दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या दिपाला तिच्या सासूबाई सकाळपासून नुसत्या न्याहाळत होत्या. दीपा मात्र सकाळपासून कामात मग्न असल्याने तिचे याकडे फारसे लक्ष नव्हते. शेवटी न राहवून सासूबाईंनी विचारलेच.
” काय ग दीपा… तु घातलेले कानातले सोन्याचे आहेत का?… “
” हो आई…मागच्याच महिन्यात केले होते…” दीपा ने उत्साहाने सांगितले.
” अमोल ने करून दिलेत का…? “सासूबाईंनी विचारले.
” नाही आई…माझी भिशी निघाली न मागच्या महिन्यात त्यातूनच केलेत… ” दीपा ने सांगितले.
त्यावर सासुबाई पुढे काहीच बोलल्या नाहीत. दीपा सुद्धा कामांमध्ये व्यस्त झाल्याने तिने सुद्धा ह्या बाबत जास्त विचार केला नाही. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर दीपा सासूबाईंना जेवायला बोलवायला गेली. ती म्हणाली.
” आई… स्वयंपाक झालाय… बाबा जेवण करून जरा बाहेर गेलेत… अदितीचे सुद्धा जेवण झालंय… अन ह्यांना घरी यायला उशीर होणार असे सांगितले त्यांनी…बहुतेक बाहेरून जेवण करून येणार आहेत…आपण सुद्धा जेवून घेऊयात… “
” मला भूक नाही…” सासूबाई म्हणाल्या.
” काय झालंय आई…? तुम्हाला बरं वाटतं नाहीय का..? ” दीपा ने विचारले.
” एकदा सांगितले ना भूक नाही म्हणून…उगाच माझी काळजी असल्याचे नाटक करू नकोस… तू कर जेवण… ” सासूबाई जरा रागानेच म्हणाल्या.
आता मात्र दिपाला कळून चुकले की सासूबाई नक्कीच रागात आहेत. दुपारपासून त्या आपल्याशी नीट बोलत नाहीयेत हे पण तिच्या लक्षात आले.
दीपा नुकतीच दिवाळी साजरी करण्यासाठी तिच्या गावी असलेल्या सासरी आली होती. नोकरीनिमित्ताने अमोल दीपा आणि आपल्या अडीच वर्षांच्या अदितीसह शहरात राहायचा. गावी त्याचे वडिलोपार्जित घर आणि दोन एकर जमीन होती. जमीन कोरडवाहू असल्याने जमिनीत फारसे उत्पन्न होत नसे.
बऱ्यापैकी पगाराची नोकरी असल्याने तो शहरात राहत होता. गाव आणि शहरांत फारसे अंतर नसल्याने कधी अमोल त्याच्या बायको मुलीसह गावी यायचा तर कधी त्याचे आई बाबा शहरात राहून यायचे. त्याच्या आई बाबांना मात्र शहरात करमत नसे. म्हणून ते जास्तीत जास्त गावीच राहत.
अमोल आणि दीपा सुद्धा प्रत्येक सणाला गावी जात. दीपा आणि तिच्या सासूबाईंनी एकमेकींसोबत जास्त वेळ घालवला नव्हता. त्यामुळे दोघींमध्ये ही म्हणावे तसे नात्याचे बंध तयार झाले नव्हते. त्यातून सासूबाईंना वाटायचे दीपा त्यांच्या मुलाचे पैसे चांगलेच उडवत असेल.
शहरात राहून मज्जा करत असेल. पण प्रत्यक्षात असे काहीच नव्हते. अमोलला बऱ्यापैकी पगार होता पण त्याने नोकरी लागताच गावातील घर बांधायचे म्हणून ऑफिस मधून कर्ज घेतले होते. आणि त्याचेच हफ्ते तो दर महिन्याला फेडायचा. दर महिन्याला खर्चाला मोजकेच पैसे उरल्याने दीपा सुद्धा काटकसरीने संसार करायची.
हळूहळू पगार सुद्धा थोडाफार वाढत होता आणि कर्ज सुद्धा कमी होत होतं. पुढच्या दोन वर्षात गावातील घरासाठी घेतलेले लोन संपणार होते. मागच्या चार वर्षात दीपा ने स्वतःसाठी म्हणून कधीच काही घेतले नव्हते. हा मागच्या वर्षी कॉलनी मधील बायकांनी भिशी टाकली तेव्हा मात्र बायकांच्या आग्रहखातर तिने सुद्धा दर महिन्याला हजार रुपये भिशीत जमा केले होते.
नेमकी दिवाळीच्या आधी तिची भिशी निघाली आणि मोठ्या हौसेने तिने हे चार ग्रामचे कानातले केले होते. पण दिपाला अजून कल्पना नव्हती की सासूबाई ह्या कानातल्यामुळेच नाराज आहेत. काय झालं असेल हे नेमकं तिला कळत नव्हतं.
सासूबाई जेवल्या नाहीत तर तिला तरी जेवण कसे जाणार होते. म्हणून ती पण न जेवता अमोलची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात अमोल घरी आला तेव्हा तिने त्याला सांगितले की सासूबाई आज जेवल्या नाहीत. अमोल तसाच आईच्या खोलीत गेला. आणि त्याने आईला विचारले.
” काय झाले आई…दीपा सांगत होती की तू अजून जेवली नाहीस…काही झाले का आई…? “
” अजून काय व्हायचे बाकी आहे…आयुष्यात हा दिवस सुद्धा पाहावा लागेल हे ठाऊक नव्हते मला… ” सासूबाई म्हणाल्या.
” हा दिवस म्हणजे काय आई…? माझे काही चुकले का…? ” अमोल ने विचारले.
” चुकले का म्हणजे… अरे तुला जन्म दिला… मोठ्या कष्टाने लहानाचा मोठा केला… अन तुला आईची अजिबात जाणीव नाही… बायकोपुढे तुला कोणीच दिसत नाही… ” सासूबाई म्हणाल्या.
” असे नाही आई… तुला असं का वाटतंय… माझं काय चुकलं ते सांग ना… ” अमोल ने पुन्हा विचारले.
” बायकोला दिवाळीला सोन्याचे कानातले करून दिलेस अन आईला साफ विसरलास…” सासूबाई म्हणाल्या.
” नाही आई… मी नाहीत केले… ते तर तिची भिशी निघाली म्हणून तिने केलेत… “अमोल म्हणाला.
” अरे पण भिशी साठी पैसे तर तूच दिले असतील ना… म्हणजे तूच केलेस… ” सासूबाई म्हणाल्या.
आता मात्र अमोल ला आईच्या नाराजीचे कारण कळले होते. आईला कसे समजावून सांगावे ते अमोल ला कळत नव्हते. आई मात्र आता अडून बसली होती की दीपा प्रमाणे आपल्याला सुद्धा सोन्याचं काहीतरी बनवून पाहिजे. शेवटी अमोल आईला म्हणाला.
” आई… माझ्याकडे सध्या दहा हजार जमा असतील… तू उद्या स्वतःसाठी काहीतरी बनवून घे… “
आता मात्र आईला आनंद झाला. ती अमोल ला म्हणाली.
” ठीक आहे मग… उद्या आपण जाऊयात गावातल्या सराफाच्या दुकानात… “
दुसऱ्या दिवशी अमोल आणि सासूबाई सराफा दुकानात जायला निघाल्या. सासूबाईंनी मुद्दामच दीपा ला सुद्धा सोबत यायला सांगितले. जेणेकरून तिलाही कळेल की आपल्या मुलाचे आपल्यावर किती प्रेम आहे ते. मग तिघेही सराफाच्या दुकानात पोहचले.
अमोल चे बजेट दहा हजारांचे होते. मात्र सासूबाईंना तिथे पंचवीस हजारांचे पेण्डेण्ट पसंत पडले. त्यांनी अमोल ला हट्ट केला की त्यांना तेच हवेत. त्याने आईला सांगितले की सध्या काहीतरी स्वस्तातले घे. पुढे पैसे आले की तो आईला असे पेण्डेण्ट घेऊन देईल. पण आई काही समजायला तयार नव्हती. अमोल आपल्याला दीपा समोर नाही म्हणतोय हा त्यांना आपला अपमान वाटला आणि त्या रागारागाने दुकानातून बाहेर पडल्या आणि तडक घराच्या दिशेने निघाल्या. त्यांना आता खूप राग आलेला होता.
थोड्याच वेळात अमोल आणि दीपा दोघेही घरी परतले. सासूबाई अमोल ला काही बोलणार इतक्यात अमोल ने आईच्या हातात एक छोटीशी डबी ठेवली. आईने उघडून बघितले तर त्यात तेच पेण्डेण्ट होते जे त्यांना आवडले होते. ते बघून त्या खूप खुश झाल्या.
आता सासूबाई घरी येणाऱ्या प्रत्येकाला आनंदाने आपले पेण्डेण्ट दाखवायच्या. शेजाऱ्यांना सुद्धा दाखवून झाले होते. एके दिवशी तत्यांची मोठी जाऊ त्यांच्या घरी आली तेव्हा दिपाच्या सासूबाई तिला म्हणाल्या.
” बघितले का ताई… अमोल ने दिवाळीला मला हे पेण्डेण्ट करून दिले…”
” अरे वा… तुझं बरंय बाई…अमोल तुला काहीच कमी पडू देत नाही… ” त्यांच्या जाऊबाई म्हणाल्या.
” हो ना… बायकोला स्वस्तातले कानातले करून दिलेत पण मला हे महागातले पेण्डेण्ट करून दिले… ” सासुबाई म्हणाल्या.
” छानच की… दिपाला काय घेऊन दिलंय अमोल ने… काय ग दीपा… दाखवणार नाही आहेस का…? ” जाऊबाई दिपाला म्हणाल्या.
” तसं नाही काकू… ते मी काढून ठेवून दिले आहेत ना म्हणून… ” दीपा काकूंना टाळत म्हणाली.
” जाऊदे बाई… नसेल दाखवायचे तर राहूदे… ” काकू उपहासाने म्हणाल्या.
दीपा यावर काहीच बोलली नाही. पण दिपाच्या सासूबाईंच्या मात्र हे लक्षात आले की मागच्या दोन चार दिवसांपासून दीपा ने तिचे कानातले घातलेच नाहीत. सासूबाईंची जाऊ निघून गेल्यावर सासूबाईंनी दीपा ला विचारले.
” काय ग दीपा… मी दोन चार दिवसांपासून पाहतेय की तू तुझे कानातले घातलेच नाहीत… कुठे गेलेत कानातले…? “
” आई मी काढून ठेवलेत… ” दीपा म्हणाली.
” काढून तुझ्या माहेरच्यांना नेऊन दिलेस का…? माझ्या मुलाच्या कष्टाची कमाई अशी तुझ्या माहेरी नेऊन दिलेली मला चालणार नाही… आत्ताच्या आता दाखव कानातले कुठे आहेत ते… “
” आई मी खरंच काढून ठेवलेत… नंतर कधीतरी दाखवेन ना… ” दीपा मान खाली घालत म्हणाली.
” ह्याचा अर्थ मला जे वाटतंय तेच खरे आहे… तू नक्कीच तुझ्या फाटक्या माहेरच्यांना नेऊन दिलेस…लग्नात तर तुझी काही हौसमौज केली नाही त्यांनी… ना काही हुंडा दिला… उलट आता माझ्याच मुलाच्या कष्टाच्या कमाईवर डोळा ठेवतायत… लाज सुद्धा नाही वाटत का तुझ्या घरच्यांना…. ” सासूबाई रागाने म्हणाल्या.
दीपा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. पण दारात उभ्या असलेल्या अमोल ने आईचे सगळे बोलणे ऐकले होते. तो आतमध्ये येऊन आईला म्हणाला.
” आई… तू हे काय बोलत आहेस…?”
” बरं झालं तू आलास… तूच बघ बाबा तुझ्या बायकोने काय प्रताप करून ठेवलेत… तू घेऊन दिलेले कानातले तिच्या माहेरच्यांना देऊन आलीय… ” दिपाच्या सासूबाई म्हणाल्या.
” असे नाहीय आई…तू तिला किंवा तिच्या घरच्यांना काहीच बोलू नकोस…तुला काहीच माहिती नाहीय…” अमोल म्हणाला.
” तू बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस… पण मला सगळं दिसतंय… आणि मी हे पटवून घेणार नाही… हिला सांग आताच्या आता ते कानातले घेऊन यायला… ” दिपाच्या सासूबाई म्हणाल्या.
” नाही घेऊन येऊ शकणार आई ती… कारण तिने ते कानातले गहाण ठेवलेत… ” अमोल म्हणाला.
” गहाण…? पण का…? हिला आहि काय गरज पडली पैशांची…? ” सासूबाईंनी आश्चर्याने विचारले.
” त्या दिवशी तुला ते पेण्डेण्ट आवडल्यावर माझ्याकडे ते विकत घेण्या इतके पैसे नव्हते…. म्हणून दीपा ने तिचे कानातले गहाण ठेवून उरलेल्या पैशांची सोय केली… त्यामुळेच मी तुझ्यासाठी ते पेण्डेण्ट विकत आणू शकलो… ” अमोल ने सांगितले.
हे ऐकून मात्र सासूबाईंना धक्काच बसला. त्यांनी कधीच दिपाला समजून घेतले नव्हते. उलट त्यांना वाटायचे की ही अमोल चे पैसे वरचेवर उडवत असेल आणि आपल्यावर खर्च करायला मज्जाव करत असेल. त्यांनी सतत तिला हे बोलून सुद्धा दाखवले होते. आपल्यासाठी दीपा तिचे कानातले गहाण टाकेल हे तर कधीच त्यांच्या ध्यानीमनीही आले नाही. त्या तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाल्या.
” मला माफ कर पोरी… मी नको नको ते बोलले तुला… आणि तू मात्र माझ्या आनंदासाठी स्वतःचा सुद्धा विचार केला नाहीस… मी मात्र खूप स्वार्थी ठरले… एवढं अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र या पिवळ्या सोन्याच्या मोहात पडले होते… मी आजवर एवढं जग पाहिलं तरीपण माणसांची पारख करायला कमी पडले… आजवर मी तुझ्याबाबतीत ज्या चुका केल्यात त्याबद्दल माफ कर मला… “
” आई… तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात… वयाने आणि अनुभवाने सुद्धा…तुम्ही माफी मागू नका…मी तुमच्यात नेहमीच माझ्या आईला बघत आलेय…माझा खरंच तुमच्यावर राग नाही… ” दीपा म्हणाली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपाच्या सासूबाई घरातून बाहेर पडल्या. थोड्या वेळाने त्या घरी आल्या तेव्हा त्यांच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. त्यांनी पिशवी मधून तिचे सोनाराकडे गहाण असलेले तिचे कानातले होते. दिपाच्या सासूबाईंनी त्यांच्याजवळच्या आजवर साठवलेल्या पैशांनी सोडवून आणले होते. हे पाहून दीपाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले आणि नकळतच तिने सासूबाईंना मिठी मारली.
यानंतर दोघी सासू सुनांच्या नात्यातली दरी कायमची मिटली आणि तेव्हापासून सासू सुनेचे नाते आणखीनच घट्ट झाले.
कधीकधी इतरांबद्दल मत बनवायच्या आधी आपल्याला आपल्या आतमध्ये डोकावून पाहणे गरजेचे असते. नाहीतर अस्सल सोन्यासारखी नाती गमवायला वेळ लागणार नाही.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.