सुमेधाने मनिषाला वाचवण्यासाठी तिला सुधीरच्या दिशेला ढकलले पण तिला स्वतःला मात्र एवढा वेळ मिळाला नाही की ती सुद्धा तिथून दूर जाऊ शकेल. वेगाने येणारी गाडी आणि त्या गाडीसमोर सुमेधाला पाहून सगळ्यांच्याच तोंडून किंकाळी बाहेर पडली. एक क्षण तर काय झाले ते कळलेच नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या लक्षात आले की सुमेधाच्या जवळ येताच गाडीने करकचून ब्रेक लावला.
तरीही सुमेधाला गाडीचा धक्का लागलाच होता. जिवावर आलेला प्रसंग आज फक्त थोडा मार लागून निभावल्या गेला होता. सुधीरने पटकन समोर जाऊन तिला आधार देऊन उठवले. सुमेधाच्या डोक्याला, हाताला आणि ढोपराला मार लागला होता. जास्त लागलेलं नसलं तरीही एकूण धक्क्यामुळे ती ग्लानीत गेली होती.
इतक्यात तो गाडीवाला गाडीमधून बाहेर उतरला. आधी तर त्याला कळलेच नव्हते त्याने काय केले ते. पण दुसऱ्याच क्षणी तो भानावर आला आणि त्याने गाडीला ब्रेक मारला होता. तो उतरून सुमेधाच्या मदतीला आला. आणि सुमेधाचा चेहरा पाहून एकदमच तिथून दूर झाला. त्याला पाहून सुधीरला त्याला मारायची तीव्र इच्छा झाली.
पण दुसऱ्याच क्षणी तो कोण आहे हे कळताच त्याने स्वतःला थांबवले.तो दुसरा तिसरा कुणी नसून निशांत होता. त्याला त्याच्या आईने निशांतबद्दल खूप चुकीचे आणि वाईट सांगितले होते. की निशांत आणि त्याची आई सुमेधा बरोबर चांगलं नाहीत वागायच्या. तिला सासरी खूप त्रास होता म्हणून घटस्फोट घ्यावा लागला वगैरे वगैरे.
सुधीरला त्याचा राग तर खूप आलेला होता त्याच्या मनात आले की आधी निशांतने तिला कमी त्रास दिलेला आहे का जो आता तिच्या जिवावर सुद्धा उठला आहे. पण कधी काळी त्याने निशांतला जावई म्हणून खूप मान दिला होता. आणि आता अचानक पणे त्याच्यावर हात उचलणे त्याला बरोबर वाटले नाही.
सुधीरने सर्वात आधी सुमेधाला डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे हे ओळखून तिला दवाखान्यात न्यायला लागला. निशांत मात्र तिथेच थबकला. आज अनेक दिवसानंतर त्याने तिला पाहिले होते. ते ही अशा अवस्थेत. खरं तर तिला पाहून त्याला राग यायला पाहिजे होता. पण आज तिला अशा जखमी अवस्थेत पाहून तो अस्वस्थ झाला होता.
त्याला तर वाटत होते की तिथून निघून जावे. पण तिथे थांबून तिची चौकशी करणे त्याच्या नैतिक जबाबदारी होती. आणि तिला अशा अवस्थेत सोडून जायला त्याचे मन मानत नव्हते. तरीही आपण तिला प्रत्यक्षपणे जाऊन भेटू शकणार नाही हे त्याला माहिती होते. म्हणून तो कुणाच्याही लक्षात येणार नाही असे अंतर राखून त्यांच्या मागोमाग गेला.
सुमेधाला डॉक्टरांनी तपासले. आणि तिच्या जखमांवर बँडेज केले. जखमा जास्त खोल नसून त्या लवकरच बऱ्या होतील हे समजल्यावर सुधीरला हायसे वाटले. मनीषा तर अजूनही धक्क्यातच होती. तिला राहून राहून वाटत होते की आज सुमेधाने तिला धक्का दिला नसता तर तिचे काय झाले असते. आणि सुमेधाला अशा अवस्थेत पाहून हे सगळं आपल्या मुळेच झालंय ह्या विचाराने तिला अस्वस्थ वाटत होते.
सुधीर डॉक्टरांनी दिलेले औषध आणण्यासाठी मेडिकल मध्ये गेला. तेव्हा हॉस्पिटल रूममध्ये सुमेधा आणि मनीषा ह्या दोघीच होत्या. मनीषा सुमेधा जवळ गेली. तिचा हात पकडला आणि रडायला लागली. तिला रडताना पाहून सुमेधा तिला म्हणाली.
” काय झालं…तू अशी रडतेस का…?”
” मला माफ करा ताई…आज माझ्यामुळे तुमच्यावर फार भयंकर प्रसंग उद्भवला असता…माझंच लक्ष नव्हतं म्हणून हे सगळं झालंय…तुम्हाला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते…” मनीषा म्हणाली.
” अगं वहिनी…वेडी आहेस का तू…तुझ्यामुळे काहीच नाही झालंय…जे काही झालंय तो फक्त एक योगायोग होता…” सुमेधा वहिनीला समजावत म्हणाली.
” आज तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते…?” मनीषा रडवेली होऊन म्हणाली.
” आणि तुला किंवा बाळाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं…स्वतःच्या बाळाला तर वाचवू शकले नाही पण तुझ्या बाळाला मी काहीच होऊ देणार नाही…” सुमेधा रडवेली होत म्हणाली.
” स्वतःच्या बाळाला वाचवू शकले नसते म्हणजे…तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं…” मनीषाने प्रश्न विचारला.
” काही नाही…असेच काहीतरी बोलून बसले असेल…डोक्याला लागलंय ना म्हणून परिणाम झाला बहुतेक डोक्यावर…” सुमेधा विषय बदलत म्हणाली.
” नाही…मला माहिती आहे तुम्ही उत्तर देणं टाळताय…” मनीषा म्हणाली.
” तसे नाही…पण मला पुन्हा ते सगळं उगाळून तुला त्रास नाही द्यायचा…” सुमेधा म्हणाली.
” त्रास नाही…पण मन तर हलकं करूच शकता ना तुम्ही…मला सांगितले तर कदाचित तुमचे मन हलके होईल…” मनीषा म्हणाली.
त्यावर सुमेधाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले आणि तिने स्वतःच्या लग्नापासून ते स्वतःच्या मिस्कॅरेज आणि घटस्फोटापर्यंतची सगळी कहाणी मनिषाला सांगितली आणि ढसाढसा रडायला लागली. तिच्याबद्दल ऐकून मनिषाला खूपच वाईट वाटले. सुमेधा चुकली हे तिला कळत होते पण त्याची खूप मोठी शिक्षा सुद्धा तिला मिळाली हे पण तिला नव्याने कळले होते.
ती सुमेधाला म्हणाली.
” ताई…तुमच्या बाळाच्या बाबतीत जे झाले ते खूप वाईट झाले…पण ते तुम्ही जाणूनबुजून केले नव्हते…तुम्ही स्वतःला अपराधी मानणे सोडून द्या… नियतीच्या मनात काय आहे हे आपल्याला नाही ना कळू शकत…” मनीषा तिला म्हणाली.
” नाही ग…हे सगळं जितकं नशिबाने घडलं तितकंच माझ्या चुकांमुळे सुद्धा घडलं…पोटातल्या बाळाचा वापर करायला निघाले होते मी…ते सुद्धा एका मुलाला त्याच्या आईपासून तोडण्यासाठी…आणि माझ्या कर्माची फळं म्हणून देवाने माझं बाळच हिरावून घेतले ग…माझ्या कर्माची शिक्षा माझ्या बाळाला मिळाली…किती स्वप्न पाहिले होते मी माझ्या बाळासाठी…मी खूप आनंदात होते…पण दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतः कसे आनंदी राहू शकणार ना…?” सुमेधा खिन्नपणे म्हणाली.
मनीषाने तिचा हात हातात घेतला आणि तिला धीर देऊ लागली. रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या निशांतने सुमेधाचे सगळे बोलणे ऐकले होते. सुमेधाने स्वतःहून अबॉर्शन केलेले नसून तिचे मिसकॅरेज झाले होते हे ऐकून त्याला फार मोठा धक्का बसला. असेही असू शकते ह्याचा त्याने कधी विचारच केलेला नव्हता.
पण त्यावेळी सुमेधाचे वागणे पाहून कुणाच्याही मनात असे आलेच नसते. सुमेधा त्या वेळी फक्त स्वतःपुरता विचार करत होती. आधी स्वतःच्या बाळाला संपवण्याची धमकी देणारी सुमेधा आज इतकी बदलेल की दुसऱ्याच्या बाळाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा करणार नाही हे सुमेधाचे रूप त्याच्यासाठी नवीन होते.
विचार करून निशांतचे डोके भांबावले होते. शेवटी त्याने हा विचार केला की आज त्याची आणि त्याच्या आईची जी परिस्थिती आहे त्याला फक्त आणि फक्त सुमेधाच कारणीभूत आहे म्हणून. आणि तो तिथून जायला निघाला. पण त्याने खूप प्रयत्न केला तरीही तो तिथून जाऊ शकला नाही. तो दवाखान्याच्या बाहेर जाऊन थांबला.
थोड्याच वेळात सुधीर औषधं घेऊन परत आला तेव्हा मनीषा आणि सुमेधाच्या डोळ्यात अश्रू पाहून म्हणाला.
” सगळं काही ठीक आहे आता…सुदैवाने थोडक्यात निभावलंय…आता तुम्ही दोघी सुद्धा ह्याचा फार विचार नका करू…आणि स्वतःला त्रास तर नक्कीच नका करून घेऊ…” सुधीर म्हणाला.
त्या सरशी दोघींनीही आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. थोड्या वेळाने डॉक्टर सुमेधाला पुन्हा एकदा तपासून तिला घरी जाऊ देणार होते. डॉक्टर तपासायला आले तेव्हा सुधीर आणि मनीषा रूमच्या बाहेर आले तेव्हा मनीषा सुधीरला म्हणाली.
” ज्या गाडी वाल्यामुळे हा अपघात घडलाय त्याला सोडू नका…त्याला पोलिसांच्या हवाली करा…त्याच्या बेजबाबदारपणामुळे आज काहीही होऊ शकले असते…”
” त्याला शिक्षा द्यावी अशी माझीही खूप इच्छा आहे ग…पण जेव्हा सुमेधा ला हे कळेल की तिच्या अपघातासाठी तो जबाबदार आहे तेव्हा तिला आणखीनच त्रास होईल…जुन्या गोष्टी आणखी जास्त प्रकर्षाने आठवतील…ती ज्यातून बाहेर निघाली आहे ते सगळेच या अनुषंगाने तिच्या समोर येतील…म्हणून अपघात कुणामुळे झालाय हे सुमेधाला न कळलेले बरे…म्हणून त्याला पोलिसात नाही दिलं मी…” सुधीर म्हणाला.
” तुम्ही काय म्हणताय ते कळलं नाही मला…तो कुणी ओळखीचा होता का…आणि सुमेधा ताईला त्याच्याबद्दल कळलं तर त्यांना त्रास का होईल…?” मनीषाने विचारले.
” कारण तो सुमेधाचा नवरा निशांत होता…याच्याबरोबर त्याचा एका वर्षापूर्वी घटस्फोट झालाय तोच हा…आधी काय त्याने कमी त्रास दिलाय का सुमेधाला…जे आताही तिच्या जिवावर उठलाय…?” सुधीर रागात म्हणाला
” तुम्ही जास्त विचार नका करू त्यांचा…सुमेधा ताई ठीक आहे ह्यातच सगळे आले…” मनीषा म्हणाली.
तोवर डॉक्टर सुद्धा सुमेधाला तपासून बाहेर आले आणि म्हणाले.
” तुम्ही आता ह्यांना घरी घेऊन जाऊ शकता…फक्त आठवडा भर त्यांची काळजी घ्यावी लागेल…”
” हो डॉक्टर…” सुधीर म्हणाला.
त्यानंतर मनीषा आणि सुधीर सुमेधाला आधार देत गाडी पर्यंत घेऊन आले. तिला नीट गाडीत बसवले आणि जायला निघाले. निघताना एका बाजूला उभे राहून लपून सुमेधाला पाहताना मनीषाने निशांतला पाहिले होते. आता तिला निशांत आणि सुमेधाबद्दल माहिती असल्याने मनीषाचा निशांतकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता.
मनीषा व सुधीर सुमेधाला घेऊन घरी आले. आईला आधी सुमेधाच्या अपघाताबद्दल काहीच सांगितले नव्हते. ती उगीच काळजी करत नसेल म्हणून. पण जेव्हा त्यांनी सुमेधाला पाहिले तेव्हा तिला पाहून त्यांना धक्काच बसला. सुधीर आणि मनीषाने त्यांना नीट समजावून सांगितले तेव्हा कुठे त्या जरा शांत झाल्या.
त्यानंतर मनीषा व सासूबाईंनी मिळून सुमेधाची खूप काळजी घेतली. सुमेधाने मनिषाला तिच्या भूतकाळाबद्दल सांगितल्याने मनीषाच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. तसेच त्या दिवशी तो अपघात सुमेधाच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याच्या हातून घडला हे ऐकल्यावर तर तिच्या मनात काहीतरी वेगळेच विचार सुरू झाले होते.
एके दिवशी सहज म्हणून तिने सुमेधाला विचारले.
” ताई…तुम्हाला एक विचारू का…?”
” अगं वहिनी विचार ना…अशी परवानगी का घेत आहेस…?” सुमेधा म्हणाली.
” तुमचं अजूनही निशांत रावांवर प्रेम आहे का…?”
तिचा प्रश्न ऐकताच सुमेधा आश्चर्यचकित झाली. कारण हा प्रश्न तिने इतक्या दिवसात कधी स्वतःला सुद्धा विचारला नव्हता.
” आज हे का विचारते आहेस तू वहिनी…?” सुमेधा म्हणाली.
” मला जाणून घ्यायचं आहे…उत्तर काहीही असलं तरी चालेल पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या…” मनीषा म्हणाली.
त्यानंतर एक दीर्घ श्वास घेऊन सुमेधा म्हणाली.
” लग्नानंतर आमच्यात बरेच काही झाले…वाद-विवाद, भांडणं, आरोप – प्रत्यारोप. आमच्या नात्याने बरेच वाईट दिवस देखील पाहिले… पण त्याआधी आमच्यात खूप प्रेम होतं…इतकं प्रेम की ते आयुष्यभर पुरून उरेल…निशांत माझं पहिलं प्रेम आहे…त्याची ती प्रेमाने ओतप्रोत भरलेली नजर, पहिला स्पर्श, माझ्यासाठी हळवं होणं हे सगळं आजही अगदी मनात साठवून ठेवलय मी…जेव्हा कधी कुठे प्रेमाचा साधा उल्लेख जरी होतो तरी मला फक्त अन् फक्त तोच आठवतो…”
सुमेधा अगदी मनापासून बोलत होती. आणि मनीषा तिचं बोलणं अलगदपणे मनात साठवून घेत होती. सुमेधाचे बोलून झाल्यावर मनीषा तिला म्हणाली.
” दुसऱ्या लग्नाबद्दल तुमचा काय विचार आहे…?”
तिच्या प्रश्नाने सुमेधा एकदमच गप्प बसली. तिला काय बोलावे ते सुचत नव्हते.
क्रमशः
मनीषाच्या मनात नेमके काय सुरू असेल…? निशांतचे पुन्हा सुमेधाला भेटणे हा फक्त एक योगायोग आहे की नियतीच्या मनात यावेळी काही वेगळेच आहे…सुमेधाच्या नशिबात पुढे नेमके काय वाढून ठेवलेले आहे…? हे सर्व जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका…
पुढील भाग उद्या प्रकाशित होईल.
©®आरती निलेश खरबडकार.