” काय मग पिंटू… काल मुलगी पाहायला गेला होता असं ऐकलं होतं…ठरलं का काही…?” पारावर बसलेल्या सदा काकाने समोरून येणाऱ्या पिंटू ला विचारले.
” अजुन काही ठरलं नाही…?” पिंटू त्यांना टाळत म्हणाला.
” अरे अजुन किती उशीर करणार आहेस…तुझ्या बरोबरच्या मुलांना दोन दोन मुलं आहेत… अन् तू आपला नुसत्या मुली पाहत आहेस…उरकून टाक लवकर…” सदा काका म्हणाले.
” हो…” एवढे बोलून पिंटू तिथून निघून गेला. मनात मात्र तेच विचार होते. तो साधारण सव्वीस वर्षांचा असताना त्याच्यासाठी वरसंशोधन सुरू केले होते. मात्र तो आज तेहतीस वर्षांचा झाला तरी डोक्यावर अक्षता पडल्या नाहीत.
तसा पिंटू ला नकार द्यावा असं त्याच्यात काहीच नव्हतं. दिसायला चांगला. ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण देखील झालेलं. घरी पंचवीस एकर बागायती शेती. तसे पाहिल्यास त्याचे लग्न जुळणे काही कठीण नव्हते. पण पिंटू घरच्यांच्या खूप लाडाचा.
तीन बहिणींच्या पाठीवर नवसाने झालेला. त्याच्या आईचा तर तो फारच लाडका. तिन्ही बहिणींचे लग्न उरकल्यावर ह्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याची आई प्रत्येक मुलीला पाहून ही आमच्या पिंटुसाठी योग्य नाही म्हणून नकारच द्यायची.
पिंटूच्या आईला वाटायचे की त्यांच्या लाडक्या पिंटूला भरपूर हुंडा मिळावा. भरपूर दागदागिने आणि सामान मिळावं. त्यांच्या होणाऱ्या सूनेकडून खूप अपेक्षा होत्या.
कधी कुणी मुलगी त्यांना रंगाने सावळी वाटायची, तर कुणी मुलगी जास्तच गोरी वाटायची. कुणाची उंची खूप जास्त तर कुणाची खुप कमी वाटायची. हिला तर बाई चष्माच आहे, हीचे डोळे खूप बारीक आहेत. कुणाचं शिक्षण कमी असलं तर ही पिंटू पेक्षा कमी शिकलेली आहे म्हणायची, आणि शिक्षण जास्त असलं तर म्हणायची की ही तर आमच्या पूर्ण घराला शिकवेल. आणि त्यांच्या ह्या सत्वपरीक्षेत एखादी मुलगी पास झाली तर मग तिच्या घरच्यांमध्ये काहीतरी कमी वाटायचे. अशातच तीन चार वर्ष निघून गेली.
इतक्या मुली पाहूनही पिंटू चे लग्न जुळत नाही म्हटल्यावर मग पिंटूच्या आईने थोडे नरमाईचे धोरण अवलंबले. एखादी मुलगी पसंत आली आणि गोष्ट फायनल पर्यंत आली की मग पिंटूच्या बहिणींना त्या मुली मध्ये काहीतरी कमी वाटायची. आणि आणि मग पिंटूच लग्न होता होता राहून जायचं. कधी बहिणींमध्ये एकमत नाही व्हायचं तर कधी जावयांना सोयरिक आवडत नव्हती. तर कधी घरच्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळत नव्हता. आणि ह्यामुळे पिंटूच लग्न काही होत नव्हतं.
त्याच्या बरोबरच्या मुलांची आता लग्ने होऊन त्यांना मुलं पण झाली होती. आणि पिंटूच्या लग्नाचा विषय मात्र कांदेपोह्यांच्या बैठकीच्या पुढे सरकत नव्हता. आताशा गावातील मंडळी त्याला लग्नाच्या बाबतीत चिडवायला लागली होती. आधी गम्मत म्हणून पिंटू विषय बदलून द्यायचा. पण आता मात्र त्याला चिडवणाऱ्यांचा राग यायला लागला होता. पण गावातल्या लोकांसाठी मात्र पिंटूच्या लग्नाचा विषय थट्टेचा बनला होता.
पिंट्याचे आजोबा मात्र त्याला नेहमी म्हणायचे.
” पिंट्या… तुझं लग्न भलेही उशिरा होईल…पण बायको मात्र एक नंबर मिळेल तुला…उशिरा होईल पण चांगलं होईल…तू काळजी करू नकोस…” पिंट्याला मात्र आता आपलं लग्न होणे कठीण वाटत होते.
त्याची लग्नाची आशा आता धूसर होत होती. आणि तेवढ्यातच त्याला सुजाता चे स्थळ आले. सुजाता दिसायला खूप सुंदर. गौर वर्ण, टपोरे डोळे, चाफेकळी नाक, आणि कुरळ केस. पिंट्याला ती पहिल्या नजरेतच आवडली होती. पण घरातील मंडळींना सर्वकाही पसंत पडेल ह्यावर तो साशंक होता.
पण ह्यावेळी मात्र सर्व घरच्यांना सुजाता पसंत पडली. सुजाता च्या घरच्यांनी सुद्धा मनाजोगता हुंडा देऊ केला. आणि एकदाचं पिंट्याच लग्न ठरलं. आणि एकाच महिन्यात पिंट्याच्या लग्नाचा बार उडवण्यात आला.
लग्न करून नवरी घरी आली. मांडव परतणी झाली. सत्यनारायण पूजा देखील झाली. आता नवरा नवरीला देवदर्शनाला पाठवायचे ठरले. घरापासून साठ किलोमीटर दूर त्यांच्या आराध्य देवतेचे मंदीर होते. दोघेही सकाळीच देवदर्शनाला निघाले. गाडीत नवरी पूर्णवेळ शांत होती. पिंट्या तिच्याशी काही बोलायला गेला तरीही ती बोलणे टाळत होती. पूर्णवेळ तिचे लक्ष फोन मध्येच होते. पिंट्याला वाटले लाजत असेल म्हणून तो देखील फारसे काही बोलला नाही.
मंदिरात दोघांनीही देवदर्शन केले. इतक्यात सुजाता पिंट्याला म्हणाली.
” मी लग्न झाल्यावर मंदिराला एकशे एक प्रदक्षिणा घालायच कबूल केले होते. मी प्रदक्षिणा पूर्ण करून येते. तुम्ही पण थोडावेळ विश्रांती घ्या. “
इतक्या वेळानंतर का होईना पण आपली बायको आपल्याशी बोलली ह्याचा पिंट्याला आनंद झाला. तो बाजूलाच जाऊन बसला आणि सुजाता मंदिराला प्रदक्षिणा घालत होती. साधारण वीस प्रदक्षिणा घालून झाल्या असतील. एकविसावी प्रदक्षिणा पूर्ण करायला गेलेली सुजाता परतलीच नाही.
पिंट्याने थोडावेळ वाट पाहिली आणि मग त्याने स्वतः मंदिराच्या आजूबाजूला बघितले. पण सुजाता कुठेच दिसली नाही. आता मात्र पिंट्याला टेन्शन आलं. त्याने सुजाताला खूप शोधले. तिचा फोटो दाखवून आजूबाजूला चौकशी सुद्धा केली. तरीपण सुजाताचा पत्ता लागला नाही.
शेवटी त्याने घरच्यांना फोन लावून सगळा प्रकार सांगितला. घरचे ताबडतोब निघून पिंट्या जवळ पोहचले. सर्वांनी मिळून सुजाता चा शोध घेतला. पण सुजाता भेटली नाही. नेमका काय प्रकार झाला हे कुणालाच कळत नव्हतं. तेवढ्यात पिंट्याच्या फोन वर सुजाताचा मेसेज आला.
“माझं लग्नाच्या आधी एका मुलावर प्रेम होतं. आणि घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केल्याने मला तुमच्याशी लग्न करावे लागले. की त्याच्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून मी त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही एखादी चांगली मुलगी बघून दुसरे लग्न करून घ्या. आणि शक्य असेल तर मला माफ करा…”
बायको चा मेसेज वाचून पिंट्याला धक्काच बसला. घरच्यांना सुद्धा हा प्रकार कळल्यावर धक्का बसला. मोठ्या मुश्किलीने पिंट्याचे लग्न झाले होते. आणि लग्न झाल्यावर बायको पळून गेली. बघता बघता बातमी संपूर्ण गावभर पसरली. जो तो पिंट्याला सहानुभूती देत होता. पिंट्याला मात्र त्याची काहीही चूक नसताना लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. पिंट्या दोन महिने घराच्या बाहेर देखील निघाला नाही..
एके दिवशी अचानक त्याचे मामा घरी आले. आणि त्याच्या वडिलांना म्हणाले.
” दाजी…आमच्या गावात एक मुलगी आहे…गरीब घरची पोर आहे…मागच्या वर्षी लग्न झाले होते…पण सासरच्यांनी तिचा छळ करून महिन्याभरात तिला माहेरी परत पाठवले…मी पोरीला लहानपणी पासून ओळखतो…खूप गुणाची पोर आहे…तुमची काही हरकत नसेल तर आपल्या पिंटू साठी तिचा विचार करूयात का..?”
हे ऐकताच पिंटू ची आई खवळली…
” माझ्या पिंटू साठी अशी दुसरपणी मुलगी नको आहे आम्हाला…माझा नवसाचा पिंटू अशा मुलीशी लग्न नाही करणार…आणि घराणं सुद्धा तोलामोलाच पाहिजे…आमच्या पिंटू साठी पोरींची लाईन लागेल …” आई म्हणाली.
इतक्या वेळ आईचे बोलणे ऐकत असलेला पिंटू म्हणाला…
” आई…आजकाल लग्नासाठी मुली मिळणे तुम्हाला वाटते तितके सोपे नाही…आणि तुम्ही ज्या पद्धतीने मुलींमध्ये उणिवा काढता त्या पाहून कोणतीच मुलगी लग्नाला तयार होणार नाही…मलापण तीन बहिणी आहेत…आणि त्यांना त्यांच्या रंग, रुपावरून हिनवलेले अजिबात चालणार नाही…मग दुसऱ्यांच्या मुलींना आपण का नावे ठेवायची…मुलींना एखाद्या वस्तूप्रमाणे पारखने बंद करा आता…काय फरक पडतो ग आई मुलगी थोडीशी सावली असली तर… मी कुठे इतका जास्त गोरा आहे…आणि थोडफार शिक्षण कमी असलं तरी काही फरक पडत नाही…मी शिकलेला आहे ना मग मी घेईल सांभाळून तिला…कधी कधी तर मुलगी चांगली असली तरीही हंड्यात एखादा लाख कमी देत असले तरीही लग्न मोडून येता तुम्ही…आपल्या घरी देवाच्या कृपेने सर्वकाही आहे…त्या एका लाखाने आपल्या संपत्तीत अशी काय फार मोठी भर पडणार आहे का…किंवा ते एक लाख कुठवर पुरणार आपल्याला…?” पिंटू जीव तोडून बोलत होता.
” अरे पण आपल्यात पद्धतच आहे हुंडा देण्या घेण्याची…आपली मुलाची बाजू असल्यावर हुंडा तर घेणारच ना…” पिंट्याचे बाबा म्हणाले.
” पण मला नकोय ना…मला फक्त एक साधी, सरळ, मला समजून घेणारी बायको हवी आहे…मग ती गोरी असो वा नसो…उंच असो वा नसो…श्रीमंत घरची असो वा नसो…मला काही फरक पडत नाही…” पिंट्या म्हणाला.
” तुझं बरोबर आहे पिंटू… काळ बदलला आहे…आपल्याला आपले विचार सुद्धा बदलावे लागतील…मुलींच्या रंगावरून, उंचीवरून, शिक्षणावरून त्यांना पारख ने योग्य नाही…मला पटत आहेत तुझे विचार…” पिंटूचे बाबा म्हणाले.
” पण फक्त पटत असून काही उपयोग नाही ना बाबा…आपल्याला हे विचार अमलात सुद्धा आणावे लागतील…” पिंटू म्हणाला.
” तुला नेमके म्हणायचे काय आहे..?” बाबा म्हणाले.
” मामांनी सुचवलेल्या मुलीचे स्थळ मला पसंत आहे…तुम्हीसुद्धा ह्या स्थळाला होकार द्यावा अशी माझी इच्छा आहे…” पिंटू म्हणाला.
” तुला पसंत असेल तर आम्हालाही मान्य आहे…हो की नाही पिंट्याची आई…?” बाबांनी आईकडे पाहत विचारले.
आईने होकारार्थी मान हलवली. मामा अन् पिंटू दोघांनाही आनंद झाला. काहीच दिवसात साध्या पद्धतीने पिंटू उर्फ प्रशांत आणि प्रियंका चे लग्न लावण्यात आले. जशी प्रशांतच्या मनात बायकोची छवी होती प्रियंका अगदी तशीच होती. साधी, सरळ आणि समजुतदार.
तिला पाहून पिंट्याला आपल्या आजोबांचे शब्द आठवायचे की ” तुला बायको भलेही उशिरा मिळेल…पण एक नंबर मिळेल…” आणि आजोबांचे शब्द खरे झालेले पाहून पिंट्याला आनंद व्हायचा.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.