मनीषा घरी आली. तिने घरी आल्यावर कपडे बदलले आणि पुन्हा रात्रीचा स्वयंपाक करायचा म्हणून स्वयंपाकघरात गेली. सासुबाई हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यांनी मनिषाकडे पाहिले पण मनीषाने मात्र त्यांच्याकडे पाहिलेच नाही. काम करताना सुद्धा मनिषाच्या मनात साठे काकूंचे बोलणे घुमत होते.
मनीषा अगदीच रडवेली झाली होती. आपण सगळ्यांची इतकी सेवा करतो. कधीच कुठल्या तक्रारीला जागा ठेवली नाही. सासूबाईंनी पण कधीच आपल्याला काही बोलून दाखवले नाही. पण नेमके बाहेरच्या लोकांना हे सगळे का म्हणून सांगावे. ते ही सर्व चुकीचे. तिच्याच मनाला प्रश्न पडला होता.
इतक्यात सुधीर यायची वेळ झाली होती. आणि सासुबाई किचन मध्ये आल्या. त्या मनिषाला पाहून म्हणाल्या.
” काय ग…झाला का स्वयंपाक…?”
” हो…” मनीषा फक्त एवढेच म्हणाली.
आणि सासुबाई घरातील छोटासा खलबत्ता घेऊन त्यात दोन चार भाजलेल्या मिरच्या टाकून कुटायला लागल्या. त्यांना पाहून मनीषा म्हणाली.
” आई…तुम्ही काय करताय…?”
” मिरचीचा ठेचा करतेय अगं…” सासुबाई म्हणाल्या.
” पण दुपारीच तर ठेचा केला होता ना मी…आणि काल रात्री तुम्ही केलेला ठेचा सुद्धा फ्रीज मध्ये ठेवलेला आहे…मग परत कशाला…? शिवाय तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतोय ना आज…” मनीषाने विचारले.
” मला आवडतो ताजा ठेचा…आणि गुडघे बरे आहेत आता…” सासुबाई म्हणाल्या.
मनिषाला वाटले की सासूबाईंना एकदा म्हणावे की ताजा ठेचा हवा असेल तर मग रोज इतका मोठा ठेचा करून कशाला ठेवायचा. पण ती काहीच बोलली नाही. सासुबाई बरोबर या वेळेला किचन मध्ये जाऊन ठेचा करायला बसायच्या. पण खायच्या मात्र अगदीच थोडका. मनिषाला नवल वाटायचे. कारण इतर कुठल्याही गोष्टीत सासुबाई कधीच मदत नाहीत करायच्या. फक्त रात्रीच्या जेवणासाठी ठेचा मात्र रोज रात्री कुटायच्या.
मनीषा ने सासूबाईंना जास्त लक्ष न देता गॅसचा ओटा पुसून घेतला. स्वयंपाकघरात इतका वेळ उभी असल्याने घामाघूम झालेली मनीषा जरा चेहऱ्यावर पाणी घ्यावे म्हणून बाथरूम मध्ये गेली. इतक्यात सुधीर घरी आला. सासूबाईंचे ठेचा कुटणे अजुन सुरूच होते. ‘ आज बहुतेक मिरच्यांचा जीव घेणार ह्या ‘ मनीषाने मनातल्या मनात म्हटले.
सुधीरने आईला पाहिले आणि तो लगेच आईजवळ जाऊन म्हणाला.
” आई…अग तुला बरं वाटत नाहीये ना…मग कशाला पुन्हा काम करत आहेस…तुला आरामाची गरज आहे…तू काळजी करू नकोस…की बोलतो आज मनीषा सोबत…ही काय वागायची पद्धत झाली का…या वयात सुद्धा तुला सगळीच कामे करावी लागतात म्हणजे काय…” सुधीर म्हणाला.
” तू काही बोलू नकोस तिच्याशी…अरे अजुन तिला घरात येऊन असा कितीसा काळ झाला आहे…नवीन नवीन लग्न झालंय ना तुमचं…जरा वेळ लागेल तिला घरात रुळायला…अन् रोज कुठे मी इतके काम करते…रोज सुमेधा असतेच की माझ्या मदतीला…फक्त आज ती काकू कडे गेली आहे म्हणून थोडं जास्त झालं…बाकी काही नाही…” सासुबाई म्हणाल्या.
हे सगळं बोलणं नुकतीच रूम च्या बाहेर निघत असलेल्या मनिषाला ऐकू गेले. ती क्षणभर तिथेच थांबली. सासुबाई सुधीरला खोटं का सांगत आहेत हे तिला कळत नव्हते. साठे काकूंच्या बोलण्याचा अर्थ आता तिला हळूहळू उमजत होता. ती तिथेच थांबून सासुबाई आणि सुधीर मधला संवाद ऐकू लागली.
सुधीर पुढे म्हणाला…
” नाही आई…तू किती दिवस अशी तिला काहीही बोलणार नाही आहेस…तिला तिची जबाबदारी कळत नसेल तर आपल्याला तिला समजाऊन सांगावेच लागेल ना…तू स्वतःही काही बोलत नाहीस आणि मलाही शपथा देऊन गप्प करतेस…पण फार दिवस मी गप्प राहणार नाही आई…”
” अरे तू उगीच काळजी करत आहेस…मनीषा चांगली मुलगी आहे…फक्त अजूनही ती तिच्या माहेरच्या लोकांमध्ये गुंतली आहे इतकंच…हे घर आपलंसं करायला थोडा वेळ लागेल तिला…नाहीतर मी स्वतःच सांगेल तिला समजाऊन…तू काही बोलू नकोस तिला…तू तिला आता जाऊन जाब विचारला तर तिला वाटेल की मी आणि सुमेधा तुम्हा दोघात भांडण लावत आहे आणि मग ती आमचा राग करू लागेल…तुला तर माहिती आहे ना सुमेधाचा संसार आधीच मोडलेला आहे…आणि मनीषा ने तिला काही बोलले तर उगीच तिला वाईट वाटेल…” सासुबाई साळसूदपणे म्हणाल्या.
” अशी कशी ती काही बोलेल माझ्या बहिणीला…एरव्ही तू म्हणतेस म्हणून मी तिला काही म्हटले नाही…पण तिने सुमेधाबद्दल काही बोललेले मी सहन करणार नाही आई…आताच सांगून ठेवतोय…” सुधीर म्हणाला. आणि त्याच्या रूममध्ये जायला लागला.
तो रूम मध्ये येत आहे हे लक्षात येताच मनीषाने काहीही ऐकलेलेच नाहीय असे दाखवत रूम मधून बाहेर यायला लागली. तिने सुधिरकडे पाहिले तर तो सुद्धा तिच्याकडे जरा रागाने पाहत होता. तो फ्रेश व्हायला गेला आणि इकडे मनिषाला रडू कोसळले. अनेक दिवसांपासून तिच्या आणि सुधीर मध्ये सुसंवाद होत नव्हता.
सुरुवातीला मनमोकळेपणाने वागणारा तो आजकाल तिच्याशी जरा तोडून वागत होता. त्याने काही बोलून दाखवले नव्हते म्हणून मनिषाला वाटले की कामाचा ताण असल्याने तो असा वागत असेल. पण आज तिला सगळ्याच गोष्टींचा अर्थ कळत होता. बरोबर सुधीर घरी यायच्या वेळेला त्या किचन मध्ये येऊन ठेचा का बनवायच्या ते सुद्धा तिला कळले.
आपण किचन मध्ये काम करतोय हे सुधीरला कळावे म्हणूनच बरोबर तो यायच्या वेळेला त्या किचन मध्ये यायच्या. सासूबाईंनी जाणीवपूर्वक सुधीरच्या आणि शेजाऱ्यांच्या मनात मनिषाबद्दल गैरसमज पसरवला होता. पण घरातील सगळं काही इतकं चांगलं सुरू असताना सासुबाई अशा का वागत असतील हे तिला कळत नव्हते.
सासुबाई जाणूनबुजून मनिषाला सुधीर आणि बाकीच्यांसमोर कमी लेखायच्या. तिला सुधीरच्या नजरेत पाडत होत्या. आणि स्वतः मात्र तिच्याशी अगदीच गोड वागायच्या. जणू काही झालेलेच नाही अशा. सुमेधा सुद्धा सासूबाईंना चांगल्या प्रकारे सामील होती. आपली आई वहिणीबद्दल काय विचार करते हे तिला ठाऊक होते. ती सुद्धा वेळोवेळी इतरांसमोर ‘आज ना बाई खूप काम होते ‘ असे बोलून दाखवायची.
सुमेधा सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते कामातच असायची. घरातील नेहमीचे काम तर करायचीच. पण दुपारी सुद्धा काही ना काही उद्योग सुरूच असायचे तिचे. कधी घरासाठी वाती बनवायची. कधी वाळवण तर कधी काय. सासुबाई सुद्धा रोज तिच्यासाठी नवनवीन काम तयारच ठेवायच्या.
आधी गव्हाचे तयार पीठ आणणाऱ्या सासुबाई ती आल्यापासून सासुबाई घरात गहू मागवायच्या. मग ते गहू निसण्यापासून इतर सगळीच कामे सूमेधा काहीही तक्रार न करता करायची. हल्ली तिच्या आईशी तर दोन तीन दिवसांआड बोलणे व्हायचे. आपली लेक संसारात रमतेय हे पाहून सुमेधाची आई सुद्धा स्वतःहून जास्त फोन करायची नाही. पण सासूबाईंनी तिच्याबद्दल जे इतरांना सांगितले होते त्यावरून फक्त तिच्याच नाही तर तिच्या माहेरच्या लोकांबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत होते.
बरं तिच्याशी वागताना सासुबाई अगदी चांगल्या वागायच्या. मग बाहेरच्यां समोर तिची अशी प्रतिमा का तयार करत आहेत हे कळत नव्हते. तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि किचन मध्ये जाऊन जेवण डायनिंग टेबलवर नेऊन ठेवायला लागली. सुधीर फ्रेश होऊन जेवायला आला.
इतक्यात सुमेधा सुद्धा काकूंच्या घरून परतली. ती काकूंच्या घरूनच जेवण करून आल्याने तशीच रूम मध्ये गेली. सासुबाई आणि सुधीर जेवायला बसले. पण मनीषा मात्र बसली नव्हती. सासुबाई तिला म्हणाल्या.
” मनीषा…अग तू पण ये ना जेवायला…”
” नाही आई…तुम्ही जेवण करा…मला भूक नाहीये…” मनीषा म्हणाली.
” अगं थोडं तरी जेव…आमच्या सोबत बस जरा…” सासुबाई म्हणाल्या. त्यावर सुधीर म्हणाला.
” राहूदे आई…तिला नसेल भूक तर कशाला उगाच आग्रह करत आहेस…तू जेव…”
त्यावर आई काहीच बोलली नाही. सगळ्यांचे जेवण झाले आणि मनीषा ने सगळी आवरा आवर करायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग सासुबाई सुद्धा किचन मध्ये आल्या मनिषाला काही सूचना देऊ लागल्या. सुधीर तिथेच हॉल मध्ये मोबाइल बघत बसला. मनिषाला सासूबाईंचे वागणे आता चांगलेच कळू लागले होते.
मनिषाला तर एका क्षणी असे वाटले की सासूबाईंच्या समोर जाऊन त्यांना चांगलाच जाब विचारावा. आणि सुधीर समोर सगळा सोक्षमोक्ष लावावा. पण तिला हे सुद्धा चांगलेच माहिती होते की सुधीर काहीही झालं तरी आईचीच बाजू घेणार म्हणून. सुधीर मनिषाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही.
त्यांना मनीषापेक्षा जास्त विश्वास आईवर असेल हे तर स्पष्टच होते. शिवाय मनीषाने हे सगळेच अगदीच विचार करून निस्तरायचे ठरवले. जेणेकरून सासुबाई आणि नणंदबाईंना त्यांची चूक सुद्धा कळेल आणि सुधीरला सुद्धा काही समजाऊन सांगायची गरज पडणार नाही.
क्रमशः
मनीषा पुढे नक्की काय करणार आहे…? सासूबाईंना त्यांची चूक कळेल का…? सुधीरला सत्य परिस्थिती कळेल का…? हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका. पुढील भाग उद्या प्रकाशित करण्यात येईल…
©® आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.
भाग ४ लवकर पोस्ट करा. सून कसा धडा शिकवणार ,ते कळून घ्यायची इच्छा आहे.
मला तुमच्या कथा खूप आवडतात.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
खूप खूप धन्यवाद 😊🙏
When will be releasing nexr part
We are immensely waiting for it
Feeling Very positive after reading all parts
Thanks for this treat
Keep writing
Thank you so much 😊