आज जे झालं त्यामुळे प्रीती विचलित झाली होती. पंकज असे काही वागेल हे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. आधी त्याने तिची मागितलेली माफी आणि मग त्याची खराब तब्येत. आताच तर प्रीती थोडीफार सावरली होती पण तिचं आयुष्य एकाच दिवसात यु टर्न घ्यायला बघत होतं.
तसा पंकजच्या डोळ्यात पश्चात्ताप तिलाही दिसला होता. पण त्याच्यामुळे तिने जे काही सोसलय ते ती विसरू शकणार नव्हती. त्याच्यामुळे पार्थला बाबांच्या प्रेमापासून दूर राहावं लागलं होतं. इतकं सगळं प्रीती इतक्या लवकर विसरू शकणार नव्हती. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तिने तिच्या आईला आज घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडली. आईने तिला कसेबसे शांत केले.
इकडे वहिनी आणि भावाचे वेगळेच खलबत सुरू होते. प्रितीच्या भावाला नुकतेच कळले होते की त्यांच्या वडिलांनी सर्व संपत्ती तिन्ही भावंडांच्या नावावर समसमान वाटली होती. जेवढा हिस्सा त्यांना मिळणार तेवढंच हिस्सा प्रीतीला सुद्धा मिळणार होता. प्रीतीला आणि तिच्या आईला मात्र ह्यातील काहीच माहिती नव्हते. वहिनीने खूप विचार केला आजी तिला एक कल्पना सुचली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिची वहिनी तिच्याजवळ आली. वहिनीला अशी अचानक समोर बघून प्रीतीला आश्चर्य वाटले. कारण हल्ली बरेच दिवसांपासून वहिनी तिच्याशी आणि ती वहिनी शी एकही शब्द बोलत नव्हती. आणि आज काहीही कारण नसताना वहिनी अचानक स्वतःहून तिच्याशी बोलायला आली होती. प्रीती स्वतःहून काही बोलत नाही हे पाहून वहिनी नेच बोलायला सुरुवात केली.
” कशी आहेस प्रीती..?”
” बरी आहे…” प्रीती म्हणाली.
” काल तू कोर्टात गेली होतीस त्याचं काय झालं…?” वहिनींनी विचारले.
” काही विशेष नाही…कोर्टात पोहचल्यावर पंकज ची तब्येत अचानक बिघडल्याने काल सुनावणी झालीच नाही…” प्रीती म्हणाली.
” तुला सांगते प्रीती…सगळी नाटकं आहेत त्यांची…सुनावणी लांबणीवर टाकण्यासाठी केलं असेल…मी तर म्हणते जेवढ्या लवकर शक्य होईल तुम्ही घटस्फोट घेऊन घ्या…” वहिनी म्हणाली.
” ते पाहू पुढचं पुढे…तुम्ही आज अचानक कशा काय आलात..?” प्रीतीने विचारले.
” मला तुमची काळजी वाटली म्हणून आली आहे…मी खरंच तुमच्याशी खूप वाईट वागले…मला माफ करा…मी पार्थ सोबत असे वागायला नको होते…” वहिनी तोंड पाडत म्हणाली.
वहिनीचे बोलणे ऐकून प्रीतीला नवल वाटले. काल पंकज ने तिची माफी मागितली आणि आज वहिनीने. तिच्या सोबत नेमकं काय घडतंय हे तिला कळत नव्हते. तरीपण वहिनी सोबत वाद घालायची तिची अजिबात इच्छा नव्हती. ती वहिनीला म्हणाली.
” ठीक आहे वहिनी…तुम्हाला तुमची चूक समजली म्हणजे झालं…”
” म्हणजे तुम्ही माझ्या वर नाराज नाही आहात ना…?” वहिनी म्हणाली.
” नाही..” प्रीती म्हणाली.
इतक्यात बाहेर काहीतरी काम करत असलेली प्रितीची आई सुद्धा आत आली होती. सुनेला बघून त्यांना सुद्धा नवल वाटले. कारण काही काम असल्याशिवाय ती ह्यांच्या खोलीत येणे शक्य नाही हे त्या ओळखून होत्या. त्यांनी बाहेरून ह्या दोघींचे बोलणे ऐकले होते. त्यांना पाहून वहिनी म्हणाली.
” आई…प्रीती ताई किती दिवस अशा एकट्या राहतील…त्यांना पण आता सोबतीची गरज आहे…तसे आपण आहोत म्हणा सोबत…पण नवरा तो नवराच असतो..नाही का..?” वहिनी म्हणाली.
” पण वहिनी… आताच तर तू म्हणाली होतीस ना की शक्य तेवढ्या लवकर घटस्फोट घेऊन घ्या म्हणून…आणि आता म्हणतेस की नवरा तो नवरा असतो…तुला नेमके म्हणायचे काय आहे…” आईने विचारले.
” आई…पंकजरावांकडून आपण घटस्फोट घेऊ आणि प्रीती ताई साठी एखादा दुसरा मुलगा शोधू…तसा माझ्या लक्षात एक मुलगा आहे म्हणा…तुम्ही म्हणत असाल तर आपण बोलून बघुयात…” वहिनीने नेमक्या विषयाला हात घातला.
” कोण मुलगा आहे तुझ्या लक्षात..?” आईने विचारले.
” माझा भाऊ आहे ना रघु…त्याच्याशी मी बोलली सुद्धा…त्याला काही हरकत नाही…तो प्रीती सोबत पार्थ ला सुद्धा स्वीकारायला तयार आहे…” वहिनी म्हणाली.
” तू असा विचार तरी कसा केलास…वर्षातून दोनदा तर जेल च्या वाऱ्या करून येतो तुझा भाऊ…दोन बायका सुद्धा पळून गेल्यात त्याच्या…दिवसभर नुसता दारूत असतो…आणि की काय म्हणून माझ्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून देऊ…?” आई रागाने म्हणाली.
आपल्या सासूचे बोलणे ऐकून वहिनीला खूप राग आला होता. पण कसाबसा राग गिळून वहिनीने पुन्हा गोड बोलायला सुरुवात केली.
” असेल तो थोडा वाईट…पण लग्न झालं की सुधारेल तो…आणि आता आपल्या प्रीतीला चांगला मुलगा मिळणे शक्य नाही… तसंही एका मुलाच्या आईला अशीच स्थळं येतात…हा तर त्याचा चांगुलपणा आहे की तो लग्नाला तयार झाला…निदान पार्थ च्या डोक्यावर बापाचे छत्र तरी येईल…” वहिनी म्हणाली.
” माझ्या पार्थ साठी मी एकटी पुरेशी आहे वहिनी… आणि तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका…मी बघेल मला काय करायचं आणि काय नाही ते…” प्रीती रागाने म्हणाली.
प्रितीचे बोलणे ऐकून वहिनी तिथून निघून गेली. वहिनीच्या मनात होते की प्रितीचे लग्न तिच्या भावाशी लावून द्यावे. जेणेकरून प्रितीच्या नावाने जे काही असेल ते त्याला मिळून जाईल. पण प्रीतीने साफ नकार दिल्याने वहिनीचा हिरमोड झाला होता. पण वहिनी इतक्यात तिचे प्रयत्न सोडणार नव्हती. वहिनीने ठरवले होते की ती रघुला काही दिवस घरी बोलावून घेईल. काही ना काहीतरी करून हे लग्न करून द्यायचंय हे वहिनीने ठरवले होते.
इकडे प्रीतीला वहिनीचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले होते. आयुष्यात आधीच दुःख कमी आहेत का जेणेकरून ह्यांनी तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करायला सुद्धा सुरुवात केली. तिच्या मनाचा कधी कुणी विचारच केला नाही. आतमधून ती खचली होती पण स्वतःच्या मुलासाठी जगासमोर खंबीर होऊन उभी होती. तिने सगळे विचार झटकले आणि पुन्हा तिच्या कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
तिची वहिनी मात्र आजकाल तिच्याशी खूप गोड बोलायला लागली होती. पार्थ ला स्वतःहून खाऊ आणून द्यायची. प्रीतीला आणि तिच्या आईला वहिनीच्या चांगले वागण्याचे कारण समजले होते पण अचानक प्रितीचे लग्न तिच्या भावाशी लावायच तिच्या डोक्यात कुठून आलं हे दोघी मायलेकींना कळत नव्हतं. प्रितीच्या बाबांनी तिनही मुलांच्या नावाने संपत्तीचे समान वाटप केले आहेत हे त्या दोघींना अद्याप माहितीच नव्हते.
इकडे पंकज ची तब्येत आता सुधारली होती. पंकजच्या आईने नेहमीप्रमाणे त्याच्या बिघडलेल्या तब्येतीसाठी प्रीतीला जबाबदार धरले होते. आईच्या बोलण्यात पंकज साठीची काळजी कमी आणि प्रीतीबद्दल तिरस्कार जास्त दिसून येत होता. आधीसुद्धा आईच्या बोलण्यातून प्रितिबद्दल तिरस्कार दिसून यायचा पण पंकज च्या तेव्हा काहीच लक्षात आले नाही.
त्याने ठरवले होते की त्याच्या आणि आईच्या हातून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या सुधारायच्या म्हणून. त्याला प्रीती आणि पार्थला ह्या जगातील सर्व सुख द्यायचे होते. त्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हते. त्याला माहिती होते की आईचे मन बदलणे इतके सोपे नाही. पण तो प्रयत्न नक्कीच करणार होता.
एके दिवशी आईनेच स्वतःहून विषय काढला. आई म्हणाली…
” पंकज…तुझ्या घटस्फोटाच प्रकरण आणखी किती दिवस चालणार आहे…लवकर घटस्फोट घेऊन टाक… म्हणजे मी तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधायला मोकळी…”
” बरं झालं आई…तूच विषय काढला ते…मला तुझ्याशी या विषयावर बोलायच होतं पण कसं बोलावं ते कळत नव्हतं…” पंकज म्हणाला.
” काय बोलायचं होतं तुला..” आईने थोडे साशंक होऊन विचारले.
” आई…मी प्रितीपासून घटस्फोट घेणार नाही…मला माझ्या बायकोला आणि मुलाला सन्मानाने आपल्या घरी परत आणायचं आहे…” पंकज म्हणाला.
” तू काय बोलत आहेस तुला कळत आहे का…” पंकज ची आई जवळजवळ किंचाळत म्हणाली.
क्रमशः
एकाच ह्या जन्मी जणू – भाग ५
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.
Comments 1