कोर्टाच्या तारखेला दोन दिवस बाकी असताना प्रीती अबोलीला भेटायला गेली. तिला पाहून अबोली म्हणाली.
” हे बघ…तू मला समजावण्यासाठी आली असशील तर मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये…”
” नाही ग… मी तुला समजावून सांगण्यासाठी वगैरे आलेली नाहीये…उलट मी तर तुझी माफी मागायला आली आहे…” प्रीती म्हणाली.
” माफी…? ती कशाबद्दल…?” अबोलीने आश्चर्याने विचारले.
” मी तुला जिजुंच्या अफेअर बद्दल आधी सांगितले नाही त्यासाठी…मी जर सगळं काही आधीच सांगितलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टींना एवढा वेळ लागला नसता…एव्हाना तुझा घटस्फोट होऊन तुझं दुसरं लग्न झालं ही असतं आणि तुझा दुसरा संसार सुद्धा सुरू झाला असता…” प्रीती म्हणाली.
” दुसरं लग्न…? अगं काय बोलतेस तू…?” अबोली एकदम ओरडलीच.
” तेच जे खरं आहे…नाहीतरी परवा घ’टस्फो’ट झाल्यावर तुझ्यासाठी मुलगा शोधावाच लागणार आहे ना दुसऱ्या लग्नासाठी…त्यातच दोन चार महिने लागतील…आणि तू विचारी जुन्या आठवणींमध्ये अडकून बसशील तोवर…म्हणून जितक्या लवकर तू नवीन आयुष्याची सुरुवात करशील तितकंच चांगलं आहे…” प्रीती अगदी सहजपणे बोलत होती.
” अगं तू काय बोलत आहेस तुझं तुला तरी कळतंय का…? कालपर्यंत जीजुंना एक संधी दे म्हणून माझ्या मागे लागणारी तू आज चक्क माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलत आहेस…” प्रितीच्या अशा बोलण्याची अजिबात अपेक्षा नसल्याने अबोली काहीशी भांबावून तिला म्हणाली.
” हो…कारण आज नाहीतर उद्या ते करावं च लागणार आहे ना….” प्रीती म्हणाली.
” मला आता दुसरं लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही…मी आयुष्यात कधीच दुसरं लग्न करणार नाही…” अबोली म्हणाली.
” अगं हे फक्त बोलण्यापुरतं चांगलं वाटतं…पण तू एकट्याने कशी राहणार आहेस आयुष्यभर…तुला आठवत नसेल पण जीजुंसोबत लग्न व्हायच्या आधी सुद्धा तू तुझ्या आईला म्हणायचीस की मला तुला सोडून कुठेच जायचं नाही…मी लग्न करणार नाही…पण करावं लागलंच ना… तसच एकदा तुझा घटस्फोट झाला की तुला फार दिवस घरचे लग्न केल्याशिवाय ठेवणार नाहीत…अगं जगाची रीतच आहे ती…एकट्या माणसाने जगणं खुप कठीण आहे ग बाई…” प्रीती म्हणाली.
” अगं तू अशी का बोलते आहेस…माझ्या घरचे मला नाही करणार दुसऱ्या लग्नाची जबरदस्ती…” अबोली विचार करत म्हणाली.
” असेही होऊ शकेल कदाचित…पण पुढे चालून तुला सुद्धा एकटं वाटायला लागेल…तुझ्या भावाच्या संसारात कदाचित त्यांना तुझी अडचण व्हायला लागेल…आई वडिलांना सतत तुझ्या एकटेपणाची काळजी वाटत राहील…त्यापेक्षा दुसऱ्या लग्नाचा विचार आतापासूनच केलेला बरा…शिवाय पहिल्यांदा वाईट, व्यभिचारी, खोटारडा, बाहेरख्याली नवरा भेटला म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा तसाच मिळेल असे नाही ना…”
अरुण बद्दल प्रितीच्या तोंडून हे शब्द ऐकून अबोली चिडली. ती मोठ्या आवाजात म्हणाली.
” अगं काय बोलतेयस तू…त्यांच्याबद्दल असे शब्द का काढत आहेस…?”
” मग तुझी काय अपेक्षा आहे… त्यांना चांगलं म्हणू का…?” प्रीतीने खोचकपणे विचारले.
आता मात्र अबोली जरा शांत झाली. काय बोलावं आणि काय नको ते तिला कळत नव्हतं. तेव्हा प्रीती पुढे म्हणाली.
” हे बघ…आता त्यांच्याबद्दल विचार करू नकोस…स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार कर…नवीन आयुष्याची सुरुवात कशी करायची त्याचा विचार कर…तसे पाहता त्यांनी सुद्धा आता हार मानली आहे आणि नाईलाजाने का होईना स्वतःच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत…त्यामुळे आता त्यांचं ते बघतील आणि आपण आपलं… तसं ही दोन दिवसानंतर सगळं काही व्यवस्थित होईलच…”
” अगं तू काय बोलत आहेस…? मला काहीच कळत नाहीये…नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत म्हणजे काय करणार आहेत…?” अबोलीने अस्वस्थपणे विचारले.
” अगं म्हणजे त्यांनी ऑफिसमध्ये बदलीसाठी अर्ज केलाय…आणि बहुतेक त्यांचा अर्ज स्वीकार सुद्धा झालाय…ते लवकरच त्यांच्या आईसोबत बेंगलोर ला शिफ्ट होणार आहेत…”
” काय…?” अबोली जवळ जवळ किंचाळलीच.
” अगं इतकी काय ओरडत आहेस…आपल्याला काय करायचंय आता…इथे राहोत की बेंगलोरला…फक्त परवा येऊन घटस्फोटाच्या कागदावर सही करा आणि मग तुम्हाला वाटेल तिथे जा म्हणावं…” प्रीती म्हणाली.
” अगं पण इतक्या लवकर ते सगळं विसरून, सगळं काही सोडून कसे जाऊ शकतात…त्यांना काहीच वाटत नसेल का…? इतक्या लवकर नवीन सुरुवात कशी करू शकतात ते…” अबोली नैराश्याने स्वतःशीच म्हणाली.
” ते तर नाहीच म्हणत होते…म्हणत होते की शेवटपर्यंत अबोलीचं मन वळवायचा प्रयत्न करणार म्हणून…?” प्रीती म्हणाली.
” मग…मग काय झालं…?” अबोलीने आतुरतेने विचारले.
” त्यांच्या आईने त्यांना समजावून सांगितलं की अबोली चा निर्णय झालाय आणि तू काहीही केलं तरी ती तुझं ऐकणार नाही आणि आपल्या घरी परत येणार नाही म्हणून….तरीही त्यांनी ऐकलं नाही म्हणून मग त्यांनी कडक शब्दात बजावले त्यांना…म्हणाल्या की झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करायची…हे असं उदास पणे घरात बसून राहायचं नाही…या घरात अबोली च्या आठवणी कायमच तुला छळत राहतील…आपण इथून दूर कुठे तरी जाऊ…तिथे राहून नवी सुरुवात करू म्हणून…” प्रीती म्हणाली.
” आणि त्यांनी ऐकले सुध्दा…?” अबोली पुन्हा एकदा स्वतःशीच म्हणाली. पण प्रीतीने ते ऐकले आणि ती पुढे म्हणाली.
” ऐकणार नाही तर काय करणार…तुला तर त्यांनी गमावलेच आहे पण आईला तरी नाराज करायला नको म्हणून तयार झालेत…प्रशांत तर सांगत होते की तिथे बेंगलोरला शिफ्ट झाल्यावर त्यांची आई त्यांच्या लग्नासाठी स्थळं सुद्धा पाहणार आहे म्हणून…”
” नाही…असे नाही होऊ शकत…” अबोली मोठ्याने म्हणाली.
” का नाही होऊ शकत…शेवटी आयुष्य काय एकट्याने काढणार आहेत का ते…शिवाय आईचं ऐकावंच लागणार ना त्यांना…” प्रीती म्हणाली तशी अबोली विचार करत सोफ्यावर बसली. तिला असे विचारात हरवलेले पाहून प्रीती पुढे म्हणाली. ” जाऊदे…आपण कशाला बोलतोय त्यांच्याबद्दल…त्यांनी तिथे जाऊन काहीही करो…पण आपल्या आयुष्यातून असा वाईट माणूस निघून जाईल ह्याचा आनंद आहे…” प्रीती म्हणाली.
आता मात्र अबोली एकदमच अबोल झाली. प्रीतीशी बोलायची सुद्धा तिची ईच्छा होत नव्हती. थोडा वेळ थांबून प्रीती तिथून निघून गेली. अबोली च्या मनात मात्र सारखे सारखे अरुणचे विचार येत होते. त्यांनी एकत्र घालवलेले सुखाचे, प्रेमाचे, आनंदाचे क्षण तिला राहून राहून आठवत होते. अरुण आजवर तिच्या मागे लागून तिला समजावत असल्यामुळे तिचा इगो कुरवाळल्या जात होता. पण अरुण आता नवीन सुरुवात करणार हे ऐकून तिला हळूहळू का होईना वास्तवाची जाणीव होत होती.
दोन दिवस तर तिला अगदी काहीच सुचत नव्हतं. जेवण सुद्धा नीट जात नव्हतं. बघता बघता घ’टस्फो’टाचा दिवस आला देखील. ती अस्वस्थपणे नुसती घड्याळाकडे बघत होती. अगदी वेळेच्या आधीच तयार झाली ती. घरच्यांनी आधी तिला बरेच समजावून सांगितले होते पण ही काही ऐकत नव्हती म्हणून मग त्यांनी सांगणे सोडून दिले होते. कोर्टात जाताना कोणीच तिच्याशी काही बोललं नाही.
आज तिला मनापासून वाटत होतं की कुणीतरी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. पण आज मात्र कुणीच ह्या विषयावर काहीच बोललं नाही. तिचे बाबा आणि भाऊ दोघेही तिच्या सोबत होते. अरुण आधीच तिथे हजर होता. त्याला पाहून अबोली मनातल्या मनात म्हणाली. ” खूप घाई आहे वाटतं ह्यांना घटस्फोट घेऊन नवीन सुरुवात करायची.”
अबोली एका बेंचवर बसलेली होती. तिचे बाबा जवळच उभे होते. त्यांना पाहून अरुण त्यांच्याजवळ गेला. आणि त्यांना म्हणाला.
” बाबा…”
पुढे तो जागीच बोलू शकत नव्हता. तेव्हा अबोलीचे बाबाच त्यांना म्हणाले.
” बोला ना अरुणराव…”
आता मात्र अरुण त्यांना म्हणाला.
” आज बहुधा शेवटचं भेटतोय आपण…मला माहिती आहे माझ्याकडून चूक झालीय…आणि त्याची शिक्षा सुद्धा मी भोगतोय…पण काहीही झालं तरीही मी नेहमीच तुमचा वडीलांप्रमाणे आदर केलाय…अबोली तर मला माफ करणार नाही पण तुम्ही माफ केलं तर निदान माझ्या मनावरचं थोडं ओझं तरी कमी होईल…”
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकर.
अबोली आणि अरुण चा घटस्फोट होईल का…? प्रीतीच्या अचानक बदलण्यामागे काय हेतू असेल हे पाहूया पुढील भागात…