” ये राधा…तुझ्या उजव्या पायाने हे माप ओलांड आणि घरात प्रवेश कर…” रागिणीताई राधाला म्हणाल्या.
आणि राधा माप ओलांडून घरात आली. गोऱ्या रंगाची, मध्य बांध्याची आणि कुरळे केस असणारी राधा आज वधुवेशात खूपच सुंदर दिसत होती.
रागिणी ताईंची सून म्हणून आजच राधाने गृहप्रवेश केला होता. राधा या घरची सून बनून स्वतःला धन्य समजत होती. ज्या दिवशी रोहित तिला बघायला आला होता त्याच दिवशी त्याच्या घरच्यांचे बोलणे ऐकून राधा भारावून गेली होती. रागिणीताई म्हणाल्या होत्या.
” आम्हाला तीन मुली आहे…त्यामुळे मुलीचे सुख कशात आहे ते चांगलेच ठावूक आहे आम्हाला…आम्ही तुमच्या मुलीला सूनेसारखे न वागवता मुलीसारखे वागवू…आमच्या तिन्ही मुलींची लग्न झाल्याने आम्हाला मुलीची कमतरता सारखी भासते घरात…तुम्ही असे समजा की तुमची मुलगी एका घरातून दुसऱ्या घरात जातेय…एका आईजवळून दुसऱ्या आईजवळ जातेय…”
रागिणी ताईंचे बोलणे ऐकुन राधाच्या घरातील सगळेच खूप भारावले होते. आजच्या काळात अशा सासुबाई मिळणं म्हणजे नशीबच. रोहित सुद्धा दिसायला देखणा होता. चांगली नोकरी होती. रोहित पेक्षा मोठ्या तीन बहिणी होत्या. सगळ्याच बहिणींची लग्ने झाली होती. सगळं काही व्यवस्थित बघून राधाचं आणि रोहितचं लग्न ठरलं आणि महिनाभरातच राधा रागिणी ताईंची सून बनून घरात आली सुद्धा.
लग्नाच्या सगळ्या विधी पार पडल्या. पूजा अर्चा आणि देवदर्शन सुद्धा झालं. घरातील पाहुणे मंडळी हळूहळू सगळीच निघून गेली. नवीन जोडपं जवळच असलेल्या एका थंड हवेच्या ठिकाणी चार दिवस मधुचंद्राला जाऊन आलं.
आता मात्र राधाचा खरा संसार सुरू झाला. घरातील सगळ्यांची मने जिंकण्याचे राधाने प्रयत्न सुरू केले होते. राधा होती सुद्धा सगळ्याच कामात चोख. तक्रारीला कुठे जागाच ठेवायची नाही. सगळ्यांना सगळं काही हातात आणून द्यायची. तिन्ही नणंदा अधून मधून येत राहायच्या. राधा त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करायची. रागिणीताई सुद्धा तिच्याशी खूप गोड बोलायच्या. सगळं काही सुरळीत सुरू होतं.
पण एकदा राधा सकाळी लवकर उठली आणि तिला अचानक गरगरायला लागलं. तशी ती पुन्हा अंथरुणात शिरली. शिरल्या शिरल्या तिला जरा झोप लागली. थोड्या वेळाने रोहित उठला आणि खोलीच्या बाहेर गेला. बाहेरून आत आला तोच रागाने फणफणत. आत येऊन त्याने राधाच्या अंगावरील अंथरून काढून मोठ्याने जमिनीवर फेकले. त्यासरशी राधाला पटकन जाग आली. ती खाडकन झोपेतून जागी होत रोहितकडे पाहू लागली. तितक्यात रोहित तिला म्हणाला.
” तुला काही झोपा काढण्यासाठी लग्न करून घरात नाही आणलंय मी…तू इथे झोपा काढत आहेस आणि माझी आई तिकडे किचन मध्ये राबतेय…चल उठ आणि लाग कामाला…आणि यापुढे माझी आई काम करताना दिसता कामा नये…”
नेमकं काय होतंय हे राधाला कळतच नव्हतं. एरव्ही प्रेमाने बोलणारा रोहित आज कोणत्या पद्धतीने बोलतोय हे तिच्या लक्षातच येत नव्हते. त्याच्याशी काय बोलावे हे सुद्धा तिला कळत नव्हते. आपल्याला उठायला उशीर झालाय हे तिच्या लक्षात आले पण थोडासा उशीर झाल्याने रोहित असा रिॲक्ट करेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. कारण आजवर रोहित तिच्याशी कधीच या पद्धतीने बोलला नव्हता.
ती पटकन उठली. बाथरूम मध्ये जाऊन थंडच पाण्याने अंघोळ केली आणि किचन मध्ये गेली. तोवर सासूबाईंचा चहाच उकळलेला नव्हता. ती गेली आणि सासूबाईंना म्हणाली.
” आई तुम्ही बसा… मी आणते चहा गाळून…”
” अगं…आलीस का तू…? खूपच लवकर आलीस…थोडावेळ झोपायच असतं आणखी… थकतेस हो दिवसभर काम करून…” सासूबाईंच्या बोलण्यातला उपरोधीकपणा राधाच्या लक्षात आला होता. सासुबाई सुद्धा अशा बोलू शकतात हे तिला नव्याने कळले होते.
ती काहीही न बोलता काम करत होती. सगळं काही आवरून आणि चहा नाश्ता करून रोहित ऑफिस ला जायला निघाला. राधा ने घाईने त्याला टिफीन नेऊन दिला. त्याने टिफीन घेताना तिच्याकडे साधे पाहिले सुद्धा नाही. सरळ दुर्लक्ष करून निघून गेला.
राधा मात्र दिवसभर त्याच्या वागण्याचा विचारच करत राहिली. आजवर नेहमीच प्रेमाने बोलणारा रोहित आज असा का बोलला असेल हे तिला अजूनही कळले नव्हते. दिवसभर ती तशाच मनस्थितीत कामे करीत होती. मध्येमध्ये तिला गरगरल्यासारखे वाटत होते. तेव्हा थोडा वेळ बसून नंतर पुन्हा कामाला सुरुवात करायची.
दुसऱ्या दिवशी सुद्धा तिला बरे वाटले नाही तेव्हा तिने रोहित ने ऑफिसला जाताना तिला दवाखान्यात नेले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की राधा आई होणार आहे. आई होणार या बातमीने राधा खूप आनंदून गेली. रोहित आणि घरातले सुद्धा आनंदी होते. बातमी ऐकून रोहितच्या बहिणी सुद्धा आवर्जून घरी भेटायला आल्या.
राधा सुद्धा आनंदाने त्यांचा पाहुणचार करत होती. रोहितच्या बहिणी दिवसभर गप्पा करीत. संध्याकाळी छान बाहेरून फिरून येत. कधी शॉपिंगला जात. तोवर त्यांच्या मुलांना राधा सांभाळत असे. राधाला त्या घरकामात काहीच हातभार लावत नसत. आधीच इतकी कामे आणि त्यात गर्भारपण. त्यामुळे राधा दिवसभरात पार थकून जाई.
पण चेहऱ्यावर मात्र थकवा अजिबातच दाखवायची नाही. सगळीकडे प्रसन्न चित्ताने वावरायची. एकदा असेच सगळेजण हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलेले होते. आपण ही त्यांच्यात बसून भाजी निवडू म्हणून ती सुद्धा भाजी घेऊन तिथे बसली. थोड्या वेळाने तिची नणंद पाणी घ्यायला म्हणून किचन कडे जाऊ लागली तेव्हा राधा तिला म्हणाली.
” ताई…किचन मध्येच जाताय तर येताना सुरी घेऊन याल का…? तेव्हढीच भाजी सुद्धा चिरून होईल माझी…”
राधाचे बोलणे रोहित आणि तिच्या सासुबाईनी सुद्धा ऐकले. आणि कोणाला काही कळेल त्या आधीच रोहित राधा जवळ आला आणि तिच्या जवळच भाजीचं ताट हाताने उधळून देत म्हणाला.
” अग ए…स्वतःला काय समजतेस ग तू…? स्वतःला घराची मालकीण समजायला लागलीस का ?…माझ्या बहिणीला काम सांगणार…यासाठी तुला लग्न करून घरी आणलं का…? खबरदार यानंतर अशी वागली तर…”
रोहितचे वागणे पाहून राधा भांबावून गेली. सगळ्यांसमोर तिला अपमानित झाल्या सारखे वाटत होते आणि रोहितच्या वागण्याने ती मनातून दुखावली होती. रोहित मात्र आपण खूप काहीतरी मोठं काम केलंय अशा खुशीने पुन्हा जाग्यावर जाऊन बसला.
राधाने जमिनीवर पडलेली भाजी उचलली आणि भाजीचं ताट घेऊन किचन मध्ये गेली. इकडे सगळेजण काहीही झालेलं नाही या आविर्भावात पुन्हा गोष्टी करायला लागले. रोहितला त्याच्या कृत्याबद्दल कुणीच साधं बोललं सुद्धा नाही. राधाच्या डोळ्यात आता अश्रू दाटून आले होते.
रोहित आणि सासरच्यांच वागणं खूप विचित्र वाटत होतं. आजवर इतके चांगले वागले आणि आता असे का वागत आहेत हे तिला कळत नव्हते. मग अचानकच तिच्या लक्षात आले. आजवर तिने तक्रारीला जागाच ठेवली नव्हती. अगदी प्रत्येकाला सगळं काही हातात नेऊन द्यायची.
म्हणून सगळे तिच्याशी गोड बोलायचे. आणि आज जेव्हा तिच्या तब्येतीमुळे तिच्या कामात दिरंगाई व्हायला लागली तेव्हा ते सगळेच तिला बोल देऊ लागले होते. रोहित बरेचदा तिला म्हणाला होता की काम करणार नाहीस तर तुला कशाला आणलय लग्न करून म्हणून. म्हणजे घरात बायको किंवा सून फक्त काम करण्यासाठी म्हणूनच आणायची होती का ह्यांना. त्या व्यतिरिक्त वेगळं असं अस्तित्व नाही का बायकोचं असा प्रश्न तिला पडला. आता मात्र तिला ह्या सगळ्यांचीच चीड आली.
सासुबाई नेहमीच म्हणायच्या की आम्ही सुनेला मुलीसारखं वागवू. आणि प्रत्यक्षात त्यांच्या मुलीसाठी आणि सूनेसाठी वेगवेगळे नियम होते. इतर वेळी नाही निदान आपल्या या अवस्थेत तरी आपल्याला समजून घ्यायला हवे होते. आपल्याला कामात थोडी मदत करायला हवी होती. आपल्याला मानसिक आधार द्यायला हवा होता असे राधाला वाटून गेले.
त्यानंतर राधाने घरात कोणालाच काही काम सांगितले नाही. जसं होईल तसं ती स्वतःच करायची. अगदी यंत्रवत काम करायची. कोणाशी जास्त बोलणे नाही ना काही नाही. आठ दिवस राहून तिच्या नणंदा परत गेल्या. सगळं काही पूर्ववत सुरू होतं. पण राधाच्या वागण्यात एक वेगळाच शुष्कपणा आला होता.
रोहितच्या किंवा रागिनिताईंच्या ते अजिबातच लक्षात आले नव्हते. किंवा तिच्या मनस्थितीचा त्यांनी कधी फारसा विचारच केला नव्हता. असेच दिवस जात होते. राधाला आता पाचवा महिना लागला होता. सुदैवाने तिला काहीही त्रास होत नव्हता. ती हळूहळू घरातील सगळीच कामे करायची.
रागिणीताई मात्र घरातील कामांकडे साफ दुर्लक्ष करत. पण घरात कुणी पाहुणा आला की त्यांच्यासमोर मात्र राधाचा खूपच लाड करत. तिला जाग्यावर पाणी आणून देत. सगळेजण रागिनिताईंचे खूप कौतुक करायचे. रागिनिताई सुनेला अगदी मुलीसारखं वागवतात म्हणून.
एकदा रागिणीताई पायऱ्या उतरताना घसरून पडल्या. फारसे काही लागले नव्हते तरीपण पायाचे एक हाड मोडले होते. रागिणीताईंच्या पायाला प्लास्टर लागले होते. रागीणीताई आता अंथरुणावर आल्या होत्या. राधा त्यांची सेवा करत होती. त्यांच्या तिन्ही मुली आपापल्या मुलांसमवेत आईला भेटायला आल्या.
पुन्हा राधाच्या अंगावर घरातील सगळीच कामे पडली. राधा सगळी कामे निमूटपणे करत होती. रात्री सगळ्यांचे जेवण पार पडल्यावर, सगळी आवराआवर करून राधाने सुद्धा तिचे जेवण गरम करायला घेतले. नेमके तेच स्वयंपाकघरात कसल्याश्या कामासाठी आलेल्या तिच्या नणंदेने ते पाहिले आणि लगेच रोहितच्या कानात काहीतरी सांगून आली.
रोहित लगेच किचन मध्ये आला. राधाने नुकतेच ताट वाढून घेतले होते. तिला पाहून तो रागाने म्हणाला.
” काय ग…तिकडे माझी आई आजारी आहे… अंथरूणावर पडून आहे…अन् तू इकडे काहीच न झाल्यासारखी मजेत जेवत आहेस…”
” मलाही आईंची काळजी आहे…आणि जेवणच तर करतेय ना…यात काय जगावेगळं आहे…तुम्ही सुद्धा सगळे जण जेवलातच ना माझ्या आधी…” राधा म्हणाली.
” काहीच न झाल्यासारखी जेवण गरम करून घेत आहेस… ताटात गोड पदार्थ घेतला आहेस…तिकडे माझ्या बहिणी बिचाऱ्या आईजवळ बसून आहेत…तिला बरं वाटावं म्हणून…अन् तू इकडे मजेत जेवत आहेस…माझी आई तुला स्वतःच्या मुलीसारखं समजते…पोटच्या मुलीसारखा जीव लावला तुला…तुझी स्तुती करताना ती अजिबात थकत नाही…आ णि तू पाठीमागे अशी वागतेस माझ्या आईच्या…” रोहित रागाने म्हणाला आणि पाय आपटत तिथून निघून गेला.
क्रमशः
कथेचा अंतिम भाग खाली वाचा
अगं अगं सूनबाई – भाग २(अंतिम भाग)
कथेचा अंतिम भाग खाली वाचा