सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत असतानाच अरूणचा फोन वाजला. त्याने घाईतच फोन रिसिव्ह केला आणि हॅलो म्हटले. त्यानंतर त्याने समोरून हे म्हटले ते ऐकून अरुण जोरात म्हणाला.
” काय…?”
समोरचा व्यक्ती जे काही म्हणाला त्यानंतर अरूणचा चेहरा गंभीर बनत गेला. अबोलीने त्याचा आवाज ऐकला आणि त्याला विचारले.
” अहो काय झालंय…कुणाचा फोन होता…तुम्ही असे अचानकच सिरीयस का झालात…?”
त्यानंतर क्षणभर थांबून अरुण म्हणाला.
” अगं…प्रशांतच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय…?”
” काय…?” अबोली जवळजवळ ओरडलीच.
” हो…” अरुण म्हणाला.
” आता कसे आहेत ते…?” अबोलीने विचारले.
” प्रशांतला फार काही लागलं नाहीये पण प्रीतीला जरा जास्त लागलंय…?” अरुण म्हणाला.
प्रीतीचे नाव ऐकताच अबोलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. अबोली एकदमच गप्प बसली. ते पाहून अरुण म्हणाला.
” चल…आपल्याला जायला हवं…”
” तुम्ही जा आणि मला फोनवर तिची तब्येत कशी आहे ते कळवा…” अबोली म्हणाली.
” अगं अशी काय बोलतेयस तू…तू सध्या तिच्याजवळ असायला हवं…ती तुझी बहिण आहे…” अरुण म्हणाला.
” पण सख्खी नाही…” अबोली कोरडेपणाने म्हणाली.
” ह्या गोष्टींची वेळ आहे का ही…तू चल आत्ताच माझ्यासोबत…”
” अहो पण तिने जे केलंय त्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटतंय का मी तिच्याजवळ जायला हवं म्हणून…? तुमचं मन मोठं आहे म्हणून तुम्ही सगळं विसरलात…पण मी अजूनही विसरलेली नाही आहे…” अबोली म्हणाली.
” मला आता वाद घालायची अजिबात इच्छा नाहीये…तू चल आताच माझ्यासोबत…” अरुण म्हणाला.
त्यानंतर मात्र अबोली काहीही न बोलता त्याच्यासोबत निघाली. पण डोक्यात मात्र विचारांनी थैमान घातले होते. तिला भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी स्पष्टपणे आठवत होत्या.
अबोली आणि प्रीती दोघीही सख्ख्या चुलत बहिणी होत्या. पण दोघी बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त वाटायच्या. कारण दोघीही लहानपणीपासूनच सोबत शिकल्या होत्या. दोघींची घट्ट मैत्री होती. अगदी एकमेकीं वाचून पान सुद्धा हलायच नाही दोघींचं. ग्रज्युएशन झालं आणि दोघींच्याही घरी दोघींच्या लग्नाची बोलणी व्हायला लागली.
आणि पाहता पाहता अबोलीचे लग्न अरुणशी ठरले. चांगल्या नोकरीवर असणारा अरुण दिसायलाही खूप छान होता. शिवाय आई वडिलांचा एकुलता एक आणि ह्याच शहरत वास्तव्याला होता. अबोलीच्या आई वडिलांना हे स्थळ अगदी समर्पक वाटले होते. दोघीही बहिणींना आपण आता दुरावणार ह्याचे वाईट वाटत होते पण निदान एकाच शहरात असल्याने कधीही जाऊन भेट होणार ह्याचा आनंद होताच.
अबोली आणि अरुणचे लग्न झाले आणि दोघांचा ही सुखाचा संसार सुरू झाला. अरुण च्या घरी फक्त त्याची आई आणि अरुण एवढे दोघेच होते पण अबोलीच्या येण्याने घराचे गोकुळ झाले होते. अरुणची आई खूपच आनंदात होती. अबोली ने सुद्धा सासूला आई मानून घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू स्वतःवर घेतल्या होत्या.
ह्या सासू सुनेच्या जोडीचे सगळ्यांना नवल वाटावे इतपत त्यांचं एकमेकींशी पटायचं. सगळ्या नातेवाईकांना सुद्धा खूप आश्चर्य वाटायचं ह्यांना पाहून. असेच एका कार्यक्रमात अबोलीच्या घरी प्रीती आलेली होती. अबोलीच्या मावस सासूला ती खूप आवडली. शिवाय अबोलीची चुलतबहीण म्हटल्यावर काही प्रश्नच नव्हता. त्यांनी स्वतःहून प्रशांत साठी प्रितीचे स्थळ मागितले.
प्रशांत सुद्धा चांगला शिकलेला आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. फक्त दिसायला जरा सावळा होता. पण प्रीतीला आणि तिच्या घरच्यांना तो मनापासून आवडला होता. शिवाय त्याचे घर अबोली आणि अरुणच्या घरापासून थोड्याच अंतरावर होते. सगळ्यांची पसंती जाणून घेऊन प्रीती आणि प्रशांतचे लग्न ठरले आणि थाटामाटात पार सुद्धा पडले.
दोघांच्याही घरच्यांचे एकमेकांशी वरचेवर बोलणे, भेटणे व्हायचे. दोघीही फोनवर सुद्धा एकमेकींच्या संपर्कात राहायच्या. अलीकडेच अबोलीच्या भावाच सुद्धा लग्न झालं होतं. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण ह्या सगळ्याला एक दिवस दृष्ट लागलीच. प्रीती आणि प्रशांतने अरुणला एका मुलीसोबत हॉटेल मध्ये डिनर करताना पाहिले होते.
पण चांगली मैत्री किंवा एखादी बिझनेस मीटिंग असेल म्हणून दोघांनीही दुर्लक्ष केले. पण सातत्याने दोन तीनदा त्यांनी दोघांना बाहेर सोबत पाहिले होते. आधीच लहान शहर आणि त्यातच या दोघांचेही सोबत फिरणे यामुळे बऱ्याच लोकांना या विषयी संशय येत होता. शिवाय प्रीती तर अबोलीची बहीण होती. सगळं पाहूनही न पाहिल्यासारखं करणं प्रीतीला शक्य नव्हतं.
पण तरीही कोणत्याही सबळ पुराव्या शिवाय अबोली जवळ विषय कसा काढायचा म्हणून प्रीती गप्प होती. पण अधूनमधून तिला विचारायची की अरुणची कुण्या मुलीसोबत मीटिंग होती का म्हणून. अबोलीला तिचे बोलणे आता विचित्र वाटायला लागले होते. पण ती प्रीतीला काही म्हणाली नाही.
तिने अरुण जवळ विषय काढला. प्रीती काय आणि कसे म्हणाली ते सविस्तर सांगितले आणि आपल्याला प्रितीच्या म्हणण्याचा नेमका अर्थ कळत नाहीये हे सुद्धा सांगितले. अबोलीला काही कळले नसले तरीही अरुणला मात्र सगळे व्यवस्थित कळले होते प्रीतीला नेमके काय म्हणायचे आहे ते. तो अबोलीला म्हणाला.
” अबोली…एक सांगू का…?”
” सांगा ना…” अबोली म्हणाली.
” मला वाटतं तुझी बहीण प्रीती आपल्या दोघांमध्ये भांडणं लावायच्या विचारात आहे…” अरुण म्हणाला.
” अहो…असे काय म्हणताय…?” अबोलीने आश्चर्याने विचारले.
” म्हणजे बघ ना…तुझ्या मनात विनाकारणच माझ्याबद्दल नको ते विचार यावेत…तुझ्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण व्हावा म्हणून तुला माझ्याबद्दल खोटं सांगतेय…” अरुण म्हणाला.
” अहो असे का बोलताय तुम्ही…ती बहीण आहे माझी…तिला माझी काळजी वाटते म्हणूनच ती मला सांगायचा प्रयत्न करत असेल ना…कदाचित तिचा गैरसमज झाला असेल…ती आपल्या दोघात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न का करेल…?” अबोलीने आपले मत मांडले.
” तूच विचार करून बघ…तू तिच्यापेक्षा प्रत्येक बाबतीत सरस आहेस…तुला नेहमीच तिच्यापेक्षा उत्तम गोष्ट मिळाली आहे…म्हणून तिच्या मनात कुठेतरी राहिली असेल ती सल…म्हणूनच ती अशी वागत असेल…म्हणजे मी म्हणतोय असे काही नसेल ही कदाचित…पण माझ्या मनात आलं म्हणून तुला बोलून बसलो…तू काही जास्त सीरियसली घेऊ नकोस माझं बोलणं…” अरुण म्हणाला.
यावर अबोली काहीच बोलली नाही. शेवटी असे काही नसेल म्हणून अबोलीने त्याला समजावले आणि आपल्या मनातील विचार झटकून दिले. पण अरुणने संशयाचा किडा तिच्या डोक्यात सोडला होता. आज नाही तर उद्या तो त्यांच्यातील नात्याला पोखरणार होताच.
शिवाय प्रीती तिची बहीण असली तरीही अरुण तिचा नवरा होता. त्याच्यावर तिचं खूप प्रेम होतं. आपला सुखात चाललेला संसार उद्धवस्त व्हायची अनामिक भीतीही होतीच. प्रीती आणि अरुण दोघेही विरुद्ध बाजूने बोलत होते आणि अबोलीला ह्या दोघांपैकी फक्त एकावर विश्वास ठेवावा लागणार होता. आणि साहजिकच अरुणचे पारडे जड होते.
असेच काही दिवस आरामात निघून गेले. त्यानंतर प्रीतीने अबोली जवळ हा विषय कधीच काढला नाही. पण एके दिवशी अचानकच प्रीती घाईतच आली आणि तिला म्हणाली.
” अबोली… जिजू कुठे आहेत ते माहिती आहे का तुला…?”
” हा काय प्रश्न झाला का प्रीती…म्हणजेच काय…मला नाही माहिती असणार तर कुणाला माहिती असणार…” अबोली मस्करीच्या मूड मध्ये म्हणाली होती.
” तू सांगणार आहेस का…?” प्रीती गंभीरतेने म्हणाली.
प्रीतीचा गंभीर स्वर ऐकून अबोलीला सुद्धा ती मस्करी च्या मूड मध्ये नाहीये ते कळले होते म्हणून ती म्हणाली.
” अगं…दोन दिवसांपासून मुंबईला गेलेत…तिथे त्यांची काहीतरी महत्त्वाची कॉन्फरन्स आहेत असे म्हणत होते…” अबोली म्हणाली.
” पण मी त्यांना शहराबाहेरच्या एका फार्महाऊस कम रेस्टॉरंट मध्ये पाहिलंय…आमच्या किट्टीच्या ग्रुपचा तिथे गेट टुगेदर होता म्हणून आम्ही तिथे गेलो होतो…तेव्हा मी तिथे जिजूंना पाहिले…”
” काहीतरीच काय…माझं अर्ध्या तासा आधी बोलणं झालंय त्यांच्याशी…ते मुंबईलाच आहेत…तू कुण्यातरी दुसऱ्या माणसाला पाहिलं असशील…” अबोली बेफिकिरीने म्हणाली.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकर.