गिरिजा काकूंच्या दोन्ही मुलांची मल्हार आणि केदार ची लग्न एकाच दिवशी ठरवली होती. घरी पाहुण्यांचे आगमन झालेले होते. गिरिजा काकू स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होत्या. दोन्ही सुनांना द्यायचे कपडे, दागिने त्यांनी स्वतः पसंत केले होते.
पण त्यांनी मुद्दामहून त्यांच्या मोठ्या सुनेसाठी हलक्या प्रतीच्या गोष्टी घेतल्या होत्या. त्यामानाने लहान सूनेसाठी सगळ्या महाग गोष्टी घेतल्या होत्या. ह्याला कारण म्हणजे त्यांची लहान सून कल्याणी ही त्यांची पसंत होती, पण मोठी सून मानसी ही मात्र त्यांना मल्हार साठी पसंत नव्हती.
कल्याणी श्रीमंत घरातील मुलगी होती. आणि मानसी एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती. गिरिजा काकूंच्या मुलाने आणि नवऱ्याने मानसीला पसंत केले होते. आणि गिरिजा काकू मात्र त्यांच्या पुढे काहीच बोलू शकला नाहीत. शिवाय मल्हारला देखील मानसी पहिल्याच नजरेत पसंत आल्याने त्यांचा नाईलाज झाला.
पण लहान मुलासाठी मात्र त्यांनी चांगली तोलामोलाची स्थळं बघून कल्याणीला पसंत केले. आणि म्हणूनच त्यांनी कल्याणीला महागातल्या वस्तू घेतल्या तर मानसीला तिच्या मानाने हलक्या प्रतीच्या वस्तू घेतल्या.
गिरिजा काकूंनी आतापासूनच दोन्ही सुनांमध्ये फरक करणे सुरू केले होते. श्रीमंत घरची होती म्हणून कल्याणी त्यांची आवडती होती. आणि मानसी मात्र त्यांना नाईलाजाने गळ्यात पडल्यासारखी वाटत होती. त्यांनी लग्नाच्या आधीपासूनच मानसी बद्दल मनात पूर्वग्रह ठेवला होता.
दोन्ही लग्न थाटामाटात पार पडले. गिरिजा काकूंच्या दोन्ही सूना घरी आल्या. गिरिजा काकूंनी आपल्याला कल्याणीच्या मानाने स्वस्त वस्तु दिल्यात हे मानसीच्या लक्षात आले होते. पण मुळात कोणत्याही गोष्टीवर संतोष मानणाऱ्या मानसीला ह्याचे जास्त वाईट वाटले नाही. मानसी मुळातच समजदार होती. घरकामात निपुण आणि स्वभावाने साधी होती. पण याउलट कल्याणी स्वभावाने गर्विष्ठ आणि कामात आळशी होती.
गिरिजा काकूंनी आता घरकामातून हात काढून घेतला होता. घरातील कामांची जबाबदारी सूनांवर टाकून त्या आता निवांत झाल्या होत्या. मानसीने घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली होती.
पण कल्याणी मात्र तिला घरकामात अजिबात मदत करायची नाही. पूर्णवेळ फक्त आपल्या रूम मध्ये बसून राहायची. आणि मानसीने घरातील सर्व कामे उरकली की मगच बाहेर निघायची. सासुशी गोड गोड बोलायची.
सासूबाईंना देखील माहिती होते की घरातील सर्व कामे एकटी मानसी करते म्हणून. पण त्यांना वाटायचं की मानसीला घरातील कामे करायची सवयच आहे. पण कल्याणी लाडाकोडात वाढलेली असल्याने तिला कामांची सवय नसेल म्हणून त्यांनी नेहमी त्याकडे दुर्लक्ष केले.
त्या सतत कल्याणीचे कौतुक करायच्या. मानसीच्या नशिबात मात्र सासूबाईंचे कौतुक नव्हते. एखाद्या चांगल्या गोष्टीवर त्यांनी कधीच तिची पाठ थोपटली नाही उलट तिच्याकडून कामात एखादी छोटीशी जरी चूक झाली तर कल्याणी समोरच तिचा पाणउतारा करायच्या. आणि सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेवत कल्याणी सुद्धा मानसीच्या लहानसहान गोष्टींमध्ये चुका काढायला लागली होती.
कल्याणीवर आपल्या सासूबाईंच्या विशेष मर्जी आहे हे एव्हाना मानसीला समजले होते. त्यामुळे ती गुपचूप सर्व काही ऐकुन घ्यायची. तिला वाटायचे की हे सर्व मल्हारला सांगितले तर उगाच घरी वाद होतील. म्हणून तिने मल्हारला ह्यातील काहीही सांगितले नाही. मल्हार मात्र सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा त्यामुळे त्याला ह्यातलं काही माहिती नव्हतं.
मानसी सर्वकाही ऐकुन घेते हे पाहून कल्याणी तिला आणखीनच राबवून घ्यायची. आता कल्याणी सकाळचा चहा सुद्धा तिच्याकडून रूम मध्ये मागवून घ्यायची. मानसी सुद्धा सर्वकाही विनातक्रार करायची.
एकदा मात्र मल्हारची तब्येत बिघडली म्हणून त्याने दोन तीन दिवसांची सुट्टी घेतली आणि घरीच थांबला. त्याला वाटलं ह्याच बहाण्याने मानसी बरोबर जास्त वेळ घालवता येईल. पण मानसी मात्र दिवसभर कामातच होती. मल्हार ने बघितले की घरात फक्त मानसीच एकटी काम करत होती. अगदी कल्याणी ला तिच्या रूम मध्ये चहा नेऊन दिल्यापासून दोन्ही वेळचा स्वयंपाक देखील तीच करायची. घरात पाहुणे आले की कल्याणी पाहुण्यां सोबत बोलत बसायची पण मानसी मात्र पाहुण्यांसाठी चहा नाश्ता करायला किचन मध्येच असायची.
एकदा मल्हार आणि गिरिजा काकू हॉल मध्ये बसलेले होते. आणि मानसी स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती. इतक्यात कल्याणी हॉल मध्ये येऊन सोफ्यावर बसली आणि दुरूनच मानसीला आवाज दिला..
” वहिनी…जरा एक ग्लास निंबुपानी करून देता का…?”
” हो आणतेच…” मानसी किचन मधूनच म्हणाली.
मानसी कामात आहे हे पाहून मल्हार कल्याणीला म्हणाला.
” मानसी जरा कामात आहे…तू स्वतःच कर ना निंबु पाणी…”
” एक ग्लास निंबू पाणी केल्याने काही हात नाहीत तुटणार तुझ्या बायकोचे…” गिरिजा काकू म्हणाल्या.
” पण आई…गेले दोन तीन दिवस मी बघतोय…तिला सकाळपासून खूप काम असतात…आणि सर्वांना चहापासून जेवणापर्यंत सर्वकाही हातात देते मानसी…मग हिला निदान स्वतःसाठी निंबुपाणी तर करताच येईल ना…” मल्हार म्हणाला.
” पण कल्याणीला सवय नाही घरची कामे करायची…तिच्या घरी असल्या कामांना नोकर होते…पण मानसीला सर्व कामांची सवय आहे…” गिरिजा काकू म्हणाल्या.
” पण हे चुकीचे आहे ना आई…आपल्या पेक्षा लहान घरातून आली म्हणून काय झाले…मानसी ह्या घरची मोठी सून आहे…माझी बायको आहे…नोकर नाही…तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या कल्याणीने तिला कामांची ऑर्डर देणे बरोबर आहे का..” मल्हार म्हणाला.
” काही फरक नाही पडत…तिला आहे कामाची सवय…” गिरिजा काकू म्हणाल्या.
” नाही आई…घरातील कामे सर्वांनी मिळून करायची असतात…सगळी कामे माझी बायको एकटीच करणार नाही…फक्त एका गरीब घरातून आलीय म्हणून माझ्यासमोर माझ्या बायकोला कामाच्या ऑर्डर दिलेल्या मला सहन होणार नाहीत…” मल्हार म्हणाला.
” ह्या घरात राहायचे असेल तर तिला घरातील सर्व कामे करावीच लागतील…नाहीतर तुझ्या बायकोला घेऊन वेगळं राहा…” गिरिजा काकू रागाने म्हणाल्या.
गिरिजा काकूंना वाटले की आपल्या असे म्हटल्याने मल्हार गप्प बसेल आणि पुन्हा ह्या विषयावर काही बोलणार नाही. पण आईचे बोलणे मल्हारच्या जिव्हारी लागले. त्याने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मानसीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने मानसीचे सुद्धा काहीच ऐकले नाही.
मानसी आणि मल्हार आता वेगळ्या घरात राहायला गेले होते. इकडे घरी मात्र गिरिजा काकू आणि कल्याणी दोघीच होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिजा काकू उठल्या तेव्हा बराच वेळ झाला तरीही चहा मिळाला नाही म्हणून त्या किचन मध्ये गेल्या तर कल्याणी अजुन उठलीही नव्हती.
त्या कल्याणीच्या रूम मध्ये गेल्या आणि म्हणाल्या.
” कल्याणी…उठ आणि केदार आणि आमच्यासाठी चहा बनव…”
” आई…मला चहा नीट बनवता येत नाही…मी आवरून येते…तोपर्यंत तुम्हीच चहा बनवता का…?”
कल्याणी चे बोलणे ऐकुन गिरिजा काकूंना राग आला पण तरीही त्या तिला काहीही न बोलता चहा करायला निघून गेल्या. मानसी आल्यापासून त्यांनी किचन मध्ये पाय सुद्धा ठेवला नव्हता. त्यांना मानसीच्या हातच्या चहाची आठवण येऊ लागली.
त्यानंतर नाश्ता आणी जेवणाच्या बाबतीत सुद्धा कल्याणीने तेच केले. आता गिरिजा काकूंना स्वतःच किचन सांभाळावे लागत होते. कल्याणी थोडीफार मदत करायची पण तेवढीच चिडचिड सुद्धा करायची. तिचा चांगुलपणाचा मुखवटा हळूहळू उतरू लागला होता. आणि तिच्या गोड बोलण्याची जागा आता उद्धटपणाने घेतली होती.
हळूहळू गिरिजा काकूंना मानसी आणि कल्याणी मधील फरक लक्षात येत होता. मानसी किती गुणी पोर होती हे त्यांना आता कळून चुकले होते. आपण केवळ श्रीमंतीला भुललो आणि चांगल्या सुनेची काहीच किंमत केली नाही हे त्यांच्या लक्षात येत होते. माणसांची किंमत त्यांच्या श्रीमंती पेक्षा त्यांच्या गुणांनी करावी हे त्यांना कळून चुकले होते.
पण मानसी घरून निघून गेल्यावर त्यांना मानसी ची किंमत कळली होती. .
त्यांनी मानसीची भेट घेऊन तिची माफी मागितली आणि तिला पुन्हा एकदा घरी चल म्हणून आग्रह केला. मानसी आणि मल्हार सुद्धा जुने सर्वकाही विसरून घरी परत आले. त्यानंतर मात्र गिरिजा काकूंनी त्यांच्या दोन्ही सूनांमध्ये अजिबात फरक केला नाही.
समाप्त.
फोटो – साभार गूगल
©®आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.
अगदि छोटी आहे पण बोधपर छान कथा आहे
आवडलीू
अतिशय सूंदर बोध घेण्यासाठी छान लेखका चे धन्यवाद🙏💕