” तुम्ही…तुम्ही इथे कशाला आलात…?” प्रीतीने विचारले.
” तुला आणि आपल्या मुलाला सोबत घेऊन जायला…” पंकज म्हणाला.
” तुम्हाला काय वाटतं…तुम्ही काहीही बोलाल आणि की तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या बरोबर येईल…?” प्रीतीने विचारले.
” मला माहिती आहे…मी तुझ्याशी ज्याप्रकारे वागलो ते पाहता ती माझ्याशी असेच वागणे अपेक्षित आहे…पण मला खरंच माझ्या चुकांची जाणीव झाली आहे…तू मला एकदा माफ कर…पुन्हा अशी चूक मी कधीच करणार नाही…” पंकज म्हणाला.
” मी सर्वकाही इतक्या सहजा सहजी विसरू शकत नाही…” प्रीती म्हणाली.
इतक्यात प्रितीची आई प्रीतीला शोधत तिथे आली. पंकज ला इतक्या दिवसांनी असे अचानक आलेले बघून तिच्या आईला सुद्धा आश्चर्य वाटले. तिच्या आईने पंकज ला घरी यायला सांगितले. पंकज ने सुद्धा होणार दिला. समोर प्रीती अन् तिची आई अन् त्यांच्या मागे एका हाती बॅग घेतलेला पंकज चालू लागले.
प्रितीच्या वहिनीने दारातूनच या दोघी मायलेकी सोबत पंकजला सुद्धा येताना पाहिले. वहिनीला आश्चर्य वाटले. पंकज इथे कसा काय आला हे वहिनीला कळत नव्हते. वहिनी कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होती. एव्हाना प्रीतीचा भाऊ देखील घरी आला होता. त्यानेही पंकजला पाहिले. आणि समोर येऊन म्हणाला.
” तुम्ही अचानक इथे कसे काय आलात..?”
” प्रीतीला घरी घेऊन जायला आलोय…” पंकज म्हणाला.
” इतकं सगळं झाल्यावर आता कशी काय बुद्धी सुचली तुम्हाला…की तुम्हाला समजलंय की बाबांनी प्रितीच्या नावावर जमीन केली आहे म्हणून आलात..?” प्रितीच्या दादाने विचारले.
” अगदी तसंच ना दादा जसं वहिनीने तिच्या भावाला बोलावलंय ती माझ्याशी लग्न करून माझ्या नावावर असलेली जमीन मिळवायला…” प्रीती म्हणाली.
प्रितीचे बोलणे ऐकून तिचा दादा अवाक् झाला. त्याच्या बायकोच्या मनात हे सर्व चालू आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती. प्रीतीचा भाऊ कसाही असला तरी तो रघुसारख्या मुलाशी प्रितीचे लग्न करून देणार नव्हता. त्याने त्याच्या बायकोकडे पाहिले आणि विचारले…
” प्रीती खरं बोलत आहे का…? तुझ्या मनात असं काही सुरू होतं का..?”
” ते….मी तर प्रितीच्या चांगल्याचाच विचार करत होते…” वहिनी म्हणाली.
” तुला वाटलं तरी कसं की प्रितीचे लग्न ह्या रघुशी होऊ शकते म्हणून…” दादाने विचारले.
” काय झालं माझ्या भावाला…चांगलाच तर आहे…आधी थोडा वाईट संगतीला लागला होता पण आता मात्र सुधार लाय तो…” वहिनी म्हणाली.
” इतकाच सुधारलेला आहे तर मग मघाशी माझ्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न का करत होता तो…” प्रीतीने रागाने विचारले.
पंकज, प्रीतीचा भाऊ आणि प्रितीची आई प्रितीकडे पाहतच राहिले. वहिनी तर घाबरून गप्प बसली. इतक्यात पंकज रघु जवळ गेला सरळ त्याची कॉलर पकडून त्याला प्रितीच्या समोर उभे केले. रघु ने निसटून जाण्याचा प्रयत्न केला पण प्रितीच्या भावाने त्याला अडवून घेतले.
” तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीशी असं वागायची…तिला हात तरी कसा लावलास तू…” असे म्हणून प्रितीच्या भावाने रघुला दोन कानाखाली मारल्या.
” हा तुझा गुन्हेगार आहे प्रीती… ह्याला आता तूच शिक्षा दे…” पंकजने रघुला प्रितीसमोर उभे केले.
” ह्याला तर की मघाशी च अद्दल घडवली आहे…हा भाजलेला हात दिसतोय ना ही त्याचीच शिक्षा आहे…” प्रीती म्हणाली.
एवढ्यात प्रितीच्या भावाने आणि पंकज ने रघुला चांगलाच दम दिला. आणि परत कधीच ह्या घरात दिसता कामा नये म्हणून बजावले. रघु लगेच त्यांच्या घरून निघून गेला. वहिनी मात्र अजूनही घाबरलेलीच होती.
” मला माफ कर प्रीती…हा तुझ्याशी इतकं वाईट वागला आणि मला कळलं सुद्धा नाही…” प्रीतीचा दादा म्हणाला.
त्याला मध्येच थांबवत त्याची आई म्हणाली.
” तो तर परका होता…पण तू तिचा सख्खा भाऊ असून सुद्धा कसा वागलास तिच्याशी ते आठवतंय का..?”
” आई…माझं खरंच चुकलं ग…बाबा गेल्यावर घराचा व्यवहार माझ्या हाती आला आणि त्याच अहंकारात मी सर्वकाही विसरून गेलो… आईचं प्रेम आणि बहिणीची माया विसरून गेलो… इतकंच काय तर माणुसकी सुद्धा विसरून गेलो होतो…” प्रीतीचा भाऊ मान खाली घालून म्हणाला.
” जाऊदे दादा…तुला आता जाणीव झालीय हे महत्त्वाचं आहे…” प्रीती म्हणाली.
” तू इतक्यात माफ नको करू मला…मला शिक्षा दे… मी तुझी जबाबदारी घेतली पण निभावू शकलो नाही… मी असताना सुद्धा माझ्या बहिणीला रानात मजुरीला जावे लागले…तिच्या लहान लेकराला सुद्धा किती अन् काय काय सहन करावे लागले…मी खूप वाईट आहे प्रीती…मी खरंच खूप वाईट आहे…” तिचा भाऊ शरमेने म्हणाला.
” तू कसाही असलास तरी माझा दादा आहेस… मी तुझ्यावर जास्त वेळ नाराज नाही राहू शकत दादा…पण यानंतर कधीच माझ्याशी असा वागू नकोस…माझ्यावर आधीसारखीच माया करत जा…” प्रीती म्हणाली.
प्रितीचे बोलणे ऐकून तिच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले. दोघांनी सुद्धा एकमेकांना मिठी मारली. त्यांना पाहून पंकज आणि प्रितीची आई दोघांनाही भरून आले. इतक्यात आतापर्यंत आतमध्ये झोपून असलेला पार्थ झोपेतून उठला आणि आईच्या नावाने रडू लागला.
प्रीतीने लगेच आत मध्ये जाऊन पार्थला जवळ घेतले. प्रितीच्या आईने पंकज ला आतमध्ये नेऊन बसवले आणि त्यांना पाणी दिले. आणि विचारले…
” पंकज राव…तुम्ही अचानक इकडे येणे कसं काय केलंत…”
” आई… मी प्रीती आणि पार्थ ला घ्यायला आलोय…” पंकज म्हणाला.
” पण आजपर्यंत एकदाही तुम्ही ह्या दोघांची साधी चौकशी सुद्धा केली नाही आणि आज अचानक त्यांना घ्यायला कसे काय आलात…” आईने विचारले.
” आई… माझं खूप चुकलं… मी खूप चुकीचा वागलो प्रीती शी…पण मला माझ्या चुका लक्षात आल्या आहेत…यापुढे मी प्रीतीला कसलाही त्रास होऊ देणार नाही…यापुढे मी तिला खूप सुखी ठेवेन…विश्वास ठेवा माझ्यावर…” पंकज म्हणाला.
” आणि मी जर तुमच्यासोबत यायला नकार दिला तर..?” प्रीती मध्येच म्हणाली.
” पण मी मात्र आता तुम्हा दोघांशिवाय राहणार नाही…मी तुला एकटीला सोडून आधीच खूप मोठी चूक केली आहे…पण यापुढे मी तुला कधीच एकटीला सोडणार नाही…” पंकज म्हणाला.
” पण मला तुमच्यावर विश्वास नाही… मी आणि पार्थ तुमच्यासोबत येणार नाही…” प्रीती म्हणाली.
” जर तू माझ्या सोबत येणार नसशील तर मी सुद्धा इथेच राहीन तुमच्या बरोबर…तुला जोवर माझ्यावर पुन्हा विश्वास बसत नाही तोवर मी तुला स्वतःहून माझ्यासोबत चालायला सांगणार नाही…मग त्यासाठी मला माझे पूर्ण आयुष्य इथेच राहावं लागलं तरी चालेल…” पंकज म्हणाला.
” पण तुमचं घर, तुमची नोकरी, तुमचं कुटुंब सगळं काही तिथे पुण्याला आहे ना…?” प्रीती म्हणाली.
” हो…पण माझं प्रेम इथे आहे…माझी बायको इथे आहे…माझा मुलगा इथे आहे… आणि आजपासून हेच माझं जग आहे…मला कळून चुकलय की माणूस पैशांनी सुखी होत नसतो तर त्याने आयुष्यात जी नाती जोडून ठेवलेली असतात त्यामुळे सुखी होत असतो…आणि मला ह्या नात्यांसोबत आयुष्यभर जगायचंय…” पंकज म्हणाला.
पंकजचे बोलणे ऐकुन प्रीती क्षणभर बोलायची थांबली. इतक्यात पार्थ पंकज जवळ आला आणि दोघेही बाहेरच्या अंगणात खेळायला लागले.
इतक्यात प्रितीची आई तिला म्हणाली…
” मला वाटतं प्रीती की तू एकदा पंकज रावांच्या बोलण्याचा विचार करायला हवा…मला त्यांचा शब्द न शब्द खरा वाटतोय…तू स्वतःला आणि ह्यांना एक दुसरी संधी द्यायला हवी…” आई म्हणाली.
” पण हे माझ्याशी कसे वागले हे माहिती आहे ना आई तुला…तरीही तू असे म्हणतेस…?” प्रीती म्हणाली.
क्रमशः
एकाच ह्या जन्मी जणू भाग – ७
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.