अवनी लग्न करून पाटलांच्या घरात पाऊल ठेवले आणि त्या घराला, तिथल्या राहणीमानाला आहे तसे स्वीकारले. एका मोठ्या शहरातून ती एका लहानशा खेड्यात लग्न करून आली होती. तिचे सासरे एक सधन शेतकरी होती. सोबतच त्यांचे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुद्धा होते. तिचा नवरा नीरज सुद्धा गावी वडिलांच्या शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावायचा.
नीरज आणि अवनी शहरात एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. नीरज ने शेती शास्त्रात पदवी घेतली होती तर अवनीने समाजशास्त्र या विषयात. पण एकच कॉलेज असल्याने दोघांची आधी चांगली ओळख झाली आणि नंतर मैत्री. मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले हे दोघांनाही कळले नाही.
दोघांचीही मने जुळली असली तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप वेगळी होती. नीरज एका खेड्यात एकत्रित कुटुंबावर वाढलेला मुलगा तर अवनी तिच्या श्रीमंत आईवडिलांची एकुलती एक मुलगी. अवनी श्रीमंत असली तरी नीरज सुद्धा गरीब नव्हता. पण दोघांच्या राहणीमानात बरीच तफावत होती. पण त्यांच्या याच विरोधाभासामुळे ते दोघे एकमेकांकडे आकर्षिले गेले. आणि प्रेमात पडले. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे कळल्यावर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आपला निर्णय घरच्यांना सांगायचे ठरवले.
नीरजच्या घरी आजवर कुणीच लव्ह मॅरेज केले नव्हते. आणि शहरातील मुलगी म्हटल्यावर त्याच्या घरचे अजूनच साशंक होते. अवनीच्या घरची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. त्यांची सुद्धा खेड्यात मुलगी द्यायची इच्छा नव्हती. पण नीरज आणि अवनी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी घरच्यांनी होणार दिला आणि अवनी आणि नीरजचे लग्न झाले.
अवनी नीरज सोबत पाटील वाड्यात आली आणि तिने वाड्यातल्या सगळ्यांना आपलेसे केले. अवनीचा स्वभाव होताच गोड. नीरजच्या घरच्यांना पण नीरज ची आवड सार्थ वाटत होती. घरी नुसता आनंदी आनंद झाला होता. आणि पुढच्या काही महिन्यांतच अवनी आणि नीरजच्या आयुष्यात बाळाची चाहूल लागली.
घरचे सगळेच आनंदले. अवनीचे कोडकौतुक होऊ लागले. मातृत्वाच्या जाणिवेने अवनी सुखावली होती. ही गोड बातमी ऐकून अवनीचे आई बाबा सुद्धा तिला भेटायला तिच्या सासरी आले. अवनी ला भेटून दोघांनाही खूप आनंद झाला. नीरज ने दोघांनाही काही दिवस इथेच राहण्याचा आग्रह केला आणि दोघांनी तो मान्य देखील केला.
अवनीचे आई बाबा काही दिवस तिच्याच कडे थांबले. दोघेही काही दिवस ग्रामीण जीवनाचा आनंद घेणार होते. पण आवनीच्या आईच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार सुरू होते. अवनी च्या लग्नामुळे तिची आई आधीच जास्त खुश नव्हती. आणि अवनी त्यांची एकुलती एक लेक होती.
त्यांच्या मनात आधीपासूनच होते की अवनी ने कुठलातरी जवळपासचा मुलगा बघून लग्न करावे. पण अवनीने नीरजशी लग्न करण्याचा हट्ट केला आणि तिच्या समोर त्यांचे काही चालले नाही. पण आता मात्र त्यांना वाटत होते की अवनी आणि नीरजने आपल्यासोबत शहरात यावं. निदान अवनीच्या मुलांना या खेडेगावात राहावं लागू नये अशी त्यांची इच्छा होती. पण अवनीला आपल्या मनातील इच्छा कशी बोलून दाखवावी हे त्यांना कळत नव्हतं. नीरजच्या घरचे अवनीच्या आईवडिलांचा छान पाहुणचार करत होते.
एके दिवशी नीरजला घरी यायला खूप उशीर झाला. शेतीच्या कामानिमित्ताने तो तालुक्याला गेला होता आणि घरी यायला बराच उशीर झालेला होता. अवनीला मात्र वाटायचं की आपल्या प्रेगन्सी मध्ये नीरजने जास्तीत जास्त वेळ आपल्या सोबतच राहावं. त्याला यायला उशीर झाल्याने आधीच अवनी थोडी नाराज होती. कसेतरी नीरजने तिला समजावले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीची आई अवनी जवळ आली आणि म्हणाली.
” काल नीरज रावांना खूप उशीर झाला होता ना ग घरी यायला…त्यांनी लवकर घरी यायला पाहिजे ना आता…आधीच तुम्हाला जास्त प्रायव्हसी मिळत नाही इथे आणि तुझ्या या अशा अवस्थेत तरी त्याच्या घरच्यांना हे कळायला हवं की तुला त्यांची जास्त गरज आहे म्हणून त्याला जास्त काम सांगू म्हणून…”
” नाही ग आई…एरव्ही उशीर नाही होत त्याला… काल थोडा उशीर झाला पण त्यात काय एवढं…” असे म्हणून अवनी ने विषय टाळला. पण आईचं बोलणं तिच्या मनाला कुठेतरी लागलं होतं. त्यानंतर अवनीच स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाकात मदत करणे, घरातील छोटी मोठी कामे करणे सुद्धा तिच्या आईला आवडायचं नाही. त्या तिला म्हणायच्या की तू घरातील कामे करण्यासाठी शिक्षण थोडीच घेतलेस. अवनी मात्र हसून विषय टाळायची. अवनीला नुकताच चौथा महिना लागला होता.
एकदा अवनी आणि तिची आई बाहेर जाण्यासाठी निघाले होते. अवनी ने घट्ट जीन्स आणि त्यावर गुडघ्यापर्यंत येणारा चिकण कारी कुर्ता घातला होता. अवनीच्या सासूबाईंनी तिला तसे बाहेर जाताना पाहिले आणि म्हणाल्या.
” अवनी…अग हे काय घातलं आहेस तू…पोटुशी आहेस अन् इतका घट्ट जीन्स घातला आहेस…आधी हा जीन्स काढ आणि काहीतरी ढिले कपडे घाल…”
” एवढ्याने काय होतंय आई…अजुन पोट जास्त वर पण आलेलं नाही…” अवनी म्हणाली.
” तरीपण मी सांगतेय ना कपडे बदलायला…कधीतरी मोठ्या माणसांचं ऐकावं मुलांनी…” सासुबाई म्हणाल्या.
यावर जास्त काही न बोलता अवनी तिच्या रूम मध्ये कपडे बदलायला निघून गेली. तिची आई सुद्धा तिच्या पाठोपाठ तिच्या रूममध्ये गेली आणि अवनीला म्हणाली.
” बघितलं स ना तुझ्या सासूबाईंच वागणं…थोड्या वेळात जाऊन परत सुद्धा आलो असतो ग आपण…पण ऐन जायच्या वेळी तुला कपडे बदलायला लावले त्यांनी…आता तर फक्त सुरुवात आहे…पुढे काय काय करायला लावतील काय माहित…आणि तुलाच इतके नियम पाळायला लावतील तर तुझ्या होणाऱ्या बाळाला काय अन किती नियमांना सामोरे जावे लागेल काय माहिती…काहीही झालं तरी हे खेडेगावच आहे ना…इथले नियम आणि परंपरा आपल्या पेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत..” आई म्हणाली.
” हो…पण पाळाव्या तर लागणारच ना आई…” अवनी म्हणाली.
” मी तर म्हणते की तुम्ही दोघे काही दिवसांसाठी आपल्या घरी का नाही येऊन राहत…या वातावरणातून थोडीशी मोकळीक मिळेल…तसही शहरात आपला इतका मोठा व्यवसाय आहे…नीरजराव सुद्धा करतीलच की काहीतरी तिथे…तेवढीच तुम्हाला प्रायव्हसी मिळेल…नीरजराव तर दिवसभर कामासाठी बाहेरच राहतात….आणि इथे एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबात तुम्हा दोघांना कुठे जास्त वेळ मिळत असेल…” आई म्हणाली.
” पण असे होऊ शकणार का आई…नीरज ऐकेल का माझं मी काही दिवसांसाठी शहरात राहायला चल म्हटलं तर…?” अवनी ने आईला विचारले.
” तू एकदा बोलून तर बघ…” आई म्हणाली.
” बघेन प्रयत्न करून…” अवनी म्हणाली.
त्यानंतर काही दिवस राहून अवनी चे आई अन् बाबा त्यांच्या घरी परत निघून गेले. अवनीच्या डोक्यात मात्र आईने बोललेले विचार फिरतच होते. एका क्षणाला तिला वाटायचं की इथेच राहू आणि दुसऱ्या क्षणाला तिला वाटायचं की आपण शहरात राहायला जाऊया. पण नीरज शी या विषयावर बोलायची तिची हिम्मत होत नव्हती.
आई गेल्यापासून अवनी च्या वागण्यात बराच फरक पडला होता. तिला आता तिच्या सासरच्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांचा काहीतरी स्वार्थ वाटायचा. तिच्या सासुबाई तिला बरेचदा सूचना करायच्या की अवनी अशी चालू नकोस, हळू चालत जा. साधी चप्पल घालत जा. ढिले कपडे घालत जा. पण अवनी मात्र मुद्दामहून त्यांनी जे सांगितलं त्याच्या उलट करायची.
अवनी नीरजला म्हणायची की तू घरी लवकर येत जा. नीरज सुद्धा प्रयत्न करायचा. पण शेतीच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात त्यामुळे कधीतरी त्याला उशीर व्हायचा. अवनी चा मात्र अशावेळी संताप व्हायचा. आधी समजुतदार असलेली अवनी आजकाल अशी का वागते आहे ह्याचं नीरज ला कोडं पडलं होतं. तेव्हा त्याच्या आईने त्याला समजावलं की प्रेगनेन्सी मध्ये चिडचिड हिने स्वाभाविकच आहे. घरातील सगळी मंडळी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध घडली की तिची पुन्हा चिडचिड व्हायची.
एकदा अवनी ने किचन मध्ये जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवली आणि हॉल मध्ये येऊन कॉफी प्यायला लागली. तिला पाहून तिच्या चुलत सासुबाई म्हणाल्या.
” अग अवनी… गरोदरपणात बाईने जास्त कॉफी पिऊ नये…सकाळपासून तिसरी कॉफी आहे ही तुझी…गरम असतं ग ते…”
अवनी च्या सासूबाईंनी सुद्धा त्यांना दुजोरा दिला. आणि अवनी ला राग आला. ती रागातच म्हणाली.
” या घरात मला माझ्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य अजिबात नाहीय का…सतत कॅमेरे पाठीशी असल्याप्रमाणे तुम्ही सगळे माझ्यावर नजर ठेवून असता…मी काय घालावं आणि काय घालू नये…किंवा काय घालावं आणि काय घालू नये हे तुम्ही कशाला ठरवताय…आधी तर की माझ्या मनाप्रमाणेच वागायचे ना…माझ्या बाळाची अतिकाळजी करून तुम्ही मला मात्र तुमच्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडू शकत नाही…आणि तुमच्या खेड्यातल्या अंधश्रद्धा तुमच्याकडेच ठेवा…तुम्ही अजून बाहेरचं जग पाहिलेलं नसल्याने तुम्हाला ह्यातलं अजून काही कळत नाही…”
क्रमशः
गोकुळ – भाग २ (अंतिम भाग)