निशांत मनापासून वाट पाहत होता सुमेधाच्या घरी येण्याची. सुमेधाचा राग सुद्धा हळूहळू शांत होत होता. तिच्या मनात यायचे की सगळे काही विसरून पुन्हा एकदा निशांतच्या घरी जावे. पण वृंदाताई तिला नेहमीच म्हणायच्या की इतके दिवस वाट पाहिली आहेस तर दोन चार दिवस आणखी वाट पहा. निशांतराव सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करतील म्हणून.
अशातच सुमेधाला तिसरा महिना लागला. आणि जे व्हायला नको होते तेच झाले. अचानक सुमेधाच्या पोटात दुखायला लागले. वृंदाताईंनी लगेच सुमेधाला दवाखान्यात दाखल केले. आणि डॉक्टरांनी सांगितले की सुमेधाच्या पोटातील ग’र्भ पोटातच गेला. इतक्या दिवसात सुमेधाला पोटातील बाळाचा लळा लागला होता.
तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण त्याहून मोठा धक्का होता निशांतसाठी. निशांतला वाटले होते की आपण आईला वृद्धाश्रमात पाठवले नाही म्हणून सुमेधाने स्वतःहून अबो’र्शन करून घेतले आहे. तो सुमेधाला हॉस्पिटल मध्ये भेटायला आला तेव्हा त्याने सुमेधावर बाळाला मारण्याचा आरोप केला.
सुमेधाने त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच ऐकले नाही. त्याच्या आईची तब्येत सुद्धा पुन्हा खालावली होती. निशांतला असता सुमेधाचे तोंडही बघायची इच्छा राहिली नव्हती. निशांतने सुमेधाला घ’टस्फो’टाची नोटीस पाठवली. सुमेधाला सुद्धा माहिती होते की निशांत तिच्यावर आता पुन्हा कधीही विश्वास ठेवू शकणार नाही. तिला माफ करू शकणार नाही. ना पुन्हा तिच्यावर कधी प्रेम करू शकेल.
मग तिनेही जास्त आढेवेढे न घेता त्याला घ’टस्फो’ट देऊन टाकला. त्यावेळी सुधीर नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात राहत असल्याने त्याला जे झाले त्याची काही कल्पना होती. त्याला त्याच्या आईने फक्त इतकेच सांगितले होते की निशांतची आई सुमेधाला खूप त्रास देते म्हणून सुमेधाचा घ’टस्फो’ट झालाय म्हणून. सुधीरचे सुद्धा आपल्या बहिणीवर खूप प्रेम होते.
आई आणि बहिणीला आधार व्हावा म्हणून त्याने खूप प्रयत्न करून स्वतःच्या शहरात बदली करून घेतली. सुधीरचे सुद्धा लग्नाचे वय झाले होते. म्हणून मग त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली. आपल्याला वरचढ आणि डोईजड होणारी मुलगी सून म्हणून नको होती म्हणून वृंदा ताईंनी एका गरीब घरातील मुलीला मनिषाला स्वतःची सून करून आणले होते. जेणेकरून ती नेहमीच त्यांच्या हाताखाली राहील.
शिवाय निशांतने जेव्हा त्यांना म्हटले होते की तुम्हालाही एक मुलगा आहे. त्याची बायको जेव्हा तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवा म्हणून हट्ट करेल तेव्हा तुम्ही काय कराल. ते बोलणे सतत वृंदाताईंच्या डोक्यात घुमत असे. म्हणून मग त्यांनी ठरवले होते. मनीषा आणि सुधीरमध्ये नेहमीच गैरसमज निर्माण करायचे. सुधीरचे आई आणि बहिणीवर खूप प्रेम होते. तो आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल हे माहिती असल्याने त्यांनी मनीषाबद्दल त्याचे कान भरणे सुरू केले होते.
सुमेधाच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगानंतर तिचा स्वभाव अजूनच कटू बनला होता. त्यातच वृंदा ताईंची तिला शिकवणी सुरूच होती. घरावर वहिनीचे वर्चस्व वाढले तर आपल्याला घरात किंमत राहणार नाही हे वृंदाताईंनी तिच्या मनात ठासून भरले होते. मग ती सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाली होती.
पण मनीषा मात्र हुशार निघाली. तिने तिच्या हुशारीने सासूबाईंना त्यांची चूक लक्षात आणून दिली होती. सासूबाईंना आपल्या चुका लक्षात यायला लागल्या होत्या. आणि मनीषाने सुमेधाच्या लग्नाचा विषय काढल्याने झालेले सर्व प्रसंग सुमेधा च्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले होते.
सुमेधाला आपली चूक लक्षात आली होती. आपण आईचे जरा अतीच ऐकले म्हणून आपला संसार तर मोडलाच पण आपल्या दादाचा संसार सुद्धा आपण मोडायला निघालो होतो ह्याचे तिला वाईट वाटले. आजवर तिच्या आयुष्यात जे झाले ते तर तो बदलू शकणार नव्हती. पण तिच्या वहिनीची माफी मागून एक नवीन सुरुवात नक्कीच करू शकणार होती.
ठरवल्या प्रमाणे सुमेधा दुसऱ्या दिवशी सकाळीच उठली. तिच्या अपेक्षे प्रमाणे मनीषा सुद्धा उठून कामाला लागली होती. मनीषा किचन मध्ये काम करत असताना सुमेधा तिच्या जवळ गेली आणि म्हणाली.
” वहिनी…”
” सुमेधाताई…आज इतक्या लवकर कशा काय उठलात…काही हवं होतं का…?” मनीषाने जरा खोचकपणेच विचारले.
” हो वहिनी…मला काहीतरी हवं आहे तुझ्याकडून…” सुमेधा म्हणाली.
” काय…?” मनीषाने आश्चर्याने विचारले.
” मला तुझी माफी हवी आहे…मी खूप चुकीची वागले तुझ्याशी…तुला गृहीत धरत आले…स्वतःच लहानात लहान काम मी तुझ्याकडुन करून घेतले…माझं खरंच चुकलं…मला माफ कर…” हे बोलताना सुमेधाच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता.
आता मात्र मनीषा सुमेधाला अशा पद्धतीने माफी मागताना पाहून म्हणाली.
” जाऊद्या ताई…जे झालं त्याचा जास्त विचार नका करू… मी सुद्धा सगळं काही विसरायचं ठरवलं आहे…आता आपण त्या गोष्टीबद्दल जास्त न बोललेले बरे…” मनीषा म्हणाली.
मनीषा आपल्याला इतक्या सहज सहजी माफ करेल अशी अपेक्षा नसलेल्या सुमेधाला मनीषाचे फार कौतुक वाटले. तिच्या मनात नकळतच एक विचार तरळून गेला. तिला वाटले की हीच्यासारखे सहनशील आपणही असतो तर आपला संसार देखील आज तुटला नसता.
पण आता हा विचार करून देखील काहीच फायदा नव्हता. तिने आपल्या डोळ्यात आलेले पाणी बोटाने अलगद टिपले आणि किचन मधून बाहेर जायला लागली. इतक्यात वहिनीच्या हातचे भांडे खाली पडून जोराचा आवाज झाला. सुमेधा ने मागे वळून पाहिले तर मनीषाला चक्कर येत होती. सुमेधाने लवकर जाऊन तिला सांभाळले. तिला खुर्चीवर बसवले आणि तिच्यासाठी पाणी आणायला गेली.
भांड्याच्या आवाजाने एव्हाना सुधीर आणि वृंदाताई सुद्धा आपापल्या खोलीतून बाहेर आले. सुमेधा ने जेव्हा सांगितले की मनिषाला चक्कर येत होती तेव्हा सुधीरला तिची खूप काळजी वाटली. सुधीरने लगेच मनिषाला हॉस्पिटल मध्ये न्यायचे ठरवले. सुमेधा म्हणाली की मी काम तुमच्या सोबत येते म्हणून. सुधीर हो म्हणाला आणि सगळे जायला निघणार इतक्यात वृंदाताई सुधीरला म्हणाल्या.
” थांब…मी पण येते तुमच्यासोबत…”
” नको आई…तू घरीच थांब…आम्ही येतो लवकरच…” सुधीर कोरडेपणाने म्हणाला.
आता मात्र वृंदाताईंना त्याच्या बोलण्याचे खूप जास्त वाईट वाटले. सगळे जण गाडीजवळ गेले. गाडीत बसताना मनीषा सुधीरला म्हणाली.
” अहो.. इतकी मोठी गोष्ट नाही आहे…आली असेल सहज म्हणून चक्कर…तेवढ्यासाठी हॉस्पिटल मध्ये जायची काय गरज आहे…”
” सहज यायला ती चक्कर काय मैत्रीण आहे का तुझी…?” सुधीर चेष्टेने म्हणाला.
मग मात्र मनीषा काहीच बोलली नाही. कार हॉस्पिटल मध्ये पोहचल्यावर सुमेधाने आधार देत वहिनीला आतमध्ये नेले. तोवर सुधीर गाडी पार्क करून आला. सुधीर आणि मनीषा दोघेही डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले आणि सुमेधा बाहेरच त्यांची वाट पाहत बसली.
सहज इकडे तिकडे पाहत असताना तिला एक परिचित चेहरा दिसला. आणि क्षणार्धात तिच्या लक्षात आले ह्या तर निशांतच्या आई आहेत म्हणून. आणि त्यांच्या सोबत चालत येणारा निशांत होता. त्याला पाहून सुमेधा कोलमडली. त्याचा पार अवतार झालेला होता. त्याला पाहून कुणीही सांगू शकले असते की त्याला दारूचं व्यसन जडलय म्हणून.
वाढलेली दाढी, ध्येयशून्य नजर, आईची काळजी आणि स्वतःसोबत जे झालंय त्याची चीड त्याच्या प्रत्येक हावभाव दिसून येत होती. त्याच्या आईची तब्येत ही खूपच खालावलेली वाटत होती. त्याला पाहून सुमेधाच्या जुन्या जखमांवरील खपली निघून ती जखम पुन्हा रक्तबंबाळ झाली होती.
निशांतने सुमेधाला पाहिले असते तर जितका त्रास तिला होतोय त्यापेक्षा जास्त त्रास त्याला झाला असता. कारण जे काही झालं त्यात बऱ्याच प्रमाणात सुमेधाची चूक असली तरी त्याने मात्र कोणतीही चूक न करता हे सगळे भोगले होते. आणि म्हणूनच त्याचे दुःख सुमेधा पेक्षा जास्तच होते.
आपण त्याच्या दृष्टीस पडून नये म्हणून सुमेधा पटकन तिथून उठून आडोशाला जाऊन उभी राहिली. निशांत आणि त्याची आई सुद्धा डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले. सुदैवाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्याने डॉक्टरांच्या केबिन वेगवेगळ्या होत्या म्हणून निशांत आणि सुधीरची सुद्धा भेट झाली नव्हती.
सुमेधा लगेच बाहेर आली. सुधीरने जिथे गाडी पार्क केली होती तिथे जाऊन उभी राहिली. तिच मन मात्र तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. तितक्यात तिला सुधीरचा फोन आला. तिने त्याला सांगितले की ती दवाखान्याच्या बाहेर आली आहे म्हणून. मग सुधीर सुद्धा मनिषाला घेऊन बाहेरच आला. त्याला पाहून सुमेधाने कसेबसे आपले अश्रू लपवत विचारले.
” काय झाले दादा…काय म्हणाले डॉक्टर…सगळं काही ठीक आहे ना…”
त्यावर मनीषा लाजली आणि सुधीर गोड हसत म्हणाला.
” सगळं काही ठीक आहे…उलट मी तर म्हणेल की बरे झाले हिला चक्कर आली ते…”
” असे का म्हणतोयस…?” सुमेधा लटकेच रागावून म्हणाली.
” कारण हिला चक्कर आली नसती तर गोड बातमी कशी समजली असती…” सुधीर हसत म्हणाला.
” म्हणजे…?” काहीच लक्षात न आल्याने सुमेधाने विचारले.
” अगं म्हणजे तू आत्या होणार आहेस…अन् मी बाबा…” सुधीर आनंदाने म्हणाला.
ही बातमी ऐकून सुमेधाने आनंदाने उडीच मारली. ती मनीषा ला मिठी मारत म्हणाली.
” थॅन्क यू वहिनी…तू आम्हाला किती आनंदाची बातमी दिली आहे तुला नाही माहिती…मागच्या काही दिवसांतील ही सगळ्यात जास्त आनंदाची बातमी आहे…मला तर अगदी काय करू आणि काय नको असं झालंय…तू आई होणार आणि मी आत्या…” आणि हसता हसता पुन्हा एकदा सुमेधाच्या डोळयात पाणी आले. तिला तो दिवस आठवला जेव्हा ती आई बनणार आहे हे तिला कळले होते. तिने लगेच आपल्या बोटाने डोळ्यातील पाणी टिपले.
सगळे घरी आले. इकडे घरी वृंदाताईंचा जीव खाली वर होत होता. मनीषा च्या कृतीने त्यांना फक्त स्वतःची चूक लक्षात आलेली नव्हती तर आपण आजवर कुठे आणि किती जास्त चुकीचे वागलो ह्याची जाणीव सुद्धा त्यांना झाली होती. आधीच आपल्या आजवरच्या वागण्याबद्दलचा खूप जास्त पश्चात्ताप होत होता. आणि त्यातच आधी सुधीरचे त्यांच्याशी तुटक वागणे आणि मनीषाची अचानकपणे तब्येत खराब होणे.
घरी आल्यावर जेव्हा सुमेधाने त्यांना मनीषा आई होणार असल्याची बातमी सांगितली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांना तर अगदी काय करू नी काय नको असे झाले होते. घरात सगळीकडेच आनंदी आनंद होता.
घरात मनीषाचे कोडकौतुक सुरू होते. सुमेधाने तर घरातील सगळ्याच कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. मनिषाला तिने फक्त आराम करायचा म्हणून बजावले होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा बारीक लक्ष देऊन काळजी घ्यायची. मनीषा तर सुमेधाच्या बदललेल्या वागणुकीला पाहून आश्चर्य चकित झाली होती. पण सुधीर मात्र मनातून निश्चिंत झाला होता.
एकतर घरातील परिस्थिती आता शांततापूर्ण आणि आनंदी होती. आई आणि सुमेधा दोघीही नखशिखांत बदलल्या होत्या. शिवाय सुमेधासुद्धा मनीषाची खूप चांगली काळजी घेत होती. छोट्याश्या गोष्टीवरून सुद्धा आता सुमेधा खूप हळवी व्हायची. जणू काही स्वतःच बाळ असल्यागत ती वागायची.
एकदा मनिषाला रूटीन चेकअप साठी हॉस्पिटल मध्ये नेलेले असताना मनीषा आणि सुमेधाला हॉस्पिटल समोर उतरवून सुधीर गाडी पार्क करायला गेला. मनीषा आणि सुमेधा उभ्या असताना सुमेधाचे लक्ष समोरून येणाऱ्या एका कार कडे गेले. कार भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने येत होती.
मनीषाचे तिकडे लक्ष नव्हते. मनीषा सुधीरच्या वाटेला डोळे लावून बसलेली होती. तिला सांगून दोघींनी तिथून जाईस्तोवर बराच वेळ लागला असता. आणि गाडीचा वेग पाहून एवढा वेळ आपल्याजवळ नाही हे सुमेधाने क्षणार्धात हेरले. समोरून सुधीर सुद्धा येतच होता. त्यालाही गाडी येताना दिसली. तो काहीतरी करेल तोवर सुमेधाने मनिषाला सुधीरच्या दिशेने ढकलले आणि स्वतः मात्र गाडीच्या समोर आली. मनिषाला सुधीरने अलगद पकडले होते. सुदैवाने मनीषा ठीक होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने मनिषाला वाचवले होते.
क्रमशः
मनीषा तर वाचली पण सुमेधाचे काय झाले असेल…? तो त्या अपघातातून वाचली असेल का…? कथानक पुढे आणखी काय वळण घेईल हे वाचण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.
कथेचा पुढील भाग उद्या प्रकाशित होईल.
©®आरती निलेश खरबडकार.
I like your writing style. I m waiting to read new part
Thank you 😊🙏