” सामान देतोस ना…?”
आईकडून ह्या प्रश्नांची अपेक्षा नसलेला अभय जरा गडबडून म्हणाला.
” क…काय…काय म्हणालात…?”
” अरे सामान द्यायला आला आहेस ना…मग दे ना…” आई म्हणाली.
” हो…हे घ्या…” हातातील जड सामानाची पिशवी आईकडे सुपूर्द करत अभय म्हणाला.
” मी सामान बरोबर आहे की नाही ते चेक करून सांगते तुला….तोपर्यंत बाहेरच थांब…” आई म्हणाली.
आणि तो घामाने डबडबलेल्या अवतारात तिथे दाराबाहेर उभा राहिला. आई सामान चेक करत होती. तोवर अभय ने त्यांच्या घरात एक नजर फिरवली. चांगलं प्रशस्त घर होतं. ऐशोआरामाची जवळपास सगळीच साधने होती तिथे. कशाचीही कमतरता वाटत नव्हती. आईचं राहणीमान सुद्धा चांगलं होतं.
आपण आईशी बोलू शकतं नाही ह्याचे अभयला खूप वाईट वाटत होते. पण आई सुखात आहे हे पाहून त्याला आतून कुठेतरी समाधान सुद्धा वाटत होते. पण लगेच आपली आई आपल्याला इतक्या वर्षात साधी भेटायला सुद्धा आली नाही हे आठवून त्याला चीड सुद्धा येत होती. अभयचं विचारचक्र सुरुच होतं इतक्यात आई अभयला म्हणाली.
” सामान तर बरोबर आहे…मी तुला लगेच सामानाचे पैसे देते…थोडा थांब…” आणि एवढे बोलून आईने आतमध्ये कुणालातरी आवाज दिला.
” सिद्धार्थ…बाळा जरा बेडरूम मधून माझी पर्स घेऊन येतोस का…?”
आणि थोड्या वेळातच सिद्धार्थ ने पर्स आणून आईला दिली. त्याला काही हा बहुधा आईचा मुलगा असावा असे अभयला वाटून गेले. आणि त्याच्या नशिबाचा हेवा सुद्धा वाटून गेला. तेवढ्यातच आईने अभयला सामानाचे पैसे दिले आणि अभय जायला निघाला. ती थोडा चालला असेल इतक्यात त्याला पाठीमागून आईने हाक मारली.
” थांब…”
आईने थांबायला सांगितले म्हणून अभयच्या छातीची धडधड वाढली. त्याला वाटले बहुधा आईने आपल्याला ओळखले असावे. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा आई म्हणाली.
” बराच वेळचा इथेच थांबलेला आहेस… ऊन सुद्धा चांगलच तापतय…पाणी वगैरे पिणार का…?”
” नको…मला तहान लागलेली नाही…” अभय म्हणाला आणि तसाच पाठमोरा चालू लागला.
त्याला आईकडून सहानुभूती नाही तर आईचं प्रेम पाहिजे होतं. इतक्या वर्षात आपल्या आईने आपल्याकडे अजिबात ही लक्ष दिलं नाही ह्याची सल त्याला टोचत होती. आईची परिस्थिती चांगली आहे तर निदान आपली मुले कोणत्या परिस्थितीत आहेत हे तरी एकदा तिने बघायला पाहिजे होते असे त्याला राहून राहून वाटत होते. इतक्या वर्षांपासून काळजात असलेली एक जखम पुन्हा भळभळू लागली होती.
त्या दिवशी त्याच विचारात तो घरी गेला. पण राधाला पाहून त्याने स्वतःला सावरलं. आणि जे झालं ते विसरण्याच ठरवलं. आणि त्यानंतर त्याने स्वतःचा अभ्यास आणखीनच जोमाने सुरू केला. दुकानात सुद्धा काम खूप प्रामाणिकपणाने करत होता. मालकाचा सुद्धा अभय वर खूप विश्वास जडला होता. घरची परिस्थिती सुद्धा हळूहळू सुधारत होती. राधा पण चांगली अभ्यास करत होती. असेच दिवस जात होते.
अभयचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि त्याने स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला. पहिल्या वर्षी अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. पण दुसऱ्याच प्रयत्नात अभय महाराष्ट्रातून तिसरा आला. अभयच्या आनंदाला पारावार उरला नाही. राधा आणि अभयची आजी सुद्धा खूपच जास्त आनंदात होती. इतक्या गरीब घरातील मुलगा असूनसुद्धा कोणतीही शिकवणी न लावता अभय महाराष्ट्रातून तिसरा आला ह्याचं सगळ्या तालुक्यासोबतच प्रसारमाध्यमांनी सुद्धा कौतुक केलं.
टीव्ही वर अभयचा इंटरव्ह्यू आला होता. अभय पासून अनेक जणांना स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा मिळत होती. अभयचं नाव सर्व स्तरातून गाजत होतं. आणि म्हणूनच आमदार साहेबांनी अभयचा जंगी सत्कार करायचा म्हणून ठरवलं. कार्यक्रमाला चांगलीच गर्दी जमली होती. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता.
इतक्यातच कुणीतरी गर्दी मधून वाट काढत त्याच्याकडे येत होतं. पण कुणीतरी त्यांना अभयकडे जाऊ देत नव्हतं. म्हणून मग त्या मोठ्याने म्हणाल्या.
” अरे मी अभयची आई आहे…मला कशाला अडवताय…”
आणि त्यांनी असे म्हटल्याबरोबरच अभय चे लक्ष त्यांच्याकडे गेले. तिथे खरोखरच अभयची आई आली होती. अभय त्यांच्याकडे पाहतच राहिला. अभय ची आहे म्हटल्यावर त्यांना कुणीच अडवले नाही. त्या लगेच अभयकडे आल्या आणि म्हणाली.
” अभय…मला ओळखलंस…मी तुझी आई…तुला भेटायला आली आहे…” आई आनंदात त्याला म्हणाली.
अभय काहीच बोलू शकला नाही. तो फक्त एकटक पाहतच राहिला. आई पुढे म्हणाली.
” इतक्या वर्षात मला खूप आठवण आली रे तुमची…पण तुम्हाला भेटायला येता आलं नाही…जीव तीळ तीळ तुटायचा रे माझा तुमच्यासाठी…शेवटी आज भेट झालीच…”
” इतकी वर्ष का जमलं नाही आई तुला…आणि नेमकं आजच का जमलं…” अभय ने शांतपणे आईला प्रश्न केला.
” ते…ते… त्याचं असं झालं की…” आईला नीट सांगता येत नव्हतं.
मग अभय म्हणाला.
” आई…आमची परिस्थिती वाईट असताना तू एकदा जरी आम्हाला येऊन भेटली असतीस तर खूप बरं वाटलं असतं ग आई आम्हाला…आम्हाला कधीच पोरक झाल्यासारखं वाटलं नसतं…पण तेव्हा तू आमची काहीच खबर घेतली नाहीस…आम्ही कोणत्या परिस्थितीत आहोत हे सुद्धा बघितलं नाहीस…
सगळ्यांच्याकडे त्यांच्या आई असायच्या…पण आम्हीच मात्र एकटे होतो…आई असूनही…मग आता जेव्हा आमची परिस्थिती चांगली झाली आहे…मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे तेव्हाच जर तुला अचानकपणे आम्हाला भेटावं वाटत असेल तर या भेटीला आता काही अर्थ नाही ना आई…इतकी वर्ष माझ्या आजीने आम्हा दोघा भावंडांचा आईच्या मायेने सांभाळ केला आहे म्हणून तिचं आमची आई आहे…” अभय म्हणाला.
” अरे पण तू माझं ऐक तरी…”
” आई…मला तुझ्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही…तू जे केलं ते त्यावेळी योग्य सुद्धा असेल कदाचित…पण आता आमच्या आयुष्यात आम्ही तुला ते स्थान नक्कीच देऊ शकत नाही जे आधी होतं…” अभय पुन्हा शांतपणे म्हणाला. आणि पाठमोरा होऊन स्टेज च्या दिशेने चालू लागला.
त्याच्या डोळ्यात आज पुन्हा एकदा अश्रू होते. आणि ते कोणाला दिसू नाहीत म्हणून त्याने रुमालाने अलगद टिपले. आई मात्र त्याला तसे पाहून नुसती पाहतच राहिली. आणि आपण इतकी वर्षे आपल्या मुलांना न भेटल्याचा पश्चात्ताप तिच्या डोळ्यात दिसून येत होता.
( लहानपणी आजूबाजूला घडलेली घटना आहे…त्यावरूनच प्रेरणा घेऊन काही काल्पनिक प्रसंग उभे करून सदर कथा लिहिलेली आहे… खरं म्हणजे आई इतकी स्वार्थी नसतेच…कधीच नसते…पण लाखात एखादी घटना ह्याला अपवाद सुद्धा ठरते…)
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका