आणि स्वाती पुढचे पंधरा वीस मिनिटे नुसते बोलत होती. अंकिता किती वाईट वागली आहे आणि तिने यापुढे कसे वागावे ह्याचे नुसते उपदेश देत होती. अंकिता मात्र तिच्याशी एक शब्द देखील बोलली नव्हती. आजवर ज्या बहिणीने तिला जे मागितलं ते दिलं तिच्याबद्दल काहीबाही बोलताना स्वातीला जराही वाईट वाटत नाही ह्याच अंकिता ला नवल वाटत होतं. पण आज तिने ठरवले होते. आजपासून ती स्वतःसाठी जगेन. ती या घरातून कुठेतरी एखाद्या लेडीज हॉस्टेलला जाईल आणि तिथेच राहील. ज्यांना तिची काळजी आजी गरज दोन्हीही नव्हती उलट ते तिला आपल्या घरातील आश्रित समजायचे अशा लोकांसोबत आता तिला राहायचं नव्हतं. तिने कोणाशीही काहीही न बोलता आपली ऑफिस ची तयारी केली आणि ऑफिस ला निघून गेली.
ऑफिस मध्ये आल्यावर तिने जेव्हा आदित्य सरांना समोर पाहिले तेव्हा तिला आठवले की काल जेव्हा सचिन आणि सुजाता तिला बोलत होते तेव्हा आदित्य सर बाहेरच उभे होते. काल ती खूप दुःखात असल्याने तिला आदित्य सरांनी सर्व ऐकले असेल असा विचारच आला नव्हता. पण आज मात्र त्यांनी सर्व ऐकले असेल म्हणून ती त्यांना पाहून ओशाळली. त्यांना चुकवून ती तिच्या टेबलवर येऊन बसली. पण एकाच ऑफिस मध्ये काम करायचं म्हटल्यावर ती त्यांना किती वेळ टाळणार होती. इतक्यात आदित्य सरांच्या केबिन मधून तिच्या साठी बोलावणे आले आणि तिच्या काळजात धस्स झालं. ती भीतभीतच सरांच्या केबिन मध्ये गेली.
” मे आय कम इन सर…” तिने विचारले.
” या ना मिस अंकिता…”
” सर काही काम होतं…” तिने सरांकडे न बघताच विचारले.
” हो…मला माफ करा मिस अंकिता…माझ्यामुळे तुम्हाला नको ते ऐकून घ्यावं लागलं…माझा उद्देश तर फक्त तुमची मदत करण्याचा होता…” आदित्य सर जरा अपराधी पणे म्हणाले.
” नाही सर…ह्यात तुमची काही चुकी नाही…हे सर्व तर आधी पासूनच त्यांच्या मनात सुरू होतं…तुम्ही तर फक्त निमित्त ठरले आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे ते मला कळलं…उलट मी तर तुमचे आभार मानायला हवे कारण तुमच्यामुळेच मला त्यांच्या मनातलं कळलं…” अंकिता म्हणाली.
” म्हणजे…आणि तुम्ही आता पुढे काय करायचं ठरवलंय..” आदित्य सरांनी विचारलं.
” मी ठरवलंय की आता यापुढे स्वतःसाठी जगायचं…जे आपला विचार करत नाहीत आपणही त्यांचा विचार करायचा नाही…” अंकिता ठामपणे म्हणाली.
आणि अंकिता आदित्य सरांच्या केबिन मधून बाहेर निघून गेली.
अंकिता चे उत्तर ऐकून आदित्य सर मनातून आनंदले. आणि आपल्याबद्दल अंकिताच्या मनात नाराजी नाही हे सुद्धा त्यांना कळले.
संध्याकाळी जेव्हा अंकिता ऑफिस मधून घरी गेली तेव्हा स्वाती आणि सुजाता कधी नव्हे त्या पक्क्या मैत्रिणी सारख्या एकमेकींशी बोलत होत्या. अंकिता ने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि ती तिच्या रूम मध्ये निघून आली. आज ऑफिस ला जाताना तिने एका लेडीज हॉस्टेल ला भेट दिली होती. तिला ते हॉस्टेल राहण्यासाठी चांगले वाटले आणि तिने तिथे राहायला जायचे ठरवले होते. सकाळीच तिने सगळी फॉर्मलिटी पूर्ण केली होती. आणि उद्या सकाळी ती तिथे राहायला जाणार होती. तिने बॅग भरायला घेतली तेवढ्यातच घराचे गेट उघडल्याचा आवाज आला. यावेळी कोण आले असेल म्हणून ती बाहेर येऊन बघते तर आदित्य सर त्यांच्या आईसोबत आलेले होते. त्यांना पाहून अंकिताला आश्चर्य वाटले.
” सर…तुम्ही इथे..?…असे अचानक…म्हणजे न सांगताच…?” अंकिताने विचारले.
सुजाता आणि स्वाती ला सुद्धा आदित्य सरांच्या येण्याचे आश्चर्य वाटले होते. कारण त्यांनी अंकीतावर कितीही आरोप लावले तरी मनातून मात्र त्यांना माहिती होतं की दोघांमध्ये असे काहीच नाही. पण सुजाता ला अंकिता ला त्रास द्यायचा असल्याने तिने जाणूनबुजून ही अफवा पसरवली होती. आणि स्वातीला सुद्धा अंकिता चा स्वभाव माहिती होता पण तिनेही सख्ख्या मोठ्या बहिणीवर तोंडसुख घ्यायची संधी सोडली नव्हती. त्या दोघी विचारातच होत्या. इतक्यात आदित्य सर बोलले.
” हॅलो मिस अंकिता…मी अचानकपणे आलो कारण मला काही बोलायचं होतं… आणि ही माझी आई आहे…”आईची ओळख करून देत आदित्य म्हणाला.
अंकिताने आदित्य सरांच्या आईला दुरूनच हात जोडून नमस्कार केला आणि त्यांना घरात बसायला सांगितले. स्वाती आणि सुजाता ही नणंद भावजय ची जोडी त्यांना पाहून एकमेकींशी कुजबुजत होती. इतक्यात सचिन सुद्धा घरी आला. अंकिता ने किचन मध्ये जाऊन त्या दोघांसाठी पाणी आणले. आणि वेळ न दवडता आदित्य सरांनी बोलायला सुरुवात केली.
” खरंतर मला हे इतक्यात बोलायचे नव्हते…आणि अशा पद्धतीने तर अजिबात बोलायचे नव्हते…पण मिस अंकिता…मला तुमच्याशी लग्न करायचे आहे…तुम्ही करणार का माझ्याशी लग्न…”
अंकिता साठी हे सर्व खूप अनपेक्षित होते. तिने तिच्या लग्नाची आशा सुद्धा सोडून दिली होती. तिच्या मनात आदित्य सरांबद्दल तशा भावना ही नव्हत्या. आदित्य सर असे काही बोलतील ह्याचा तिने विचार सुद्धा केला नव्हता. ती क्षणभर स्तब्ध झाली. तिची मनस्थिती ओळखून आदित्य सर म्हणाले.
” काय झालं मिस अंकिता…मी तुम्हाला लग्नाबद्दल विचारलेले तुम्हाला आवडले नाही का..?”
” तसे नाही…पण तुम्हाला माझ्याबद्दल अजुन काही माहिती नाही…तुम्ही मला नीट ओळखत सुद्धा नाही…” अंकिता म्हणाली.
” मला तुमच्याबद्दल सर्व काही माहिती आहे…तुमच्या वडिलांच्या निधनानंतर तुम्ही की कष्टाने घरकामात आईला मदत केली आणि सोबत जिद्दीने अभ्यास सुद्धा केला…चांगली नोकरी मिळवली…त्यानंतर तुमची आई गेली…आणि तुमच्या दोन लहान बहीण भावांना तुम्ही सांभाळले…त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या सुखाचा सुद्धा विचार केला नाही…इतकी निस्वार्थ आणि कष्टाळू मुलगी मला लग्नासाठी कुठे मिळेल…” आदित्य म्हणाला.
” पण मी बत्तीस वर्षांची आहे… माझं लग्नाचं वय निघून गेलं…” अंकिता म्हणाली.
” मी पस्तीस वर्षांचा आहे…म्हणून काय मी लग्नाचा विचार करू नये का…अहो बत्तीसाव्या वर्षी पहिलं लग्न करणारेही खूप आहेत…आणि आयुष्यात जोडीदार मिळवायला वयाची अट कशाला हवी…दोघांची मने जुळली की मग वय कितीही असले तरी काही फरक नाही पडत…” आदित्य म्हणाला.
” पण तुम्ही माझ्यावर दया आली म्हणून तर माझ्याशी लग्न करू इच्छित नाही ना…” अंकिता म्हणाली.
” नाही…तुम्हाला पाहिलं त्या दिवशीपासून मी तुमच्या प्रेमात पडलो होतो…पण मला ते नंतर कळलं…तुमचा साधा सरळ स्वभाव…कामाच्या बाबतीत प्रामाणिक असणे…हे सगळं मला आवडायचं…मी तुमच्याबद्दल माझ्या आईलाही सर्व काही आधीच सांगून ठेवलं होतं…चांगली संधी पाहून तुम्हाला लग्नाबद्दल विचारणारच होतो…पण काल अनपेक्षित पणे ते सर्व घडून आले आणि मला या पद्धतीने तुम्हाला विचारावे लागले…”
” पण तुम्ही आज माझ्याशी ऑफिसमध्ये बोललात तेव्हा मला ह्याबद्दल काहीच सांगितले नाही…”
” कारण मी आज हे ऑफिसमध्येच विचारले असते तर तुम्हाला वाटले असते की कालच्या प्रकारामुळे मी तुम्हाला लग्नाची मागणी घालतोय…म्हणून मी आधी तुमची माफी मागितली…पण तुम्ही माझ्यावर नाराज नव्हता म्हणून विचार केला की आता आणखी वेळ नको दवडायला…” आदित्य म्हणाला.
” हो बाळा…आदित्य ला मी आजपर्यंत अनेक मुली दाखवल्या लग्नासाठी…पण हा मात्र टाळत राहिला…पण तुला मात्र ह्याने स्वतःच पसंत केले…आणि त्याची पसंती मलाही खूप आवडली आहे…तू माझ्या घरची सून झाली तर मला खूप आवडेल…” आदित्यची आई म्हणाली.
अंकिताला मात्र काय करावे ते कळत नव्हते. तिचा नात्यांवरील विश्वास उडाला होता आणि आजच तिला एक नवीन नाते खुणावत होते.
सुजाता, सचिन आणि स्वाती मात्र हे पाहून ओशाळले होते. अंकिता ला इतका चांगला नवरा मिळेल ह्याची तर त्यांनी कल्पना सुद्धा केली नव्हती. अंकिता चे लग्न झाले तर तिचा आजवर आपल्याला मिळणारा पगार मिळणार नाही ह्याची उशिरा का होईना पण सुजाता आणि स्वातीला जाणीव झाली होती. स्वाती ने आदित्य सरांना नकार द्यावा ह्यासाठी त्यांनी मनोमन देवाची प्रार्थना सुरू केली होती.
अंकिता विचारातच होती इतक्यात आदित्य म्हणाला…
” तू नकार दिलास तर मला वाईट वाटेल असा विचार करून मला होकार देऊ नकोस…माझी इच्छा आहे की तू यापुढे फक्त स्वतःचा विचार करावा…तुला मी लग्नासाठी पसंत असेल तरच मला होकार दे…”
आदित्य चे बोलणे ऐकून अंकिता ला जाणीव झाली की आदित्य खरोखर तिच्या मनाचा विचार करतो. तिने ठरवले की आता स्वतःला एक दुसरी संधी द्यावी. मागचं सर्व विसरून पुन्हा एकदा नव्याने, स्वतःसाठी जगावं…आणि ती आदित्य ला म्हणाली.
” मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे…”
आदित्य ला आणि त्याच्या आईला खूप आनंद झाला. स्वाती आणि सुजाता ने त्यांच्या चुकीबद्दल अंकिता ची माफी मागितली आणि हे घर सोडून जाऊ नको म्हणून विनवले. पण अंकिता ने यावेळी त्यांचे काहीच ऐकले नाही. आणि दोन दिवसांनी आदित्य आणि अंकिता ने साध्या पद्धतीने मंदिरात लग्न केले.
आदित्यने अंकिता वर मनापासून प्रेम केले होते आणि हळूहळू अंकिता सुद्धा आदित्यच्या प्रेमात पडली. आणि दोघांचा राजा राणीचा संसार सुरू झाला. तिच्या माहेरच्यांना मात्र नंतर तिला दुखावण्याचे दुःख झाले. पण ते तिचा पगार मिळणे बंद झाल्याचे होते की त्यांना खरंच त्यांच्या चुकांची जाणीव झाल्याचे होते ते त्यांनाच माहीत.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.
Khup chaan katha 👌👌