कावेरी लगबगीने सिमाताईंच्या घरी आली. बाहेर चप्पल काढून घाईने आत शिरत होती. इतक्यात सीमा ताई म्हणाल्या…
” अग सावकाश…आज कामांची इतकी घाई कसली आहे…”
” ताईसाहेब…आज आईला बरं नाही…काम आटोपलं की तिला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून घाई करत आहे…” कावेरी म्हणाली.
” बरं बाई… आटोप तुझी कामे आणि मग घेऊन जा तुझ्या आईला दवाखान्यात…” सीमाताई म्हणाल्या.
” व्हय ताई…” असे म्हणत कावेरी पटापट कामे आवरू लागली. तिची कामे जवळपास संपली होती. फक्त किचन ओटा आवरला की ती घरी जायला मोकळी होती. हॉल मध्ये टीव्ही सुरू होता. आणि टीव्ही वरच्या बातम्यांचा आवाज किचन मध्ये स्पष्ट ऐकू येत होता. तसा कावेरीला बातम्या पाहायला वेळच मिळायचा नाही पण काम करताना बातम्या सुरू असल्या की ती थोडीफार ऐकायची. आजसुद्धा ती अशीच काम करताना बातम्या ऐकत होती. इतक्यात टीव्ही वर एक बातमी झळकली.
अकोला जिल्ह्यातील एका लहानशा गावात शिकणारा संकेत पाटील दहावीच्या परीक्षेत राज्यातून दुसरा.
ही बातमी ऐकून कावेरी एकदम स्तब्ध झाली. क्षणभर तिला काहीच सुचले नाही. अतिविचार केल्याने तिला गरगरू लागलं आणि ती मटकन झाली बसली. तिने कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी जुन्या आठवणी यायच्या थांबत नव्हत्या.
तिला तो दिवस स्पष्ट आठवत होता ज्या दिवशी तिचे आणि कैलासचे लग्न झाले होते. ती घरच्यांना काकुळतीने सांगत होती की तिला कैलास अजिबात आवडला नाही आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे नाहीय. तेव्हा तिच्या बाबांनी तिला लग्नाच्या एक दिवस आधी खूप मारले होते. आणि दमदाटी करून तिचे आणि कैलासचे लग्न लावून दिले होते.
कैलास तसा खूप चांगला मुलगा होता. घरी भरपूर शेती होती. आणि आईवडिलांना दोन मुलीनंतर झालेला एकुलता एक मुलगा होता. चांगल्या संस्कारात वाढलेला, होतकरू, सर्वांना मदत करणारा आणि निर्व्यसनी.
फक्त दिसायला बराच साधारण होता. बारीक शरीरयष्टी आणि सावळा रंग ह्यामुळे त्याचे चांगले गुण समोरच्याला दिसायचेच नाहीत. आणि कावेरी ला सुद्धा तो म्हणूनच नापसंत होता. गोऱ्यापान रंगाची, टपोऱ्या डोळ्यांची कावेरी रुपगर्विता होती. तिच्या होणाऱ्या नवर्याबद्दल तिच्या काही अपेक्षा होत्या. आणि सर्वात मोठी अपेक्षा म्हणजे तो दिसायला देखणा असावा.
तिच्यासाठी कैलासचे स्थळ आले तेव्हा तिने घरच्यांना स्पष्ट नकार दिला होता. पण तिच्या नकारला तिच्या घरच्यांनी जुमानले नाही आणि तिचे आणि कैलासचे लग्न लावून दिले.
सतरा वर्षांची कावेरी लग्न करून कैलास च्या घरी आली. तिच्या बाबांच्या भीतीने तिने लग्न तर केले पण कैलास ला ती मनापासून स्वीकारू शकली नव्हती. तिला त्या घरात राहायचे नव्हते पण तिचा नाईलाज होता. आणि नाईलाजाने का होईना तिला कैलास शी जुळवून घ्यावे लागले होते.
त्यानंतर वर्षभराच्या आत त्यांच्या घरात पाळणा हलला. कावेरी ने मुलाला जन्म दिला आणि कैलास ने लाडाने त्याचे नाव संकेत ठेवले. संकेत जसजसा मोठा होत होता तसतशी कावेरीची चिडचिड वाढत होती. आधीच कमी वयातलं बाळंतपण, एवढ्या मोठ्या घरातील कामे आणि इतक्या लहान वयात आलेली मुलाची जबाबदारी यामुळे तिची चिडचिड होत होती. आणि ती याचा सगळा राग कैलास आणि तिच्या मुलावर काढायची.
त्यानंतर संकेत तीन वर्षांचा पूर्ण व्हायच्या आधीच तिला दुसरी मुलगी झाली. पुन्हा जबाबदारी वाढली होती. ती मनातून कुढत होती. तिच्या सगळ्या दुःखाचं कारण ती कैलास लाच समजायची. तिला वाटायचे की त्याचे स्थळाच तिच्यासाठी आले नसते तर तिला असा सुंदर नसलेला नवरा मिळालाच नसता. तिने अजूनही मनापासून कैलास ला नवरा म्हणून स्वीकारलेच नव्हते. तिला सतत वाटायचे की आपल्या दुःखाचे कारण फक्त कैलासच आहे.
त्यामध्ये आणखी भर म्हणजे हे दोघे जेव्हा पण कुठे बाहेर जायचे तेव्हा लोक नेहमी त्यांची तुलना करत. कैलास ने काय नशीब काढलं म्हणून त्याला इतकी सुंदर बायको मिळाली असे म्हणत. लोकांचे असे बोलणे म्हणजे तिला तिचा अपमान वाटायचा. अशीच सहा वर्षे निघून गेली.
असेच एकदा त्यांच्या घरी कैलासचा एक बालमित्र अजय आला. अंगाने धिप्पाड, गोऱ्या रंगाचा आणि कुरळ्या केसांचा अजय दिसायला देखणा होता. आधी तो पुण्याला काम करायचा पण आता तो पुण्यातील काम सोडून गावी राहायला आला होता. त्याला दारूचे व्यसन होते. म्हणून कोणत्याच नोकरीवर तो व्यवस्थित काम करू शकत नव्हता. त्याला वारंवार नोकरी बदलावी लागत असे. म्हणून तो कंटाळून शेवटी घरी निघून आला.
घरच्यांना त्याचे लग्न करायचे होते पण त्याच्याबद्दल माहिती काढली की त्याच्या दारूच्या सवयी लोकांना माहिती पडायच्या. आणि अशाने त्याचे लग्न सुद्धा जुळत नव्हते. पण कैलासचा चांगला स्वभाव असल्याने त्याने अजयला मित्र म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला.
अजय सुद्धा त्याला सांगायचा की यापुढे मी दारूला हात लावणार नाही. अजय आपले ऐकतोय म्हणून कैलास ला खूप आनंद झाला होता. अजय आता अधूनमधून घरी यायला लागला होता. त्याने कावेरी ला पाहिले तेव्हाच त्याला कावेरी खूप आवडली होती. दिसायला सुंदर असणाऱ्या कावेरी ला कैलास तितकासा आवडत नाही ही गोष्ट त्याने हेरली होती.
तो हळूहळू कावेरीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला होता. तो कावेरी च्या मुलांशी खेळायचा. त्यांना चॉकलेट्स द्यायचा. हळूहळू तो आता कावेरीशी सुद्धा बोलायला लागला होता. तो कावेरी च्या सौंदर्याची स्तुती करू लागला होता. कावेरी ला सुद्धा त्याची स्तुती करणे खूप आवडायला लागले होते.
कैलासला कधी असे वागणे जमलेच नव्हते. हळूहळू ती सुद्धा त्याच्याशी तिच्या मनातले दुःख सांगायला लागली होती. त्याने ह्याच गोष्टीचा फायदा घेतला आणि तिच्याशी गोड गोड बोलून तिला भुलवले होते. त्या दोघांमधली जवळीक कावेरीच्या सासूला लक्षात येत होती. त्यांनी अजय च्या घरी येण्यावर आक्षेप घेतला.
कैलासचा मात्र कावेरीवर खूप विश्वास होता. म्हणून त्याने आईचे बोलणे फार मनावर घेतले नाही. पण तेव्हापासून अजय आणि कावेरी मात्र थोडे सावध झाले आणि अजयचे कावेरीच्या घरी येणे कमी झाले. कावेरी ला मात्र अजय शी बोलायची सवय झाली होती. म्हणून आता दोघांच्या फोन वर गप्पा सुरू झाल्या होत्या.
कावेरीला आता अजयशी लग्न करायचे होते. कित्येक दिवस फक्त मनात असलेली एका देखण्या नवऱ्याची स्वप्ने तिला खरी करायची होती. ती अजयला आता लग्न करण्याबद्दल विचारू लागली होती. पण अजयला तिच्याशी लग्न करण्यात फारसा रस नव्हता. पण एके दिवशी एका सणाला तिला सजलेलं पाहून त्याच्या मनात वेगळीच कल्पना आली. तिने तिच्या अंगावर घातलेलं सोनं पाहून त्याची नियत बदलली.
क्रमशः
काय भुललीस वरलीया रंगा – भाग ३ (अंतिम भाग)