” मनीषाने विचारले.
” हो…” सुमेधा निर्धाराने म्हणाली.
त्यावर मनीषा तेवढ्यापुरती गप्प बसली. पण तिच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. सुमेधाताईंच्या बोलण्यावरून एवढे तर नक्कीच होते की त्यांच्या मनात अजूनही निशांत बद्दल भावना आहेत.
मनीषाने हे सगळे सुधीरच्या कानावर घातले. सुधीरला आधी तर या सगळ्यांवर विश्र्वासच बसत नव्हता. पण जेव्हा मनीषा ने सांगितले की तिला सर्व काही सुमेधा ने स्वतः सांगितले आहे तेव्हा कुठे त्याचा यावर विश्वास बसला. पण आई अशीही वागू सहकते हे त्याच्यासाठी नवीनच होते. पण मनीषा जेव्हा म्हणाली की आपण एकदा निशांत राव आणि सुमेधाताईंच्या मधला गैरसमज दूर करून त्यांना पुन्हा एक संधी देऊयात. तेव्हा मात्र निशांत तिला म्हणाला.
” अगं हे काय जगावेगळं सुचतंय तुला… कधी ऐकलं आहेस का घ’टस्फो’ट झाल्यावर कुणी पुन्हा एकत्र येतं म्हणून…”
” अहो पण प्रयत्न करायला काय हरकत आहे…टीव्ही सीरियल मध्ये नाही का पुन्हा भेटतात एकमेकांना…” सुमेधा म्हणाली.
” अगं ते काय खरं असतं का…? आणि त्यांच्या आणि आपल्या आयुष्यात साम्य नसतं…वास्तविकता जरा वेगळी असते…” सुधीर म्हणाला.
” पण जर सुमेधाताई आणि निशांतराव पुन्हा एकत्र आले तर…मला तर कल्पना करूनच खूप छान वाटते आहे…असे नाही झाले तरी चालेल…पण सुमेधाताई साठी आपण निदान एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे…फार तर फार काय होईल…आपल्याला ते हसतील किंवा आपला अपमान करतील…पण सुमेधाताई साठी आपण एवढे सहन नाही का करू शकत…निदान माझ्या साठी तरी आपण एकदा प्रयत्न करून पहा… प्लीज…” मनीषा म्हणाली.
” तू म्हणतेस ते ठीक आहे…एकदा प्रयत्न करायला खरंच काही हरकत नाही…सुमेधासाठी मी एवढं तरी नक्कीच करू शकतो…फार तर अपयशी होऊ पण जर यश मिळाले सुमेधा सुखी होईल…” सुधीर म्हणाला.
आणि दोघेही नवरा बायको हे जगावेगळं धाडस करायला तयार झाले. एके दिवशी बाहेर काहीतरी महत्त्वाचे काम आहे असे सांगून दोघेही घरातून बाहेर पडले.
निशांत च्या घराचा रस्ता लागल्यावर सुधीरला जरा अस्वस्थ वाटायला लागले होते. पण मनीषाने त्याला समजावून सांगितले. शेवटी दोघेही निशांतच्या घराच्या पायऱ्या चढताना एकमेकांकडे पाहत होते. पण कसेबसे ते त्याच्या घरी पोहचलेच. त्या दोघांनाही घरात पाहून निशांत एकदमच आश्चर्यचकित झाला.
सुधीर आणि त्याची चांगलीच ओळख होती. पण मनिषाला मात्र त्याने त्या दिवशी दवाखान्यात पाहिले होते. हे दोघेही इथे कसे आले हे त्याला काहीच कळत नव्हते. तसे तर त्यांना पाहून त्याला विशेष आनंद झाला नव्हता. पण तो एवढाही वाईट नव्हता की त्यांना आल्या पाऊली परत जायला सांगेल. त्याने दोघांनाही बसायला सांगितले. नंतर तो त्यांना म्हणाला.
” तुम्ही आज अचानक इथे…?”
” हो…तुमच्याशी जरा बोलायचं होतं…” सुधीर म्हणाला.
” काय..?” काहीच न कळल्याने निशांत म्हणाला.
” मला कळलंय की तुम्ही अजूनही लग्न केलेले नाही…” सुधीर म्हणाला.
” हो…पण तुम्हाला काय त्याचं…” निशांत वैतागत म्हणाला.
” आम्हाला कारण कळेल का तुम्ही का लग्न नाही केलं त्याचं…” मनीषा मध्येच म्हणाली.
मनीषाने प्रश्न विचारल्यावर निशांत जरा शांत झाला. हाच प्रश्न सुधीर ने विचारला असता तर निशांत त्याच्यावर खूप रागावला असता. पण एका स्त्री सोबत तो वैतागून बोलणाऱ्यातला नव्हताच मुळी. म्हणून मग त्याने तिच्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर दिले. तो म्हणाला.
” कारण त्यानंतर मला कुणाशी लग्न करायची इच्छा झाली नाही…”
” जर तुमची हरकत नसेल तर मी काही सुचवू का तुम्हाला…?” सुधीर म्हणाला.
” काय सुचवणार आहात तुम्ही मला…?” निशांतने विचारले.
” जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुमेधा पुन्हा आलेली चालेल का…?” सुधीरने विचारले.
” काय…काय बोलताय तुम्ही…तुमचं तुम्हाला तरी कळतंय का…? एकत्र यायचं असतं तर घ’टस्फो’ट कशाला घेतला असता आम्ही…आणि सुमेधा माझ्या आईशी कशी वागली ते पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तिचा विचार करणे माझ्याच्याने शक्य होणार नाही…तुमचं बोलून झालं असेल तर निघा तुम्ही…” निशांत म्हणाला.
त्यावर मात्र सुधीर आणि मनीषा काहीच बोलू शकले नाहीत. ते दोघेही जायला निघाले. मात्र इतक्यात त्यांना मागून आवाज आला.
” थांबा…”
मनीषा, सुधीर आणि निशांत तिघांनीही मागे वळून पाहिले. तर मागे निशांतची आई एका काठीचा आधार घेऊन उभी होती. तिला पाहून निशांत म्हणाला.
” हे काय आई…ही तुझी आरामाची वेळ आहे…आणि तूनिथे बाहेर काय करत आहेस…?”
” मी आराम करत राहिले तर तुझा विचार कोण करेल…तू जर तुझ्यासाठी विचार करत नसशील तर मलाच काहीतरी करावे लागेल ना…” आई म्हणाली.
” म्हणजे…? तुला काय म्हणायचे आहे आई…?” निशांत ने विचारले.
” मला या दोघांचा विचार पटला आहे…” आई म्हणाली.
” पण आई…तुला माहिती आहे ना सुमेधा काय आणि कशी वागली आहे ते…” निशांत म्हणाला.
” अरे पण ती सुद्धा एक माणूसच आहे ना…आणि चुका ह्या माणसांकडूनच होतात…चुका न व्हायला आपण काही देव थोडेच आहोत…” आई म्हणाली.
” पण आई…” निशांत म्हणाला…पण त्याला मध्येच थांबवत आई म्हणाली.
” अरे निदान ह्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे…आधी पूर्ण ऐक आणि मग काय तो निर्णय घे… आणि घरी आलेल्यांना चहा पाणी न विचारता निघून जायला सांगणे ही काय रीत झाली का…?”
तेव्हा मात्र निशांतचा अगदी नाईलाज झाला. आई मनीषाला म्हणाली.
” तू कोण आहेस ग…सुधीरची बायको आहेस का…?”
” हो काकू…” मनीषा म्हणाली आणि दुरूनच त्यांना नमस्कार केला.
मग मनीषाने त्यांना सगळे काही समजावून सांगितले. सुमेधाने स्वतःहून बाळाचे अबोर्शन केले नाही ह्यापासून ते सुमेधा आता किती बदलली आहे इथपर्यंत तिने सगळे सांगितले. सुमेधाच्या वागण्यामागे वृंदाताईंचा हात होता हे तर त्यांना माहिती होतेच. शिवाय सुमेधाचे अजूनही फक्त निशांतवर प्रेम आहे हे सुद्धा समजावून सांगितले.
मनीषाची सुमेधा बद्दलची तळमळ पाहून तर निशांत च्या आई भारावून गेल्या. आणि म्हणाली.
” सुरुवातीला सुमेधा जेव्हा या घरात आली तेव्हा मी तिला माझी मुलगी मानले होते…ती सुद्धा खूप चांगली वागायची…जरा हट्टी होती पण मनाने वाईट नव्हती…पण पुढे अचानकच तिची वागणूक बदलायला लागली…आणि पुढे जे झाले ते तर खूपच वाईट झाले…पण जे झालेलं आहे ते आपण बदलू तर नाही ना शकत…पण जर आता आपण काही करू शकत असू तर नक्कीच प्रयत्न करू…” निशांतची आई म्हणाली.
” पण आई…मला पुन्हा सुमेधाला आपल्या आयुष्यात आणायचे नाही…” निशांत म्हणाला.
” असे नसेल तर मग आजवर मी तुला इतक्या मुली सुचवल्या लग्नासाठी तर लग्न का नाही केले…कशाला एकटा असताना तुमच्या लग्नाचा अल्बम बघत असतोस…तिने दिलेले घड्याळ अजूनही तुझ्या हातात असते…एकदा ते घड्याळ दिसत नव्हते तर सगळे घर डोक्यावर घेतले होते…तिला विसरून पुन्हा नवीन आयुष्याला सुरुवात का नाहीस केली…का अजूनही तिथेच आहेस…ना आयुष्यात मागे परतू शकला आहेस ना पुढे गेला आहेस…” त्याची आई त्याला म्हणाली.
आता मात्र तो काहीच बोलू शकला नाही. त्यावर मनीषा म्हणाली.
” मी सुद्धा त्या दिवशी तुम्हाला बघीतले होते…ताईला अपघात झाला तेव्हा ताईला दवाखान्यातून सुट्टी होईपर्यंत तुम्ही तिथेच थांबला होतत…तुमच्या चेहऱ्यावर काळजी अगदी स्पष्ट दिसत होती…” मनीषा म्हणाली.
” तू कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या डोळ्यात ते दिसतच…” त्याची आई म्हणाली.
” पण आई…” निशांत फक्त एवढेच बोलू शकला.
” अरे तिच्याकडून चूक झाली…पण त्या चुकीची शिक्षा तिने भोगली आहे ना…फक्त तूच नव्हते गमावले तुझ्या बाळाला.. तिनेही गमावले होतेच की…मग एकदा तिला माफ करून बघ…बघ आयुष्य कसं पुन्हा बहरू लागेल…” त्याची आई म्हणाली.
” मग तुला काय वाटतं.. मी काय करावं…?” निशांत ने विचारले.
” मला वाटतं तू तिला पुन्हा एक संधी द्यावी…तिला पुन्हा तुझ्या आयुष्यात जागा द्यावी…” आई म्हणाली.
निशांत काहीच बोलू शकला नाही. मग त्याची आई पुन्हा म्हणाली.
” स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी तरी ह्याबाबत विचार कर…नाहीतर मग दुसऱ्या लग्नासाठी होकार दे…सुमेधा नसेल तर दुसऱ्या एखाद्या मुलीशी लग्न कर…पण असा एकटा राहू नकोस…मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे…एकतर सुमेधा नाहीतर दुसरी कुणी…पण तुझा सुखाचा संसार मला पाहायचा आहे…आता वय झालंय माझं…डोळे मिटायच्या आधी एकदा तुला स्थिरस्थावर झालेलं पहायचं आहे मला…”
आता मात्र निशांत विचारात पडला. सुमेधाच्या नंतर तो इतर कुणाचा विचार करू शकला नाही हे सुद्धा खरे होते. त्या दिवशी पण सुमेधावर असणारा त्याचा राग अजूनही बाकी होता. पण सुमेधावर त्याचे कुठेतरी प्रेम सुद्धा होते. आणि सुमेधा एकदा पुन्हा त्याच्या आयुष्यात येणार ह्या विचाराने त्याच्या मनावर जणू मोरपंख फिरल्यासारखे झाले होते. काय करू आणि काय नको ह्या विचारात तो होता.
क्रमशः
निशांत आता काय निर्णय घेईल…? मनीषा आणि सुधीरला त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल का…? सुमेधाला जेव्हा हे कळेल तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल…? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका .