धीरजने राधाला घरी सोडले. त्या दिवशी राधाच्या घरच्यांनी राघव आणि धीरजला जेवल्याशिवाय सोडले नाही. राधाच्या घरच्यांचा आग्रह या दोघांकडून ही मोडवला नाही. दोघांनाही त्या दिवशी घरी निघायला रात्रच झाली होती. तसे पाहता दोघांचे गावही काही फार दूर नव्हते. दोघेही घरी जायला निघाले.
घरी जायला निघाल्यावर राघवने धीरजला विचारले.
” काय झालं धीरज…मघाशी कुणाचा फोन आला होता तुला…?”
” काही नाही रे…मघाशी सांगितलं ना ऑफिसमधून आला होता ते…” धीरज विषयाला टाळण्यासाठी म्हणाला.
” पण फोनवर बोलताना तू खूपच जास्त टेंशन मध्ये वाटत होता…” राघव म्हणाला.
” ऑफिस मधल्या कामाचं पण टेंशन असतच ना…तू पण काय चौकशा करतोयस…काही असतं तर मी सांगितलं असतं ना तुला…”
” तसं नाही…पण तुला कुणाचा फोन आलेला ते पाहिलं मी…” राघव म्हणाला.
” पण … तुला कसे कळले…?” धीरजने आश्चर्याने विचारले.
” तूझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर स्पष्ट झळकत होते तिचे नाव…शनाया म्हणून…आणि समोर एक हार्ट सुद्धा दिलेला होता…” राघव म्हणाला.
” हो…तिचाच फोन आला होता…” धीरज म्हणाला.
” म्हणजे अजूनही तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहात…?” राघव ने आश्चर्याने विचारले.
” नाही…म्हणजे तसे कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहोत… जस्ट फ्रेंडशिप आहे आत्ता…” धीरज म्हणाला.
” तुझी गर्लफ्रेंड आता तुझी चांगली फ्रेंड आहे असे म्हणतोयस तू…?” राघव जरा आश्चर्याने म्हणाला.
” हो… म्हणजे तसच काहीतरी…” धीरज म्हणाला.
” हे बघ… तुझं आता लग्न ठरलय…आणि राधा खूप चांगली मुलगी आहे…मला वाटतं की तू शनाया सोबतच्या नात्याला पूर्णविराम द्यायला हवा…” राघव म्हणाला.
” तू समजतोयस तसं काहीच नाही बघ…आम्ही खरेच चांगले मित्र आहोत आता…” धीरज म्हणाला.
” मला फक्त एवढंच वाटतं की तू राधाला सुखात ठेवलं पाहिजे…आणि तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचार करायला नको…” राघव म्हणाला.
” मी नक्कीच तिला सुखात ठेवेन…तू अजिबात काळजी करू नकोस…” धीरज म्हणाला.
त्या सरशी राघवने तो विषय बंद केला. पण मनातून मात्र तो साशंक होता. धीरजने सुद्धा आपण राघवला छान समजावून सांगितले म्हणून हुश्श केले.
शनाया आणि धीरज दोघेही एकाच ऑफिस मध्ये काम करायचे. शनाया धीरजला जरा सीनिअर होती. मॉडर्न आणि आकर्षक असणाऱ्या शनायाच्या धीरज पाहताक्षणीच प्रेमात पडला. काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालेल्या शनायाला सुद्धा आता आयुष्यात पुढे जायचं होतं. शनायाला धीरजची नजर चांगलीच कळली होती. मग तिनेही जास्त आढेवेढे न घेता त्याला त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं.
आणि तेव्हापासून दोघांच प्रकरण सगळ्याच ऑफिसला माहिती झालं. सोबत आउटिंग तर नेहमीचच झालेलं. दोघांच्याही मित्र मैत्रिणींना त्यांचं नातं माहिती होतच. दोघांनीही याबाबत कुठेही पडदा ठेवला नव्हता. त्यामुळे राघव ला सुद्धा हे माहिती झाले होतेच. फक्त याबाबत त्याने कधीच त्याच्या आई बाबांना वा नातेवाईकांना कळू दिले नव्हते. अर्थात लग्नाचा विषय निघाल्यावर तो त्यांना सगळं काही सांगणार होताच.
आणि लवकरच तो दिवस सुद्धा निघाला जेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याच्या साठी स्थळं पाहायला सुरुवात केली. तेव्हा त्याने आई वडिलांना आपल्या ऑफिस मध्ये असणारी एक मुलगी आपल्याला पसंत असल्याचे सांगितले. आई वडिलांनी आधी तर त्याच्या पसंतीला विरोधच केला. पण निदान तिला एकदा पाहून घ्या म्हटल्यावर मग त्यांनी सुद्धा विचार केला की एकदा तिचा विचार करण्यात काही हरकत नाही. तसेही आजकालच्या मुलांच्या मनाविरुद्ध वागता येत नाही.
मग त्यांनी धीरजला सांगितले की आम्हाला एकदा तिला बघायचे आहे म्हणून. मग धीरजने सुद्धा आई बाबांना तिचा फोटो दाखवला. तिचा पेहराव पाहून त्याच्या आईने आधीच नाक मुरडले. पण आईचाही थोडा नाईलाज होता. शेवटी दोघा नवरा बायकोला एकमेकांसोबत राहायचे होते. ते ही शहरात. त्यामुळे बायको त्याच्या पसंतीची असणे कधीही चांगले असे वाटून त्यांनी काही हरकत घेतली नाही.
ही गोष्ट शनायाला कधी भेटून सांगतो आणि कधी काही असे त्याला झाले होते. त्याला फोनवर तिला काहीच सांगायचे नव्हते. मग त्या दिवशी ऑफिसला गेल्यावर ती आनंदातच तिच्या जवळ गेला. आणि हळूच तिला म्हणाला.
” शनाया… आय हॅव अ गूड न्यूज फॉर यू…”
” गूडन्यूज…? ती कोणती…?” शनायाने विचारले.
” माझ्या आई बाबांना मी आपल्या बद्दल सगळं सांगितलय…आणि त्यांना तू सून म्हणून पसंत आहेस…” धीरज अधिरतेने म्हणाला.
” काय म्हणालास तू…लग्न…आणि मी…तुला असे वाटले तरी कसे…?” शानाया इतक्या जोरात म्हणाली की सगळ्या ऑफिसला ते ऐकू गेले.
तिचा आवाज ऐकून धीरजचा चेहराच पडला. शिवाय ऑफिस वाल्यांसमोर तिचे त्याला असे मोठ्याने बोलणे ह्यामुळे तो ओशाळला होता. तो हळूच तिला म्हणाला.
” अगं जरा हळू बोल ना…सगळे आपल्या कडेच पाहत आहेत…”
” पाहू दे…पण मला काहीही न विचारता तू डायरेक्ट लग्नाचा विचार तरी कसा केलास…?”
” लग्नाचा विचार म्हणजे…आपलं प्रेम आहे एकमेकांवर…मग आता पुढची पायरी लग्नच आहे ना…त्या शिवाय का आपण नेहमीसाठी एकमेकांचे होऊ…” धीरज म्हणाला.
” हे बघ… डेट करणे, प्रेम करणे इथवर ठीक आहे…पण मला लग्न करण्यात काही एक इंटरेस्ट नाही बघ…मला फक्त आणि फक्त माझ्या करिअर वर फोकस करायचे आहे…मला ते कमिटमेंट अँड ऑल नकोय…माझं आधीच ब्रेकअप सुद्धा याच कारणासाठी झालंय…त्याला लग्न करायचं होतं आणि मला नाही…आणि यात मला काहीच चुकीचं वाटत नाही…मला वाटलं होतं की तुला सुद्धा माझं म्हणणं पटेल…पण तू लग्नाचा विचार करशील हे मला माहीत नव्हते…” शनाया त्याला म्हणाली.
” मग…आपण लग्न नाही करायचे तरीही रेलेशन मध्ये राहायचे…हे कसे शक्य आहे…?” धीरज तिला म्हणाला.
” सोप्पं आहे…आता जसे सुरू आहे तसेच पुढेही सुरू ठेवायचे…”
” अगं पण माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची घाई झालेली आहे…त्यांना त्यांच्या नातवंडांच तोंड पहायचं आहे…त्यांना कसे सांगणार हे सगळं…मुळात त्यांना ते पटणारच नाही…” धीरज म्हणाला.
” हे बघ…मला लग्नच करायचं नाही तर मूलबाळ खूप दूरची गोष्ट आहे…मी अजिबात तुझ्या किंवा तुझ्या आई बाबांच्या ह्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत…पण तू म्हणत असशील तर माझ्याकडे ह्या सगळ्यांवर एक उपाय आहे…?” शनाया म्हणाली.
” काय…?” धीरजने पुन्हा अधिरतेने विचारले.
” तू तुझ्या आई बाबांच्या पसंतीने एखाद्या मुलीशी लग्न करून घे…म्हणजे त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि आपलं जे चाललंय ते सुद्धा तसेच सुरू राहील…” शनाया म्हणाली.
” पण तू माझं दुसऱ्या मुलीशी लग्न झालेलं पाहू शकशिल…?” धीरज ने विचारले.
” ऑफकोर्स…म्हणून तर तुला ही आयडिया देतेय ना…आणि माझं सगळ्यात जास्त प्रेम माझ्या करिअरवर आहे…तुझ्या पेक्षाही…आणि मला माहिती आहे की आज ना उद्या तू माझ्या मागे पुन्हा लग्नासाठी भुणभुण लावशील…त्यापेक्षा तू दुसऱ्या मुलीशी लग्न करून घे…” शनाया म्हणाली.
शनायाचे बोलणे ऐकुन धीरज विचारात पडला. शनायाला त्याच्यासोबत नातं तर ठेवायचं होतं पण लग्न वगैरे च्या भानगडीत तिला पडायचं नव्हतं. मुळात तिचं आधीच ब्रेकअप सुद्धा त्याच कारणास्तव झालं होतं. शनाया आपल्याशी लग्न करायला तयार नाही हे त्याला माहिती झालं होतं. आणि जास्त फोर्स केला तर आधी प्रमाणे आताही ती आपल्याशी ब्रेकअप करेल हे सुद्धा त्याला माहिती होतं.
धीरजला सुद्धा आता शनायाचे बोलणे पटू लागले होते. शनाया स्वतःच त्याला दुसरिशी लग्न करायला सांगत होती. अशाने त्याला बायको असल्यावरही शनायासारखी गर्लफ्रेंड त्याच्या आयुष्यात राहणार होती. त्याला तर नुसत्या कल्पनेनेच गुदगुल्या होत होत्या. त्याने मग तसच करायचं ठरवलं.
घरी त्याने आई बाबांना सांगितलं की शनायाला त्याच्याशी लग्न करायचे नाही आणि म्हणून त्यांनी ब्रे’कअ’प केले आहे. त्याच्या आईला तर ह्याचा खूपच जास्त आनंद झाला. त्यांना शनाया मुळात आवडली नव्हतीच. मग त्यांनी उत्साहाने धीरजसाठी मुली बघण्याचे काम सुरू केले. आणि मग धीरजसाठी राधाचे स्थळ आले.
राधाचे स्थळ त्यांना धिरजसाठी सर्वार्थाने योग्य वाटले होते. राधाच्या वडिलांना राधा आणि कावेरी अशा दोनच मुली होत्या. त्यांनी दोघींना सुद्धा खूप चांगले संस्कार दिले होते. कावेरी तर तिच्या सासरी खूप आनंदात होती. सासरचे तिच्यावर खुप खुश असत. आणि राधा तर दिसायला जितकी सुंदर होती स्वभावाने तितकीच चांगली.
राधा त्यांच्या घरच्या सगळ्या चालीरीती आणि परंपरा निभावून नेणाऱ्यातील होती. त्यांची मर्जी सांभाळणाऱ्यातील होती. त्यांनी राधाला लहानपणी पासून बघीतले होते. शिवाय राधाच्या वडिलांची सगळी मिळकत आज ना उद्या दोघी बहिणींनाच मिळाली असती. निखिल जवळ जेव्हा राधाचा विषय काढला तेव्हा त्यालाही राधा खूप आवडली होती.
साध्या सरळ स्वभावाच्या राधाला मूर्ख बनवणे त्याला जास्त सोपे वाटले होते. शिवाय राधाला शिकवायचे असे म्हणून तिला जवळच्याच असणाऱ्या कॉलेज मध्ये एडमिशन घेऊन द्यायची आणि तिला इथेच आई बाबांजवळ ठेवायचे व आपण वीकेंडला इथे घरीच यायचे. आणि बाकीचे दिवस तो आणि शनाया आहेच की. त्याने विचार केला आणि इतकी चांगली युक्ती सुचल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटली.
राधाला जेव्हा त्याने पाहिले तेव्हा त्याला ती खूप आवडली होती. जसजसा तो भेटत आणि तसतसा त्याचा विचार आणखी पक्का होऊ लागला होता. त्याने ठरवले होते की एकवेळ शनायाला सोडून देईल पण राधाला नाही. तरीही जोपर्यंत दोन्हीकडे चालतंय तोपर्यंत चालू द्यावं असं त्याचं मत होतं.
आणि म्हणूनच एकीकडे तो राधाशी गोड बोलत होता आणि दुसरीकडे शनायाला हे पटवून देत होता की त्याचं फक्त तिच्यावरच प्रेम आहे आणि राधाशी लग्न तो फक्त घरच्यांसाठी करतोय म्हणून. त्यामुळे साहजिकच शनायाला काहीच प्रोब्लेम नव्हता.
राधा आणि धीरजचा साखरपुडा आता फक्त चारच दिवसांवर राहिला होता. राधाने घरच्यांना तिच्या साखर पुड्यासाठी घेतलेली साडी दाखवली. त्यानंतर साडी स्वतःच्या कपाटात ठेवताना तिचं लक्ष राघवने तिला दिलेल्या पिशवीकडे गेलं. आतापर्यंत त्या गिफ्टवर तिचं लक्षच नव्हतं पण आता दिसल्यावर मात्र राघवने आपल्याला नेमकं काय गिफ्ट दिलं असेल ह्याचं कुतूहल दाटून आलं.
तिने पिशवी उघडुन बघितलं तर तीच मोरपंखी साडी होती जी तिला त्या दुकानात खूप जास्त आवडली होती आणि धीरजला आवडली नाही म्हणून घेता आली नव्हती. साडी बघून तिची कळी खुलली. राघवचे गिफ्ट तिला मनापासून आवडले होते.
क्रमशः
धीरज आणि शनाया बद्दल राधाला किंवा तिच्या घरच्यांना काही कळेल का…? धीरज आणि राधाचे लग्न वाटते तितक्या सोप्या पद्धतीने होईल का…? शनाया आणि राधामध्ये धीरजचे सँडविच तर नाही ना होणार…? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचायला विसरु नका.
©®आरती निलेश खरबडकार.
खुप छान
पुढील भाग
धन्यवाद 😊🙏
खुपच सुंदर कहाणी आहे, मला सगळे भाग आवडले ,पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे.
मला सगळे भाग आवडले, कहाणी खुपच सुंदर आहे, पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
खूप खूप धन्यवाद 😊🙏