घरी महेशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. राजेश आणि त्याची बायको राधिका घरातील प्रत्येक कामात जातीने लक्ष देत होते. सगळं काही ऐन भरात सुरू असताना राजेशच्या आई वडिलांनी राजेश आणि राधिकासाठी एक अनपेक्षित घोषणा केली. राजेशचे वडील त्याला म्हणाले.
” हे बघ राजेश…आता महेशचे लग्न होणार आहे…तुला तर माहिती आहे आपल्या घरी फक्त एकच चांगली बेडरूम आहे…जिथे तू आणि राधिका राहता…शिवाय लग्न झाल्यावर दोन्ही जावांचे पटेल की नाही ह्याची सुद्धा काळजी आहेच…म्हणून आम्हा दोघांची इच्छा आहे की तुम्ही दोघांनी आपल्या विद्युत नगरातील घरात राहावे…घरातील भाडेकरूंना आम्ही घर खाली करायला सांगितलेलं आहे…लग्न झालं की काही दिवसात तुम्ही तिकडेच शिफ्ट व्हा…”
हे ऐकून राजेश आणि राधिकाला धक्काच बसला. कुठे ते लग्नाच्या आनंदात होते आणि कुठे लग्न झाल्यावर त्यांना वेगळं राहायला सांगण्यात आले होते…राजेशला घरातून वेगळं राहायला जायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून तो त्याच्या बाबांना म्हणाला.
” पण बाबा…आपण जर ठरवलं तर आपल्या घराच्या मागच्या जागेत असलेल्या मोठ्या जागेत आणखी एखादी बांधूच शकतो ना…त्यासाठी वेगळं रहायची काय गरज आहे…”
” हे बघ…मी काही निर्णय घेतला असेल तर तो तुम्हा दोघांच्या चांगल्यासाठीच घेतला असेल…पुढे नात्यात भांडण होतातच…त्यापेक्षा आताच दुरून नात्यातील गोडवा जपण्याचा प्रयत्न करूयात…आज ना उद्या हे करावेच लागेल मग आता का नाही…” बाबा म्हणाले.
पण मग मीच का म्हणून दुसरीकडे राहायला जायचं असा प्रश्न राजेशच्या मनात वारंवार डोकावत होता. पण नेहमीप्रमाणेच त्याने तो प्रश्न ओठांवर येऊ दिला नाही. जिथे राजेशचेच काही चालायचे नाही तिथे राधिका तरी काय बोलणार. दोघांनीही मुकाटपणे घरच्यांचा निर्णय मान्य केला.
पण यामुळे त्यांच्या लग्नाच्या आनंदावर विरजण पडले होते. हे काही त्यांच्यासोबत पहिल्यांदा होत नव्हते. घरात नेहमीच महेशला झुकतं माप दिलं जायचं. राजेश आणि महेश दोघेही सख्खे भाऊ. दोघांमध्ये ही फक्त तीन वर्षांचा अंतर. पण घरच्यांनी हे अंतर फक्त वयापर्यंत मर्यादित न ठेवता आवडता आणि नावडता असे केले होते.
राजेश अभ्यासात खूपच साधारण होता. आणि महेश हुशार. नेहमी पहिल्या पाचात यायचा. घरात नेहमीच राजेश आणि महेशची तुलना व्हायची. सुरुवातीला सगळ्यांनीच राजेशला अभ्यासाला सक्ती केली पण राजेशचे अभ्यासात मन लागेचना. मग शेवटी घरच्यांनी त्याच्या मागे अभ्यासाचा धोशा लावणे सोडूनच दिले.
हळूहळू घरात सगळ्यांनीच मग राजेशच्या सगळ्याच गोष्टीत रस घेणे कमीच केले. किंवा असेही म्हणता येईल की आपले सगळे लक्ष महेशवर केंद्रित केले. महेश मुळे चारचौघात त्यांना सांगता येई की आमचा मुलगा अभ्यासात खूपच हुशार आहे. महेशचे आईबाबा म्हणून त्यांच्या पदरी कौतुक पडे तर राजेशचे आईबाबा म्हटले तर सांगण्यासारखे असे विशेष काहीच वाटायचे नाही त्यांना.
आता आईबाबांनीच राजेशला जर दुर्लक्षित केले म्हटल्यावर इतर लोक त्याला काय जुमानतील. सगळेच राजेशला गृहीत धरायचे. त्याला त्याची आवड निवड विचारली जायची नाही. पण महेशला मात्र सगळे आवडीचेच मिळायचे. इतकंच नाही तर जसजसा तो मोठा होत गेला तसतसं त्याच महत्त्व वाढत आणि ह्याचं घटत गेलं.
घरात कुठली वस्तू आणायची आणि कुठली वस्तू नाही आणायची हे सुद्धा महेशला विचारूनच ठरवायचे. मात्र इतक्या वर्षात राजेशला जेवणात काय आवडतं ते सुद्धा घरच्यांना ठाऊक नसेल इतकं दुर्लक्षित केलं होतं त्याला. घरात कुठलीही पूजा असली तरीही मोठा राजेश असतानाही महेशला पूजेत बसवलं जायचं. आपण अभ्यासात विशेष प्रगती करू शकलो नाही म्हणूनच आपल्याला महेश पेक्षा कमी महत्त्व मिळतं हे राजेश पूर्णपणे जाणून होता. आणि म्हणूनच कधीच त्याने घरच्यांना उलट प्रश्न विचारलेच नाहीत.
राजेश अभ्यासात हुशार नसलं तरी इतर अनेक बाबतीत तो बराच हुशार होता. आणि मुख्य म्हणजे खूप कष्टाळू होता. कसातरी बारावीपर्यंत शिकला आणि पुढे काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. मग त्याचेही उत्तर त्याने स्वतःच शोधून काढले. त्याच्या एका मित्राच्या वडिलांचे गॅरेज होते. हा बरेचदा जायचा तिथे. आणि त्याला त्या सगळ्यात खूप इंटरेस्ट वाटायचा.
म्हणून मग एकदा त्याने मित्राला गाडी दुरुस्ती संबंधी शिकायचं आहे असे म्हटले. मित्राने वडिलांना सांगितले आणि त्याच्या वडिलांनी आनंदाने काम शिकवायला होकार दिला. पण राजेशला त्याच्या कामाचा मोबदला घ्यायला हवा ही अट सुद्धा घातली. राजेशला कामाच्या मोबदल्यात पैसे नको होते. पण मित्राच्या वडिलांनी तशी अट ठेवल्याने त्याने सुद्धा नाईलाजाने हो म्हटले.
मात्र त्यावर घरी सगळ्यांनी राजेशला खूप वेड्यात काढले. आपल्या घरी सगळं काही असताना कुणाच्या गॅरेज वर हा काम करणार आणि हे जर इतरांना कळले तर लोक काय म्हणतील यामुळे त्याला घरच्यांचे खूप बोलणे ऐकावे लागले. पण राजेश मात्र त्यावर ठाम राहिला. मग घरच्यांनी सुद्धा त्याच्याकडे फार लक्ष दिले नाही.
राजेश मनापासून काम शिकायला लागला. राजेश च्या लग्नाचा विषय निघाल्यावर सुद्धा घरचे हेच म्हणायचे की ह्याला मुलगी मिळणे कठीण आहे. मग सगळ्यांनी मिळून एका गरीब घरातल्या मुलीला त्याच्यासाठी पसंत केले. तिच ही राधिका. जी वागणूक घरात राजेशला मिळायची त्यापेक्षा जरा जास्तच तुसडेपणाची वागणूक राधिकाच्या नशिबी आली.
तिला सुद्धा घरात अजिबात महत्त्वाचं स्थान नव्हतं. ती घरी आल्यावर घरातील कामवाल्या बाईला काढून टाकले होते. गरीब घरच्या मुलीला कामांची सवय असते म्हणून. दिवसरात्र घरातील कामे करून सुद्धा ती सतत दुर्लक्षित असायची. पण राजेश मात्र तिच्यावर मनापासून प्रेम करायचा. राधिका सुद्धा नवऱ्याचे इतके प्रेम पाहून हरखून जायची.
मग तिला घरच्यांच्या वागण्याचे वाईट वाटायचे नाही. पण महेशच्या तुलनेत आपली नवऱ्याला दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे मात्र तिला वाईट वाटायचे. राजेश मात्र अजूनही मन लावून कामे शिकतच होता. त्याने आजवर जमलेले काही पैसे घेऊन स्वतःचे एक लहानसे गॅरेज टाकले होते.
महेश सुद्धा चांगला शिकून इंजिनिअर झाला. त्याच्या लग्नाचा विषय जेव्हा घरात सुरू झाला तेव्हा तर घरच्यांमध्ये जणू नवा उत्साह दाटून आला. त्यांनी महेशसाठी खूप मुली बघितल्या. आपल्या लाडक्या मुलासाठी त्यांना सर्वगुणसंपन्न आणि श्रीमंत घरातील मुलगी पाहिजे होती. आणि त्यांचा हा शोध मयुरीवर येऊन थांबला होता.
श्रीमंत वडिलांची एकुलती एक लेक होती मयुरी. तिच्या घरच्यांनी लग्नात कशाचीही कमतरता ठेवली नव्हती. महेशच्या घरी सुद्धा त्याच्या लग्नाच्या जोरदार तयाऱ्या सुरू होत्या. ज्यातील जास्तीत जास्त तयारी राधिका आणि राजेश उत्साहाने करत होते. पण आईवडिलांनी त्यांच्या वेगळे राहण्याचा निर्णय सूनावून जणू त्यांचा उत्साह मावळून टाकला होता.
राजेशचे लग्न थाटामाटात पार पडले आणि नाईलाजाने का होईना राजेश आणि राधिका वेगळ्या घरात राहायला गेले. राधिका घरातून गेल्यावर लगेच सासूबाईंनी कामवाल्या मावशींना पुन्हा घरी बोलावून घेतले. कारण आपल्या लाडक्या सूनेकडून ते काम करवून घेणार नव्हते. राजेशचे गॅरेज सुद्धा आता बऱ्यापैकी चालायला लागले होते.
आपली सासू आपल्या जावेला मानाने वागवत नाही हे मयुरीने बरेचदा पाहिले होते. त्यामुळे तिने सुद्धा जावेला विशेष मन दिला नव्हता. सासुबाई आपल्या लहान सुनेच्या कौतुकात मग्न होत्या. असेच एक वर्ष गेले. राजेश आपल्या व्यवसायात झपाट्याने प्रगती करत होता. पण त्याच्या आईवडिलांनी मात्र या गोष्टीची साधी दाखल सुद्धा घेतली नाही.
सगळं काही सुरळीत आहे असे वाटत असताना एके दिवशी अचानक राजेशच्या कुटुंबावर संकट कोसळले. राजेशच्या आईला कॅन्सरचे निदान झाले आणि सगळ्यांना खूप दुःख झाले. कॅन्सर सुद्धा अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत येऊन ठेपलेला. सगळेच या बातमीने सैरभैर झाले. राजेश तर अगदीच कोसळून गेला होता. पण स्वतःचे दुःख आवरून त्याने आईची काळजी घेण्याचे ठरवले.
आईच्या इलाजासाठी सगळेच दवाखान्याच्या फेऱ्या मारत होते. राजेश तर प्रत्येकवेळी आईच्या सोबत असायचा. आईचा इलाज सुरू झाला होता पण म्हणावी तशी वेगाने काहीच प्रगती होत नव्हती. महेश आता आईसोबत कधीकधी दवाखान्यात यायला लागला. नोकरीवर इतकी सुट्ट्या घेणे शक्य नसल्याचे सांगत त्याने दिलगिरी व्यक्त केली.
मयुरी सुद्धा तिच्यावर आलेल्या अतिरिक्त भाराने थकली. आजवर कधीच फारसे काम करावे लागले नव्हते आणि त्यातच आजारी माणसांची सेवा करायचे तर खूप दूर होते. तिने आईंच्या सेवेसाठी एखादी बाई ठेवण्याचा सल्ला दिला. आणि दर दोन तीन दिवस आड माहेरी जाऊन राहायला लागली.
क्रमशः
किंमत नात्यांची – भाग २(अंतिम भाग)