नवी पहाट ( एक भावनिक कथा) – भाग २ अंतिम भाग

सुनंदाताईंनी हातातील भाजी बाजूला ठेवली. त्या शांतपणे म्हणाल्या,

 

“सुधा, जरा हळू बोल. ती ऐकेल.”

 

“ऐकू दे ना! माझी इच्छा आहे की तिने सुद्धा ऐकावे.” सुधाताई तावातावाने म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या.

 

“वहिनी, अहो ती तुमची सुन आहे. तिचा नवरा गेलाय. तिने जरा तरी दुःखाचे, संयमाचे भान ठेवायला नको का? पूर्वीच्या काळी विधवा स्त्रिया कशा साध्या राहायच्या, एका कोपऱ्यात राहायच्या. ही तर अगदी घराची मालकीण झाल्यासारखी फिरतेय. दादा सुद्धा प्रत्येक गोष्टीत तिचा सल्ला घेतो. हे शोभते का आपल्या कुळाला?”

 

सुधाताई थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या, “आज टिकली लावतेय, उद्या नवीन कपडे घालेल, हसेल-खिदळेल… आणि उद्या जर तिने दुसरे लग्न करायचा विचार केला तर? लोक काय म्हणतील आपल्या घराण्याबद्दल? तुटलेल्या संसाराचे धिंडवडे काढायचे आहेत का तुम्हाला? विधवा सुनेला तिच्या मर्यादेत ठेवायला हवे. तिला मोकळ रान दिलंय तुम्ही!”

 

सुधाताईंचे हे कडक आणि टोचणारे शब्द ऐकूनही सुनंदाताई शांतच राहिल्या. त्यांच्या डोळ्यांत राग नव्हता, तर एक अगाध आईपण आणि प्रौढ समंजसपणा होता. सुनंदाताईंनी सुधाताईंचा हात धरला आणि त्यांना शेजारी असलेल्या लाकडी बाकावर बसवले.

 

“सुधा,” सुनंदाताई अत्यंत मऊ पण ठाम आवाजात म्हणाल्या, “तू ज्या नजरेने शर्वरीकडे बघते आहेस, ती नजर जुन्या परंपरेची आहे. पण मी तिच्याकडे एका आईच्या नजरेने बघते.”

 

” आईच्या नजरेने? हे काय नवीन? वहिनी, ती तुमची सून आहे, लेक नाही!”

 

“साकेत गेला, सुधा…” सुनंदाताईंच्या आवाजात क्षणाभरासाठी वेदना दाटून आली, पण त्यांनी स्वतःला सावरले. “माझा एकुलता एक मुलगा गेला. माझं काळीज पिळवटून निघालं. पण साकेत गेला म्हणून मी या जिवंत मुलीचे आयुष्यही मारून टाकू का?”

 

सुधाताई मूठ घट्ट करून ऐकत राहिल्या.

सुनंदाताई पुढे म्हणाल्या,

 

“साकेतच्या जाण्याने शर्वरीच्या आयुष्यात जो अंधार आलाय, तो आम्ही रोज पाहतो. जेव्हा ती रात्री बंद दाराआड उशीत तोंड लपवून रडते, ते मी ऐकले आहे. पण सकाळी उठून ती जेव्हा आमच्यासमोर येते, तेव्हा आम्हा म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांचे खचलेले मन सावरण्यासाठी ती चेहऱ्यावर हसू आणते. तिची ती टिकली, तिचे ते हसू, हा तिचा कमकुवतपणा नाही सुधा… ती तिची जगण्याची धडपड आहे! आणि आम्ही तिची ती धडपड का हिरावून घ्यावी?”

 

“पण वहिनी, समाजात काही नियम असतात की नाही? लोक काय म्हणतील?” सुधाताईंनी आपला मुद्दा मांडायचा प्रयत्न केला.

 

“लोक?” सुनंदाताई हसल्या, पण त्या हसण्यात कडू अनुभव होता.

 

“लोक साकेत गेल्यावर दोन दिवस आले, वाईट वाटल्याचे नाटक केले आणि निघून गेले. लोक आमच्या रोजच्या दुःखात पाऊल टाकायला येत नाहीत. आणि राहिली गोष्ट मर्यादेची आणि दुसऱ्या लग्नाची… तर सुधा, आज मी तुला अगदी उघडपणे सांगते.”

 

सुनंदाताईंनी सुधाताईंच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिले.

 

“मुलाच्या नंतर आम्हाला शर्वरीचाच आधार आहे आणि तिला सुद्धा आमचाच आधार आहे. आणि उद्या जर शर्वरीने तिचे आयुष्य नव्याने सुरू करायचे ठरवले, तिने पुन्हा लग्न करायचा विचार केला, तर मी आणि तिचे बाबा स्वतः तिचे आई-बाप बनून तिचे कन्यादान करू! आम्हाला यात काहीही वावगे किंवा चुकीचे वाटणार नाही.”

 

सुधाताई अवाक झाल्या. त्यांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या काळात विधवा पुनर्विवाहावर अजूनही ग्रामीण भागात उघडपणे बोलले जात नव्हते, तिथे त्यांची भावजय स्वतः सुनेच्या दुसऱ्या लग्नाचा पाठिंबा देत होती.

 

“वहिनी, तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? घराची परंपरा…”

 

“परंपरा माणसासाठी असतात सुधा, माणूस परंपरेसाठी नसतो,” मागे उभ्या असलेल्या माधवरावांचा गंभीर आवाज आला.

 

माधवराव कधी आत आले होते ते कुणालाच कळाले नव्हते. ते पुढे आले आणि सुधाताईंच्या शेजारी बसले.

 

माधवरावांनी सुधाताईंकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एका बापाची कणखरता होती.

 

“सुधा,” माधवराव म्हणाले, “तुला वाटतंय की शर्वरी मर्यादा सोडून वागतेय? पण मला सांग, साकेतच्या जाण्यानंतर या वाड्याला पुन्हा घरपण कोणी दिले? मी जेव्हा दुःखाने खचून गेलो होतो, शेताकडे जायचे सोडून दिले होते, तेव्हा याच शर्वरीने माझा हात धरून मला बाहेर आणले. तिने मला सांगितले, ‘बाबा, साकेतचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. ही मुलगी माझी सून उरलेलीच नाही, ती आमची मुलगी झाली आहे.”

 

“दादा, पण लोक नावे ठेवतील,” सुधाताईंनी शेवटचा प्रयत्न केला.

 

“ठेवू दे नावे!” माधवराव ठामपणे म्हणाले. “जेव्हा साकेत नव्हता, तेव्हा ही मुलगी माहेरी जाऊन राहू शकली असती. पण ह्या दुःखाच्या परिस्थिती मध्ये आम्हाला सोडून गेली नाही. तिने आमचे दुःख आपले मानले. जर तिने कपाळावर टिकली लावली, तर त्यात कोणाचा काय तोटा आहे? ती जिवंत आहे, आणि तिला जिवंतपणाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर आत्ताच्या काळातही आम्ही तिला त्या जुन्या काळोख्या रूढींमध्ये ढकलणार असू, तर साकेतच्या आत्म्याला तरी शांती मिळेल का? साकेतवर तिचे जितके प्रेम होते, तितकेच तिला स्वतःचे आयुष्य सन्मानाने जगण्याचा हक्क आहे.”

 

सुधाताईंना या उत्तरांची अपेक्षा नव्हती. त्यांना वाटले होते की त्यांचे भाऊ आणि भावजय त्यांच्या सुरात सूर मिसळतील आणि शर्वरीला बंधनात ठेवतील. पण इथे तर संपूर्ण चित्रच उलटे होते. सासू आणि सासरे दोघेही आपल्या सुनेच्या पाठीशी ढाल बनून उभे होते.

 

सुधाताईंचा जुनाट विचारसरणीचा अहंपणा दुखावला गेला. त्यांना हे आधुनिक विचार आणि ही ‘मोकळीक’ अजिबात पटत नव्हती.

 

“ठीक आहे दादा,” सुधाताई नाराजीने उठून उभ्या राहिल्या. “तुमचे घर, तुमचे विचार! मला यात जास्त बोलायचा अधिकार नाही. पण मला हे काही पटत नाहीये. मला इथे एक काम आहे. ते झाले की मी निघते उद्याच.”

 

“सुधा, थांब ना, दोन दिवस राहा ना अजून.” सुनंदाताईंनी विनवले.

 

“नको. मला या वातावरणात गुदमरल्यासारखे वाटतेय. मी माझी बॅग घेते आणि उद्या दुपारच्या बसनेच परत जाते,” सुधाताईंनी कडक शब्दांत सांगितले.

 

दुसऱ्या दिवशी सुधाताईंनी आपली बॅग उचलली. शर्वरी त्यांना थांबवण्यासाठी पुढे आली, “आत्या, काही चुकले का माझे? तुम्ही चहा-पाणी करून व्यवस्थित जा ना…”

 

सुधाताईंनी शर्वरीकडे एक थंड कटाक्ष टाकला, काहीही उत्तर न देता त्या वळून वाड्याच्या बाहेर पडल्या. त्यांच्या मनात रागाची आणि अविश्वासाची भिंत अजूनही कायम होती.

 

सुधाताई निघून गेल्यावर अंगणात एक शांतता पसरली. शर्वरी उभी होती. तिच्या डोळ्यांतून नकळत दोन अश्रू घसरले. तिने काल आत्या आणि सासू-सासऱ्यांमधील झालेला तो संवाद बाहेरून ऐकला होता.

 

तिला आठवत होते, जेव्हा साकेत गेला होता, तेव्हा तिला वाटले होते की तिचे आयुष्य आता संपले. तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. पण तिचे सासू आणि सासरे तिच्या खोलीत आले होते. त्यांनी तिचे हात हातात घेतले होते आणि म्हणाली होती, “बाळा, साकेत गेला म्हणून तुझे जगणे संपत नाही. तू आमची मुलगी आहेस. तू हसलीस तरच या घरात आनंद वाटेल.”

 

आज जेव्हा आत्यांनी तिच्या अस्तित्वावर, तिच्या टिकलीवर आणि तिच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हा तिच्या सासू-सासऱ्यांनी ज्या ठामपणे तिची बाजू घेतली, त्याने शर्वरीचे हृदय भरून आले होते.

ती हळूच पुढे आली आणि तिने सुनंदाताईंना घट्ट मिठी मारली.

 

“आई…” शर्वरीला पुढे बोलता येत नव्हते, तिचा गळा आवळला होता.

सुनंदाताईंनी तिला जवळ घेतले आणि तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. “अगं वेडे, रडतेस का? सुधाचे विचार जुने आहेत. तिला जे वाटले ते ती बोलली. पण तू मनात काही आणू नकोस.”

 

माधवरावही जवळ आले आणि शर्वरीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले,

 

“शर्वरी, या जगात लोक काय म्हणतात याला महत्त्व द्यायचे नसते. तू आमचे अस्तित्व आहेस. तुझा स्वाभिमान आणि तुझे आनंद हेच आमचे ध्येय आहे. तू कधीही स्वतःला एकटे किंवा अपराधी समजू नकोस.”

 

शर्वरीने सासू-सासऱ्यांकडे पाहिले. तिच्या डोळ्यांतील अश्रू आता दुःखाचे नव्हते, तर कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे होते. या कलंकित आणि जुनाट रूढींनी भरलेल्या समाजात तिला असे सासू-सासरे मिळाले होते, जे तिचे रक्षक बनून उभे होते.

 

तिने आपले अश्रू पुसले. कपाळावरील ती छोटी तांबडी टिकली अजूनही चमकत होती—शोक आणि वैधव्याच्या अंधारावर मात करणाऱ्या एका नव्या पहाटेच्या आशेसारखी!

 

शर्वरी पुन्हा एकदा हसली. ती आत गेली आणि साकेतच्या फोटोसमोरील दिवा नीट केला. तिने मनातल्या मनात म्हटले, “साकेत, तू जिथे कुठे असशील तिथे खुश राहशील… कारण तुझी ही शर्वरी एकटी नाही, आणि ती कधीही हार मानणार नाही.”

 

घराच्या अंगणात वाळत घातलेली फुले वाऱ्याने हलत होती, आणि वाड्याच्या भिंतींवर एक नवी, प्रकाशमय सकाळ पसरत होती.

 

समाप्त.

ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा इथे वाचा 👇

अहंकार

माझी बायको नोकर नाही.

वेळीच नाही म्हणायला शीक – भाग १

स्वीकार – भाग २ (अंतिम भाग)

 

 

©® आरती निलेश खरबडकर.

Leave a Comment