राधा मात्र हातातला घास पुन्हा ताटात ठेवून विचार करू लागली. खरं तर तिने काहीच चुकीचं केलेलं नव्हतं. सासूबाई ना काय हवं नको ते बघून, सगळ्यांचा स्वयंपाक करून, सगळ्यांना जेवू घालून, सगळी आवर सावर करूनच जेवायला बसली होती.
या सगळ्या कामाच्या गदारोळात सासुबाई जवळ जाऊन बसायला वेळ मिळाला नव्हता इतकंच. पण ती वारंवार त्यांच्या खोलीत जाऊन काय हवं नको ते विचारत होतीच. जेवण गरम करून खाण्यात रोहित ला काय गैर वाटतंय ते राधाला कळतच नव्हते. पण हल्ली रोहित बरेचदा असा वागत होता. काहींना काही तरी करणे राधाला आवश्यक वाटत होते.
तिने मनात काहीतरी विचार केला आणि जेवण करायला सुरुवात केली. कारण प्रश्न फक्त तिच्या भुकेचा नव्हता तर तिच्या पोटातल्या बाळाचा सुद्धा होता. त्यामुळे मनस्थिती काहीही असली तरी स्वतःची काळजी घेणे तिच्यासाठी क्रमप्राप्त होते.
दुसऱ्या दिवशी नणंदा सुद्धा आरामात उठल्या. बाहेर येऊन पाहतात तर राधा कुठेच दिसत नव्हती. त्यांना चहा आणि नाश्ता हवा होता. त्यांनी राधाच्या खोलीत जाऊन पाहिले तर तिथे सुद्धा राधा नव्हती. म्हणून त्यांनी राधाबद्दल रोहितला विचारले. रोहित सुद्धा नुकताच उठला होता. राधा कुठे आहे हे त्यालाही माहिती नव्हते.
ऐन सकाळी ती दिसत नाही ह्याचा त्याला भयंकर राग आला होता. तो सुद्धा राधा कुठे आहे ते पाहायला लागला. त्याच्या आईच्या रूम मध्ये त्याने जाऊन पाहिलं तर राधा तिथे आईजवळ बसली होती. राधाला आईजवळ बसलेलं पाहून त्याचा राग किंचित शांत झाला.
आज ती सकाळीच उठली आणि तिच्या सासूबाईंजवळ येऊन बसली होती. सासूबाईंशी बोलू लागली होती. बराच वेळ झाला तरी राधा आपल्याजवळच बसलेली आहे हे पाहून सासूबाईंना ही जरा विचित्र वाटले होते. ही इथेच बसून आहे तर घरातील कामे कधी करणार असा प्रश्न त्यांच्या मनात आला. पण नेमकं हे बोलून कसं दाखवाव हे त्यांना कळत नव्हतं.
आता रोहित आला आहे तर तोच तिला घरातील कामे करायला पाठवेल म्हणून त्या निश्चिंत झाला. रोहित तिला पाहून म्हणाला.
” राधा…तू इथे काय करतेयस…? ते ही इतक्या सकाळी…?”
” इथे काय करतेय म्हणजे काय…? आईंची काळजी घ्यायला नको का इथे कुणी…त्यांना एकटं वाटू नये म्हणून आलीय त्यांच्याजवळ…”
हे ऐकून रोहित काहीच न बोलता तिथे उभा राहिला. राधा पुढे म्हणाली.
” काल तुम्ही मला जाणीव करून दिली की आई माझ्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करतात आणि मी सुद्धा त्यांच्या सूनेसारखी नाही तर मुलीसारखी काळजी घ्यायला हवी…पण मी मात्र आईंच्या जवळ बसून न राहता नुसती घरकामात गुंतून बसले होते…पण आता आणखी नाही…आता मी आईंना सोडून कुठेच नाही जाणार…त्यांना काय हवं नको त्याची काळजी घेईन…”
रोहित आता काहीच बोलू शकला नाही. तो कसनुसा हसत तिथून निघून गेला. जाऊन बहिणींना सांगितले की राधा आईजवळ बसलेली आहे म्हणून. आपण इथे आलेलो असताना आपली चहा नाश्त्याची सोय करायची सोडून राधा आईजवळ जाऊन बसलीय ह्याचा एव्हाना त्याच्या बहिणींना रागच आला होता.
पण काहीही न बोलता त्या किचन मध्ये शिरल्या. माहेरी येऊन काम करायची आता त्यांना सवय राहिली नव्हती. त्यामुळे माहेरी आल्यावर अगदी आळसावल्यागत व्हायचं त्यांना. त्यामुळे साध्या चहालाही बराच वेळ लागला त्यांना. त्यांना वाटले होते की निदान आपला चहा होईपर्यंत तरी राधा परत येईल आणि नाश्त्याच्या तयारीला लागेल.
पण आज राधा सासूबाईंच्या खोलीतून बाहेर यायचं नावच घेत नव्हती. शेवटी तिघींनी मिळून कसातरी नाश्ता बनवला. तिघिंचीही मुले एकत्र जमल्याने बराच गोंधळ घालत होती. शिवाय घरात पसारा सुद्धा बराच होत होता. मुलांना आवरून ही मुलांचा दंगा कमी होत नव्हता.
नाश्ता झाल्यावर एक नणंद नाश्त्याची एक प्लेट घेऊन आईच्या खोलीत आली. तिला पाहून राधा म्हणाली.
” ताई…आज माझाही नाश्ता इथेच आणा…म्हणजे आईंना एकटीने नाश्ता करायची गरज नाही…”
ननंदेने जरा रागानेच राधाकडे पाहिले. पण राधाने आज तिच्या पाहण्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी नणंदेने तणतणत च तिला नाश्त्याची प्लेट आणून दिली. सासुबाई सुद्धा राधाचे आजचे विचित्र वागणे बघून हैराण झाल्या होत्या. पण राधा ने सासूबाईंकडे सुद्धा लक्ष दिले नाही. ती आरामात नाश्ता करत होती.
आता मात्र जेवणाची तयारी करायची होती. राधाच्या नणंदा आता जरा जास्तच रागात होत्या. त्या तिघीही एका दमात आईच्या खोलीत गेल्या आणि राधाला म्हणाल्या.
” काय ग राधा…घरी आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार सगळं विसरली आहेस का तू…अगं सकाळी साधा चहा सुद्धा नाहीस दिला तू…आम्हाला चहा नाश्ता स्वतःच बनवून घ्यावा लागला…आणि आता काय जेवण पण बनवणार नाही आहेस का…?”
” हो ना…माझ्या मुली काय आता तू घरात असताना सुद्धा स्वतः कामे करणार आहेत का…?” सासुबाई म्हणाल्या.
” अहो आई असं काय बोलताय तुम्ही…तुमच्या मुली म्हणजे काय…मी पण तुम्हाला मुलीसारखीच आहे ना…तुम्हीच तर नेहमी म्हणता…आणि यावेळेला सगळ्यात जास्त महत्वाचे तुम्हाला बरे वाटणे आहे…आणि त्यासाठीच मी इथे तुमच्याजवळ बसून आहे ना…” राधा म्हणाली.
” तू इथे माझ्याजवळ बसली तर मी काय लवकर ठीक होणार आहे का…? आणि तू इथे बसून राहिलीस तर घरची कामे कोण करणार…? की आता माझ्या मुलींना कामांना जुंपणार आहेस तू…?” सासुबाई म्हणाल्या.
” तसं नाही आई…तुम्हाला असे बघून मला काही सुचत नाहीये…कामांमध्ये मन लागत नाहीये…म्हणून इथे बसलेली आहे…आणि ताई इथे बसल्या तर तुम्हाला बरं वाटतं ना…म्हणूनच मी पण तुमच्याजवळ येऊन बसली आहे…आणि मी रोज स्वयंपाक करतेच ना…आता ताईंनी घरची कामे केली काय किंवा की केली काय…काय फरक पडतो…शेवटी तुम्हाला सगळ्या सारख्याच…” राधा निष्काळजीपणे म्हणाली.
” म्हणजे तू आता माझ्या मुलींसोबत स्पर्धा करणार आहेस का…? तुला सगळ्यांसमोर मुलगी म्हणून काय वागवते तर खरंच माझ्या मुलीची जागा घेणार आहेस का तू…? तू सून आहेस अन् शेवटपर्यंत सूनच राहशील…? तू इथे माझ्या डोक्यावर बसल्यापेक्षा घरची कामे कर…त्यानेच मला जास्त बरं वाटेल…जा अन् जाऊन स्वयंपाक कर…” सासुबाई म्हणाली.
” तुम्ही इथे अशा आजारी असताना आम्हा सगळ्यांना जेवण जाणार का…? मी तर म्हणते राहू दे स्वयंपाक वगैरे…नाहीतरी नाश्ता झाला आहेच ना…मला तर बाई तुम्हाला असं पाहून अजिबात भूक लागणार नाही…” राधा पुन्हा धीटपणे म्हणाली.
” आईला लागलंय म्हणून काय आम्हाला भूक लागणे बंद होणार आहे का…? की आम्ही जेवण करू नये असे तुला वाटतेय…? आम्ही उपाशी राहिल्याने आई काय लवकर बरी होणार आहे का…?” मोठी नणंद म्हणाली.
नणंदेने असे बोलताच राधाने दारात उभ्या असलेल्या रोहित कडे पाहिले. तिने त्याच्याकडे पाहताच तो खजील झाला. आपण काल राधाशी चुकीचं वागलो ह्याचे त्याला आता खूप वाईट वाटले होते. राधा गर्भार असूनही घरातील सगळीच कामे एकहाती सांभाळते आहे. कसलीही तक्रार करत नाहीये. उलट आपण तिला जास्तच राबवून घेतो.
काल सुद्धा आधी सगळ्यांना जेवू घालून नंतरच ती जेवत होती. खरंतर या अवस्थेत सगळ्यात आधी तिने जेवायला हवे होते. पण आईवर आपले किती प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात आपण कधी इतके वाईट वागून गेली त्याचे त्यालाही कळत नव्हते. तो राधा जवळ आला आणि तिला म्हणाला.
” राधा…मला माफ कर…मी मागच्या काही दिवसांपासून तुझ्याशी खूपच वाईट वागतो आहे… काल तर मी कहरच केला…तुझ्या या अवस्थेत ही तुला तुझ्या जेवणावरून बोललो… माझ्याच्याने खरंच चूक झाली…मी असाही वागू शकतो ह्याची मलाच लाज वाटतेय…”
आता मात्र ज्या नणंदेने रोहित च्या कानात येऊन राधाच्या जेवण गरम करण्याबद्दल सांगितले होते ती सुद्धा खजील झाली. राधा रोहितला म्हणाली.
” तुम्हाला तुमची चूक कळली ह्यातच सगळं आलं…तुम्ही माफी नका मागू माझी…फक्त एवढंच लक्षात ठेवा की काहीही झालं तरी घरातील सून मुलीची जागा नाही घेऊ शकत…मुलींसाठी आणि सुनेसाठी वेगळा न्याय असतो… मी सुद्धा मुलींसारखे उशिरा उठून सगळी कामे सोडून आईंजवळ बसून राहिली तर घरातली कामे होणार नाही…
मलाही आईंची काळजी आहे आणि म्हणून अधिक काळजीने घरातील जबाबदाऱ्या सांभाळते आहे…कारण सध्यातरी माझ्या हातात फक्त तेच आहे…आणि अशा परिस्थितीत मी थकते…मला सुद्धा मध्ये आरामाची आणि वेळेवर जेवणाची गरज आहे…कारण ते माझ्या बाळासाठी योग्य आहे…आणि मी सगळ्याच जबाबदाऱ्या योग्य पणे निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय…पण या सगळ्यात तुम्ही कुणीच मला हातभार लावत नाही ह्याचे मात्र मला खूप वाईट वाटतं…या अवस्थेत मला तुमच्या सहकार्याची तुमच्या आधाराची गरज आहे हे कुणालाच जाणवत नाही…”
आता मात्र रोहितसह त्याच्या आईला आणि बहिणीला ही आपल्या वागण्याचे खूप वाईट वाटले. सगळेच आपल्या वागण्यावर खजील होते. सासुबाई राधाला म्हणाल्या.
” मला माफ कर पोरी…लग्नाच्या आधी तुला शब्द दिला होता मुलीसारखं सांभाळेन म्हणून…अन् मुलीसारखं तर सोड साधं घरातल्या एका व्यक्तीप्रमाणे सुद्धा नाही सांभाळलं मी तुला…सतत आमच्यापेक्षा कमी समजलं…तुला जणू इथे काम करण्यासाठी आणलंय अशी वागणूक दिली…खूप चुकलं माझं…”
” आम्हाला पण माफ कर…आमचं सुद्धा खूप चुकलं ग…इथे आलो की आम्ही नुसत्या फरमाईश करायचो…मुलांना तुझ्या भरवशावर सोडून आम्ही मात्र आमच्यात गुंग असायचो…घरी आम्हाला एका मुलाला सांभाळणे कठीण जाते आणि तू मात्र सगळ्या मुलांना एकत्रच सांभाळायचीस…आणि अशावेळी तर आणि कायम तुझ्या मदतीला असायला हवं होतं पण इथे सुद्धा आम्ही आमच्यातच गुंग होतो…” मोठ्या नणंद बाई म्हणाल्या.
” जाऊद्या…तुम्हाला तुमची चूक कळली ना ह्यातच सगळं आलं…माझ्या मनात कोणाबद्दल ही राग नाही…फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी आज अशी वागले…तुम्हाला वाईट वाटले असेल तर खरंच सॉरी…आणि आता येते मी…स्वयंपाक करायचा बाकी आहे अजुन…” राधा हसून म्हणाली.
” नाही राधा…आज तू स्वयंपाक करायचा नाहीस…आज सगळं आम्ही करणार…आणि आम्ही जोवर इथे आहोत तोवर आम्ही तुझ्यासोबत प्रत्येक कामाला हातभार लावू…” छोटी नणंद म्हणाली.
” नाही ताई…खरंच मी करेल सर्व…” राधा म्हणाली.
” करू दे त्यांना…आज आपण सासू सूना छानपैकी बसून गप्पा मारू…आपल्या हातून बरेच आनंदाचे क्षण सुटून गेलेत पण यापुढे त्या क्षणांना होईल तसे जगून घेऊ…आई आणि मुलगी होऊ शकलो नाही तरीही सासू आणि सून म्हणून एकमेकींना समजून घेऊ…एकमेकींचा भक्कम आधार होऊ…” तिच्या सासुबाई म्हणाल्या.
त्यासरशी राधाच्या डोळ्यात पाणी दाटून आले. त्यानंतर दोघी सासुसूना बराच वेळ गोष्टींमध्ये रमल्या होत्या. रोहित आणि त्याच्या बहिणी कृतार्थ डोळ्याने त्यांच्याकडे पाहत होत्या.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.