प्रकाशराव विचार करतच घरी गेले. शालू ताईंनी रस्त्याने त्यांचे कान भरले ते वेगळेच. शालू ताई आणि प्रकाशरावांनी घरात पाय ठेवलाच होता इतक्यात त्यांच्या घरी त्यांच्या सासुबाई आणि मोठ्या जाऊबाई आल्या. त्यांच्या जाऊबाई त्याच शहरात थोड्या अंतरावर राहायच्या.
शालूताईंच्या सासुबाई कधी त्यांच्याकडे तर कधी त्यांच्या मोठ्या जावेकडे राहायच्या. जाऊबाई आणि त्यांच्या कुटुंबाचे बऱ्यापैकी पटायचे. प्रकाशरावांना तिथे आलेले पाहून त्यांच्या सासुबाई म्हणाल्या.
” अरे वा…हा तुझा भाऊ प्रकाश आहे ना…खूप वर्षांनी आलाय…?”
” हो सासूबाई…यावेळी सुद्धा खूप तगादा लावला त्याच्या मागे तेव्हा आलाय…स्वतःहून कसला येतोय तो…” शालूताई म्हणाल्या.
मग प्रकाशराव म्हणाले.
” शेतीची कामे असतात आणि मुले पण लहान होती…नाहीतर मुलांच्या भरवशावर सगळं सोडून आलो असतो…”
” हो ना…आपण मुलांच्या भल्यासाठी आयुष्यभर झटतो…आपल्या इच्छा आकांक्षा मारतो आणि मुलं काय करतात…आपल्या साध्या एका इच्छेचा मान ठेवू शकत नाहीत…” शालू ताई मध्येच म्हणाली.
यावर सासुबाई आणि जाऊबाईंचा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्या पुढे सांगायला लागल्या.
” आता आमच्या नंदिनीचेच बघा ना…दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार आहे म्हणून किती चांगलं स्थळ पाहिलं होतं तिच्यासाठी…अगदी लाखात एक…पण तिने मात्र बापाच्या इभ्रतीचा विचार न करता ऐन मांडवात लग्नाला नकार दिला हो…अन् कोण कुठल्या त्या साधारण नोकरी करणाऱ्या नकुलशी बरी एका पायावर लग्नाला तयार झाली…”
आता मात्र प्रकाशरावांनी मान खाली घातली. त्यांची परिस्थीती पाहून शालू ताईंच्या सासुबाई आणि जाऊबाई सुद्धा काहीच बोलल्या नाहीत. प्रकाशराव थोडा वेळ आराम करायला म्हणून त्यांच्या खोलीत निघून गेले. इकडे शालू ताईंच्या सासुबाई सुद्धा आराम करायला म्हणून त्यांच्या खोलीत निघून गेल्या.
खोलीत आल्यावर प्रकाशरावांना अचानक आठवले की आईने शालूताईंसाठी साडी पाठवली होती. पण काल ओवाळणी च्या गेली त्यांना ती साडी शालूताईला द्यायचे लक्षातच आले नाही. आता आठवलीच आहे तर देऊनच देऊ ताईला म्हणून प्रकाशरावांनी ती साडी घेतली आणि ताईला द्यायला म्हणून खोलीच्या बाहेर पडले. पण हॉलमध्ये पोहचायच्या आधी त्यांच्या कानावर शालू ताई आणि त्यांच्या जाऊबाई च्या गोष्टी पडल्या. जाऊबाई शालू ताईंना म्हणत होत्या.
” तू नंदिनी बद्दल इतके चांगले सांगितलेस…दिसायला खूप सुंदर आहे, अभ्यासात हुशार आणि घरकामात निपुण आहे तर मग आपल्या सचिन साठी का नाही मागणी घातलीस तिला…सचिनसाठी तर आपण मुली शोधतच आहोत ना…तुझ्या भावाच्या मुलीसोबतच तिचं लग्न झालं असतं तर चांगलं च झालं असतं…
तसेही रवीला आपण आधीपासूनच ओळखतो ना…किती दारुडा आहे तो…आता तर डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की त्याने दारूने स्वतःचे शरीर खराब करून घेतले आहे म्हणून…मग अशा परिस्थितीत तू नंदिनी चे लग्न त्याच्याशी लावायला का निघाली होतीस…? त्यापेक्षा सचिन सोबतच का नाही लावले तिचे लग्न…नाहीतरी मागच्या दोन वर्षांपासून आपण त्याच्यासाठी मुली शोधतच आहोत ना… “
हे ऐकल्यावर शालूताई म्हणाली.
” माझ्या सचिन सोबत नंदिनीचे लग्न…अजिबात नाही…कुठे ती नंदिनी आणि कुठे माझा सचिन…तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या भावाची परिस्थिती…आणि मला माझ्या तोलामोलाचे घराणे हवे आहे माझ्या सचिनसाठी..जे आमचे योग्य मानपान ठेवू शकेल…
शेवटी एका चांगल्या शिकलेल्या, श्रीमंत घरातल्या एकुलत्या एक मुलाची आई म्हणून माझी सुद्धा काही स्वप्ने आहेत त्याच्या लग्नाबद्दल…आणि राहिली गोष्ट रवीच्या स्थळाची तर तुम्हाला तर माहिती आहे की त्याचे लग्नच जुळत नव्हते…कारण मुलीकडच्यांना त्याच्या व्यसनाबद्दल माहिती व्हायचे…
पण रवीचे बाबा सचिनच्या बाबांचे खूप चांगले मित्र आहेत आधीपासून…त्यांनी त्यांच्याकडे शब्द टाकला की मी एखादी मुलगी सुचवतो म्हणून…मग मलाच नंदिनीची आठवण झाली…शेवटी तिला इतका श्रीमंत घरातील मुलगा या जन्मात मिळाला नसता..
आणि प्रकाश काही माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही आणि नंदिनी सुद्धा काही तक्रार करणार नाही म्हणून मी ही सोयरिक केली होती…मला वाटलं इतक्या मोठ्या घरी मुलगी दिली म्हणून माझा भाऊ आयुष्यभर माझ्या ऋणात राहील आणि रवीसाठी चांगली बायको मिळाली म्हणून रवीच्या घरचे सचिनच्या बाबांच्या ऋणात राहतील…
पण ऐन वेळेला त्या मायलेकिंनी धिंगाणा घातला अन् सोयरिक होता होता फिस्कटली…पण ते तरी बरे म्हणावे की सुजाताचे वडील तिचे लग्न रवीशी लावून द्यायला तयार झाले अन् सचिनच्या बाबांचा शब्द खाली गेला नाही…
रवीचे लग्न तर झाले पण नंदिनी अन् तिच्या आईने जे केले ते मी कधीच विसरू शकणार नाही…म्हणून जाणूनबुजून प्रकाशला मी रवीच्या घरी घेऊन गेले होते.. जेणेकरून त्याच्या मनात असलेला मायलेकिबद्दचा राग धगधगत राहील…”
शालूताईंचे सगळे बोलणे प्रकाशरावांनी ऐकले. त्यांना तर त्या क्षणी काहीच सुचेनासे झाले. त्यांच्या हातून साडीची थैली खाली पडली आणि त्या आवाजाने शालूताई आणि त्यांच्या जाऊबाईंचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांना पाहून तर शालू ताईंना सुद्धा धक्का बसला. प्रकाशने आपले बोलणे ऐकले तर नसेल ना ह्या शंकेनेच त्यांना घाम आला.
त्या प्रकाशरावांना काही बोलणार इतक्यातच प्रकाशराव रागाने आतमध्ये निघून गेले आणि त्यांची बॅग घेऊन तडक घराबाहेर निघून गेले. शालूताई त्यांना मागून हाका मारत होती पण प्रकाश रावांनी साधे मागे वळून सुद्धा नाही पाहिले. त्यानंतर शालूताईंची जाऊबाई त्यांना म्हणाली.
” बघितलंस शालू…तुझ्या अशा वागण्याने तुझ्या भावाला किती दुःख झाले ते…अगं तुला सगळं काही माहिती आल्यावर तू त्याच्याशी अशी कशी वागू शकतेस…स्वतःच्या भावाच्या सख्ख्या मुलीला तू अशा लोकांच्या घरची सून बनवणार होतीस…
असे तर कुणी आपल्या शत्रुसोबत सुद्धा वागणार नाही…अन् त्याच्या परिस्थीती बद्दल तू कशी बोलू शकतेस…काहीही झालं तरी कधी काळी तू सुद्धा त्याच घरात राहायची ना…तू सुद्धा त्याच परिस्थीतितून इथे आलीस हे तू काही विसरू शकतेस…
अगं मला सख्खा भाऊ नाही म्हणून मला सतत तुझा हेवा वाटायचा की तुझा भाऊ तुला किती जीव लावतो… तुझा भाचा अन् भाची सतत आत्या आत्या म्हणून तुझ्या मागे फिरायची लहानपणीपासून…पण तू किती बदललीस…तुला श्रीमंती अन् स्टेटस समोर माणुसकीचे आणि नात्यांचे काहीच मोल नाही का शालू…?”
आता मात्र शालू ताई एकदमच गप्प होती. विचार करून करून तिचे डोके चालेनासे झाले होते. त्याच्या परिस्थिती मुळे तिने त्याला कधी फारसे महत्त्व दिले नव्हते पण आज मात्र आपण आपल्या भावाला कायमचे गमावून बसू की काय ह्या भीतीने ती अस्वस्थ झाली होती.
इकडे मात्र प्रकाशराव विचार करून करून वेडे व्हायचे बाकी होते. ज्या बहिणीला लहानपणी पासून आईच्या स्थानी मानले, जीचे सगळे काही म्हणणे ऐकले, जिला विचारल्याशिवाय आयुष्यात कधी कोणताच निर्णय घेतला नाही, स्वतःच्या मुलीला फक्त तिच्या शब्दाखातर एका अनोळखी मुलाशी लग्न करायला तयार केले होते, जीचा अपमान झाला म्हणून बायकोला इतक्या वर्षांच्या संसारानंतर माहेरी पाठवले ती आपल्याशी अशी वागू शकते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण होते.
आपल्या सख्ख्या बहिणीने आपल्या मुलीच्या आयुष्याचा खेळ मांडला होता अन् आपण सुद्धा आंधळेपणाने ती जे काही म्हणेल तेच खरे म्हणून इतर सगळ्यांना खोटे समजले. लग्नाच्या दिवशी सुद्धा तिचा खोटारडेपणा समोर आला होता पण आपण त्याकडे अजिबात लक्ष न देता फक्त बहिणीचा मान अपमान अन् आपल्या खोट्या इभ्रतीचा विचार केला.
खरे तर आपली खरी इभ्रत ही आपली मुलगीच आहे अन् आपल्या बायकोने तिच्या भविष्याचा विचार करून एकाप्रकारे आपली इभ्रत राखली हे त्यांना कळून चुकले होते. ते सगळं काही आठवून प्रकाश रावांचा राग अनावर झाला होता अन् त्याच रागाच्या भरात ते चक्क शालू ताईच्या घरापासून साथ किलोमीटर दूर असणाऱ्या रेल्वे स्टेशन पर्यंत पायी आले होते. पण काही केल्या त्यांचे विचारचक्र थांबत नव्हते.
आपल्या नकळत आपण इतक्या चुका करून बसलो आहोत की त्या सुधारण्याचा कोणताच मार्ग दिसत नाही ह्याने प्रकाशराव अस्वस्थ झाले होते. आज एकादमात सगळ्या गोष्टींचा उलगडा झाल्याने ते व्यथित झाले होते. त्यांना कळत नव्हते की नेमके वाईट कोणत्या गोष्टीचे वाटून घ्यावे.
आपल्या सख्ख्या बहिणीने आपल्याला फसवले ह्याचे, आपण आपल्या बायको शी एवढे वाईट वागलो ह्याचे की आपल्यामुळे आपल्या मुलीचं पूर्ण आयुष्य बदलले ह्याचे. विचार करून करून त्यांच्या डोक्याचा पार भुगा झाला होता. ते स्वतःच्याच नजरेत एवढे खाली पडले होते की नेमके ह्यातून सावरावे कसे हे सुद्धा त्यांना कळत नव्हते.
शेवटी ट्रेन ची अनाऊंसमेंट झाली अन् प्रकाश राव भानावर आले. नंतर त्यांच्या लक्षात आले की मघापासून चार तास झालेत त्यांना एकाच जागी बसून विचार करताना. विचारांच्या तंद्रीत एवढं वेळ कसा निघून गेला ते त्यांचं त्यांना सुद्धा कळलय नाही. प्रकाशराव ट्रेनमध्ये जाऊन बसले ते आपली चूक दुरुस्त करण्याचा निर्धार करूनच.
इकडे सकाळीच सरला ताईंच्या घरी मागच्या गल्लीत राहणारा नितीन आला. त्याला पाहून सरलाताई म्हणाली.
” अरे नितीन…बऱ्याच दिवसांनी आलास…ये बैस…नकुल दादाला भेटायला आला होतास का..?”
” नाही… मी तर तुमच्याकडून पेढे खायला आलोय..” नितीन म्हणाला.
” पेढे…ते कशाचे रे…?” सरला ताईंनी कुतूहलाने विचारले.
” म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही….” नितीन म्हणाला.
” नाही…मला काहीच माहिती नाही…कशाबद्दल बोलतो आहेस तू…” सरला ताईंनी विचारले.
” अहो काकू…नंदिनी वहिनी त्यांच्या कॉलेजमधून पहिल्या आल्यात बी एस सी च्या दुसऱ्या सेमीस्टर मध्ये…” नितीन म्हणाला.
” काय सांगतोस काय…सगळ्या कॉलेजमधल्या मुलांमध्ये पहिली आली आहे ती…मला तर नंदिनीने काहीच सांगितलं नाही…नंदिनी…अगं ए नंदिनी…जरा इकडे ये…” सरला ताई आनंदाने नंदिनीला बोलवत म्हणाल्या.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
प्रकाशराव आता पुढे काय करतील…? शालूताईंना तिच्या चुकीची जाणीव होईल का…? नंदिनी आणि सुजाता चे आयुष्य कुठले वळण घेईल…?” जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.