सगळं काही ऐकून घेतल्यावर आई म्हणाली.
” नकुलला एक मैत्रीण आहे ह्याचा तुला त्रास होतोय की तो तुझ्यापेक्षा जास्त तिच्याशी मनमोकळेपणाने बोलतो ह्याचा तुला त्रास होतोय…”
नंदिनी गप्प बसली…नेमके काय उत्तर द्यावे ते तिला कळत नव्हते. मग काहीतरी मनाशी आठवून ती म्हणाली.
” तो जसा तिच्याशी चांगला बोलतो तसा माझ्याशी नाही बोलत ह्याचा राग आलाय मला…”
” ती त्याच्याशी जशी बोलते तशी तू बोलतेस का त्याच्याशी…मग तू सुद्धा त्यांच्याकडून अशी अपेक्षा कशी करू शकतेस…ती त्याची लहानपणीची मैत्रीण आहे… समवयीन आहेत दोघे…त्यामुळे अर्थातच ते एकमेकांना चांगले ओळखत असतील…
म्हणूनच तर दोघांची चांगली मैत्री आहे ना…आणि व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक नात्याला एक वेगळी जागा असते…तिची जागा वेगळी आणि तुझी जागा वेगळी…तो तिला सगळं काही बोलून दाखवत असेल तर तू स्वतःहून त्याच्या मनातलं समजून घेत जा….आणि आजच्या काळातले मुलं आहात ना तुम्ही…
मग तुला त्याच्या मैत्रिणी पासून ईर्ष्या व्हायला नको…अभ्यासात हुशार राहणारी तू प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अजूनही जरा मागेच आहेस…नाती अशी नाही बनत…त्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या मनात स्थान मिळवावं लागत…” उषाताई म्हणाल्या.
” खरंच माझं चुकलं आई…आधी लग्न असं गडबडीत झाल्याने मी इतर कोणत्या गोष्टींवर लक्षच दिलं नाही…त्यानंतर बाबा माझ्यावर नाराज होते त्याचाच विचार करत राहिले…दुसऱ्या कोणत्या गोष्टीवर लक्षच दिले नाही…नकुल माझ्याशी चांगलं बोलण्याचा, वागण्याचा प्रयत्न करायचा पण मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही…मला वाटलं की लग्न झाल्यावर नाती आपोआपच बनतात…त्यात आपल्याला काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत…मी प्रत्येक नात्याला गृहीत धरलं…” नंदिनी कबुली देत म्हणाली.
” चला…म्हणजे तुला तुझी चुक कळली तर…”
” हो आई…पण आता काय करू…झालेली चूक कशी सुधारू…?”
” खूप सोप्पं आहे ग…तुला जे वाटतं ना ते जाऊन नकुलला सांग…स्वतःची चूक कबूल कर…तो खूप समजदार आहे…समजून घेईल तुला…” उषाताई म्हणाल्या.
हे ऐकून नंदिनीला खूप समाधान वाटले. आईने तिच्या मनातील चलबिचल ओळखून अगदी योग्य सल्ला दिला होता. नंदिनी ने नकुल शी बोलायचे ठरवले.
इकडे नकुल ला सुद्धा नंदिनी ची आठवण येत होती. पण नंदिनी स्वतःहून कॉल करत नाहीये म्हणजे तिला आत्ताच आपल्याशी बोलायचे नाही असे त्याला वाटत होते. म्हणून त्यानेही स्वतःहून तिला कॉल केला नाही वा तिला घरी ये असेही म्हटले नाही.
नकुल विचार करत घरात बसलेला होता. तेवढ्यातच मुग्धा तिथे आली. नकुलला पाहून मिश्किल हसत म्हणाली.
” काय झालंय नकुल…? आजकाल तू खूप विचारात दिसत आहेस…? बायकोची आठवण येतेय वाटतं…?”
” काहीतरीच काय तुझं…मस्करी करण्याची सवय जाणार नाही ना तुझी…” नकुल म्हणाला.
” करते मी कधी कधी मस्करी…पण आज मात्र तू खूपच सिरीयस दिसत आहेस…मागच्या चार पाच दिवसांपासून तू असाच दिसत आहेस…खरंच सांग काय झालंय…? काही बिनसलंय का…? नंदिनीशी भांडण झालंय का तुझं…?” मुग्धा ने विचारले.
” भांडण करायला तिने माझ्याशी व्यवस्थित बोलायला तर हवं ना…” नकुल काहीसा पुटपुटत म्हणाला. पण मुग्धा ने मात्र ते ऐकले. ती त्याला म्हणाली.
” व्यवस्थित बोलत नाही म्हणजे…?”
” काही नाही…सोड ना…तू सांग…आणखी किती दिवस आहेत तुझ्या सुट्ट्या…?” नकुल विषय बदलत म्हणाला.
” तीन दिवसांनी जायचं आहे मला परत…पुन्हा बघुयात कधी जमतंय ते…” मुग्धा ने सांगितले
” खरंच मुग्धा…मला तुझा खूप अभिमान वाटतो बघ…लहानपणी किती भित्री होतीस ना तू…आणि आता कशी एकदम एवढ्या दूर राहून सगळं मॅनेज करतेस…एकदम आत्मविश्वासाने…” नकुल तिला म्हणाला.
” ते ठीक आहे…पण तू विषय नको बदलू स…मला सांग तुझ्यात आणि नंदिनीत सगळं काही ठीक आहे ना…?” मुग्धा ने विचारले.
” हो…म्हणजे ठीकच म्हणावं लागेल…” नकुल म्हणाला.
” आता तू सांगणार आहेस की नाही…” मुग्धा ने विचारले.
” तुला तर माहिती आहे ना माझं आणि नंदिनी चं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ते…माझ्यासाठी हे सगळं खूपच अनपेक्षित होतं…आणि खरं सांगायचं म्हणजे मी तयार सुद्धा नव्हतो…तरीही आमचं लग्न झालं…अन् मग मी या सगळ्याचा राग नंदिनी वर काढला…तिला म्हटलं माझ्याशी फक्त कामाचं बोलायचं…खूप काही बोललो ग तिला…” नकुल म्हणाला.
” मग…ती काय म्हणाली…?” मुग्धा ने विचारले.
” तोच तर प्रॉब्लेम आहे की ती काही बोलतच नाही…त्या दिवशी सुद्धा नव्हती बोलली अन् आताही बोलत नाहीये…” नकुल म्हणाला.
” अरे तूच विचार कर…तू वयाने मोठा आहेस…मुलगा आहेस तरीही तू झाल्या प्रसंगाने किती बिथरला होतास…मग ती तर वयाने लहान आहे…तिच्यावर खुप मोठा प्रसंग ओढवला होता…ह्या सगळ्यांमध्ये तिला काय तरी सुचत असेल…” मुग्धा म्हणाली.
” ह्या दृष्टीने मी विचार केलाच नाही बघ…मला जेव्हा तिला झिडकारायच होतं तेव्हा मी तिला दूर लोटलं…आणि आता की तिच्या प्रेमात पडलोय तेव्हा मला असं वाटतंय की तिनेही माझ्या प्रेमात पडावं…म्हणजे सगळं काही स्वतःच्या सोयीने बघतोय ना मी…तिला सरळ सरळ गृहीत धरतो य मी…” नकुल ओघात बोलुन गेला.
” काय म्हणालास…? पुन्हा सांग…?” मुग्धाने विचारले.
” मी गृहीत धरतोय तिला…” नकुल म्हणाला.
” ते नाही…त्या आधी बोललास ते…प्रेमात पडलोय अँड ऑल…” मुग्धा ने मिश्किल हसत विचारले.
आता मात्र आपण मुग्धा समोर काय बोललो हे आठवून नकुल ओशाळला. मग मुग्धाच म्हणाली.
” हे बघ…प्रेमात पडला आहेस ना तर तिला स्पष्ट सांग…ती सांगितल्या शिवाय का तिला तुझ्या मनातलं कळणार आहे…”
” पण तिने नकार दिला तर…” नकुलने शंका उपस्थित केली.
” वेडा आहेस का तू…बायको आहे ती तुझी…ती का देईल नकार…? आणि समजा दिला तरीपण तुम्ही सोबतच राहणार आहात की आयुष्यभर…पुन्हा प्रयत्न करायचा तिला प्रेमात पाडण्याचा…पण मला तर वाटतंय की आग दोनो तरफ लगी है…” नंदिनी त्याच्यावर हसत म्हणाली.
” म्हणजे…” नकुल ने विचारले.
” म्हणजे तिचं पण प्रेम आहे तुझ्यावर…” मुग्धा म्हणाली.
” पण हे तुला कसं माहीत…?” नकुल ने विचारले.
” आपल्याला बोलताना पाहून तिचा फार जळफळाट व्हायचा हे पाहिलंय मी…” मुग्धाने सांगितले
” अच्छा…म्हणूनच त्या दिवशी तशी वागली ती…” शेतात जेवायला गेल्यावर ती जे वागली ते स्वतःशीच आठवत नकुल म्हणाला. आता मात्र नकुल आणखीनच ओशाळला. मुग्धा बरोबरच बोलत होती. आपणच नंदिनीला समजू शकलो नाही. त्या दिवशी तिच्यावर ओरडण्याऐवजी तिला समजून घेतलं असतं तर तिचं मन तरी दुखावल्या गेलं नसतं असा त्याने विचार केला.
नंदिनी सुद्धा नकुलच्या विचारात होती. तिला त्याच्याशी मनातील सगळे बोलायचे होते. आणि अचानकच तिच्या फोनची रिंग वाचली. तिने फोन पाहिला तर नकुलचा फोन आला होता. स्क्रीन वर त्याचे नाव पाहूनच तिला धडधडत होतं. तिने फोन उचलला.
” हॅलो नंदिनी…मला तुझ्याशी बोलायचं आहे…”
” मला पण तुमच्याशी बोलायचं आहे…” नंदिनी म्हणाली.
” मग आता घरी येतेस का…?” नकुल म्हणाला.
” इतक्या सकाळी…आईला काय वाटेल इतक्या सकाळी निघाले तर…आई म्हणेल की निदान जेवून तरी जा…आणि जेवायला सुद्धा वेळ होईल…मग दुपार तर होईलच निघायला…” नंदिनी म्हणाली.
” चालेल…तू तयार राहा…मी येतो थोड्या वेळाने तुला घ्यायला…” नकुल म्हणाला.
” ठीक आहे…” नंदिनी म्हणाली.
नंदिनीने घरी सांगितले की दुपारपर्यंत नकुल तिला घ्यायला येणार आहे. मग तिच्या आईने सुद्धा तिच्यासाठी तिच्या आवडीचा स्वयंपाक केला. नंदिनीने पटापट जाण्याची तयारी केली. दुपारपर्यंत नकुल आला सुद्धा. जेवण आटोपली आणि घरच्यांनी दोघांचाही आनंदाने निरोप घेतला.
नकुल नंदिनीला घेऊन घरी पोहचला. नंदिनीला पाहून सरला आत्याला खूप आनंद झाला. नकुलला नंदिनीशी बोलायचे होते. पण त्याची आई आणि नंदिनी किचन मध्ये एकमेकांशी बोलत होत्या म्हणून त्याचा नाईलाज होता. नंदिनी आल्या बरोबर घरच्या कामाला लागली. शेवटी रात्रीचे जेवण झाल्या नंतर जेव्हा झोपायला रूम मध्ये आल्या तेव्हा नंदिनीनेच बोलायला सुरुवात केली. ती नकुलला म्हणाली.
” मला बोलायचं आहे तुमच्याशी…”
” मलाही बोलायचं आहे…पण आधी तू बोल…” नकुल म्हणाला.
” मी त्या दिवशी तुमच्याशी तसे बोलायला नको होते…पण मला खरंच मुग्धा बद्दल काही वाईट बोलायचे नव्हते…ते मी चुकून बोलून गेले…तुमच्या मैत्रीबद्दल माझ्या मनात काहीच वाईट नाही…मला फक्त वाटायचं की तुम्ही सगळ्यात जास्त माझ्याकडे लक्ष द्यावं…माझ्याशी बोलावं म्हणून…” नंदिनी म्हणाली.
” मलाही माफ कर…माझे अन् मुग्धा चे बोलणे एकदम जास्त नव्हते पण त्या मानाने मी तुझ्याशी खूपच कमी अन् कोरडेपणा ने बोलायचो हे माझ्या लक्षातच आले नाही…मुळात मी कशी त्या दृष्टीने विचारच केला नाही…
लग्न झाल्यावर मी जरा नाराज होतो पण खरं सांगायचं म्हणजे आता मला माझ्या तशा वागण्याचे खूप वाईट वाटत आहे… खरं सांगत आहे…तू मला कधी आवडायला लागली अन् मी कशी तुझ्या प्रेमात पडलो मला कळलंच नाही…
पण तू जराशी दूर गेल्यावर ते खूप प्रकर्षाने जाणवू लागलं…माझ्याकडून चुका झाल्या त मला मान्य आहे… मी त्या कबूल सुद्धा करतोय…पण यानंतर माझ्यावर रागावत जाऊ नको…आणि राग आला तरी पण कधी माझ्यापासून दूर जाऊ नकोस… प्लिज…”
नंदिनी काहीच न बोलता नुसती त्याच्या कडे पाहत होती. ती काहीच बोलत नाही हे पाहून तोच तिला म्हणाला.
” काय झालं…तू बोलत का नाहीस…बोल ना…”
” मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यावर कुणी इतकं प्रेम करेन…तुमच्या डोळ्यात ओतप्रोत प्रेम भरलेलं दिसत आहे मला…मी खरंच खूप नशीबवान आहे…मला देवाने खूप सुंदर नाती दिलीत…आणि त्याहूनही अधिक म्हणजे भरभरून प्रेम करणारा नवरा…आणि मी वेडी हे सुखाचे दान ओंजळीत घेऊ शकले नव्हते…पण आता मला हे सगळे प्रेमाचे क्षण जगायचे आहेत…तुमच्यासोबत…” नंदिनी भावुकपणे म्हणाली.
” मी सुद्धा आजन्म साथ देईल तुला…कोणत्याच परिस्थितीत तू कधीच एकटी नसशील…तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहील…” नकुल म्हणाला.
नकुलने असे म्हणताच नंदिनी त्याच्या मिठीत शिरली. त्याने सुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतले. एकमेकांची सोबत मिळाल्याने दोघेही आता खऱ्या अर्थाने पुर्ण झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही अगदीच स्वतःशीच हसत जायची तयारी करत होते. नकुल ऑफिसला जायची तयारी तर नंदिनी कॉलेजला जाण्याची तयारी. दोघांनाही खुश पाहून नकुलची आई सुद्धा खुश होती. दोघेही आज मोठ्या खुशीत घरून निघाले.
संध्याकाळी येताना सुद्धा दोघांची जोडी खुशीतच घरी आली. नकुल ने पायावर पाणी घेतले आणि फ्रेश व्हायला रूम मध्ये जाणार इतक्यात त्याला कुणीतरी आवाज दिला.
” काय नकुल राव…आज मोठ्या खुशीत दिसताय…म्हणून आमच्यावर लक्ष सुद्धा नाही गेलं…”
नकुल ने वळून पाहिले तर मुग्धा आणि त्याची आई तिथेच बसल्या होत्या. नकुल थोडा ओशाळला आणि म्हणाला.
” तसे काही नाही…मी तर फक्त…”
” राहू दे…काही स्पष्टीकरण वगैरे नकोय…मी उद्या चाललेय म्हणून आज काकूंना भेटायला आले होते…” मुग्धा म्हणाली.
” हो…आणि मी तिच्यासाठी तिच्या आवडीचे रवा आणि बेसनाचे लाडू केलेत…ते सुद्धा द्यायचे होते तिला…” नकुल ची आई म्हणाली.
इतक्यात नंदिनी मुग्धाला म्हणाली.
” इतक्या लवकर जाणार आहात का तुम्ही…अजुन तर आपण एकमेकांसोबत वेळ सुद्धा घालवला नाही…”
” पुढल्या वेळेला येईल तेव्हा नक्कीच…यावेळेला जरा जास्तच सुट्ट्या झाल्यात माझ्या…” मुग्धा म्हणाली.
थोडावेळ सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि मग मुग्धा घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी मुग्धा बेंगलोरला पुन्हा जायला निघाली. त्यानंतर नकुल आणि नंदिनी सुद्धा एकमेकांच्या सोबतीने नवीन आयुष्याच्या वळणावर होते. प्रेमा सोबतच एकमेकांच्या करिअर चा सुद्धा दोघे विचार करू लागले होते. नंदिनीचे कॉलेज पूर्ववत सुरू झाले होते आणि नकुल सुद्धा नोकरीत प्रगती करत होता.
इकडे सुजाता च्या सासरे बुवांनी तिला आणि तिच्या सासूला माहिती पडू न देता त्यांच्या नावावर असलेली सगळीच प्रॉपर्टी रेवाच्या नावाने केली. फक्त राहते घर त्यांच्या बायकोच्या म्हणजेच सुजाताच्या सासूबाईंच्या नावाने होते म्हणून ते तिच्या नावावर नाही करू शकले.
रवीच्या नावावर विशेष काही नव्हते पण त्याला घेऊन दिलेली तीन दुकाने मात्र होती. ती सुद्धा रेवा च्या नावावर नाही होऊ शकली. या सगळ्याने रेवा मात्र एकदम हवेत होती. आता तिला कशाचीही फिकीर नव्हती. आईने सुजाता चे लाड करू देत वा आणखी काही.
सगळी प्रॉपर्टी तर आपल्या जवळ आहे. आणि जे काही सध्या नावावर नाही ते बाबा काहीतरी करून उद्या आपल्यालाच देतील ह्याचा तिला विश्वास होता. ह्या सगळ्यांपासून अनभिज्ञ असलेली तिची आई मात्र रेवा आता सुजाताच्या बाबतीत नरमाईने वागते असा विचार करून खुश होत्या.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकर.
प्रॉपर्टी मिळाल्यावर रेवाचे समाधान होईल का…? पुढे चालून रेवा मुळे सुजातावर कोणते संकट तर नाही ना येणार…? सुजाता च्या सासरे बुवांवर आपल्या या निर्णयाने पश्चात्ताप करण्याची वेळ तर नाही ना येणार..? जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.