आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे अरुणने सुद्धा आपली चूक सुधारली होती. अरुणने प्रशांतला सुद्धा सगळं काही खरं खरं सांगितलं आणि त्यालाही आश्वासन दिले की तो यापुढे कधीही असे वागणार नाही. त्याच्या वागणुकीत पश्चात्ताप दिसून येत होता म्हणून प्रशांत आणि प्रीती झालं गेलं सगळं विसरून गेले.
पण अबोलीचा गैरसमज मात्र दूर झाला नाही. ती प्रीतीला चुकीचंच समजत होती. तिचा राग कमी होण्याऐवजी वाढतच राहिला. अरुणला हे पाहून खूप वाईट वाटायचं. पण अबोली ला खरं सांगितलं तर ती काय करेल ह्याची त्याला भीती वाटायची. म्हणून तो तिला सांगायची हिम्मत करू शकत नव्हता. पण वाढता वाढता तिचा राग एवढा वाढला की आज प्रीतीला दुखापत झाली तरी तिची काळजी वाटण्या ऐवजी अबोलीला पुन्हा जुन्या गोष्टी आठवत होत्या.
हॉस्पिटल मध्ये पोहचल्यावर अबोली तिथेच थबकली आणि अरुणला म्हणाला.
” तुम्ही जाऊन या…मी इथेच उभी राहते…”
” अबोली…हे काय बोलत आहेस तू…चल म्हणतोय ना…” अरुण आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला.
” मला नाही यायचं…मी तिला दुरूनच पाहून निघून जाईल…आणि तुम्ही का तिची इतकी काळजी करताय…तिला तिच्या कर्माचीच फळे मिळाली आहेत ना…शिवाय एवढं सुद्धा नाही लागलंय तिला…दादाचा फॅमिली ग्रुप वर मॅसेज आला होता…लवकरच बरी होईल…” अबोली म्हणाली.
यावर अरुण काहीच बोलला नाही. त्याने सरळ अबोली चा हात पकडला आणि तिला घेऊन हॉस्पिटल च्या बाहेरच्या दिशेने चालू लागला. तो त्याच्या गाडीजवळ पोहचला आणि अबोलीला सुद्धा गाडीत बसायला सांगितले. अरुण असे का बोलतोय ते तिच्या लक्षातच येत नव्हते. ती गाडीत बसली आणि तिने विचारले की आपण कुठे जातोय.
त्यावर अरुण काहीच बोलला नाही. मग अबोली सुद्धा गप्प बसली. गाडी शहराच्या बाहेरच्या दिशेने नेत होता. इतक्यात एका हॉटेलसमोर गाडी उभी केली आणि अबोलीला गाडीतून बाहेर उतरायला सांगितले. अबोली गाडीच्या बाहेर आली आणि तिने समोर पाहिले. ते पाहताच तिला धक्का बसला. अरुण तिला म्हणाला.
” काही आठवतंय का…?”
” हो…मला आठवतंय…हे तेच हॉटेल आहे जिथे प्रीतीने मला आणले होते…ती म्हणाली होती की तुम्ही कुण्या मुलीसोबत इथे आहात म्हणून…पण तुम्ही इथे नव्हतेच…” अबोली म्हणाली.
” असं तुला वाटतं…” अरुण म्हणाला.
” म्हणजे…” अबोली ने आश्चर्याने विचारले.
” म्हणजे…मी त्या दिवशी इथेच होतो…” अरुण एक दीर्घ श्वास टाकत म्हणाला.
आता मात्र अबोलीचा चेहरा पांढराफटक पडला. ती जोरात ओरडली.
” काय…?”
” हो…” अरुण म्हणाला.
” पण इथे का आला होता तुम्ही…? आणि मला तेव्हा का नाही सांगितलं…?” अबोलीने विचारले.
” मला तुला खरं सांगायची इच्छा होती पण सतत भीती वाटायची की तू मला सोडून गेलीस तर…म्हणून आजवर तुला खरं सांगितलं नाही…पण माझ्या या स्वार्थापायी मी तुम्हा दोघी बहिणींना कायमचे एकमेकांपासून वेगळे केले ह्याची जाणीव झालीय मला…तू प्रीतीचा इतका राग करायला लागलीस की तिच्याबद्दल जराही सहानुभूती उरली नाहीये तुझ्यात…आणि हे सगळं फक्त माझ्यामुळे होतंय…” अरुण म्हणाला.
” तुम्ही हे सगळं काय बोलताय मला काहीच कळत नाहीये…तुम्ही सरळ सरळ सांगता का तुम्हाला काय बोलायचं आहे ते…” अबोली चिडून म्हणाली.
त्यानंतर अरुण ने जे काही झालं ते सगळं खरं खरं अबोलीला सांगितलं. अरुण च्या तोंडून सगळं सत्य ऐकल्यावर अबोली मटकन खाली बसली. तिला अरुणचा भयंकर राग आला. ती चिडून त्याला म्हणाली.
” तुमची हिम्मत कशी झाली माझ्यासोबत अशी वागण्याची…तुम्ही असे कसे करू शकता…मी कुठे कमी पडले ते तरी सांगा…तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवला ही चूक झाली का माझी…इतके दिवस मला अंधारात ठेवलं तुम्ही…”
” माझी खूप मोठी चूक झाली हे मान्य आहे मला…यावर तू देशील ती शिक्षा भोगायची तयारी सुद्धा आहे माझी…आजवर तू कशी रिॲक्ट होशील ह्याची भीती वाटत असल्याने मी तुला खरं सांगितलं नाही…”
यावर अबोली काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. ती मनाने सैरभैर झाली होती. अरुण पुढे म्हणाला.
” तुझ्यापासून हे लपवून ठेवण्यात खरे तर माझा स्वार्थ होता…पण प्रितीने अगदी निस्वार्थपणे तुझा राग, तुझा हा अबोला सहन करून सुद्धा तुला सत्य नाही सांगितले…तुला धक्का बसेल म्हणून…तू मला सोडून जाशील ह्याची खात्री होती म्हणून…तिला जर आपला संसार मोडायचा असता तर तिने तुला तिखट मीठ लावून सगळं सांगितलं असतं…तिच्याबद्दल तुझ्या मनात चुकीचं भरवण्यात माझा स्वार्थ होता…पण तिने मला समजावून सांगितल्यावर मात्र मला मी किती मोठी चूक करणार होतो ह्याची जाणीव झाली…आज माझ्यात जो काही बदल झालाय ह्याला फक्त तिने मला दिलेली एक संधीच कारणीभूत आहे…” अरुण म्हणाला.
अरुणचे बोलणे ऐकून सैरभैर झालेल्या अबोलीला अचानक प्रितीची आठवण आली. सत्य कळल्याने तिच्या नजरेत पश्चात्ताप दाटून आला होता. अचानक तिच्या लक्षात आले की प्रीती चा अपघात झालाय आणि ती हॉस्पिटल मध्ये आहे. ती त्याच मनस्थितीत अरुणला मोठ्या आवाजात म्हणाली.
” मला प्रीतीला पहायचंय…लवकर चला…लवकर…”
अरुणने क्षणाचाही विलंब न लावता तिला घेऊन गाडीने सरळ हॉस्पिटल गाठले. अबोलीने घाईतच दरवाजा उघडला आणि अरुणची वाट सुद्धा न पाहता धावतच प्रीती जवळ गेली. प्रितीच्या डाव्या हाताला आणि खांद्याला मार लागला होता. तीला पाहताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती तिथेच रडायला लागली. अबोलीला अशा अवस्थेत बघून प्रीती तिला म्हणाली.
” अगं अशी काय रडतेस…एवढं जास्त नाही लागलंय मला…पण तू अशीच रडत राहिलीस तर मात्र मला वाटेल की मला खूपच लागलंय…”
तिला पाहून अबोली तिला म्हणाली.
” इतक्या सिरीयस वातावरणात सुद्धा तुला गंमत सुचते का ग…बघ ना किती लागलंय ते…”
” तू आली हे पाहूनच बरं वाटतंय मला…” प्रीती म्हणाली.
” तू खूप मोठ्या मनाची आहेस ग…अगदी काहीही न झाल्यासारखी बोलत आहेस माझ्याशी…” अबोली म्हणाली.
ह्या दोघी बहिणींचे बोलणे सुरू आहे हे पाहून प्रशांत तिथून निघून गेला. प्रीती पुढे म्हणाली.
” अगं जे काही झालंय त्यात तुझी तरी काय चूक…माझाच गैरसमज झाला होता म्हणून मी तुला काहीबाही सांगत बसले…आणि नवऱ्याबद्दल वाईट ऐकून घेणे कोणाला आवडणार आहे…”
” अशी कशी ग तू प्रीती…मी इतकी वाईट वागून सुद्धा अजूनही माझाच विचार करते आहेस…मला माहिती आहे ह्या सगळ्यात तुझी काहीच चुकी नाही म्हणून…मला अरुणने सगळं काही खरं सांगितलंय…” अबोली खिन्नपणे म्हणाली.
” काय…?”. प्रीती जवळजवळ किंचाळलीच.
तिचा आवाज ऐकून बाहेर उभे असलेले प्रशांत आणि अरुण दोघेही घाईने आत आले. अरुणला बघून प्रीती म्हणाली.
” ही अबोली काय बोलत आहे…तुम्ही काय सांगितलंत हिला…?”
” मी सगळं खरं सांगितलंय तिला…” अरुण म्हणाला.
” पण का…?” प्रीती म्हणाली.
” आज नाहीतर उद्या मला तिला सत्य सांगायचेच होते…आणि हीच योग्य वेळ होती…” अरुण अबोलीकडे अपराधीपणा ने पाहत म्हणाला.
त्यावर अबोलीने एक तिरस्काराचा कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि त्याच्याकडे पाठ फिरवत प्रीतीला म्हणाली.
” मला माफ जर प्रीती…माझी खूप मोठी चूक झाली…चूक नव्हे तर गुन्हा झाला…तुला लहानपणापासून ओळखते मी…तरीही तुला समजू शकले नाही…खरंच खूप चुकले मी…माझी तर तुला तोंड दाखवायची सुद्धा हिम्मत होत नव्हती…पण आपण चुकलोय म्हटल्यावर माफी तर मागायलाच हवी ना…”
हे बोलताना अबोलीच्या डोळ्यात पाणी आले होते. तिला शांत करत प्रीती म्हणाली.
” झालं गेलं सगळं विसरून जा अबोली…जे काही झालंय ते मागे सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करुयात…मी तर सगळं केव्हाच विसरली आहे…आता मागचा काहीच विचार करायचा नाही…”
” हो… खरं आहे तुझं…माझा पण तोच विचार आहे…” अबोली काहीश्या रहस्यमयी आवाजात म्हणाली.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.