राधाच्या काकांनी राघवला झोपडी स्वच्छ करण्यास मदत केली. खाटेवर टाकायला म्हणून अंथरूण पांघरूण आणून दिले. झोपडीत लाईटची सुविधा सुद्धा होती. शेतात पाणी द्यायचे म्हणून विजेची सोय आधीच केलेली होती. फोन चार्ज करायला सुद्धा एक जुनं बोर्ड दिसत होतं.
” चला…एवढी सुद्धा गैरसोय नाही दिसत इथे…पण सासुरवाडीत असेही राहावे लागेल ह्याची कल्पना सुद्धा केली नव्हती…” राघव हसून स्वतःशीच म्हणाला.
तेवढ्यात राधाचे काका त्याला म्हणाले.
” हे बघ राघव…अजूनही वेळ आहे…मला वाटतं तू इथे राहण्याचा विचार सोडून दिला पाहिजे…माझ्यासोबत घरी चल…”
” नाही मामा…आता ठरवलं आहे ते होऊनच जाऊ द्या…” राघव म्हणाला.
त्यावर मग मामा काहीच बोलले नाहीत. राघव तिथेच थांबला आणि मामा घरी निघून आले. राधाच्या बाबांचा राग अजूनही शांत झाला नव्हता तर राघवला आलेलं पाहून आणखीनच वाढत होता. आजवर अशा परिस्थितीत राघव कधीच राहिला नाही हे माहीत असल्याने राधाला राघवची काळजी वाटत होती. तिच्या जीवाची घालमेल तिच्या आईला कळत होती म्हणून आईने एकदा पुन्हा राधाच्या बाबांशी बोलायचे ठरवले. त्या राधाच्या बाबांना म्हणाल्या.
” राधाचे बाबा…मला काय वाटतं…तुम्ही राघवशी असे बोलायला नको होते…”
” मला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे…त्याचा विषय सुद्धा माझ्या समोर काढू नका…” राधाचे बाबा म्हणाले.
मग राधाची आई गप्प बसली आणि योग्य वेळ आली की बोलू असे ठरवले. इकडे राधा मात्र घरामागच्या खिडकीतून राघवच्या हालचाली टिपत होती. अर्थातच राघवच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे. राघव झोपडीच्या बाहेर उभा राहून शेतीला न्याहाळत होता.
हळूहळू रात्र व्हायला लागली आणि राधाच्या काकू ने राघव साठी जेवणाचे ताट आणि प्यायला पाणी पाठवले. राघवने जेवण केले. आणि मनोमन राधाच्या काकूचे आभार मानले. राधाला सुद्धा आज तिच्या काकुचे खूपच कौतुक वाटत होते. शेवटी त्यांनी तिच्या नवऱ्याच्या जेवणा खाण्याची जबाबदारी घेतली होती.
त्या दिवशी राधाच्या गळ्यातून जेवणाचा घास खाली सुद्धा उतरत नव्हता. झोपडीच्या आजूबाजूला जंगली जनावरांच्या येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आता तर ना राघव काही ऐकायला तयार होता ना तिचे बाबा. तिला राहून राहून अस्वस्थ वाटत होते. शेवटी घरात सगळ्यांची जेवणे आटोपली आणि घरच्यांची निजानीज झाली. झोपायच्या आधी राधाच्या बाबांनी राघव राहत असलेल्या झोपडीकडे पाहिले आणि मनातल्या मनात काहीतरी विचार करतच झोपायला गेले.
इकडे राधाचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. राघव कसा असेन हाच विचार सारखा तिच्या मनात येत होता. ते म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती. तसेच अनेक वाईट विचार राधा च्या मनात येत होते. तिने विचार केला की एकदा झोपडी च्या बाहेरून राघव ला पाहून यावे का..?
तो ठीक आहे हे पाहू आणि परत येऊन झोपून जाऊ. असा विचार करून राधा पलंगावरून उठली. पण आजवर रात्रीच्या वेळेला तर दूर पण संध्याकाळच्या सुमारास सुद्धा ती घराच्या बाहेर पडली नव्हती. पण आज अगदी यंत्रवत तिची पाऊले बाहेरच्या दिशेने आपसूकच पडत होती. राघवच्या काळजीने बाबांच्या भीतीवर मात केली होती.
आज राघव कडे जाताना ना तिला कशाची भीती वाटतं होती ना अवघडलेपण जाणवत होते. ती झपाझप पाऊले टाकत निघाली होती. शेवटी जेव्हा झोपडी एकदमच जवळ आली तेव्हा ती एकदमच थांबली. आपण एवढ्या रात्री इथे आलोय पण राघवला दिसलो तर. त्यापेक्षा दुरूनच त्याला बघू आणि निघून जाऊ असा राधाने विचार केला.
आतापर्यंत वेगाने चाललेली पाऊले आता मात्र हळुवार पुढे जात होती. झोपडीचे दार बंद होते. तिने जरा पुढे जाऊन पाहिले तर ते आतून बंद नसून फक्त लोटलेले असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने हळूच दार उघडले आणि आत डोकावून पाहिले. राघव खाटेवर झोपलेला होता आणि छातीवर पुस्तक उलटे पडलेले होते. बहुधा वाचता वाचता झोप लागली असावी.
त्याला पाहूनच निघून जायचं असं ठरवून आलेली राधा त्याला पाहून ठरवलेलं विसरली बहुधा. ती आतमध्ये गेली. हळूच त्याच्या छातीवर चे पुस्तक काढून घेतले आणि तिथेच बाजूला असलेले पांघरून त्याच्या अंगावर घातले. त्याला पाहून तिला अगदीच भरून आले होते. किती निरागस दिसत होता राघव.
लहानपणी तिला आपला नवरा वाटणारा राघव, मग पुढे तिचा होणारा दिर आणि मग त्याचं झालेलं लग्न सगळंच तिच्या डोळ्यासमोर येऊन गेलं. राघवने कठीण प्रसंगी तिला दिलेली साथ, तिच्यावर ठेवलेला अढळ विश्वास आणि तिच्या प्रेमासाठी काहीही करायची तयारी हे पाहून कोण त्याच्या प्रेमात नाही पडणार. आपली राधा काही त्याला अपवाद नव्हती.
नवीन नवीन प्रेमात पडलेल्या माणसाची जशी हालत असते तशीच आपल्या राधाची झाली होती. राधा प्रेमाने त्याला न्याहाळत होती. पण बाहेर रातकिड्यांचा आवाज आला आणि रद्द भानावर आली. भानावर आल्यावर सर्वात आधी तिच्या मनात बाबांचा विचार आला आणि ती बाहेर जायला निघाली.
इतक्यात मागून तिचा हात कुणीतरी घट्ट पकडुन ठेवला. राधाचा भीतीने थरकाप उडाला होता. पण दुसऱ्याच क्षणाला तिने त्याच्या स्पर्शाला ओळखले आणि तिला कळून चुकले की हा राघवच आहे. काही क्षणापूर्वी जगाला विसरून त्याच्याकडे पाहणारी राधा आता मात्र त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हती. तिच्या डोळ्यात लाज दाटून आली होती.
मग राघवच तिला म्हणाला.
” थांब ना…मला भेटायला आलीस आणि न भेटताच जात आहेस…”
” भ…भेटायला नाही… फ…फक्त पाहायला आले होते…” राधा अडखळत बोलली. जणू काही तिची चोरी पकडल्या गेली अशी तो घाबरत होती.
” पाहायला…पण का…?” राघव ने जाणून बुजून विचारले.
” इथे राहणं सुरक्षित नाहीये ना म्हणून मला खूप काळजी वाटतं होती…” राधा म्हणाली.
” फक्त काळजी…?” राघव ने पुन्हा विचारले.
आता मात्र राधाला त्याच्या बोलण्याचा ओघ कळला होता. पण पार लाजून चूर झालेल्या राधाला नेमकं काय बोलावं ते कळत नव्हतं. पण चेहऱ्यावर आणि डोळ्यात दाटून आलेली लाज राघव च्या नजरेतून सुटली नव्हती. शेवटी ती त्याला म्हणाली.
” मला जायला हवं…कुणाला कळलं तर…?”
” कळलं तर कळलं…आपण नवरा बायको आहोत… समजलं…?” राघव ने तिला आठवण करून दिली.
” हो… पण बाबा नाराज आहेत सध्या…त्यांना खूप राग येईल…मला निघायला हवं…” राधा म्हणाली.
” ठीक आहे… जसं तुला ठीक वाटेल…” राघव थोडा हिरमुसून म्हणाला.
तरीही राधा तिथेच उभी होती. मग राघव खट्याळ हसून तिला म्हणाला
” काय ग.. जायची इच्छा होत नाहीये का…?”
” तसं नाही…” राधा म्हणाली.
” मग…” राघव ने पुन्हा विचारले.
” तुम्ही हात पकडुन ठेवलाय माझा…” राधा हाताकडे इशारा करत म्हणाली.
त्यासरशी राघवच्या लक्षात आले की आपण अजूनही राधाचा हात पकडुन ठेवला आहे. मग त्याच्या वेंधळेपणाच त्यालाही नवल वाटलं. त्याने हळूच तिचा हात सोडला. राधा बाहेर जायला निघाली.
राघव कडे येताना पायांचा वेग जेवढा जास्त होता तेवढाच घरी परतताना तो वेग संथ झाला होता. तिचे पाय जणू जड झाले होते. राघव पासून दूर जाताना तिला अगदीच कसेतरी होत होते. आजवर न जाणवलेली प्रेमाची चाहूल तिच्या रोमा रोमात भिनली होती. आजवर एकाच खोलीत राहूनही तिला असे काही जाणवले नव्हते पण आज मात्र त्याच्यापासून दूर जाणे तिला खूपच कठीण काम वाटत होते.
राघव तिला पाठमोरी जाताना पाहत होता. राधा चालता चालता थांबली आणि अचानकच मागे वळली. राघवला पाहिले आणि धावतच जाऊन त्याला मिठी मारली. त्याने तिला बाहुपाशात घेतले आणि म्हणाला.
” इतकं प्रेम आहे तुझं माझ्यावर…?”
” तुम्हाला कसं कळलं…?” राधाने विचारले.
” तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय ते…” राघव म्हणाला.
” डोळ्यांवरून प्रेमाचा अंदाज येतो का…?” राधा म्हणाली.
” हो तर…पण तुझ्या तर प्रत्येक कृतीतून प्रेम दाटून येतं…” राघव म्हणाला.
” अच्छा…ते आणि कसे…?” राधा म्हणाली.
” मला माहिती आहे की लहानपणी पासूनच तुला अंधाराची भीती वाटते…तरीही अर्ध्या रात्री तू घराच्या बाहेर शेतात निघून आलीस…तुझ्या आई बाबांना न सांगता माझ्याकडे निघून आलीस…” इति राघव.
” तुमची काळजी वाटली म्हणून पाहायला आले होते…” राधा प्रेमाचा विषय टाळत म्हणाली.
” अच्छा…आणि माझी काळजी वाटते म्हणूनच माझ्या मिठीत आहेस का मघापासून…” राघव मिश्किल हसत म्हणाला.
तसे तिच्या लक्षात आले की आपण बऱ्याच वेळचे राघवच्या मिठीत आहोत. ती पटकन त्याच्या पासून दूर झाली.
” काय ग…खरंच प्रेम नाहीये का तुझं…?” राघव खोट्या नाराजीनेच म्हणाला.
” तसं नाही…माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर…सगळ्यात जास्त…खूप जास्त…” राधा नकळतच बोलून गेली.
” अन् माझं ही तुझ्यावर खूप प्रेम आहे…अगदी लहानपणापासून…” राघव म्हणाला.
” लहानपणी पासून…? ” राधाने आश्चर्याने विचारले.
क्रमशः
राधा आणि राघवच्या प्रेमाच्या कबुली नंतर पुढे काय होईल…? राधा राघव ला भेटायला गेलीय हे घरच्यांना कळेल का…? राधा च्या बाबांच्या मनात नेमके काय चालले असेल…? जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका.
©®आरती निलेश खडबडकार.